|| नीलेश निमकर

आज शाळेअभावी मुलांना शिक्षण घेता येत नाही अशी परिस्थिती निदान महाराष्ट्रात तरी नाही. मात्र, शैक्षणिक गुणवत्तेबद्दलचा प्रश्न आता भेडसावतो आहे. काही प्रयोगशील व्यक्ती आणि संस्था ‘आदर्श शिक्षणा’चे प्रयोग आपापल्या परीने करीत असले, तरीही गुणवत्तावाढीचे ते ‘रोल मॉडेल’ विविध कारणांस्तव सार्वत्रिक पातळीवर राबवणे अशक्य आहे. त्यामुळे देश-काल-परिस्थितीनुसार त्या- त्या ठिकाणी आवश्यक त्या लवचीक धोरणातूनच शैक्षणिक गुणवत्तावाढीचे सार्वत्रिक प्रयोग करावे लागतील.

गेली काही वर्षे शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्तेचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसते आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी शिक्षण क्षेत्रात प्रत्येक मुलापर्यंत शाळा कशी पोहोचेल याबाबतची चर्चा मध्यवर्ती होती. या काळात शाळेचा अभाव भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अस्थायी, अनौपचारिक रचना प्रयत्नशील होत्या. पण शाळांच्या अभावाचा हा प्रश्न आज बऱ्याच अंशी सुटलेला दिसतो. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर खेडोपाडी पसरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातींतील (रळ) मुलासांठी चालविण्यात येणाऱ्या व सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातींतील (रउ) मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा, ‘आंतरराष्ट्रीय’ असे विशेषण असणाऱ्या शाळा, मुख्य प्रवाहाला समांतर चालणाऱ्या, ‘प्रयोगशील’ म्हटल्या जाणाऱ्या शाळा अशा विविध प्रकारच्या शाळांचे जाळे राज्यभर पसरलेले दिसते. परिसरात शाळाच नाही म्हणून मुलाला शिक्षण घेता येत नाही अशी स्थिती आता अपवादात्मक ठिकाणीच आहे. मात्र, याचा अर्थ राज्यात शालाबाह्य़ मुलेच नाहीत असा नाही; पण ती शाळेबाहेर असण्याचे कारण शाळांचा अभाव हे नक्कीच राहिलेले नाही. शाळांचे इतके विस्तृत जाळे उभे राहिल्यावर साहजिकच आता त्यांच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे काय याबाबत शिक्षणकर्मीमध्ये बरीच मत-मतांतरे असली तरी आपल्या शिक्षणव्यवस्थेतून मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता फारशी बरी नाही याबाबत मात्र बहुतेकांत एकमत दिसून येते. अगदी ढोबळमानाने बोलायचे झाले तर गुणवत्तेसाठी काम करणाऱ्यांत दोन विचारप्रवाह दिसतात. एक विचारप्रवाह निष्पत्तीला आणि मूल्यमापनाला महत्त्व देतो, तर दुसरा शिक्षणाच्या प्रक्रियेला! निष्पत्तीला महत्त्व देणारा विचार मानणाऱ्यांचे म्हणणे असे की, एखाद्या इयत्तेत मुलाला नेमके काय आले पाहिजे याबाबतची निश्चिती केली तर वर्गात नेमके काय करायचे यात स्पष्टता येईल. त्यामुळे शिकण्यातून काय घडायला हवे, हे शक्य तितक्या साध्या शब्दांत व नेमकेपणाने मांडायला हवे व मुलांना ते येते आहे की नाही हे तपासत राहायला हवे. असे केल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल. तर शिक्षणप्रक्रियेला महत्त्व देणारा विचार मानणाऱ्या लोकांचे म्हणणे असे की, शिकणे ही एक प्रक्रिया आहे. रोज वर्गात काय घडते, मुलांना कशा प्रकारचे अनुभव मिळतात, शिक्षक त्यांना विचार करायला प्रवृत्त करतात का, त्यांना किती स्वातंत्र्य आहे यावर मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून आहे. वर्गातील ही प्रक्रिया बळकट झाली तर निष्पत्ती आपोआप साध्य होतील. या दोन्ही विचारांची तुलना केली तर सहजच लक्षात येईल की, पहिला विचार जास्त सुटसुटीत, वस्तुनिष्ठपणे तपासण्याजोगा आहे, तर दुसरा त्या तुलनेत अधिक गुंतागुतीचा व तपासून पाहायला अवघड वाटणारा असा आहे. आता या पाश्र्वभूमीवर ज्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण चालते असे मानले जाते, त्या नेमके काय करतात हे पाहणे उद्बोधक ठरेल.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नमुने शिक्षकांनी व शिक्षणात काम करणाऱ्या संस्थांनी उभे केलेले दिसतात. यात जसे शासकीय यंत्रणेच्या मर्यादेत राहून काम करणारे अनेक शिक्षक व अधिकारी आहेत, तसेच व्यवस्थेच्या बाहेर राहून काम करणाऱ्या काही अशासकीय संस्था आणि प्रयोगशील शाळादेखील आहेत. या सर्वच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कामांत काही समान धागे आहेत. सार्वत्रिक गुणवत्तेच्या प्रश्नाचा विचार करताना हे समान धागे समजून घेणे उपयुक्त ठरेल.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे हे सर्वच नमुने उभे करण्यामागे काही विचारशील, प्रयोगशील अशा व्यक्ती आहेत. ‘अक्षरनंदन’ किंवा ‘कमला निंबकर बालभवन’ यांसारख्या प्रयोगशील मानल्या जाणाऱ्या शाळा असोत, नाही तर ‘कुमठे बीट’सारखा शासकीय यंत्रणेत राहून केला गेलेला प्रयोग असो; त्यामागे कुणी एक व्यक्ती किंवा एखादा लहानसा गट भक्कमपणे उभा असतो असे दिसते. अगदी मुख्य धारेतील शाळांमध्ये सेवा बजावत असताना आपापल्या वर्गात शिक्षणाचे अभ्यासनीय नमुने उभे करणारे शिक्षकही बहुधा स्वप्रेरणेनेच काम करत असतात आणि त्यांचे काम त्यांच्या त्यांच्या विचारांतून उभे राहिलेले असते. या सर्वच व्यक्तींचे काम अभ्यासले तर सहजच लक्षात येते की, त्यांनी निष्पत्तीला व मूल्यमापनाला महत्त्व देणारा विचार व प्रक्रियेला महत्त्व देणारा विचार यांचा समन्वय त्यांच्या कामात साधला आहे. ही सर्व मंडळी  वर्गातर्गत प्रक्रिया बळकट करण्यावर काम करतात व आपल्या कामाचा काय परिणाम झाला याचे वेळोवेळी मूल्यमापनही करत राहतात.

या प्रयोगांबाबत अजून एक बाब विचारात घ्यायला हवी, ती म्हणजे यातले कुठलेच काम दोन-पाच महिन्यांत किंवा एखाद्या वर्षांत उभे राहिलेले नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत व सातत्य आहे. या कामाच्या कर्त्यांनी एखादा निश्चित विचार घेऊन केलेल्या दीर्घकालीन प्रयत्नांतून हे काम उभे राहिले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या या बहुतेक नमुन्यांत स्थानिक परिस्थिती, मुलांची पाश्र्वभूमी यांचा सखोल विचार केलेला दिसतो. हा विचार त्यांच्या यशापयशातील एक महत्त्वाचा घटक आहे. मूल व त्याचा स्थानिक सांस्कृतिक परिवेश याबाबत संवेदनशील राहून शिकण्या/शिकवण्यात योग्य ती लवचीकता आणणे हे सूत्र बहुतेक ठिकाणी पाळलेले दिसते.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या या नमुन्यांतील वर उल्लेखिलेले समान धागे पाहिले तर लक्षात येते की, या कामांची बलस्थानेच  सार्वत्रिकीकरणाच्या वेळी त्यांची मर्यादा ठरतात. लहान प्रमाणात काम करत असताना उपलब्ध असणारा वेळ व संसाधने व्यवस्थेच्या पातळीवर काम करताना उपलब्ध असतातच असे नाही. गुणवत्तेच्या या लहान प्रमाणांवरील प्रयोगांत जी जबाबदारी त्यांच्या कर्त्यां व्यक्तींनी वा गटांनी घेतलेली असते ती व्यवस्थेच्या पातळीवर शासकीय संस्थांवर येऊन पडते. आज तरी तालुका पातळीवरील इफउ वा जिल्हा पातळीवरील ऊकएउढऊ यांसारख्या संस्था ही जबाबदारी पेलायला पूर्णपणे समर्थ आहेत असे दिसत नाही. एकतर ढाच्याच्या पातळीवर त्या बऱ्याच कमकुवत आहेत. शिवाय तिथे काम करणाऱ्या व्यक्तींच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी म्हणावे तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.

आधी झालेल्या कामांतून शिकून आपण अधिक वेगाने काम करू शकतो हे खरे; पण तरीही अनेक वर्षांचे काम आपण एखाद् दोन महिन्यांत करून दाखवू, असे म्हणणे हे केवळ अनाठायी आत्मविश्वासाचेच नाही, तर अज्ञानमूलकही आहे असे म्हणावे लागेल. खरे तर एखाद्या कल्पनेच्या सार्वत्रिकीकरणात लहान प्रमाणात काम करताना आलेले प्रश्न मोठय़ा प्रमाणावर काम करताना सोडवावे लागतातच; शिवाय लहान प्रमाणावरील प्रयोगांत न आलेले असे व्यवस्थेचे प्रश्न अशा वेळी कळीचे ठरतात. एखादी कल्पना ५० जणांना समजावून  देणे आणि ५००० जणांना समजावून देणे यातला फरक केवळ संख्यात्मक नाही, तर गुणात्मकदेखील आहे हे लक्षात घ्यायला लागते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या ठिकाणी झालेले काम हे जसेच्या तसे उचलून दुसऱ्या जागी लागू करता येत नाही. उदाहरणार्थ, जिथे मुलांची घरची भाषा शाळेच्या भाषेला अगदी जवळची आहे अशा पश्चिम महाराष्ट्रात केलेला एखादा भाषाशिक्षणाचा प्रयोग आदिवासी भागात जसाच्या तसा करता येत नाही. कारण तिथे मुलांच्या घरच्या व शाळेच्या भाषेतले अंतर हा मुद्दा निर्णायक ठरतो. संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाला तर सर्वत्र शिकणाऱ्या मुलांची परिस्थिती काही एकसारखी नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची योजनादेखील एकजिनसी असणे शक्य नाही. याबाबत महाराष्ट्रात माँटेसरी पद्धतीचे शिक्षण सुरू करणाऱ्या ताराबाई मोडक यांचे काम लक्षात घेण्याजोगे आहे. कोसबाडसारख्या आदिवासी भागात काम करताना ताराबाईंनी माँटेसरी पद्धतीत स्थानिक गरजा लक्षात घेऊन कालसुसंगत असे अनेक बदल केले व त्यातून अधिक लवचीक अशी शिक्षणपद्धत उभी राहिली. खरे तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा एकच नमुना सरधोपटपणे सार्वत्रिक करणे योग्य नाही. तर यशस्वी मानल्या गेलेल्या शिक्षणातील नमुन्यांमागचा विचार, त्यांच्यातील सातत्य व लवचीकता कशी सार्वत्रिक होईल याचा विचार करायला हवा.

दीर्घकालीन नियोजन हा गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणाचा कणा असेल. तालुका व जिल्हा पातळीवरील शैक्षणिक संस्थांना स्थिर व बळकट कसे करता येईल याचा कार्यक्रम ही या नियोजनाची सुरुवात असायला हवी. सार्वत्रिक गुणवत्तेच्या कामात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांच्या निरंतर व्यावसायिक विकासाची प्रभावी व्यवस्था उभारणे हे आता तातडीचे झाले आहे. आज मुलांना डिजिटल तंत्रज्ञान वापरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा बराच बोलबाला आहे. नजीकच्या भविष्यात शिक्षकाऐवजी टॅब किंवा तत्सम यंत्रेच मुलांना थेट शिकवतील अशी मांडणी अनेक जण करताना दिसतात. तंत्रज्ञानावर अतिविश्वास आणि शिक्षकांवरील अविश्वास या दोन्ही बाबी या प्रकारच्या मांडणीमागे आहेत. जेव्हा एखादी गोष्ट प्रचंड मोठय़ा प्रमाणावर करायची असते तेव्हा तंत्रज्ञानाचा वापर हा फायद्याचा ठरतो, हे नक्कीच. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकाला पर्याय म्हणून करायचा की शिक्षकाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी करायचा, हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. विमानोड्डाणासारख्या प्रगत शास्त्रात ऑटो-पायलटसारखे तंत्रज्ञान येऊनही अजून आपण पायलटस्ना रजा दिलेली नाही, हे लक्षात घेता शिक्षणासारख्या सामाजिक शास्त्रात माणसाचे काम यंत्र करेल असे मानणे आज तरी स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर शिक्षकांच्या निरंतर व्यावसायिक विकासासाठी व त्यांचे काम सोपे करण्यासाठी कसा करावा, हा विचारच नजीकच्या भविष्यात गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण होण्याला हातभार लावू शकेल असे दिसते.

nilesh.nimkar@quest.org.in