जे वण्याच्या आनंदाची सुरुवात ही भूक लागल्यानंतर होते. मध्यंतरी वेगवेगळ्या गावात कुठे काय छान छान खायला मिळते ते एका वृत्तपत्रात येत असे. मोठ मोठे लोक त्यात लिहीत असत. मजेदार माहिती मिळत असे, पण एकाही सद्गृहस्थाने मी खाण्याआधी भूक लागायची वाट पाहतो असे लिहिले नव्हते. संस्कृतीजन्य आजारांची सुरुवात ही भूक नसताना खाण्याने होते आणि त्याचे आजारात रूपांतर हे हालचालशून्य जीवनाने होते. त्यातच खाण्याच्या आनंदात माती कालवायला अनेक सल्लागार, तज्ज्ञ  तयार असतात आणि आयुष्याच्या एका अत्यंत आनंदपूर्ण गोष्टीचा अंत होतो तो कायमचा.

अन्न हे शरीराचे पोषण करते. त्याची चव हे मनाचे पोषण करते, तर त्याचा स्वाद हा आत्म्याला समाधान देतो. श्राद्धाला उत्तम स्वाद आणि सुगंध असलेले पदार्थ त्यासाठीच असतात. आपण जे आत्ता खातो ते आपले होणारे शरीरमन असते. त्यासाठी आदरपूर्वक खाणे आवश्यक असते. असे म्हणतात की, एक सफरचंद खाणे हे समाधी अवस्थेकडे नेऊ शकते. आपली पंचेंद्रिये आणि जाणिवा जागृत ठेवून ते खायचे असते. ते कसे तर प्रथम त्या वस्तूकडे पाहून आज आपल्या नशिबात हे उत्तम खाणे आणून दिल्याबद्दल त्या विश्वशक्तीचे मनोमन आभार मानायचे. हे सफरचंद माझ्यापर्यंत येण्यासाठी आज अनेक लोक राबले आहेत. कित्येक वर्षांपूर्वी ते कुणी लावले आहे, त्याची देखभाल केली आहे. ते कुणी योग्य वेळेस तोडले आहे. काळजीपूर्वक साठवले आहे. ते कुणी विकत घेऊन काश्मीरच्या बागांपासून माझ्या शहरापर्यंत आणले आहे. ते कुणी विक्रेत्याने मला विकले आहे आणि आज मी ते खातो आहे, हे सारे समाजात बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने चालले असल्यामुळे शक्य आहे. आज हे लोक माझ्यावर खरोखर उपकारच करत आहेत, पण त्यातला एकही माणूस मी कधी बघणार नाही, एवढेच काय कधी पाहिला तर हाच तो माणूस हे मला कळणार नाही. पूर्वी माणसांना कळायचे की हीच ती गाय जिचे मी दूध पितो. हाच तो शेतकरी ज्याच्या शेतातले धान्य मी खातो. त्यामुळे कुणाशी कृतज्ञ राहायचे हे कळणे शक्य होते. आज हे शक्य नाही, पण कृतज्ञ राहायचे नाही असे नाही. एका व्यक्तीशी कृतज्ञ राहता नाही आले तरी साऱ्या अन्न पिकवणाऱ्यांशी कृतज्ञ राहायचे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

एकदा ही जाणीव मनात ठेवली की अन्नाच्या किमतीऐवजी अन्नाचे मूल्य कळते. हे मूल्य कळले म्हणजे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याचा अर्थ कळतो. बिनडोक लोकांना अन्न हे असे न कळता प्रथिने, कबरेदके, चरबी, उष्मांक असे शाब्दिक कळते आणि हे पूर्ण असे परब्रह्म पुंडलिकाला भेटायला येते, तेव्हा पुंडलिक घाबरून पळत सुटतो. त्याला त्या परब्रह्मात फक्त कोलेस्टेरॉल, सॉल्ट, ट्रान्स फॅट्स, इन्सेक्टिसाईडचा अंश आणि विविध रोगांच्या आमंत्रणपत्रिका दिसतात. अशा चिंतातूर जंतूंची मांदियाळी वाढतच चालली आहे. हे जंतू स्वत: तर भयग्रस्त असतातच, पण त्यांच्या आसपासच्या साऱ्यांना भयग्रस्त करतात. देव त्यांना क्षमा करो.

छान भूक लागली आहे आता खायला सुरुवात करायची. प्रथम ते सफरचंद पाहायचे. काय तो रंग आहे! ताजे असेल तर खरंच तेजस्वी दिसते. सर्व बाजूंनी पाहायचे. वा! काय रंग आहे!! मग ते हातात धरायचे. हाताला करकरीत लागते. वा! काय स्पर्श आहे!! मग दातात धरून चावायचे. मस्त आवाज येतो. तो ऐकायचा. त्याच वेळी त्याचा स्वाद सुटतो आणि जिभेवर चव अवतीर्ण होते. हे सारे एकत्र अनुभवायची एक कसरतच असते. म्हणजे चवीकडे लक्ष गेले की स्वादाकडे दुर्लक्ष होते. ते टाळायचे. हळूहळू हे जमू लागते. मुखरसात ते सफरचंद एकजीव करायचे आणि त्याचा रस झाला की तो गिळायचा. गिळताना नुसते सुख असते बघा. असे ते सफरचंद संपवायचे. हे ब्रह्मांडातून आलेले पूर्णब्रह्म आता माझ्या पिंडाला मिळाले. हे अन्न आता माझे शरीरमन होणार. नमोऽस्तुते! नमोऽस्तुते!! नमोऽस्तुते!!!

असे हे अन्न असते. कृतज्ञतेचा अभाव आणि मूल्याचा ज्यांना विसर पडतो त्यांच्या जीवनात खाण्याचा आनंद नाही, अन्नाशी संवाद होत नाही, राहतो नुसता विसंवाद. शाकाहारी की मांसाहारी, अंडे खायचे की नाही, उपासाला हे चालते की ते चालते, दिवसात किती वेळा खायचे, किती खायचे, जेवताना पाणी प्यायचे की नाही, एक घास किती वेळा चावायचा, दूध चांगले की वाईट असे अनेक प्रश्न घासाघासाला पडत असताना बिचारे गपागपा गिळत असतात. त्याउलट एका रेड इंडियन जमातीची ही प्रार्थना पाहा. ही जमात मांसाहारी आहे. आपल्या आसपासच्या कुरणावर चरणाऱ्या प्राण्यांना मारून ते खाऊन त्यांचे जीवन चालते. त्यांचा ‘मेडिसिन मॅन’ ज्या प्राण्याकडे निर्देश करेल, त्या प्राण्याचा अथक पाठलाग करून ते त्या प्राण्याला मारतात. मधे जरी सहज मारण्यायोग्य प्राणी आला तरी त्याला मारत नाहीत. नंतर सारी टोळी त्या प्राण्याभोवती बसून ही प्रार्थना म्हणते..

‘आज आमची भूक भागवण्यासाठी आम्ही तुला मारले आहे. आता तुझे शरीर हे आमचे शरीर होईल, पण आम्ही तुला खात्री देतो की आम्ही मेल्यानंतर आमच्या शरीराची माती होईल. त्या मातीत वाढलेले गवत खाऊन तुझी पोरेबाळे समाधानाने राहतील.’

केवढी कृतज्ञता! केवढा विचारांचा आवाका! नाहीतर शाकाहाराचा तावातावाने प्रचार करणारे आणि स्वत:ला जास्त नैतिक समजणारे महाभाग बघा. ‘जीवो जीवस्य जीवनम्!’ हे अफाट अहंकारशून्य सत्यवचन तर ‘अहिंसा परमो धर्मा:।’ हा सपाट अहंकारपूर्ण विचार.

भूक लागल्यावरच खा. भूक भागल्यावर थांबा. पंचेंद्रियांनी खा. तहान लागली तर पाणी प्या. जिभेला चव आणि पडजिभेला स्वाद पूर्ण मिळाल्यावरच गिळा. अन्न चांगले बनवले असेल तर दररोज प्रशंसा करायला विसरू नका. तरच कधी अळणी झाले म्हणालात तर त्याला किंमत राहील. शाकाहार, मांसाहार असा वादविवाद करू नका. कृतज्ञ असा. आज तुमच्यासाठी ही मेथी अकाली उपटल्याने मेली आहे. नाहीतर ती फुलावर येऊन बिया टाकून वाळून गेली असती. तुम्ही जे दूध पीत आहात ते दुसऱ्याच्या आईचे ढापलेले दूध आहे. आत्ताच जो पांढरा रस्सा-तांबडा रस्सा असलेले मटण खाल्लेत त्यासाठी एक बोकड मेला आहे. त्याच्याशी कृतज्ञ असा. वाघाने हरीण खाल्ले की हरणाच्या शरीराचे वाघाचे शरीर होते. जसे मेथी, दूध, मटण, उपासाचे पदार्थ याचे तुमचे शरीर होते.

म्हणूनच अन्नाला नावे ठेवत जेवू नका. स्वत:लाच शिव्या देण्यासारखे आहे ते. आवडले नाही तर खाऊ नका. माजलात तर खाऊन माजा, टाकून माजू नका. अन्नदाता सुखी भव असा मनोमन आशीर्वाद देऊन उठा. अन्नाविषयी ज्या कुणाचा सल्ला ऐकाल त्याने आयुष्यात दु:ख उत्पन्न होत असेल तर ते ऐकू नका. ज्या सल्ल्याचे पालन केले असता आयुष्यात आनंदाचे शिंपण होते तो सल्ला योग्य असे समजा. सामान्य नियम म्हणून ज्याची जाहिरात होते ते अन्न अगर पेय सामान्यपणे अयोग्य समजा. संस्कृतीजन्य पदार्थ घरी केलेले जास्त योग्य, नशिबात नसतील तर अगदी मेस किंवा हॉटेलातील चालतील. नैसर्गिक आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले हे सर्वात योग्य, असे जरी असले तरी जे खायचे ठरवाल ते कृतज्ञतेनेच खा. योग्य रीतीने जेवा. आनंदी शरीरमन मिळेल आणि मिळत राहील ते अगदी शेवटपर्यंत. या अन्नावर पोसलेले शरीर दुसऱ्या कुणाचे अन्न होईपर्यंत आनंद होईल आणि होत राहील.