27 November 2020

News Flash

हिंदूंवरच्या वाढत्या जबाबदाऱ्या..

श्रावण महिना सुरू झाला की हिंदूंचे सणवार सुरू होतात ते थेट तुळशीच्या लग्नापर्यंत धूमधडाक्यात ते चालू असतात. यंदा या सगळ्याला वेगळा रंग, वेगळे महत्त्व आहे.

| August 31, 2014 01:10 am

श्रावण महिना सुरू झाला की हिंदूंचे सणवार सुरू होतात ते थेट तुळशीच्या लग्नापर्यंत धूमधडाक्यात ते चालू असतात. यंदा या सगळ्याला वेगळा रंग, वेगळे महत्त्व आहे. कारण १६ मे २०१४ पासून भारतात भाजपचे शत-प्रतिशत सरकार केंद्रात आले आणि तेव्हापासून देशभरातल्या हिंदूंच्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या आहेत.
त्यातली सर्वात पहिली म्हणजे आपण हिंदू असल्याचा खेद, खंत, न्यूनगंड.. झालाच तर अभिमानही न बाळगता ‘गर्व’ बाळगायचा. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असं म्हणताना छाती ५६ इंच फुलली पाहिजे. काही नतद्रष्ट असे म्हणतील की, ‘गर्वाचे घर खाली’! त्याकडे दुर्लक्ष करू. आपलं हिंदू गर्व घर मुळातच बिनमजल्यांचं आहे. तसं करण्याचं कारण- आपलेच काही भ्रष्ट झालेले हिंदू ‘गर्वाचे घर खाली’ किंवा ‘वरचा मजला रिकामा’ असं म्हणतील, म्हणूनच ही बिनमजल्याची योजना!
नुकताच दहीहंडीचा खेळ रंगला. कृष्णाच्या बाळलीला म्हणजे दहीहंडी. पूर्वी ती कुठेतरी गल्लीबोळात साजरी व्हायची. ‘दोन पैसे, दोन पैसे देतो तुला’ वगैरे भिकारडी गाणी म्हणत, तीन, चार, गेलाबाजार पाच थरांत ती कोसळायची. पण आता असं नाही चालणार! कारण भागवतकाका म्हणतात : भारत हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे हिंदूंचे सणवार, व्रतवैकल्यं जोरदार व्हायला हवीत. आता भागवतकाका काही साधी असामी नाही. १९२५ पासून त्यांची संघटना आणि आता ते ‘बलशाली-  म्हणजेच अखंड हिंदुराष्ट्राचा नकाशा घेऊन फिरताहेत. ‘इतिहास बदलता येत नाही, पण भूगोल बदलता येतो’ या वचनाचा आधार घेऊन ते सध्याच्या कमजोर हिंदुराष्ट्राचा नकाशा बलशाही हिंदुराष्ट्रात बदलण्याचा त्यांचा मनसुबा आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून चाचा नेहरूंच्या कबुतर डिप्लोमसीने या देशाची पार वाट लावली. पुढे त्यांची मुलगी, मग तिचा मुलगा, मग त्याची बायको आणि आता पुन्हा हिचा मुलगा यांनी देशाची वाट लावण्याअगोदरच १६ मे आणि २६ मे हे भाग्यशाली दिवस उजाडले. योगायोगाने किंवा नैसर्गिक न्याय पाहा- २७ मे रोजी चाचा नेहरूंची पुण्यतिथी असते!
तर मुद्दा- दहीहंडीचा! इतकी वर्षे आपण अळीमिळी गुपचिळीसारखे सण साजरे करत होतो. पण आपल्या हिंदू पद्धतीत दगडाला शेंदूर फासला की जसा त्याचा देव होतो, तसेच नव्या लोकशाहीत गल्लीतले दादा, गुंड, भाई यांनी पांढरी वस्त्रं घातली की ते कार्यसम्राट, समाजभूषण, एवढंच नव्हे तर नगरसेवक, आमदार, मंत्रीही होतात. मग त्यांना आपले- म्हणजे आपल्या संस्कृतीतले जुने दिवस आठवतात. पूर्वी राजाला ‘खेळ’ बघायचे असले की प्राण्यांपासून मनुष्यप्राण्यांपर्यंत सगळे राजासमोर झुंडीने जमून राजाचे लक्ष वेधून घेत. राजा मग सस्मित मुद्रेने कंठीहार फेक, कडं फेक, काही मुद्रा उधळ असं करायचा. त्या चकमकीत काही ठारही व्हायचे. पण तसंही अमरपट्टा घेऊन कोण आलंय? याच भावनेने आज काही समाजभूषण आठ, नऊ, दहा थरांच्या दहीहंडय़ा, लाखापासून २५ लाखांपर्यंतची बक्षिसे, पाऊस असला तर पावसात, नाहीतर टँकरने पाण्याचा हैदोस घालतात. वर आणखी काही लाख खर्चून बोर्डावर नाचवाव्या तशा काही सेलिब्रेटी नाचवतात. (एरवी त्यांना अभिनेत्रीही म्हणतात!) त्यासाठी जी गाणी वाजवली जातात, ती इथून थेट इंद्राच्या दरबारात ऐकू येऊन तिथल्या अप्सराही नाचतील एवढय़ा रणदुदुंभी आवाजात असतात.
आपल्या हिंदू असण्याचा बिंदूएवढाही गर्व नसलेले काही रिकामटेकडे स्त्री-पुरुष हे हिंदू सण जवळजवळ बंद करण्यासाठीच कोर्टाच्या पायऱ्या चढतात! ‘आवाज हळू करा, थर कमी लावा, गोविंदा अमुक वयाचेच ठेवा..’ आपलं नशीब, की ते असं म्हणत नाहीत, की दहीहंडीची तसबीर ठेवा आणि तिच्यासमोर मौन पाळा. चमच्याने दोन थेंब पाणी डोक्यावर घ्या! या अशा बेजबाबदार हिंदूंना ‘तिकडेच’ पाठवले पाहिजे! तिकडे म्हणजे स्वर्ग, पाताळ नव्हे, नरकात. किंवा नरकसदृश काही देश आहेत म्हणे, तिकडे पाठवावे.
आता गणपती, गौरी, मग नवरात्र, दसरा, दिवाळी असं सगळं रांगेने येणार आहे. पुन्हा काही बेजबाबदार हिंदू ‘.. या अटींवर सण साजरे करा’ म्हणतील. तर अशा भुक्कड लोकांना धडा शिकवायची वेळ आलीय. भागवतकाका आणि त्यांच्यासारखेच आणखी काही काका-काकू-आजोबा, आपले साधू-महंत हे आपल्या पाठीशी आहेत. आमचं तर (म्हणजे जबाबदार हिंदूंचं!) असं म्हणणं आहे- आता आपण पितृपंधरवडा पण साजरा करायला हवा. दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सवात जसे मांडव टाकून ते साजरे करतो, तसंच तिथे प्लँचेटच्या साहाय्याने पितरांना बोलवायचं आणि डॉल्बी साऊंडमध्ये त्यांच्याशी संवाद साधायचा. हल्ली आपण समूहाने गायत्री मंत्र नाही का म्हणत? तसं समूहाने पितरांशी बोलायचं. याचा पुन्हा पोलिसांना चोर, खुनी शोधायला फायदाच होईल. त्या आबांना कळेल- शाहू, फुले, आंबेडकर नव्हे; हळद, कुंकू आणि नारळ महत्त्वाचा!
नवरात्र म्हणजे देवीची पूजा! आपण महिलांना किती सन्मान देतो! देवी दुष्टांचं निर्दालन करते. हल्ली याचिकाकर्त्यां बेजबाबदार हिंदूंचं जे पेव फुटलंय ना, त्यांना एक-एक करून देवीच्या पायदळी द्यायला हवं. आणि देवीने त्रिशूळ वगैरे खुपसला तर ती काही हिंसा नाही. वध.. निर्दालन. हे सगळं १६ मेनंतर आता पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आहे. गर्वाने सांगावं लागणार आहे. त्यात आपले नवे पंतप्रधान मूळ गुजरातचे असल्याने ‘गरबा’ हे राष्ट्रीय नृत्य समजूनच नाचायला हवं. गरब्याला वेळेचं बंधन कसलं? उलट, एकाच जागी गोल गोल फिरतात ते मोजून गिनीज बुकात ‘हिंदू रिलीजन रिजनल डान्स’ असं नोंदवायला हवं!
होळी आणि दसऱ्याला बेजबाबदार हिंदू पर्यावरणवादी ‘झाडं तोडू नका, पान तोडू नका’ असा गळा काढतात. एकेकाळी आपण वल्कलं नेसत होतो सर्व. तेव्हा नाही झाली पर्यावरणाची हानी? माणसाला पुनर्जन्म घ्यायला ८४ लाख योनी फिरावं लागतं. झाड काय, टाकलं बी की उगवलं पुन्हा! पण नाही. आपण हिंदू आहोत म्हणजे मागास आहोत, असा न्यूनगंड जोपासत, हिंदू असल्याची शरम वाटत फिरणारे आता अल्पसंख्य कसे होतील, हे पाहिलं पाहिजे.
दसऱ्याच्या शोभायात्रा म्हणजे इतिहासाचं पानच जिवंत होतं जणू! शस्त्रपूजा! हिंदू सहिष्णु म्हणून आजवर त्याला जवळपास नि:शस्त्र करून, चरख्यावर सूत कातायला लावून, दुसरा गाल पुढे करायला लावला. आता बोला! नुस्तं ‘चले जाव’ म्हटलं आणि इंग्रज गेले? सुसंस्कृत होते ब्रिटिश; पण एवढेही सुसंस्कृत नव्हते, की ‘जा’ म्हटल्यावर गेले. म्हणजे काय, ते लक्षात आलं ना? ज्यांच्यामुळे गेले त्यांची नावंच नाही कुठे. ही अशी लबाडी! पण आता १६ मेनंतर आपली जबाबदारी वाढलीय. मोठय़ा शोभायात्रा काढल्या पाहिजेत. वाहतूक कोलमडली तरी चालेल; हिंदुराष्ट्र कोलमडता कामा नये. नऊवारी नेसून, नाकात नथ, हातात तलवार घेऊन मुली घोडय़ावर बसतात तेव्हा कसं भरून येतं. ते सगळं सांभाळत त्या ‘ए प्लीज, माझी नथ क्लिप करत्येस?’ किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅपवर लगेच अपलोड कर,’ असं म्हणतात, तेही किती गोड वाटतं! असं वाटतं- परंपराच आधुनिक होऊन बोलतेय! यावेळी ढोल, ताशा, झांजा, लेझीम यांचा डेसिबल तपासायला येऊच दे कुणी.. जबाबदार हिंदू त्यांनाच व्हिजिबली आऊट करेल.
१६ मेनंतरच्या जबाबदाऱ्यांची आठवण जरी झाली तरी मनावर गोड दडपण येतं. दिवाळीत पणत्या, रांगोळ्या, आकाशदिवे यांसोबत फटाके नसतील तर कसं वाटेल? म्हणजे लग्न लागलं, पण सनई-चौघडाच नाही वाजला! बरं, आता कुणा नतद्रष्टाचे फुटलेच कान, तर बाजारात श्रवणयंत्र आलीयेत ना! म्हणे लहान मुलांना आणि वृद्धांना त्रास होतो. उलट, यानिमित्ताने लहान मुलांना पुढे आपल्याला किती ऐकण्याची क्षमता वाढवायचीय याची चाचणी घेता येईल. आणि एवढी र्वष एवढं ऐकल्यावर वृद्धांनी आता काहीही नाही ऐकलं तरी चालेल खरं तर. पण धर्मबुडव्यांना कोण सांगणार?
हे झालं सणासुदीचं! पण यापलीकडे काही नवीन जबाबदाऱ्या हिंदू म्हणून आपण घ्यायला हव्यात. उदा. आपली नवी पिढी इंग्रजी माध्यमात शिकते. शिकू दे. आवश्यक आहे इंग्रजी माध्यम. मराठी माध्यम नाळेपासूनच जोडलंय आपल्याला. पण त्या इंग्रजी शाळेत नागपंचमी, नारळी पौर्णिमा, हरतालिका, गणपती, दसरा, दिवाळी, तुळशीचं लग्न, संक्रांत, होळी अशा सर्व सणांना किमान दोन व जास्तीत जास्त पाच दिवस सुट्टी हवीच. ‘आरतीला या’ ऐवजी ‘प्लीज कम फॉर गणेशपूजा’ चालेल; पण सुट्टी हवी. कॉन्व्हेंटवाल्यांना आपला गर्व दाखवायलाच हवा. मराठी माध्यमाच्या शाळेत जाऊन कुणाला दाखवणार गर्व?
आता १६ मेनंतर मुलींनी हिंदू मुलींसारखं भारतात- म्हणजे खेडय़ात राहावं. कारण इंडियात- म्हणजे शहरात त्यांच्यावर बलात्कार होतात. बलात्कार होतो एक; पण पर्यटनाचं हजारो कोटींचं नुकसान होतं. श्रीरामसेनेने बेजबाबदार हिंदू मुलींच्या झिंज्या उपटल्या होत्या, तशीच शिक्षा करायला हवी. १६ मेनंतर त्यांनी आता कपडे घालतानाही जबाबदार हिंदू मुलीसारखे कपडे घालावेत.
दुसरं- आपल्याकडे ३३ कोटी देव असताना साईबाबा वगैरे कशाला? त्यांच्याकडे सर्व धर्माचे लोक येतात आशीर्वादाला. ते आपल्यात असले काय, नसले काय, काय फरक पडतो? सिद्धिविनायकाला चालत जा. शिर्डीला जायचं काही कारण नाही. बरं, साईबाबा आले, मग सत्यसाईबाबा आले. तिथे मुख्यमंत्र्यांपासून भारतरत्नापर्यंत सर्व जादूचे खेळ बघायला! मग शंकराचार्य चिडले तर चुकलं काय? आता ‘सबका साथ, सबका विकास’ म्हटल्यावर पुन्हा ‘सबका भला, सबका मालिक एक’ कशाला? ऐकलंत ना परवा? कुणी मोठा नाही. सगळे सेवक!
१६ मेनंतर आपण अनेक गोष्टी मोडीत काढतोय. पण ‘मोडी’चं कदाचित पुनरुज्जीवन करू. याला विरोध होणार. आत्तापर्यंत अशाच विरोधातून गुरू नानक, महावीर, गौतम बुद्ध, परमहंस, महानुभाव, वारकरी, आर्यसमाजी, सत्यशोधकी, परिवर्तनवादी अशा अनेकांनी आपापल्या शाखा काढल्या. त्या आपण निमूट स्वीकारल्या. त्यामुळे बेजबाबदार हिंदूंची संख्या वाढली आणि बहुसंख्य असूनही आपण अल्पसंख्य असल्यासारखे चोरून जगू लागलो. सूफी, संतपरंपरा, कबीर ते साईबाबा म्हणजे सिंधूचं- पर्यायाने हिंदू खोरं आकुंचन करून टाकणारे.. त्यांनाही आपण डोक्यावर घेतलं. ठीक आहे. पण आता कुठलाही वेगळा रंग नको. हिंदू गणवेश आवश्यक आहे. नाहीतर इथे जो-तो मी ख्रिश्चन, मी बौद्ध, मी शीख, मी आर्यसमाजी, मी जैन, मी अमुक, मी तमुक.. काहीजण तर औद्धत्याने ‘आय एम इंडियन, मी भारतीय..’ असं म्हणतात. त्यामुळेच जबाबदारी वाढलीय.
१६ मेच्या आधी ते श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणारे दाभोलकर गेले तेव्हा जबाबदार हिंदूंनी ‘शिक्षा मिळाली’ असं योग्य वर्णन केलं. तर आता १६ मेनंतर तो कुणी अनंतमूर्ती निवर्तला तेव्हा जबाबदारीने फटाके फोडले, त्याच्या गावी. त्यामुळे आता थोडी आशा वाटू लागलीय, की हिंदू थोडे जबाबदारीने वागतील, जबाबदारी घेतील!
शेवटची सरळ रेघ : ‘ठाकरे’ कधी निवडणूक लढवत नाहीत. आमचा तो ‘जेनेटिक प्रॉब्लेम’आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. हा ‘जेनेटिक प्रॉब्लेम’ उद्धव ठाकरेंच्या लवकरात लवकर लक्षात यावा म्हणून भाजपवाले देव पाण्यात बुडवून बसलेत म्हणे!   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:10 am

Web Title: growing responsibilities of hindus
Next Stories
1 गर्जा (सोयीने) महाराष्ट्र माझा!
2 ..पिक्चर अभी बाकी है!
3 आबा राहिले काय.. गेले काय..
Just Now!
X