आठ लेखांचा हा संग्रह डॉ. कुमार सप्तर्षी यांनी थोर समाजवादी साथी एस. एम. जोशी यांना अर्पण केला आहे. लेखसंग्रह असं वर्गीकरण स्वत: लेखकाने केलं असलं तरीही यात लेखांबरोबरच मुलाखतींचाही समावेश करण्यात आला आहे. काही ठिकाणी, उदा. ‘तिबेट व दलाई लामा’मध्ये तर लेख आणि मुलाखत यांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. इतकंच नव्हे तर लेखकाने सदर लेखसदृश मुलाखतीत दलाई लामा यांच्याबरोबर तिबेटमधील खाम प्रांतामधून आलेल्या नोर्ब नावाच्या निर्वासिताची मुलाखतही चपखलपणे अंतर्भूत केली आहे. त्यामुळे सदर पुस्तकाचा फॉर्म लेखसंग्रह इतकाच न राहता तो काही प्रमाणात विस्तारून समोर येतो. हे विस्तारित रूप लोभस आहे ते केवळ फॉर्ममुळे नाही तर त्यातील माहितीमुळे. निरीक्षण, ऐतिहासिक भागामुळे आणि लेखकाच्या प्रामाणिक शैलीकथनामुळे. यातील काही लेख ‘सत्याग्रही विचारधारा’ या त्यांच्याच मासिकातून प्रकाशित झाले आहेत.
या पुस्तकात जे वैविध्य आहे ते फारच रोमांचकारी आहे. पुरीच्या श्रीशंकराचार्याबरोबर जाहीरपणे डॉ. सप्तर्षीचा झालेला वाद आणि त्या वादाची त्यांनी सांगितलेली कहाणी अतिशय वाचनीय तर आहेच, पण झापडबंद विचार करणाऱ्या सनातनी मंडळींच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ‘दत्ताचा अवतार’ नावाचा आणखी एक लेख यात आहे. तो लेख म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या खेडय़ातील दत्त मंदिरात तिथल्या अस्पृश्य समाजातील गावकऱ्यांना मंदिर-प्रवेश मिळावा यासाठी ‘युक्रांद’ या संघटनेने नोव्हेंबर १९७७ साली दिलेल्या यशस्वी लढय़ाची ही कहाणी आहे. कुशल संघटक कसा असतो, लढा कसा हाताळावा याचे प्रात्यक्षिक कोणासही सहज शिकून घेता येईल, असा हा अत्यंत मार्गदर्शक लेख आहे.
बाळासाहेब ठाकरे, पांडुरंगशास्त्री आठवले आणि दलाई लामा या तीन मान्यवरांच्या आणि त्यांच्या आचार, विचार, कार्याच्या, संप्रदायाच्या अनुषंगाने घेतलेल्या दीर्घ मुलाखती आहेत. पैकी दलाई लामांच्या मुलाखतीत लेखकाने तिबेटविषयी दिलेली माहिती, त्यातही विशेषत: दलाई लामा यांची पंचशील शांतता योजना याविषयी दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे. चीनची दादागिरी, पं. नेहरूंचे धोरण, निर्वासित हद्दपार सरकारची धरमशाला इथे असणारी राजधानी, इत्यादींची माहिती खरोखरच तिबेट समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. बाळासाहेबांची रोखठोक उत्तरं आणि त्या विषयाला असलेलं ऐतिहासिक मूल्य आजही वाचताना विचार करायला लावतं. पांडुरंगशास्त्री आठवले यांची मुलाखत वाचताना ती मुलाखत आठवले यांची राहत नाही तर ती त्यांच्या संपूर्ण भक्तिप्रयोगाची मुलाखत होते.
‘राशिनची यात्रा’ हा या पुस्तकातला एकमेव वेगळा लेख. राशिन हे सप्तर्षी यांचं गाव. आपल्या गावातल्या देवीच्या जत्रेचं वर्णन आणि विश्लेषण करत लेखक ‘जत्रा म्हणजे समाजाच्या अंतरंगाचं गाइड’ कसं आहे ते आपल्यासमोर उलगडून दाखवतो. ‘जत्रा’ हा प्रकार व्यवस्थापनशास्त्राच्या अंगाने कसा समजून घ्यायला हवा, याचं भान आणून देणारा हा लेख आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरू शकेल असं वाटतं. तसेच भारतीय ग्रामीण वैशिष्टय़ांची रूपं अभ्यासण्याची किती आवश्यकता आहे, याचंही भान या लेखाने येऊ शकतं.
श्रीशंकराचार्याबरोबर झालेला वाद किंवा अस्पृश्य समाजातील गावकऱ्यांना मंदिर-प्रवेश मिळावा यासाठी दिलेला लढा अथवा स्वत:च्याच गावच्या, राशिन या गावच्या, जत्रेचं महत्त्व विशद करणारा लेख हे आत्मानुभवाचा प्रत्यय देत असले तरी त्याला एक सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास आहे. तो इतिहास आत्मानुभवापेक्षा अधिक मोठा असतो नि होतोही, पण ‘विपश्यना : आत्मक्षालन’ आणि ‘माझं हिमालय भ्रमण’ हे दोन लेख लेखकाच्या आत्मिक प्रेरणांच्या मुळाचं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणारे ठरतात. स्वत:चा शोध घेणारी ही प्रक्रिया, शैलीपासून सच्चेपणापर्यंत अत्यंत लोभस आहे. त्यातही विपश्यनाविषयी लिहिताना लेखक अनेक प्रकारचं निरीक्षण समोर मांडतो. विपश्यनामधील विविध संकल्पना, शब्द विशद करून सांगतो. उदा. आर्यमौन, आत्मसमर्पण विधी, शीलपालन, त्याचे आठ नियम, अधिष्ठान, मंगलमैत्री इत्यादी. हा लेख वाचताना विपश्यनेची संपूर्ण माहिती झाली पाहिजे याचं भान लेखकाने बाळगलेलं दिसतं. वस्तुत: मौनव्रतात येणारा वा होणारा मनाचा उद्रेक (जो डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या लेखात वाचायला मिळतो.) डॉ. सप्तर्षीच्या लेखीही नसल्याचं जाणवतं. ते का, असा प्रश्न पडतो. मग लक्षात येतं की, ज्या माणसाने येरवडय़ाच्या विद्यापीठात मौनव्रताचा जो साक्षात आत्मानुभव घेतला आहे, त्यांना आर्यमौन व्रताची दीक्षा आदीच लाभली होती. आत्मक्षालन बाकी होतं, ते या विपश्यनेत घडलं.
‘माझं हिमालय भ्रमण’ हा विद्यार्थिदशेत हिमालयाचा एकटय़ाने केलेला प्रवास आहे. स्वत:चा शोध घेण्यासाठी लेखक हेतुत: प्रवासाला निघालेला आहे, प्रवास करतोय आणि पूर्णही केला आहे. संन्यासी बनण्याचं वेड घेऊन निघालेल्या तरुणाला जे समाजदर्शन झालं त्याने हा तरुण पूर्वसंस्कारातून मुक्त झाला. मोकळा झाला. बंधमुक्तही झाला. तो हिंदू न राहता, भारतीय झाला, ही या प्रवासाची फलश्रुती आहे. या लेखात डायरीही समाविष्ट झालेली आहे. हा लेख लेखकाचा फार आवडता आहे का? कारण ‘यात्री’ या त्यांच्या पुस्तकात तो यापूर्वी समाविष्ट करण्यात आला होता. तोच या पुस्तकात घेण्यात आला आहे. मात्र डायरीतील ३१ मे १९६५, १ जून, २ जून या तारखा ‘यात्री’तल्या लेखाशी जुळत नाहीत, एक दिवसाचा फरक पडतोय, तो का व कसा याचं आश्चर्य वाटतं. असो. त्याने बिघडत काहीच नाही. मजकूर मात्र तोच आहे. कदाचित ‘धार्मिक’ या वर्गातला लेख म्हणून आवर्जून समाविष्ट करण्यात आला असावा.
सप्तर्षी यांना महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत-आंदोलनांत मोठं स्थान आहे. साधारणपणे १९६४-६५ला वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. १९६७ पासून ते जे.पीं.च्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्रिय झाले. बिहारच्या दुष्काळात मदत केंद्रांपासून कोयना भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. युथ ऑर्गनायझेनच्या स्थापनेचं रूपांतर पुढे युवक क्रांती दलात झालं नि विद्यार्थ्यांची आंदोलनं करून त्यांनी महाराष्ट्रात एका यशस्वी युवक चळवळीचा पाया रचला. ‘आम्ही विद्यार्थी, आमच्या दंगली’ या छोटेखानी पुस्तिकेने (१९६६-६७) महाराष्ट्र विचार करता झाला. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांनी ती लेखरूपाने छापली. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी बोलावून घेतले. चर्चा केली. काँग्रेसने युवकांना समजून घेण्याचे (नाटक) प्रयत्न केले. आणीबाणीत त्यांना अटक झाली. त्याआधी आणि नंतरही अनेकदा त्यांना अटक झाली. (वाचा, ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’) १९७० ते ८० च्या दशकात सप्तर्षी यांनी अनेक आंदोलनं केली, लढे दिले, प्रश्न ऐरणीवर आणले. पैकी श्रीशंकराचार्याबरोबर झालेला जाहीर वाद खूपच गाजला. ‘संकल्प’सारख्या आत्मनिवेदनातून पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या निर्मितीची घालमेल त्यांनी विशद केली. पूर्णवेळ कार्यकर्त्यांची गरज त्या वेळी सर्वच तरुणांना भुरळ घालत होती. त्याचंच ते एक प्रातिनिधिक रूप होतं. मे १९७७ ला ते युक्रांदमधून बाहेर पडले. जनता पक्षात गेले. आमदार झाले. पण १९६७ ते १९७७ या दशकात डॉ. सप्तर्षी नि युक्रांद यांची छाप तरुण पिढीवर मोठी होती. समाजवादी बिरुद असल्याने धर्म, देव, श्रद्धा, अध्यात्म याविरुद्ध असणारा लढा ही एक त्यांची व त्या विचाराच्या तरुणांची ओळख होती. अशा विचारांचा लढाऊ माणूस धर्माबद्दल काय लिहितो याची उत्सुकता सर्वानाच असणार.
धर्माबद्दल भाष्य करणारे हे सर्व लेख या प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट केलेले असले तरी काही उल्लेख वाचून अचंबा वाटतो. अर्थात डॉ. सप्तर्षी न लपवता प्रामाणिकपणे ते उल्लेख मांडतात. उदा. वयाच्या ११व्या वर्षी त्यांना विवेकानंदांनी वेड लावलं. त्यांना संन्यास घ्यायचा होता. त्यांच्याघरचं वातावरण ब्राह्मणी होते. (ते प्रथम संघ शाखेवर जात असत) हिमालयात जाऊन आल्यावर ते बदलले. गावच्या जत्रेसाठी त्यांनी श्रीएरंडेस्वामींना गावाला आणलं होतं. अकरा दिवस ते त्यांच्याच घरात उतरले होते. डॉ. सप्तर्षी श्रीएरंडेस्वामींचे त्या दिवसात खासगी सचिवच बनले होते. वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांना अध्यात्माचं वेड लागलं होतं. ते आणि अनिल अवचट यांनी पूर्णानंदांची दीक्षाही घेतली होती. सकाळी उठून ते साधनाही करत असत. (पुढे हे वेड कसं सुटलं ते मात्र आलेलं नाही.) अशा अनेक बाबी या पुस्तकात आहेत. पण इतकंच नाही. युक्रांदचे तपशील, युक्रांदचं बळ कशात होतं त्याचं वर्णन, श्रीशंकराचार्याच्या वादातला विविध तपशील, त्यातील हास्यास्पद विधानं, नामदेव ढसाळांविषयीचं भविष्य, बाळासाहेब ठाकरे यांचं विलोभनीय व्यक्तिमत्त्व, युक्रांदचा इतिहास, जनता पक्षावरील भाष्य, आर. एस. एस., सावरकरांवरील भाष्य, बाबरी मशीद प्रश्नांवरचे भाष्य, हिंदू-मुस्लीम प्रश्नांवर तोडगा, शिवसेनेचे काका वडके व त्यांचं कार्य, छगन भुजबळ, उद्धव-राजविषयीची विधानं, बाळासाहेबांची अभ्यासपद्धती, पुरोगामी विचारांची झालेली दुर्दशा, धर्माबद्दलचं भाष्य, व्याख्या, अशा अनेकानेक गोष्टींचं वैचारिक खाद्य या संग्रहात वाचायला मिळतं. मात्र हा भाग ऐतिहासिक वळणाचाच राहतो. याच्यामागे असणारा विश्लेषणाचा भाग (काही अपवाद सोडल्यास) हिमनगासारखा अदृश्यच राहतो. तो पृष्ठभागावर आणण्याचं उत्तम कार्य सप्तर्षी करू शकतात. ते सामथ्र्य नि वैचारिक बळ त्यांच्यापाशी आहे. ते त्यांनी करायला हवं.
उदा. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, प्रत्येक समाजवाद्याने विपश्यनी बनलं पाहिजे. ते का, यावर चर्चा व्हायला हवी. गोयंकाजी निसर्गधर्माची मांडणी करत ती सर्व समाजवाद्यांनी स्वीकारावी म्हणून, की अन्य कारणांसाठी? किंवा ते असंही म्हणतात की, ‘ ‘ब्राह्मण्य’ या प्रवृत्तीने हिंदुत्ववाद नावाचं रूप घेतलं आहे.’ याचा तर खलच व्हायला हवा. ‘समाजात मूलभूत परिवर्तन झालं नाही पण काही अंशी रूपांतर झालं आहे,’ असं मांडताना ते रूपांतर कोणतं? धार्मिक की वैचारिक? ज्या दत्त मंदिरात दलितांना प्रवेश मिळाला तो समाजच सप्तर्षीना दत्ताचा अवतार मानू लागला, या मानसिकतेचं विश्लेषण करायचं नाही का? आदरणीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी सांगितलेली हिंदू-मुस्लिमांसाठीची उपासना पद्धत किंवा येशू ख्रिस्ताला व महंमद पैगंबराला अकरावा-बारावा अवतार समजण्याची कल्पना वाऱ्यावर सोडायची का? अशी असंख्य उदाहरणं देता येतील.
प्रस्तुत पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच ‘माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म’ अशी एक व्याख्या दिलेली आहे. ती चांगली आहे, पण ‘धर्म’ या शब्दाऐवजी नीती, प्रेम, बंधुत्व, मैत्री असे गुणवाचक कोणतेही शब्द टाकले तर काय फरक पडेल? त्याचा विचार करता धर्माचं अधिक अपरिवर्तनीय व्याख्येत रूपांतर करता येईल का, याचा विचार लेखकाने करायला काय हरकत आहे?
असो. वाचनीय, ऐतिहासिक माहितीपूर्ण पुस्तक दिल्याबद्दल सप्तर्षी यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच.
‘धर्माबद्दल’ – डॉ. कुमार सप्तर्षी, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १९५, मूल्य – २०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical debate movement interesting history
First published on: 08-09-2013 at 12:02 IST