मंदार मोरेश्वर जोगळेकर

पाश्चात्त्य देशांमध्ये संस्कृतीचं जतन, संवर्धन या गोष्टींवर भर दिला जातो. अगदी बारीकसारीक घटना-घडामोडींच्या आठवणी, तसंच जुन्या काळातल्या गोष्टी जपून ठेवण्याची सवय या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसते. आपल्याकडेसुद्धा ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. वेदकाळापासून मौखिक परंपरेतून साहित्य जपलं गेलं आणि नंतर शिलालेख, भूर्जपत्रं, छपाई वगैरे वेगवेगळ्या तंत्रांच्या साह्यने ही जपणूक झाली. डिजिटायझेशन हे त्याचंच पुढचं रूप आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्या, दुर्मीळ आणि मौल्यवान साहित्याचं, संदर्भाचं आणि संस्कृतीचं जतन व संवर्धन उत्तम तऱ्हेने होऊ शकतं. आजच्या युगाच्या या तंत्राने जुन्या साहित्याच्या जतनाचं काम व्यापक प्रमाणावर करण्याची गरज आहे.

आपण यासाठी काहीतरी करावं असा विचार मनात आला. अमेरिकेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी उत्तम दर्जाचं डिजिटायझेशनचे काम करत असताना मिळालेला अनुभव मराठी साहित्यासाठी कसा वापरता येईल, या भूमिकेतून ‘बुकगंगा’ची निर्मिती झाली. त्यातून सुमारे पंधरा हजार मराठी ई-बुक्सची निर्मिती करण्यात आली. केवळ व्यावसायिकता न पाहता काही सामाजिक उपक्रमही राबविले.

‘किशोर’सारख्या मासिकाचे लहानपणापासून संस्कार होत होते. या मासिकाच्या जुन्या अंकांचं जतन करून पुढच्या पिढीला तो ठेवा बदलत्या युगाच्या माध्यमात उपलब्ध करून देता यावा, या भावनेतून ‘किशोर’चे संपादक किरण केंद्रे यांच्याशी चर्चा झाली. विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये शिकत असताना ज्या समाजाने आपल्याला मदत केली, त्या समाजाचं आपण देणं लागतो, या भावनेतून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ‘किशोर’च्या डिजिटायझेशनचं काम हाती घेतलं.

‘किशोर’ मासिकाच्या पहिल्या अंकापासून- म्हणजे नोव्हेंबर १९७१ पासूनचे ५५१ अंक- सुमारे ३० हजार पानांचं डिजिटायझेशन करायचं, हे खूप मोठं काम होतं. शिवाय नुसतं स्कॅन करणं एवढंच न पाहता त्याचा दर्जा उत्तम कसा राहील, वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर ते व्यवस्थित वाचता कसं येईल, आदी गोष्टींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्याआधी काही ठिकाणचे डिजिटायझेशनचे प्रकल्प पाहिले होते; पण त्यात दर्जापेक्षा केवळ स्कॅनिंग करण्यावरच भर होता. तसं होणार नाही याची काळजी आम्ही घेतली.

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यतल्या साखरप्यासारख्या माझ्या छोटय़ा गावात असलेल्या आमच्या ‘बुकगंगा युनिट’ने ‘किशोर’च्या डिजिटायझेशनचं काम केलं. आमच्या या युनिटद्वारे या छोटय़ा गावातल्या मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होते. आमच्या या क्षेत्रातल्या अनुभवाच्या जोरावर ‘किशोर’चं काम दर्जेदार पद्धतीने पार पडलं. आजपर्यंत जवळपास १५ लाख वाचकांनी हे अंक वाचले आहेत. काम उत्तम झाल्याचीच ही पोचपावती आहे. एकीकडे आपण वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची ओरड ऐकतो; पण वाचकांना त्यांच्या माध्यमात साहित्यउपलब्ध केलं तर त्यांची वाचनाची भूक मोठी आहे हे वास्तव आहे, हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

‘किशोर’च्या टीमबरोबर काम करण्याचा अनुभव खूप सकारात्मक होता. त्यांच्याकडून सर्व प्रकारचं सहकार्य मिळालं. त्याआधी आम्ही ‘वाङ्मयशोभा’ मासिकाचं डिजिटायझेशन केलं होतं. नंतर ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचंही डिजिटायझेशन आम्ही केलं. या प्रकल्पांतर्गत डिजिटायझेशन केलेले ‘किशोर’चे जुने अंक http://kishor.ebalbharati.in/Archive या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. नवे सर्व अंकही या लिंकवर उपलब्ध होत आहेत. ‘किशोर’साठी अनेक दिग्गजांनी लेखन केलं आहे, चित्रं काढली आहेत. त्यांचं ते दर्जेदार साहित्य लेखक आणि चित्रकारांच्या नावाने सहज  शोधता येईल असा उपक्रम यापुढे हाती घेण्यात येणार आहे.

२०२० या वर्षांने डिजिटल विश्वाची निकड तीव्रतेने जाणवून दिली. मुलांच्या हातात मोबाइल हे चित्र आता सगळीकडे दिसतं आहे. म्हणूनच ‘किशोर’चं अ‍ॅप तयार करण्याचाही मानस आहे. त्यामुळे जगभरातल्या मुलांसाठी दर्जेदार मराठी बालसाहित्य उपलब्ध होऊ शकेल. डिजिटायझेशनमुळे अमेरिका, युरोप, सिंगापूर अशा देशांमध्ये चालवल्या जाणाऱ्या मराठी शाळांमध्येही ‘किशोर’ मासिक सहजी उपलब्ध करून देणं शक्य झालं आहे.

तमिळ, हिंदी, बंगाली अशा भारतीय भाषांचा विचार करता ई-बुक स्वरूपात साहित्य प्रकाशित करण्यात मराठी भाषा आघाडीवर आहे. मात्र, मराठीतलं एकंदर साहित्य पाहता अजून डिजिटायझेशन या क्षेत्रात कितीतरी मोठी मजल मारण्याची गरज आहे. ‘किशोर’सारखीच इतरही अनेक मासिकं, नियतकालिकं आहेत, की ज्यांचं जतन होणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी या क्षेत्रातल्या कितीतरी हातांनी पुढे येण्याची गरज आहे. एखाद् दुसऱ्या संस्थेच्या आवाक्यातलं हे काम नव्हे.. एवढं विपुल साहित्य मराठी भाषेत जुन्या काळात निर्माण झालेलं आहे. आम्ही आमच्या परीने यात काम करत आहोतच; पण आणखी कोणी अशा प्रकारचे डिजिटायझेशन प्रकल्प राबवू इच्छितात, गांभीर्याने काम करू इच्छितात, त्यांना साहाय्य व मार्गदर्शन करायला आम्हाला नक्कीच आवडेल.

(संस्थापक, बुकगंगा डॉट कॉम)

wmandar@joglekar.com