News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘साथ साथ’

१९८२ साली आलेला आणि रमणकुमार यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि फारुख शेख, दीप्ती नवल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘साथ साथ’ हा चित्रपट, प्रेमातली एक वेगळीच

चित्रपट - साथ साथ

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

‘होते म्हणू स्वप्न एक

एक रात्र पाहिलेले

होते म्हणू वेड एक

एक रात्र राहिलेले!’

त्याच्या डोळ्यात एक अंगार.. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध.. अन्यायाविरुद्ध! तिच्या डोळ्यात फक्त त्याच्याबद्दलचं कौतुक, अभिमान आणि अनुराग! प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल वाटणारी ओढ, आकर्षण- एवढाच अर्थ की दोघे मिळून ज्या विचारांवर, ज्या भावनांवर, ज्या मूल्यांवर प्रेम करतो, त्याच्याशी प्रामाणिक राहणं, तो पाया ढासळू न देणं? जी स्वप्नं दोघांनी मिळून पाहिली ती कशी विसरणार? अन् जर विसरली तर तो त्या वेळच्या आपल्या निरागस, लखलखीत, स्वच्छ भावनांचा अपमान नाही का? असं झालं तर त्या पायावर उभी असलेली आपली ही इमारत कोसळायला वेळ लागणार नाही! पण त्या जोडीदाराचीही काही बाजू असेलच ना? कोण चूक? कोण बरोबर? १९८२ साली आलेला आणि रमणकुमार यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि फारुख शेख, दीप्ती नवल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘साथ साथ’ हा चित्रपट, प्रेमातली एक वेगळीच ताकद दाखवणारा. जोडीदाराला भरकटू न देण्यासाठी प्रेम पणाला लावणं.. त्यासाठी त्याला सोडून जाण्याची तयारी दाखवणं, पण भलत्या तडजोडी करणं नाकारणं, हे ठळकपणे व्यक्त करणारा, मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात काय किंमत मोजावी लागते, हे दाखवणारा, वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट. जावेद अख्तरजींची शायरी, काव्य म्हणून उच्च दर्जाची आणि कथेशी इमान राखणारी! त्याला जोड कुलदीपसिंग यांच्या अतिशय सुंदर मेलडीची! त्यांनी मोजकेच चित्रपट केले, पण अतिशय दर्जेदार संगीत दिलं. त्यातलाच हा ‘साथ साथ!’ या शैलीवर कुणाचाही पगडा नाही. तत्कालीन ऐंशीच्या वातावरणाशी हे संगीत सुरेख  मेळ राखून आहे. अतिशय सुंदर आणि बोलकी गाणी आहेत या चित्रपटात. फारुख आणि दीप्तीचे ताजे चेहरे, नैसर्गिक वावर आणि ही गाणी.. यामुळे ‘साथ साथ’ हा एक छान अनुभव ठरतो.

स्वत:चं सुखवस्तू कुटुंब सोडून आलेला, समाजवादी विचारसरणीचा अविनाश आणि मिलमालकाची मुलगी गीता. एकाच कॉलेजचे विद्यार्थी. मित्रमैत्रिणींचा मस्त धमाल करणारा त्यांचा ग्रुप आहे. अविनाश परखड लिहिणारा.. संपत्तीसंग्रह, भांडवलशाहीविरुद्ध पोटतिडिकेने बोलणारा, भांडणारा. तर गीता त्याच्या तडफदार व्यक्तिमत्त्वावर, त्याच्या तत्त्वनिष्ठेवर भाळणारी. ‘‘अविनाशसे शादी करने के लिये उसे देखने की नहीं, ‘समझने की’ जरुरत है’ और ‘मैने उसे ‘समझ’ लिया है..’’ हे ठासून सांगणारी. त्याला आपण आवडतोय.. पण तो हे कधीच बोलून दाखवणार नाही, त्याच्यात आणि आपल्यात जी सामाजिक, आर्थिक दरी आहे, ती त्याला हे बोलू देणार नाही, हे जाणून गीता त्याला त्याच्या कोषातून बाहेर काढते आणि अविनाशमधला प्रियकर व्यक्त होतो..

‘तुमको देखा तो ये खयाल आया’

तू एक कविता, कधी संपूच नये असं वाटणारी! ..माझ्या रखरखीत आयुष्यात घनगर्द सावली घेऊन आलीस. तू सोडून या जगात फक्त एक ईर्षां, शोषण, अन्याय हेच कठोर वास्तव आहे. माझ्या आसपास फिरकू न शकणाऱ्या कोमल भावना फक्त तुझ्यात साकार झाल्या. या आधी जीवनाची काळी बाजूच इतक्या बटबटीतपणे पाहिली. जगणं कुरूप, खडतर असतं एवढंच माहीत. आयुष्याला तुझा मोरपंखी स्पर्श झाला आणि रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुलले! हे पोळणारं ऊन आता सुस होईल. कारण तुझ्या पदरानं एक सुंदर शीतल छाया दिलीय. या वणवण करणाऱ्या पावलांसाठी मखमल आणि कोरडय़ा ओठांची तृष्णा भागवणारी अमृतवर्षां म्हणजे तू!

‘जिंदगी धूप, तुम घना साया!

आज फिर दिलने इक तमन्ना की

आज फिर दिलको हमने समझाया..’

मन फार हळवं. तुझं आकर्षण अनेकदा वाटूनही ते नाकारायला शिकलं की हळूहळू. त्याला तशी सवयच लावली मी. कैक वेळा वाटलं तुला स्पर्शावं.. तुझ्या तलम ओढणीचा निसटता तलम स्पर्श व्हावा.. पण समजावलं मनाला..

‘हम जिसे गुनगुना नही सकते,

वक्त ने ऐसा गीत क्यू गाया?’

जे मी स्वप्नातसुद्धा कल्पू शकत नाही. मला कधीच मिळणार नाही ते असं कसं अवचित माझ्या ओंजळीत आलं? ते मी झेलू तरी शकेन का? की हे मृगजळ? पण काहीही असलं तरी आत्ताचा हा तुझ्या सहवासातला क्षण भरभरून जगायचाय.. वेळ कुणाला आहे विचार करायला.. काय मिळवलं? काय गमावलं? अभ्यासू, गंभीर अविनाशला खुल्या हवेत मोकळा श्वास घ्यायला लावणारी गीता- जिच्या डोळ्यांत हजार आयुष्यांना पुरेल एवढी ऊर्जा, एवढा रोमान्स आहे. जिच्या हास्यात सगळ्या समस्या क्षणार्धात विसरायला लावणारी विलक्षण ताकद आहे. ‘कभी रोमॅंटिक शायरी नही करते?’ या तिच्या प्रश्नावर, ‘आज’ करने को जी चाह रहा है’ हे त्याचं, तिच्या डोळ्यात बघून दिलेलं उत्तर खूप सूचक. त्या गुणगुणण्याला तिच्या मुग्ध हुंकाराची साथ. तो हुंकारसुद्धा मनातला आहे, ओठावर नाही आला अजून. जगजीतजींच्या त्या घनगर्द आवाजाला चित्राच्या धारदार, खनकदार आवाजाचा प्रतिसाद..‘घना’ऽऽऽ साया’ म्हणताना तो ‘घना’ शब्द इतका भरीव उच्चाराचा येतो. फार सुंदर लागलाय तिथे शुद्ध धैवत. अत्यंत साधी, पण ताजीतवानी करणारी सुरावट, तितकाच ताजा, रोमॅंटिक आवाज.’ ‘हम’ शब्दावरचा घुमारा केवळ अप्रतिम. ‘आज फिर दिलको ‘हमने’ समझाया’मधला ‘हमने’ शब्द कुठल्या तरी खोल गाभाऱ्यातून आल्यासारखा येतो. जगजीतजींच्या आवाजाची श्रीमंती अक्षराअक्षरांत जाणवत राहते. या आवाजात आपण काहीही तासन् तास ऐकू शकू असं वाटत राहतं. कानांचे अक्षरश: लाड करणारा हा आवाज.. ‘तमन्ना’वरच्या नाजूक खटक्याची केवळ जगजित सिंग या नावाच्या आवाजातच कल्पना करू शकतो. त्याला एक किंचित थरथर आहे. किती? कणभर, पण तीच काळजाचा ठाव घेते! हे कृत्रिमपणे आणता येत नाही, मुळात आवाजातच ती ‘कशिश’ असावी लागते. चाल आपल्या कानात, मनात ठसा उमटवत जाते तेव्हा तो आवाज आधी आपला ठाव घेत असतो. जगजीत सिंग हा असा आवाज आहे, की ज्यात फार विभ्रम, Voice Modulation करायची गरजच नाही, त्या आवाजाच्या अस्तित्वातूनच गाण्याला शरीर मिळतं. भाव झिरपायला लागतो. त्यात जावेद अख्तरसारखे शायर, मौनसुद्धा शब्दबद्ध करू शकणारे. त्यामुळे अविनाशचा स्वभाव त्या काव्यात अचूक उमटला. त्याचं थोडं नव्‍‌र्हस असणं, अंतर्मुख असणं.. स्वत:मधला रोमान्स फुलू न देण्याची त्याची वृत्ती, पण गीतामुळे त्या सुप्त प्रणयाला आलेली किंचित जाग. हे सगळं आलंय त्या शायरीत.. म्हणूनच तर म्हणतो ना तो, की ‘हम जिसे गुनगुना नही सकते, वक्त ने ऐसा गीत क्यू गाया?’ जावेदजींची प्रत्येक ओळ कथेशी नातं सांगते.

अविनाश-गीताच्या प्रेमाला, गीताच्या घरातून साहजिकच विरोध आहे. अविनाश स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणारा. स्वाभिमान न विकणारा. त्यासाठी गरिबी सहन करणारा. तर गीता श्रीमंत घरातली.. हा संघर्ष टिपेला पोचतो.. कॉलेजमधल्या एका मुशायऱ्यात गीताला तिच्या निर्णयापासून परावृत्त करायचा प्रयत्न अविनाश करतो.

‘प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी?

मेरे हालात की आंधी में बिखर जाओगी!’

अनिकेत मी, भणंग मी! नको करूस गं असं प्रेम. तुझी लक्तरं होतील माझ्या अस्थिर वादळी आयुष्यात. काय मिळणार तुला यातून? आगीशी खेळ आहे हा. तुला माझ्याबरोबर मी निखाऱ्यावरून चालायला नाही लावू शकत. अपार दु:ख, वेदनांच्या गावातला मी रहिवासी. मीच जगू शकतो तिथे. ही स्वप्नं कधीच पुरी होणार नाहीत, मी पराभूत, ओशाळवाणा ठरेन. माझ्याबरोबर लाजिरवाण्या स्थितीत मी तुला बघू शकत नाही. हे आयुष्य तुझ्यासाठी तरी सोपं असू दे ना? तुझ्यावर प्रेम करणारे किती तरी जण असतील. हे आयुष्य खूप छान घटना, लख्ख भविष्य घेऊन तुझ्या स्वागताला तयार असेल! असं का वाटतंय तुला, की मला विसरू शकणार नाहीस? तू नको मला जीव लावूस गं. इथेही जगजीतजींच्या आवाजाचं वजन. त्यातली  कमालीची समजूत, मार्दव.. अगदी एखाद्या चुकलेल्या कोकराला छातीशी धरून थोपटावं तसा हा आवाज.. त्या आवाजातच अपार काळजी.. करुणा भरलीय.. ‘प्यार’ हा शब्द अतिशय कोमल मींड घेऊन येतो.. ती मींड, गोलाई, संपूर्ण गाण्यात सरोदनं तोलून धरलीय.. इथे सरोदसारख्या वाद्याचंच काम होतं.. ही जखम समजून घेणारं, सरोद हेच वाद्य.. या  जखमांवर हळूच बासरीची फुंकरही आहे. ‘मेरी हालात की’ या ओळीवरचा पंचम फार सुंदर ठहराव देतो. ‘एक मै क्या.. हा अंतरा अतिशय वेगळ्या चालीचा. फार फार दर्द ओतलाय. ‘एक मै क्या अभी आयेंगे दिवाने कितने’ ही ओळ तो छातीवर दगड ठेवून म्हणतोय हेसुद्धा समजतं त्या आवाजातून फारुखच्या चेहऱ्यावरून!

‘एक मै क्या अभी आयेंगे दिवाने कितने!

अभी गुंजें गे मुहब्बत के तराने कितने?

जिंदगी तुमको सुनायेगी फसाने कितने!

..क्यू समझती हो, मुझे भूल नही पाओगी?’

त्यात ‘जिंदगी तुमको सुनायेगी’ ही ओळ तर रडवतेच! ‘सुनायेगी’ या एका शब्दासाठी जगजीतजींना लाख सलाम.. अंतर्बा गदगदून येतं हा शब्द ऐकताना. कुठून येतो हा टोन, हा पोत? हे अतक्र्य असतं. आपलं नशीब थोर म्हणून आपल्या कानांवर हे आवाज पडले एव्हढंच म्हणू शकतो.. ‘क्यू समझती हो’.. ही ओळ, तालाशिवाय ठेवण्यात संगीतकाराची बुद्धी दिसून येते. अगदी नाइलाज झाल्यावरचं वाक्य आहे हे. मनाविरुद्ध म्हणलेलं. या वेळी गीताच्या चेहऱ्यावरचे रडवेले भाव, दीप्ती नवल इतके सुंदर व्यक्त करते.. की हा चेहरा कधी एकदा पुन्हा खुलेल असं वाटत राहतं.

अविनाश-गीताचं लग्न, संसार आणि तत्त्वांचा संघर्ष व्यक्त करणारी ‘ये तेरा घर, ये मेरा घर’ आणि ‘क्यू जिंदगी की राह में मजबूर हो गये’ ही गाणी उत्तरार्धात!

(पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:03 am

Web Title: farooq sheikh deepti naval bollywood movie saath saath dd70
Next Stories
1 भारत-पाक सौहार्दाचे प्रतीक
2 अथेन्सचा प्लेग
3 हास्य आणि भाष्य : एक बेट, एक झाड आणि एक माणूस!
Just Now!
X