04 July 2020

News Flash

फ७ = आहार आरोग्याचं बीज पारंपरिक शेतीत!

अनिताच्या कुणा तरुण नातेवाईकाचं कर्करोगानं निधन झालं. त्याच्या पत्नीला भेटून अनिता आणि नितीन माझ्याकडे आले.

| December 21, 2014 01:01 am

अनिताच्या कुणा तरुण नातेवाईकाचं कर्करोगानं निधन झालं. त्याच्या पत्नीला भेटून अनिता आणि नितीन माझ्याकडे आले. दोघंही खूप अस्वस्थ होते. ‘किती भीषण आहे अगं हा आजार! उपचारही जीवघेणे आणि खर्चीक! माणसांनी करायचं काय? बरं, इतकं करून माणूस हाताला लागेल याची काहीच शाश्वती नाही.’ अनिता उदासपणे म्हणाली.
‘ते डॉक्टर तर असं म्हणाले की, अजून पाच-दहा वर्षांत हा आजार सर्दी-पडशासारखा कॉमन होणार आहे म्हणे. हे खूप भयंकर आहे. यावर काही उपाय नाही का? नवीन संशोधन कमी पडतंय का?’ नितीन म्हणजे ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती..’
‘सगळ्या वैद्यकीय शाखांमध्ये यावर रग्गड संशोधन चालू आहे. पण हे संशोधन खूप महाग असतं. पर्यायानं त्यातून मिळणारे उपचारपण महाग. शिवाय इलाज जेवढा जहाल, तेवढे त्याचे दुष्परिणामही जहाल.’ मी म्हणाले.
‘आणि या आजाराचं कारण अजून सापडलं नाहीये ना!’ अनिताचा नि:श्वास.
‘असं काही नाही. ताजं सत्य वेगळं आहे. कॅन्सर निर्माण करणाऱ्या कितीतरी कारणांचा आता शोध लागला आहे. आपल्याभोवती केमिकल्सचा जो घट्ट विळखा पडलाय ना, तो सगळा कॅन्सर निर्माण करणाराच आहे. वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर, बांधकामात उडणारी सूक्ष्म धूळ, रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, जास्त दुधासाठी गायी-म्हशींना टोचलेल्या किंवा अन्नातून दिलेल्या हार्मोन्सचे दुधावाटे आपल्या आपल्या शरीरात जाणारे अंश, परफ्युम्स, डिओज, एअरफ्रेशनर्स, साबण, शाम्पू, डासांसाठीचे फवारे, टूथ पेस्ट, घरात वापरली जाणारी कीटकनाशके, सौंदर्य प्रसाधनं, एसी/फ्रीज यातून निघणारे वायू, मायक्रोवेव्हची किरणं, हवा-पाणी-अन्न यांच्या शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी प्युरिफायर्स, तयार अन्नात असणारी प्रीझव्‍‌र्हेटिव्ह्ज, काही आधुनिक औषधं .. काय नाही ते सांग. आपण उपयोगात आणत असलेली प्रत्येक वस्तू तपासून बघायची गरज आहे. आंधळेपणाने खरेदी करण्याचे दिवस आता संपले. अगं, परवा एका केमो घेतलेल्या रुग्णाला माझ्यासमोर रुग्णालयातून घरी आणलं. डॉक्टरनी -संसर्गजन्य आजार टाळा असा सज्जड दम भरलाय त्यांना. म्हणून रुग्ण घरात खुर्चीवर बसल्या बसल्या त्याच्या एका नातेवाईकानं त्याच्या हातावर सॅनिटायजरचे थेंब टाकले. का तर म्हणे, गाडीच्या दाराचं हँडल, सीट, फाइल्स- कुठे कुठे हात लागले असतील ना! इन्फेक्शन नको. पण त्या सॅनिटायजरमध्ये काही कॅन्सर करणारे घटक आहेत त्यांचं काय? माध्यमांनी आणि वैद्यकीय माहितीनं ‘इन्फेक्शन’चा एवढा मोठा ब्रह्मराक्षस उभा केला आहे आपल्यासमोर; की लोकांना त्याचीच प्रचंड भीती बसली आहे. त्यापुढे बाकीचा विचार सुचतच नाही.’ मी माहिती पुरवली.
‘हो, पण इन्फेक्शनचा विचारही आवश्यक आहे ना?’ नितीन बिचारा, नेटवरून माहिती मिळवून शंकासुर बनलेल्या पिढीचा प्रतिनिधी आहे.
‘मान्य. पण मी एक खूप साधा विचार करते. पटतो का बघ. आपलं शरीर ही निसर्गाची निर्मिती आहे. आपलं अन्न हीसुद्धा त्याचीच निर्मिती. (आता- आतापर्यंत होती.) इन्फेक्शन निर्माण करणारे यच्चयावत जीवसुद्धा त्या निसर्गाचीच पिल्लं. या दोघांशी मत्रीनं कसं वागायचं आणि वेळ पडली तर त्यांच्यापासून स्वत:चं संरक्षण कसं करायचं याचा एक ‘इनबिल्ट प्रोग्राम’ आपल्या शरीरात असतो. त्यामुळे जिवाणू-किटाणू यांना इतकं घाबरायचं कारण नाही. त्यांचा प्रतिकार शरीर व्यवस्थित, रचनात्मक रीतीनं करू शकतं. शरीर तेवढं बलवान राहील याची काळजी घेतली की झालं. याउलट केमिकल्स ही मानवानं निसर्गात केलेली अक्षम्य लुडबुड तर आहेच, शिवाय ती मानवी शरीराच्या ‘इनबिल्ट प्रोग्राम’चा भागही नाहीत. त्यांचं काय करायचं, हे शरीराला कसं कळणार? शरीराचा गोंधळ होतो. ज्या शरीराला जे सुचेल ते केलं जातं. त्यातून होणारा गुंता म्हणजे कॅन्सर. म्हणून माझ्याकडे सल्ला मागणाऱ्या माझ्या रुग्णांना मी नेहमी सांगते की, धान्य टिकवण्यासाठी केमिकल्सऐवजी बिब्बा, तिरफळ, एरंडेल तेल, कडुिनब याचा वापर करा. हे पदार्थ, किंवा इतकी काळजी घेऊनही निर्माण झालेला एखादा किडा पोटात गेला तर त्यांचं काय करायचं याबद्दल शरीर प्रशिक्षित आहे. पण केमिकल्सचं तसं नाही.’

‘खरंच गं. आपण निसर्गापासून किती दूर जातोय नाही?’ नितीनला हळूहळू पटायला लागलं होतं.
‘हो. आणि तेच आपल्या वाढलेल्या विविध आजारांचं कारण आहे. वैद्यक शास्त्रात आज कल्पनातीत प्रगती झाली आहे. तरी दीर्घकाळ आणि निरोगी आयुष्य लाभलेल्या माणसांची संख्या किती कमी आहे! याउलट भारतीय लोक जेव्हा आयुर्वेदोक्त निसर्गस्नेही जीवनशैली जगत होते, तेव्हा १०० वष्रे निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात विकासाचा परिसस्पर्श न झालेल्या प्रदेशात अशा निरोगी आणि दीर्घायुषी जमाती आजही अस्तित्वात आहेत.’ मी पोटतिडिकीनं बोलत होते.
‘मग शहरातल्या लोकांनी काय करायचं?’ नितीनचा प्रश्न.
‘माझा आवडता फंडा.. गाडीऐवजी देशी गाय आणि ग्यारेज ऐवजी गोठा.’ मी हसून म्हणाले.
‘हे कसं शक्य आहे? तू विकास थांबवण्याच्या गप्पा करते आहेस.’ विकासाचं भूत एकदा मानगुटीवर बसलं की उतरणं अवघड.
‘मुळीच नाही. उलट मी विकासाच्या गप्पा करते आहे. मानवाचं आयुष्य, आरोग्य, क्षमता यांची निसर्गत: वाढ आणि तिला मदत करणाऱ्या निसर्गाचं संवर्धन हा खरा विकास झाला. आज विकासाच्या नावाखाली आपण आपल्याला निस्तरता येणार नाही असा प्रदुषणाचा खेळ मांडला आहे आणि संपूर्ण पृथ्वीलाच विनाशाच्या टोकावर आणून ठेवलं आहे. अविचारानं आपण इतका मूर्खपणा करण्याचं धाडस केलं ना? मग विचारपूर्वक शहाणपणा करण्याचं धाडस करू शकत नाही? आणि आज आपण राजीखुशी हे केलं नाही तर परिस्थिती उद्या आपल्याकडून ते बळजबरीनं करून घेईल.’ कुठल्या अंत:प्रेरणेनं मी बोलत होते हे माझं मलाही कळत नव्हतं.
‘मग अन्नाचं काय? तू म्हणशील, शेती करा.’ नितीनचा संभ्रम.
‘करावीच लागेल. आज ज्या पद्धतीनं शेतकरी आणि शेतजमीन यांचा आकडा कमी होतोय, त्याचा विचार केला तर उद्या जो पिकवेल, त्यालाच खायला मिळेल. नसíगक उत्पादनात वाढ झाली तर पोषण. शहरातल्या व्यक्तींना आत्ता चांगली सुरुवात करता येऊ शकते. आजही बऱ्याच लोकांचा आपल्या गावाशी संपर्क असतो. त्या गावातला एक शेतकरी दत्तक घ्यायचा. त्याला एक देशी गाय-बल जोडी घेऊन द्यायचा. त्या जोडीच्या चाऱ्याची व्यवस्था करायची. झाली सेंद्रिय धान्याची व्यवस्था.’ मी म्हणाले.
 ‘अगं किती खर्च येईल याला?’ अनिताचा भाबडा प्रश्न.
‘खर्च? याला गुंतवणूक म्हणतात. आधुनिक मराठीत इन्व्हेस्टमेन्ट. परताव्याची कितीतरी खात्री. मेडिक्लेम काढतोच ना आपण! त्यात किती पसा जातो? इतकं करून काही आजारी न पडण्याची खात्री नसते. आजार झाल्यावर मिळणारा फक्त आíथक परतावा असतो. तरी मेडिक्लेम काढतोच ना  आपण! आपली अडचण ही आहे, की आपल्यासाठी खात्रीनं आणि दीर्घकाळ हितकर असलेल्या गोष्टींचा विचार आपल्यापर्यंत पोचवणारे पूर्वज आता राहिले नाहीत. जे ग्रंथरूपाने आहेत, ते आपल्याला जुनाट वाटतात. आपली स्वत:ची बुद्धी हितकर विचार करेल असं प्रगल्भ करणारं शिक्षण आपल्याला दिलं जात नाही आणि या विचारांचं मार्केटिंग करून कुणी ते आपल्यापर्यंत पोचवत नाही.’ माझा बोलविता धनी आज काही वेगळंच वदवून घेत होता माझ्याकडून.
‘खरं आहे गं.’ इतका वेळ गंभीरपणे ऐकत असलेल्या नितीनच्या चेहऱ्यावर, मला आल्यापासून पहिल्यांदाच हसू दिसलं. ‘आता मी पहिलं काम हेच करतो. जमीन जरी नाही तरी मी एक शेतकरी नक्कीच दत्तक घेऊ शकतो. किती नको नको ते खर्च करतो आपण. ही गुंतवणुकीची तुझी वेगळी संकल्पना मला आवडली. आणि हिचं मार्केटिंग माझ्याकडे लागलं.’
आरोग्याचं बीज आपल्या देशी शेतीत पिकतं, हे उमगलेले असे बरेच नितीन आज आपल्याला हवे आहेत, आपल्या लेकरांच्या आरोग्यासाठी.    
(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2014 1:01 am

Web Title: f7 aliment
Next Stories
1 झोप का गं येत नाही? वैद्य
2 डोळस होऊ चला..
3 PCOD ची त्सुनामी रोखण्यासाठी..
Just Now!
X