|| सुभाष अवचट

चित्रपट दिग्दर्शक रबीन्द्र धर्मराज आणि त्याची बायको पापीया माझ्याकडे पुण्यात राहायला आले होते. त्याचा ‘चक्र’ सिनेमा नुकताच गाजला होता. तो जयवंत दळवींच्या कादंबरीवर होता. स्मिता पाटीलची त्यात भूमिका होती. ते दोघे दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले. ते पोहोचले की नाही हे विचारायला मी रात्री फोन केला. तेव्हा समजले, रबीन्द्र हे जग अचानक, वाटेतच सोडून गेला. मी सुन्न झालो. त्याच्या अंत्यविधीला मी चर्चमध्ये पोहोचलो. तो विधी अंगावर काटा आणणारा होता. मला रबीन्द्रचा चेहरा बघवत नव्हता. त्यानंतर आता काय करावे? कोठे जायचे? स्क्रिप्ट रायटर, कॅमेरामन आम्ही एकमेकांशी न बोलता संध्याकाळच्या सुमारास गाडीने भटकत चौपाटीवरच्या कोपऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये बसलो. विचित्र मन:स्थिती होती. रबीन्द्रच्या मृत्यूची छाया होती. त्यावेळी मी स्क्रिप्ट रायटर मित्राकडून पॅड घेऊन त्यावर काही ओळी लिहिल्या. त्या ओळींच्या आजतागायत आठवणी अजून माझ्यापाशी आहेत.

‘बुलडोझरने रस्त्यावर दडपलेला असतो दिवसाचा जखमी पारा

कोपऱ्यावरच्या रेस्तराँमध्ये व्हिस्कीच्या ग्लासात उगवतो सायंकाळचा धुरकट तारा…

अशावेळी संगमरवरी गोल टेबलावर हे शहर कोपरा टेकते आणि इराणी खुर्चीत दिवेलागणीला सुरुवात होते

हळूहळू शहरावर जमत येते पोरकी काजळी

मनात मुंग्यांची रांगोळी

सरकत राहतात वाहनांचे पाठोपाठ दिवे

रेंगाळत आवाजही पुसट होत जातात दूरदूर

व्हिस्कीच्या ग्लासात एकाग्र वितळू लागतो

बर्फात अडकतो माझाच चेहरा…

या चेहऱ्याचे वैश्विक, न थांबणारे, जन्म- मृत्यूच्या यात्रेतले गोल फिरणारे पाळणे आहेत. काही फेसलेस असतात, ते नट होतात. कधी मॅकबेथ, ऑथेल्लो, नाही तर ‘नटसम्राट’मधले अप्पा बेलवलकर बनतात. हुकमी चेहरे बदलायचे वरदान त्यांना असते. या चेहऱ्याचे मला का कुणास ठाऊक आकर्षण आहे. फेसलेस अ‍ॅक्टर्सवर माझी पेंटिंग सीरिजही मी केली. त्यातले एक पेंटिंग डॉ. लागू या फेसलेस नटाच्या ‘लमाण’ पुस्तकावर आहे. हजारो वर्षं माणसं दृष्टीआड होतात. त्यांच्या आठवणी, चेहऱ्यांचे, कालखंडाचे खंडहर होतात. मातीच्या, दगडांच्या खोल खाली दफन होतात. उत्खनन केल्यामुळे काही अवशेष सापडतात. पूर्वजांच्या रूट्सचा शोध घेणे किंवा आपले वास्तुपुरुष कोण होते याचे संदर्भ सारे जग शोधते. पण त्या काळाचा चेहरा दिसत नाही. अपूर्ण पुरावे बघून तहान भागत नाही. मानवजातीच्या मेंदूचा अंदाज अजूनही कोणी बांधू शकलेला नाही. तो उद्ध्वस्त करतो आणि परत ते उकरून गौरवही प्राप्त करतो. आणि मग या गत आठवणींना चेहरे देण्याची युक्ती सुरू झाली. पहिली जनावरांची चित्रे गुहेत आली. ती प्रगत झाली. मग पुतळे आले. आणि काही काळानंतर त्यांची पोट्र्रेट्स आणि फोटोग्राफी आली. त्या चित्रांमधून बखरही लिहिली गेलीच; पण ती चित्रांमधून साक्ष देणारी झाली.

अनेक म्युझियम्समध्ये फिरताना ही ऐतिहासिक चित्रमय सफर त्या काळाची पाने जवळून उलगडून दाखवतात. अनेक संस्कृती आल्या, लपल्या. मी कापाडोसियामध्ये होतो. हे शहर म्हणजे लाव्हाने बनवलेली जादू आहे. हजारो वर्षांपूर्वी तो उफाळून बाहेर आला. पृथ्वी इकडची तिकडे केली. समुद्र, डोंगरतुकडे सरकत खंड बनवले. त्यांना आकार मिळाला. चेहरे मिळाले. आणि पुढची अनेक वर्षे तो धगधगत राहिला. या निसर्गाच्या पोटात अनाकलनीय रहस्यं आणि शक्ती आहे. तो शांत झाला. त्याच्यातून तप्त राहिलेली राख उडत टर्कीमध्ये जाऊन वाऱ्याबरोबर गिरक्या घेत स्थिरावली आणि थंड झाली. तेथे स्कायस्क्रेपरसारखे उंच सुळके तयार झाले. शिल्पकाराच्याही कल्पनेपलीकडे जाऊन गोल, त्रिकोणी आकार बनले. उंच सुळक्यावर अलगद मोठा गोल चेंडू ठेवलेला दिसतो. आपल्याकडे मुलांच्या चित्रांत त्रिकोणी डोंगर आणि त्यावर उगवलेला सूर्य दिसतो. कापाडोसियामधील मुलांच्या चित्रात अ‍ॅबस्ट्रॅक्ट डोंगर दिसतात. हीच तर निसर्गाची किमया आहे. त्या उंच सुळक्यामध्ये राख उकरायला सोपी होती. त्यामुळे लोकांनी ती उकरत तेथे अपार्टमेंट तयार केले. न्यू यॉर्कमधील एखाद्या स्कायस्क्रेपरसारखेच. तळाशी चर्चेस, मार्केटस्, सेमिट्रिज् तयार करण्यात आल्या.

कापाडोसिया हे अद्भुत शहर आहे. या शहराच्या खाली- जमिनीखाली दुसरे शहर आहे. आमचा गाईड हिस्टोरियन होता. त्यामुळे तो आम्हा चित्रकार मंडळींवर खूश होता. एका सकाळी तो म्हणाला, ‘तुम्हाला आज सरप्राइज देणार आहे.’ आमची बस शहरातल्या एका गल्लीत थांबली. आम्ही उतरलो. आसपास इमारती होत्या. मध्ये एक छोटे मैदान. तेथे एक पत्र्याची शेड होती. आम्ही त्याच्यापाठोपाठ तेथे गेलो. पाहतो तर तिथे जमिनीत उतरलेल्या पायऱ्या होत्या; आणि मुख्य म्हणजे त्या शहरातून झिरपत येणारा सूर्यप्रकाश होता. आम्ही त्या पायऱ्या उतरत खाली पोहोचलो. समोर एक मोठी खोली होती. त्याच्या दरवाजावर कोरलेली लिपी आणि एक-दोन अस्पष्ट चेहऱ्यांची शिल्पे होती. गाईडची कॉमेन्ट्री सुरू झाली… ‘हे एका श्रीमंत व्यापाऱ्याचे थडगे आहे. हे पंधरा दिवसांपूर्वीच सापडले. शहरात फिरणाऱ्या एका बग्गीच्या घोड्याचा पाय कशात तरी अडकला. तो सोडवताना थोडे खणले तर हे थडगेच सापडले. अधिक खणत गेले तेव्हा एक शहरच जमिनीखाली लपले आहे असे दिसले. शोध घेताना त्या तिथल्या मुख्य खोलीत त्या व्यापाराचे शव थडग्यात आणले गेले असावे, तेथे दरवाजावर त्याचे नाव आहे. तो, त्याची बायको आता दिसत नाही, पण त्यांचे वर्णन आहे व त्यांचे चेहरे आहेत. इथली त्याकाळची प्रथा होती. त्या खोलीचे दरवाजे रात्रभर उघडे ठेवीत असत. शेजारच्या डायनिंग हॉलमध्ये त्याचे मित्र, नातेवाईक रात्री भोजन करीत व त्याच्या आठवणी रात्रभर काढीत. आम्ही डोकावून बघितले. खरोखरीच पलीकडच्या हॉलमध्ये लांबलचक दगडी टेबल होते. सकाळी त्या मालकाचा दरवाजा बंद करून सारे निघून जात. जिवंत असतानाच श्रीमंत माणसं मृत्यूनंतर अशा त्यांच्या मालकीच्या जागा सुरक्षित ठेवत. एवढेच नाही तर त्यापलीकडे अनेक कोनाडे होते. त्या मालकाचे घोडे, कुत्री, नातेवाईकांच्या अस्थी असे सारे तेथे ठेवले जाई. त्यातल्या काही अस्थी आम्ही तेथे पाहिल्या. कोनाड्यावर दगडात त्यांची नावे, हुद्दा कोरलेला होता. जवळजवळ किलोमीटरभर त्या खोल्या पसरलेल्या होत्या. फक्त मुख्य कत्र्या मालकाच्या खोलीवरच त्याचा चेहरा कोरलेला होता. वर सारे शहर उभे होते आणि आम्ही त्याच्या खाली जमिनीत इतिहासाच्या पाऊलखुणा बघत होतो. हीच प्रथा पिरॅमिडमध्येही दिसते. मृत्यू कोणालाही नकोसा असतो. पुनर्जन्मानंतर सारे व्यवस्थित असावे हा अट्टहास त्यात होता. तरुण असतानाच या कबरी बांधण्याचे काम सुरू व्हायचे. आयुष्यभर मृत्यूचेच आकर्षण राहणे, शरीर या छायेत जगणे… हे फारच झाले.

पोट्र्रेट! तेही स्वत:चे असावे; यामागची भूमिका हीच असावी की दृष्टीआड झाल्यावर लोकांच्या आपण स्मरणात राहावे. खरं तर पोट्र्रेट्सचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. फोटोग्राफीचा शोध लागण्याआधीचा. यामागे एकच उद्देश असावा, तो म्हणजे रेकॉर्ड ठेवण्याचा. त्याचा मार्ग म्हणजे चित्र व पुतळे करणे हा होय. त्याचे मूळ इजिप्तमध्ये सुरू झाले आणि सर्वदूर पसरले. चित्रकलेतील ती एक शाखाच तयार झाली. त्या काळातल्या या पोट्र्रेट्सनी अनेक म्युझियम्स, कोर्ट्स, पार्लमेंट्स, जुन्या वास्तू तुडुंब भरल्या आहेत. राजेरजवाड्यांच्या या पेंटिंग्जमध्ये त्यांची एकूण शक्ती, त्यांचे महत्त्व, सौंदर्य, संपत्ती, त्यांची अभिरुची दाखवली गेली. पॅरिसमधले लूव्र म्युझियम पाहताना याचा अंदाज येतो. युद्ध जिंकून आलेल्या सैनिकांचे घोडदळ, पोट्र्रेट्समधील व्यक्तींच्या पायाशी बसलेली कुत्री, अन्य प्राणी, व्यक्तींचे ड्रेसेस, दागिने, त्यांची गोंडस मुले, पिंजऱ्यातील पक्षी, त्यांच्या राण्या, हातात फुले घेऊन मागे उभ्या असलेल्या दासी, झुंबरे, त्यांची हत्यारे, इ. प्रामुख्याने चित्रित केले गेले. यात कित्येक चित्रकारांचे योगदान झाले. त्यांचे कसब, निरीक्षणशक्ती या चित्रांत उतरलेली दिसते. त्यातील चित्रकारांची नावेही काळाच्या पडद्याआड गेली.

काळ बदलला. रेनेसान्स काळात आणि मध्ययुगीन काळात कलेत नवीन आकृतिबंध आले. सतराव्या-अठराव्या व एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली आणि साऱ्यांना धक्का देणारा अगदी वेगळा असा बदल झाला. यादरम्यान जगाला व्हॅन गॉग, मातीस, गोगँ, पिकासो मिळाले. विसाव्या शतकामध्ये या पोट्र्रेट्सचा अर्थ बदलला. इतर आविष्काराला महत्त्व आले. वेगळ्या रंगांमध्ये आणि आकृतिबंधांमध्ये नवीन पिढी काम करू लागली आणि कलेचा तोंडवळा बदलला. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, अधिक व्यक्तिगत झाला. व्यावसायिक पोट्र्रेट्स ही आता इतिहासातला एक इतिहास झाली. ती आता हेरिटेज प्रॉपर्टी आहे.

शेवटी चेहरा काय असतो? पुतळे बनवताना शिल्पकार समोरच्या मॉडेलचा- मग तो किंवा ती कोणीही असो; त्या चेहऱ्याच्या आत लपलेल्या कवटीचा आकार बनवतो. पृष्ठवंशीय प्राण्यांमधील मेंदू, काही ज्ञानेंद्रिये सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कुर्च्या, हाडे यांचा तो संग्रह असतो. ही कवटी डोक्याला व चेहऱ्याला आकार देते. आणि ती पाठीच्या सर्वात वरच्या मणक्यालाही जोडलेली असते… हे एक शास्त्रीय सत्य आहे.

कोणताही चित्रकार वा शिल्पकार चेहऱ्याकडे पाहत असताना पहिले काय बघत असेल, तर तो त्यात दडलेला कवटीचा आकार! त्यावर थर लावून मग तो त्यावरच्या चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व बाहेर काढतो. मी असे पोट्र्रेट कधी केले नाही. मला तसे शिक्षणही मिळाले नाही. लहानपणापासून मला प्रश्न पडायचे : मला हा मित्र, मैत्रीण, शिक्षक, शेतकरी का आवडतो?  काही जण देखणे व जवळ असूनही का आवडत नाहीत? नंतर जसजसा मी मोठा होत गेलो तसतसे मला कळले की मला त्यांचे इतर एक्स्प्रेशन आवडते. कित्येक मित्र-मैत्रिणी, आदरणीय शिक्षक, कामगार यांची माझी मैत्री ही त्यांच्या मनाशी झाली. त्यांचे पोट्र्रेट करून मी भिंतीवर लटकवले नाही. त्यांचा तो सहवास, आठवणीतले चेहरे सतत मनात बरोबर असतात. त्यांचा फोटो अल्बमही माझ्यापाशी नाही.

चेहऱ्यांच्या आत कुठले दुसरेच चेहरे असतात. त्यांचे पोट्र्रेट करण्याचा अट्टहास माझ्याकडे नाही. युद्धात जखमी होऊन गावात परतलेला शेतकऱ्याचा जवान मुलगा, शेतात जळलेले घर, पुरात वाहून गेलेले वृक्ष, जनावरे, लहानपणापासून प्रेम करणारी परकरातली मैत्रीण, शाळेत भांडण झालेल्या नातवाला थोपटणारे आजोबा, ट्रिपला जाताना डब्यात तिखट-मिठाच्या पुऱ्या आणि मुरलेले लोणचे देणारी आजी, गोधडीत लपवून ‘चांदोबा’ वाचायला देणारी बहीण, पगार मिळत नसतानाही गावातील मुलांना शिकवणाऱ्या फाटक्या गुरुजींच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गावकऱ्यांचे चेहरे, कबड्डीत राष्ट्रीय पारितोषिक घेऊन घरी परतल्यानंतर रापलेल्या चेहऱ्यावर कौतुकाने हसणारे त्या खेळाडूच्या आई-वडिलांचे चेहरे आणि भोवती गुलाल उधळत नाचणारे गाव, शहरातल्या म्युझिक कॉम्पिटिशनमध्ये स्टेजवर गाणाऱ्या आपल्या छोट्या मुलीला पाहून डोळ्यात पाणी आलेले पालक, एअरपोर्टवर परदेशी निघालेल्या मुलाला सोडायला आलेल्या कुटुंबाचे कासावीस चेहरे, उन्हाळ्यात पोहायला शिकवणारा प्रेमळ मामा, गावातल्या वेडसर मुलाचे आणि अधू मुलीचे लग्न लावणाऱ्या गावकऱ्यांचे समाधानी चेहरे, घटस्फोट होऊन घरी परतलेल्या मुलीला कवेत घेणारे आई-वडील… असे अनेक चेहरे आयुष्यात आसपास येत-जात असतात. हेच चेहरे माझ्या पेंटिंग्जमध्ये येत गेले. त्यात हमाल, मुळशीचे शेतकरी, नट, गुहेतले साधू, मुंजीतला छोटा बटू, नाहीतर झाडे आली. डोंगरांनाही स्वत:चा चेहरा असतोच.

निसर्गाने अद्भुत सौंदर्याची दैवी भेट सर्वांना दिली आहे. कळत-नकळत ती प्रत्येकाकडे असतेच. पण त्याची जाणीव असेलच असं नाही. आरशातलं प्रतिबिंब सतत तुम्हाला दिसत असतं. प्रत्येक जण आपल्या चेहऱ्यावर प्रेम करतो. तो चेहरा टिकावा म्हणून ब्युटीपार्लर्स भरलेली असतात. चेहरा जपण्याची सौंदर्यप्रसाधने जगभर विकली जातात. निरनिराळे डाएट्स, जिम्स, फॅशन्स, लिपस्टिक लावावी, तसे मेडिटेशन आणि केसांचे कलप अहोरात्र मदतीला असतात. जंगलातल्या आदिवासी स्त्रियादेखील अंगावर फुले, हार, कथलाचे स्वस्त दागिने घेऊन नटतात. पक्ष्यांना निसर्गाने कितीतरी रंग, सुंदर आकार दिले. गाढवाची पिल्लंसुद्धा लहानपणी किती सुंदर दिसतात. एखाद्या सुंदर स्त्रीसारखं प्रत्येक झाड आपला मोहोर, फुले, पक्षी अंगावर घेऊन थाटात उभे असते. हे सारे उपजत असते. सर्वसाधारण व्यक्तीही आपल्या आत्मिक सौंदर्याने उठून दिसते. चेहऱ्याच्या आतला चेहरा तुम्ही म्हातारे झाल्याची जाणीव करून देत नाही. ऐंशी-नव्वदच्या दशकामधील अत्यंत सुंदर नटी आता वयस्कर झाली आहे. तिच्याकडे मी कॉफीला गेलो की ती थाटात बसलेली असते. मला विचारते, ‘सुब्बु, मी कशी दिसते?’ ती आरशात बघते, नटते, त्यावेळी ती तरुण चेहराच आरशात बघते. तुमचे मन तुम्ही बदललेले आहात याची जाणीव तुम्हाला करून देत नाही. ती जाणीव असती तर आजी किती सुंदर दिसते, साईसारखी तिची मऊ त्वचा, तिचे प्रेमाचे मऊ लुसलुशीत हात, तिच्या गळ्याला घट्ट मिठी मारत ‘माझी लव्हली फ्रेंड’ म्हणणाऱ्या खोडकर नातीच्या नात्यातही हेच सौंदर्य दिसायला हवे. टक्कल पडलेला पुरुषदेखील डोक्यावर केस असल्याच्या सवयीने हात फिरवून ठीकठाक करतो.

गरट्रुड स्टाईन ही अमेरिकन लेखिका, कवयित्री, नाटककार होती. ती पॅरिसमध्ये राहत होती. तिचा भाऊ श्रीमंत होता. त्यांनी आर्ट कलेक्शन करायला सुरुवात केली होती. मातीस, पिकासोंच्या चित्रांचे मोठे कलेक्शन त्यांच्याकडे झाले. पिकासोनं तिचे पोट्र्रेट केले. ते जगप्रसिद्ध आहे. तिने पिकासोच्या स्टुडिओमध्ये नव्वद वेळा सीटिंग दिले. ते पोट्र्रेट झाले तेव्हा सगळेजण म्हणाले, ‘पोट्र्रेटमधली ती गरट्रुड दिसत नाही.’ त्यावर पिकासो म्हणाला, ‘थांबा… काही दिवसांनी ती तशी दिसायला लागेल.’ तिचे पोट्र्रेट करताना तो चेहरा पेंट करीत नव्हता. ती तिथे समोर बसली होती, इतकंच! त्याच्या डोक्यात नवीन स्टाईल घोळत होती. झालेही तसेच. तो चेहरा रंगवताना त्याने ‘क्यूबिझम’ला जन्म दिला. डोरा मारचे पोट्र्रेटही याला साक्षी ठरते.

सेल्फ पोट्र्रेट करताना चित्रकार स्वत:चा चेहरा रंगवत नसतो. चेहऱ्याच्या आतल्या त्याच्याच मनातल्या अनेक चेहऱ्यांची गुंतागुंत प्रकट करण्याचा तो प्रयोग असतो. त्याचे ते पोट्र्रेट हे त्याचे इनर एक्स्प्रेशन असते. कदाचित तो त्यावेळी मनात वडिलांबरोबर सायकलवर डबल सीट बसून ग्राऊंडकडे निघाला असेल, पेनचे टोपण हरवल्यासारखा चेहरा असलेल्या मित्रांबरोबर कॅफेमध्ये सिग्रेट ओढत असेल, जीव व्याकूळ होऊन बें-बें ओरडणाऱ्या बकरीच्या पिल्लाला पाणी पाजीत असेल, नाही तर कापाडोसियातल्या जमिनीच्या आत खोदलेल्या चर्चमध्ये एकटा बसला असेल. तो चेहरा रंगवणे हे फक्त निमित्तमात्र असते. तो भास-आभासात अडकलेला त्याचा चेहरा नसतो किंवा असतो. कारण शेवटी पेंटिंगमधल्या चेहऱ्याच्या आत काय दडले आहे, हे मला तरी आजपर्यंत समजलेले नाही.

आजवर मी जगलेल्या ऋतूंनी मला किती चेहरे दिले?

Subhash.awchat@gmail.com