News Flash

मन तुमुल कोलाहल

उद्याचा विचार आजच्या अस्तित्वाइतकाच निर्थक आहे. अन् माझ्यासमोर हेलकावे खात  गळून पडणारं पान तरीही वाळक्या देठाच्या आकडय़ानं पन्हाळीला लटकतं आहे.

प्रखर पिवळे ऊन आहे. हिरवळ आता म्लान आहे. जांभळीचे झाड तीवर सावलीचे ठिपके पाडत उभे आहे. खिडकीतून ठिपके पाहताना हिरवळ हसल्याचा भास होतो.

गिरीश पांडुरंग कुलकर्णी – girishkulkarni1@gmail.com

उद्याचा विचार आजच्या अस्तित्वाइतकाच निर्थक आहे. अन् माझ्यासमोर हेलकावे खात  गळून पडणारं पान तरीही वाळक्या देठाच्या आकडय़ानं पन्हाळीला लटकतं आहे. त्यानं देह ठेवलेला नाही.. झाडानं विरक्ती साधली  केव्हाच. मात्र, पानाचं लागट लटकणं सहज संपत नाही. सकाळी खिडकीतून बाहेर पाहताना उन्हाच्या ताज्या कवडशांसवे रिंगण करीत पडून राहिलेली ही कलेवरं हिरवळीवरचा कचरा आहेत. उंच जांभळाच्या पानपसाऱ्यात वरती हलकी सळसळ आहे. मी वर पाहतो. अजूनही वर असलेली सत्वहीन पिवळी गळीची पाने  जिवंत सळसळीच्या दंशाच्या टप्प्यात, पण बेदखल आहेत. त्यांचे लगावदार देठआकडे वाळून ताठर झाले आहेत. मी कमरेत मोडून झाडू लागताच वर सळसळ फिरते. फिरत राहते. दर वेळी मी दचकतो. माझ्या पुढय़ात नवा कचरा गाळणाऱ्या जांभळीकडे घाबरून पाहतो. त्याच्या विरक्तीत माझ्या नावचा कुठलाच आकडा नाही. मला त्यानं जमेस धरलेलं नाही. वरती अडकल्या पिवळ्या पानांनाही माझा दिलासा वाटत नाही. त्यांचं प्राक्तन सळसळीशी बांधून जाणारा वाराही  तसाच.. बेगुमान. त्याला माझ्या मणक्याची फिकीर नाही. मी झाडतोच आहे सारा कचरा. हिरवळ निर्मळ एकरंगी दिसण्याचा माझा अट्टहास मला  क्षुल्लक करतो आहे. अवचित नाचून गलबला करणारा एक अन् टवकारून फांद्या निरखणारा एक, एकत्र कधी, कधी एकेकटय़ानं लक्ष वेधून घेत आहेत. पक्ष्यांठायी कुतूहल आहे?  नाचऱ्या मूठभर देहात आनंद आहे? मला निबंधाकरताही पक्षी व्हावंसं वाटलेलं नाही. मात्र, ही निर्हेतुक निव्र्याजता मोहक आहे. मी विसाव्यासाठी थांबलो असता त्यांचं गाणं ऐकतो. त्यांना पाहतो. आज ते अधिक आनंदी आहेत. मला बेसावध गाठत सळसळ पुन्हा फिरते. पाने गळतात. मी परत वाकतो. झाडू लागतो. सळसळीला नियम नाहीच. तिचं सारं अस्तित्व वाऱ्याअधीन आहे. तरीही ती जिवंत आहे. मला मात्र पराधीन असणं मानवत नाही. मी त्रस्त होऊन पसारा झाडत राहतो. मला करण्यासारख्या उरलेल्या काहीच गोष्टी आहेत. झाडून सलग केलेली हिरवळ दुपारची सुस्ती लेऊन पडून राहते. तिला स्वत:च्या सलग सौंदर्याची आस नाही. वाऱ्याबद्दल तिची तक्रार नाही की पडणाऱ्या पानांबद्दल माझ्यासारखा आकसही नाही. पक्ष्यांना हिरवळीच्या या सौंदर्याची जाणीव नाही. लहानखुऱ्या रंगीत रोपटय़ांशी लडिवाळ लहरणाऱ्या फुलपाखरांमध्ये पक्ष्यांसारखीच धुंदी आहे. वारा पडला आहे. उष्म्यानं श्वास रोखून हिरवळीचं चित्र ताणून धरलं आहे. सळसळीची भीती लपून मनात पाझरते आहे. अचानक आभाळभर आवाज करीत अनिश्चितता जांभळीच्या पानगाळणीतून टपटपू लागते. टपोऱ्या थेंबांचं झाडातून निथळणं काही दिवसांनंतर गळणाऱ्या जांभूळफळासारखं हरखून टाकणारं आहे. स्वच्छ सलग हिरवळीला रोपांची महिरप आहे. त्यांच्या पानांचे रंग पाण्यात मिसळत आहेत. कष्टाला लगडलेलं हे सुखाचं फळ आहे अशी माझी समजूत होत असता अवचित आठवण काढल्यासारखा वारा घाईनं येतो. दडून बसलेली भीती त्याला पहायला पिवळ्या पानांच्या घुमावदार हेलकाव्यातून समोर साकार होते.  फिकट, धुळकट पिवळी पाने रोपांच्या माथ्यावर, खांद्यांवर, हिरवळीच्या सर्वागावर आता उतरली आहेत. जीवनेच्छेच्या हिरव्या चित्रावरचे सर्वत्र उठलेले हे डाग माझ्या शरीरात थकवणारा ज्वर पसरवत आहेत. मी वर पाहतो. विरक्त जांभळीची हिरवी पाने नुकत्या नहालेल्या करडय़ा फांद्यांशी लाडिक लगट करीत आहेत. एरवी नाचून गलबला करणारा तो एक मूठभर हसून शीळ घालतो आहे.

***

प्रखर पिवळे ऊन आहे. हिरवळ आता म्लान आहे. जांभळीचे झाड तीवर सावलीचे ठिपके पाडत उभे आहे. खिडकीतून ठिपके पाहताना हिरवळ हसल्याचा भास होतो. डोळे निववणाऱ्या गडद हिरव्या सावलीचे पुंजके आल्हाददायक आहेत. उकाडय़ाच्या काहिलीत आता वाऱ्याचे आर्जव आहे. मी हलक्या पावलांनी हिरवळीवर येतो. वर पाहतो. तो फांद्या निरखित उडय़ा मारणारा एक उंच शेंडय़ावर पानाआड दडला आहे. मला तो दिसत नाही. मात्र तिथे असल्याची साक्ष देणाऱ्या उडय़ा तो मारतो आहे. मी मानेचा काटकोन करीत त्याला पाहण्याचा अट्टहास करतो आहे. त्याच्या उंच जाऊन बसण्याने मला डिवचल्यासारखे होते. माझ्या इच्छेचा त्या पक्ष्यावर ताबा नाही. वारा यावा असे वाटत असता तो येत नाही. मी मान वळवून सावलीचे ठिपके मोजत झाडाच्या बुंध्याला टेकतो. खोड जुने आहे. त्याची साल सुरकुतलेली आहे. सुरकुत्यांवर हात फिरवत असता हसऱ्या गुदगुल्यांनी घामेजलेला तळवा भरून जातो आहे. आजीच्या भेगांना तेल लावल्याच्या आद्र्र आठवणींनी डोळे भरून येतात. मी वर पाहतो. तो मूठभर टकमक्या बराच खाली येऊन मला दिसत फांद्या निरखत असतो. एक स्तब्ध क्षण तयार होत असताना एकाएकी तो शेपटी उडवीत तीव्र आळवणी करतो.. करत राहतो. झोप मोडल्याप्रमाणे जांभळीचं झाड घुसळत जागं होतं अन् सगळीकडे वाराच वारा भरतो. त्या सुखद झुळकांचा दिलासा देऊन टकमक्या भुर्र्र उडून जातो. घुसळणीतून हुसकावून लावलेली लागट पिवळी पाने चक्राकार फिरत हिरवळीवर पसरतात. मी पावलांनी हिरवळ गोंजारत एकेक पान गोळा करू लागतो. उन्हाच्या तुकडय़ात त्यांचे ढीग लावतो. शेवटचे पान बोटात त्याचे देठ अडकवून माझ्या तळव्यातली माया जागवते. बोटातून सोडवून ढिगावर टाकताना मला भरून येतं. मी घाईनं घरात येतो. हात धुऊन तळव्यात दाटलेली माया कोरडी करतो. खिडकीतून पाहताना त्या सलग हिरव्या चौकटीवरच्या पिवळ्याधमक पानराशी चमकदार गोंदण भासतात. मी हसतो. वर पाहतो. हिरव्या पानांची लाजरी लवलवही गर्भार थकव्याने क्लांत  हसताना भासते.

***

आता खिडकी बंद आहे. बाहेरही अंधार आहे. घरात साथीच्या आजाराच्या बातम्यांचा कोलाहल आहे. माणसांच्या चेहऱ्यावर मुस्क्या बांधल्या आहेत. मुस्क्या बांधलेल्या माणसांची चित्रे केविलवाणी आहेत. सज्जातून रस्ता खाली हमरस्त्याकडे गेलेला दिसतो. एरवी अपरात्रीच गल्लीत फिरणारी पाळीव, पण फिरस्ती कुत्री आता रस्त्यात मधेच बसून आहेत. अजून रात्र झालेली नाही. कुत्र्यांना साथीच्या आजाराची खबरबात नाही. रस्त्यावरून दिसेनाशी झालेली माणसे घाबरून घरात बंदोबस्तात बसली आहेत. अचानक मोकळा मिळालेला रस्ता पाहून कुत्र्यांच्या आवाजात मोकळेपणा आला आहे. काळे मांजर निर्विकार अन् भयकारक आहे. त्याचा पायरव ऐकू येत नाही. माणसांच्या लुप्त झालेल्या वावराने मांजराचे हिरवे डोळे आवारात वारंवार लकाकत आहेत. बातम्यांतली अन् घरातली माणसे उद्याच्या शंकांनी ग्रस्त आहेत. त्यांच्या तुस्त सुखावरची साय तडकली आहे. एरवी ऐट मिरवण्याकरिता उपयोगी येणारी दांडगी वाहने धूळ साचवीत उगी उभी आहेत. त्यांच्या गळ्यात गुरांसारख्या घंटा नाहीत. मालकही पाठीवर हात फिरवीत नाही. त्याला वाहनांच्या निर्जीव असण्याबद्दल शंका नाही.

आता सारे अचेतन झाल्याप्रमाणे स्थिर होते आहे. घराघरातील दिवे अंधाराला शरण गेल्यावर मांजराच्या डोळ्यांनी अंधार चहूकडे लक्ष ठेवून आहे. सज्जाच्या समोर उभे बदामाचे झाड घाटदार पाने पसरून अंधाराचा रंग बदलते आहे. शेजारी काटेरी फणस लेऊन उभे फणसाचे झाड आहे. लहान फणस बाळसेदार अन् तुकतुकीत काटेदार आहेत. ऐकू येण्याइतकी आता शांतता प्रखर आहे. झोपी जाण्याच्या धडपडीत व्यग्र माणसे ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या जेवणानंतर ऐकलेल्या बातम्यांमध्ये गुंतून पडली आहेत. घरात घुसलेला अंधार बाहेरच्या काळोखाशी संधान बांधून माणसांना सतत पडणाऱ्या स्वप्नांमध्ये भीती मिसळत आहे. बदाम, फणस, कुत्रा अन् हिरव्या डोळ्याचे मांजर यांना स्वप्ने पडणाऱ्या माणूसपणाची आस नाही. त्यामुळेच ती सारीच निर्धास्त आहेत. गडद निजेच्या सातखणी वाडय़ात स्वप्नांचे सप्तरंगी लोलक फिरवीत मश्गुल झोपणारा मी टक्क जागा आहे. टपकन् गल्लीच्या डांबरी सडकेवर पडलेला लाल टणक बदाम घरात अडकल्या माणसांची भीती वाढवतो आहे. वारा केव्हाचा पडला आहे. डोईवर फिरणारी पंख्याची पाती स्वत:भोवती निश्चित गतीनं भोवंडत आहेत. पहाटपाखराची वाट पाहत अवघे भय ओथंबले आहे. तरीही या साऱ्या असण्याचे अप्रूप वाटत आहे.

***

ही शुभ्र ताजी सकाळ आहे. खिडकीसमोरच पलीकडच्या कुंपणातल्या चाफ्याची फुलून आलेली फांदी दिसते आहे. पांढऱ्या पाकळ्या पिवळ्या गाभ्याभोवती फेर धरून आहेत. मी बाहेर येतो. चाफ्याकडे जावंसं वाटत असताना हलकेच लहरणारी नागवेलीची वेल लक्ष वेधते. कुठूनसा टकमक्या येतो. टकमक बघत राहतो. मी नागवेलीपाशी आहे. ती हिरवीकंच इवली पाने  तळहाती घेऊन मी त्यांचं कौतुक करतो. काही थोडं बोबडं  बोलतो. पिवळ्या पानांचे ढीग उचलून पोत्यात भरतो. पोत्यात हात दाबला असता पानांचा पाचोळा होतो. मी वर पाहतो.  जांभळीची तेजाळलेली अंगकांती सुखावते आहे. हलका वारा आहे. हे जांभळाचे दिवस.  जांभळाला कुठलाही आजार नाही. आजाराच्या विचाराने मन  म्लान होते. मात्र तो मूठभर दुसरा येतो. मनमोकळं पुष्कळ गातो. टकमक्या इथेच असावा. गाणं ऐकून तोही येतो. रोपटय़ांशी फुलपाखरे नक्षीदार उघडमीट करीत आहेत. कुंपणाबाहेर रस्त्यालगत लावलेल्या शोभेच्या  रोपटय़ावर रात्री जागलेली पांढरीफेक कुत्री  झोपली आहे. मी दार उघडून गल्लीत येतो. कुत्री दचकते. मी तिच्या जवळ बसतो. तिला अचानक ही सलगी समजत नाही. ती अंतर ठेवते. दुमडून गेलेलं रोपटं मी सरळ करतो. आधाराला इवल्या बुंध्याशी ढेकूळ लावतो. कुत्री हे पाहते आहे. ती काही न बोलता निघून जाते.

***

आता दुसरीच उत्तररात्र आहे. दिवस अन् रात्री माणसे घरीच आहेत. पलीकडच्या इमारतीच्या खिडकीत तरुणी बसली आहे. उष्म्यामुळे तोकडे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य ती मुक्त लेऊन आहे.  तो देह माझ्या नजरेच्या टप्प्यात आहे. त्या  वळसेदार, किंचित स्थूल शरीरात तृप्ती आहे. अंधारातली स्त्रीआकृती सज्जात येताच वासना जागवते. पांढरी कुत्री खालून ओळखीचं पाहते आहे. मी उगाच उभा राहतो. मनात तुंबळ माजली आहे. विचारांचा कोलाहल निद्रिस्तांची झोप मोडेल कदाचित. पण त्याहीपेक्षा मलाच मोडेल.   हे काय आहे? माझ्या भीतीचे मूळ कोण निखंदेल? मी हस्तमैथुन करतो आहे. वासनेच्या आवेगात भीती दडपली जाते आहे. शरीर दमवून झोपी घालायचे आहे. माझ्या अर्थहीन अस्तित्वाची लक्तरे पाहत फणस मूक उभा आहे.  कुत्री स्वभावशील इमानानं वरती पाहते आहे. मी माझ्या तर्काचा निचरा करणाऱ्या उत्सर्गाच्या  उत्कंठेत आहे.

***

हा दिवस नवाच आहे. कुंपणापलीकडच्या रस्त्यावरून आजी जाते आहे. वृद्धांना आजाराची भीती जास्त आहे. चालणारी आजी माझी नाही. माझ्या आजीच्या मृत्यूला वर्षे लोटली आहेत.  तरीही मी निर्धास्त नाही आहे. तिच्या अंत्यविधीला जाताना मला अपघात झाला. मी तिला विरून जाताना पाहिलेलं नाही. मी गल्लीत येतो. कुत्री रोपावर झोपली नव्हती. ढेकूळ तसेच बुंध्याशी लगडून आहे. आजी दिसेनाशी होत नाही. गल्ली लांब उताराची आहे. तरुणीच्या खिडकीभर पडदा आहे. खिडकीच्या झापेवर कावळा आहे. तो ओरडतो सर्वसाधारणपणे.  पाहुणा येण्याची सुतराम शक्यता नाही आहे.  कुणीच कुणाकडे जाऊ-येऊ शकत नाही. माणसे  एकेकटय़ानं अर्थ शोधत आहेत. आजी हमरस्त्याशी जाऊन परतली आहे. ती माझ्यापाशी ओळखीचं थांबते. सगळीच देवळं बंद आहेत.  देवाचा या दिवसात उपयोग नाही. आजीला देवाचं खूप करावं लागलं आहे. ती आता मुक्त आहे. गुलाबी पडदा सारून तरुणी आम्हा दोघांकडे खाली पाहते आहे. मी नजर जाताच अपराधी ओशाळतो डोळ्यांत. ती सिगारेटचा झुरका हवेत सोडून निव्र्याज हसते. मला आजीचा हात तळव्यात घ्यावासा वाटतो आहे. आजीला आधाराची गरज नाही. ती चढ चढून घरी जाते. मी बाळफणसाचे काटे कुरवाळून आत येतो.

***

आता मी तसाच आहे. माझा भवताल आजारमुक्त आहे. त्यानं मला हळूहळू स्वीकारलं असावं. टकमक्या आता फार लपत नाही. कावळा कुंपणाअलीकडे माझ्या खिडकीच्या झापेवर येतो. नागवेल जवळ जाताच बोबडं बोलते आहे. जांभळीच्या खरखरीत, वृद्ध बुंध्यावर तळवा रमतो आहे. तर्काचे आडमुठे  पान न् पान गळत आहे. अर्थाची तगमग आस विझून निवते आहे. ती हलक्या पावलानं हिरवळीवर येते. मला कुशीत घेते. इतका वेळ ती होतीच. मला आता दिसते आहे. हिरवळीवर आम्ही पहुडलो आहोत. अर्थव्यवस्थेच्या, आजाराच्या बातम्या ऐकत माणसे भय साचवत   बसली आहेत. तिच्या कुशीत माझे अर्थशोधाचे भय लोपते आहे. बोटात अडकले पिकले पान आजीगत मऊ होते आहे. स्थलांतरित मजुरांच्या तांडय़ाची भूक पोटात उगवते आहे. माझ्या अर्थहीन अस्तित्वाची शांत दखल आकार घेत आहे. ती नि:शब्द जवळ आहे.

मी डोळे उघडून पाहतो. ती हलकेच गुणगुणू लागते.. ‘तुमूल कोलाहल कलह में मैं हृदय की बात रे मन..’ मी हमसून तिच्या वत्सल स्तनांवर   विसावतो. ती गातेच आहे..

 

‘विकल हो कर नित्य चंचल

खोजती जब नींद के पल

चेतना थक-सी रही तब, मैं मलय की बात रे मन।

 

चिर विषाद विलीन मन की,

इस व्यथा के तिमिर वन की

मैं उषा-सी ज्योति-रेखा, कुसुम विकसित प्रात रे मन।

 

जहाँ मरू-ज्वाला धधकती,

चातकी कन को तरसती,

उन्हीं जीवन घाटियों की, मैं सरस बरसात रे मन।

 

पवन की प्राचीर में रुक,

जला जीवन जी रहा झुक,

इस झुलसते विश्वदिन की, मैं कुसुम रितुरात रे मन।

आता आभाळ निरभ्र निळे आहे.

माझ्या भयाचे कलेवर निचेष्ट आहे.

मी वर पाहतो.

जांभळीत प्रसन्न सळसळ आहे.

टकमक्या पानाआड पाहतो आहे.

वेदना संपवून जांभळीने हिरव्या इवल्या फळांचा घोस व्याला आहे.

गडद निजेच्या सातखणी वाडय़ात स्वप्नांचे सप्तरंगी लोलक फिरवीत मश्गुल झोपणारा मी टक्क जागा आहे. टपकन् गल्लीच्या डांबरी सडकेवर पडलेला लाल टणक बदाम घरात अडकल्या माणसांची भीती वाढवतो आहे. वारा केव्हाचा पडला आहे. डोईवर फिरणारी पंख्याची पाती स्वत:भोवती निश्चित गतीनं भोवंडत आहेत. पहाटपाखराची वाट पाहत अवघे भय ओथंबले आहे. तरीही या साऱ्या असण्याचे अप्रूप वाटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 1:03 am

Web Title: experience your beautiful surrounding dd70
Next Stories
1 ‘आम्हास आम्ही पुन्हा पहावे’
2 लॉकडाऊन काळातल्या तुटक नोंदी
3 रात्रंदिन युद्ध… (चीन)
Just Now!
X