मुंबई दूरदर्शन अद्याप स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेत होते. पण त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढत होता. अंगावर बाळसे चढत होते. १९७५ चा सुमार असावा. दूरदर्शनवर ‘गजरा’ नावाचा एक रंजनपर कार्यक्रम lok01सुरू झाला होता. कार्यक्रम तसा सुमारच होता. त्यात नाच, जादूचे प्रयोग, नकला, गाणी असे फुटकळ प्रकार सादर होत असत. होता होता हा ‘गजरा’ विनायक चासकरकडे आला. चासकर मूळचा इंदूरचा (की भोपाळचा?). दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर तो प्रोडय़ूसर म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्रावर रुजू झाला. विनायक आणि कुमुदबरोबर अरुणची आणि माझी ओळख- नव्हे दोस्ती ठ.र.ऊ. मध्ये झाली. कुमुद ही प्रथम श्रेणीची अभिनेत्री होती. विनायकचा कल अधिककरून नेपथ्यसज्जा, प्रकाशयोजना, ध्वनिनियंत्रण, सुतारकाम याकडे असे. चासकरच्या इंदुरी मराठीची आम्ही टिंगल करीत असू. ‘मी हे करून राहिलोए’ अशी भाषा तो बोलायचा. तेही आमच्या पुणेरीपणाची टर उडवायचे. अरुणला ‘पेशवे’ म्हणून संबोधायचे. दिल्लीला आम्ही चौघांनी दोन र्वष मजेत घालवली. मात्र एक वर्षांने सीनियर असल्यामुळे ते आमच्याआधी दिल्ली सोडून गेले. तर आता विनायक दूरदर्शनवर मराठी नाटय़विभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन, इ. विभाग सांभाळत होता. ‘गजरा’ त्याच्याकडे आल्यावर त्याने तो आमूलाग्र बदलला. प्रत्येक स्वतंत्र गजऱ्याला एक वेगळे निश्चित असे अस्तित्व हवे म्हणून तो एक छानसा विषय निवडून त्या विषयाच्या सूत्रात कार्यक्रम बांधू लागला. एकाच विषयाच्या सभोवती रुंजी घालणाऱ्या विविध आविष्कारांची गुंफण करून छानसा ‘गजरा’ माळला जाई. या गजऱ्याचा सुगंध महाराष्ट्रात दूरदूरवर पोहोचायला वेळ लागला नाही. विषयांना (सुरुवातीला तरी) तोटा नव्हता. उदा. सासुरवास, महागाई, फॅशन, रहदारी, वसंत ऋतू, एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, व्यायाम, इ.
गजरा सादर करण्यासाठी नाटक, चित्रपट, लेखन, पत्रकारिता इ. क्षेत्रांमध्ये कामगिरी केलेल्या अनुभवी पटूंना पाचारण करण्यात येई. मग अक्षरश: गजरा त्यांच्या गळ्यात पडत असे. विषयाची निवड, लेखन, सूत्रसंचालक आणि इतर कलाकार ठरवणे, तालीम करणे, इ. जबाबदारी मग त्यांची.
मला जेव्हा ‘गजरा’ करण्यासाठी आमंत्रण आले, तेव्हा मी मनापासून आनंदित झाले. याचं एक कारण असं, की या कार्यक्रमाचा चेहरामोहरा माझ्या लाडक्या नाटय़प्रकाराशी- ‘रिव्ह्य़ू’शी मिळताजुळता होता. फ्रेंच रिव्ह्य़ू हा एक मोहक, बेबंद आविष्कार आहे. वारा प्यायलेल्या वासरागत तो बागडतो.. तुम्हाला समवेत घेऊन. त्याच्या अवखळ प्रकृतीला कसलं बंधन मानवत नाही. त्याला साचेबंद कथानक नसतं. एक सूत्र मात्र असतं. या सूत्रात छोटे स्वयंपूर्ण प्रवेश, गाणी, नाच, चुटके, नकला गुंफल्या जातात. थोडक्यात म्हणजे ‘गजरा’! गुदगुल्या करीत, टपला मारीत जाणारे मोहनाटय़. आनंद होण्याचं दुसरं कारण असं की, लेखन आणि दिग्दर्शन या माझ्या दोन्ही जमेच्या बाजूंना एक वेगळेच आव्हान पेलायची नवी संधी मिळणार होती.
माझ्या गजऱ्याचा विषय होता- ‘डोळा’! चासकरच्या टीचभर खोलीत आमची गहन चर्चा चालत असे. खोली कसली, टी. व्ही.च्या सेट डिपार्टमेंटने जुजबी प्लायवूडच्या फळ्या ठोकून, पार्टिशन्स उभारून छोटी छोटी खुराडी उभी केली होती. चासकरची हरहुन्नरी सहायिका मीना गोखले आवर्जून या चर्चासत्रात भाग घेई. अधूनमधून विलास वंजारी डोकावत असे. भेंडय़ा खेळल्यागत आम्ही ‘डोळा’ या शब्दाभोवती रुंजण घालू लागलो. वाक्प्रचारांची यादी जमवू लागलो. डोळ्याचे पारणे फिटणे, डोळाभरून पाहणे, डोळ्याआड करणे, काणाडोळा करणे, डोळ्याला डोळा भिडवणे, डोळ्याचे पाते लवणे.. एक ना दोन- ही सूची जमवता जमवता डोळे पांढरे व्हायची पाळी आली. म्हणी तरी किती असाव्यात? ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘दृष्टीआड सृष्टी’, ‘आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं’, इ. इ. खरोखर, त्या छोटय़ा खोलीत आम्ही सगळे विलक्षण ‘डोळस’ झालो होतो. विलास गमतीने म्हणाला, ‘सईचे डोळे आले आणि सगळ्यांना लागण झाली.’
आमच्या या संशोधनाचा वापर करून मी एक छोटंसं प्रहसन लिहिलं आणि अरुणने सुयोग्य म्हणींची पखरण करीत आपलं निवेदन रेकॉर्ड केलं. माझी एकच तक्रार होती : कसली आपली मराठी भाषा? इतक्या अवलिया, सुंदर अवयवासाठी इतका बेंगरूळ शब्द? डो-ळा? नेत्रपल्लवी, नयनकटाक्ष, मदिरेचे प्याले अशा कविकल्पना या क्ष शब्दाच्या जवळपास तरी फिरकतील का? ‘डोळा’ म्हटलं की मला तरी रांजणवाडीच सुचते. असो.
माझ्या गजऱ्यात सूत्राला धरून आम्ही अनेक मजेदार कार्यक्रम आयोजित केले. अपेक्षित असलेल्या कविता, गाणी तर होतीच; पण एक मजेदार चित्रकोडं आम्ही एका कुशल फोटो एडिटरच्या साहाय्याने पेश केलं. सुप्रसिद्ध व्यक्तींच्या डोळ्यांचे क्लोजअप्स दाखवले आणि निमंत्रित पाहुण्यांना ते कुणाचे, हे ओळखायचं आव्हान दिलं. या जुगारात आम्ही सिनेनट, पुढारी, कलावंत, क्रिकेटपटू, शास्त्रज्ञ, गायक इत्यादींचे नयनबाण वापरले.
मात्र, डोळ्यांवरचा हा गजरा चिरकाल लोकांच्या लक्षात राहिला याचं संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीकडे जातं. ती व्यक्ती म्हणजे विजय र्मचट. भारताचे एक अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू म्हणून त्यांनी प्रचंड कीर्ती आणि लोकप्रियता मिळवली होती. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले. विशेषत: ज्यांना काही शारीरिक कमतरता आहे, अशांच्या पुनर्वसनासाठी ते अपार परिश्रम घेत असत. ‘मरणोत्तर नेत्रदान’ हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय होता. विजय र्मचट यांचा माझ्या ‘स्पर्श’ सिनेमाच्या यशामध्ये फार मोठा वाटा होता. तेव्हापासून आमची छान ओळख झाली होती. दोस्ती म्हणत नाही, कारण प्रत्येक बाबतीत ते माझ्यापेक्षा थोर होते. स्नेह मात्र म्हणता येईल.
आमच्या गजऱ्यामध्ये नेत्रदानासंबंधीच्या आपल्या विलक्षण अनुभवांबद्दल गप्पा मारायला मी विजय र्मचटना बोलावले. विषय जर जबरदस्त, सच्चा आणि दिलखेचक असेल आणि तज्ज्ञ वक्ता जर आपल्या विषयाशी प्रामाणिक असेल, तर साधी मुलाखतदेखील अतिशय रंगतदार होऊ शकते. विजय र्मचट अर्धा तास बोलत होते आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. इथे एक-दोन किस्से सांगते. ज्या हॉस्पिटलबरोबर त्यांचा नेत्रदान प्रकल्प चालू होता, त्या ठिकाणी बेहराम नावाचे वृद्ध पारशी गृहस्थ दाखल झाले. त्यांची पत्नी पेरिन त्यांच्याबरोबर कायम सोबत असे. दोन-चार दिवसातच हा वृद्ध पेशंट मरण पावला. हुंदका दाबत पेरिनबाई म्हणाल्या, ‘आपले डोळे दान करायची बेहरामची अतिशय इच्छा होती. हट्टच होता. त्यानं इथे येण्यापूर्वी मी हरप्रकारे याबद्दल कोशिश करीन असं माझ्याकडून कबूल करून घेतलं होतं.’
पण एक मोठीच अडचण होती. पारशी लोकांमध्ये कुणीही ‘अ’-पारशी मृताचा चेहरा पाहू शकत नाही. याबाबतीत ते फार कडक आणि कट्टर असतात. बेहरामचा चेहरा रीतीप्रमाणे तात्काळ कापडाने झाकण्यात आला होता.
‘या हॉस्पिटलमध्ये कुणी पारशी डॉक्टर नाही का?,’ पेरिनने विचारले.
‘छे. एकही नाही.’ प्रकल्पाधिकारी उत्तरले.
‘मग एखादा इंटर्न तरी? शिकाऊ डॉक्टर?’
‘नाही हो. तोही नाही.’
‘मग एखादी पारशी सिस्टर आहे का?’
अधिकारी बुचकळ्यात पडले. पेरिनचे प्रश्न आता भरकटत चालले होते. त्यांनी नकारार्थी मान हलविली.
‘तुमच्याकडे पारशी वॉर्ड बॉय तरी आहे का?’ डोळ्यांत प्राण आणून पेरिनने विचारलं. अखेर हताश होऊन अधिकारी काहीशा चिडचिडय़ा स्वरात म्हणाले, ‘अहो, पारशी पेशंटसुद्धा नाहीये इथे!’ म्हाताऱ्या पेरिनने जवळजवळ उडीच मारली. ‘नाही ना? कुणा पारशीची सावलीपण नाही आसपास? मग त्वरा करा. झटपट तुमचं काम करा आणि ऑपरेशन करा. माझ्या बेहरामची इच्छा पूर्ण करा.’
मृत बेहरामने आपले डोळे दान केले आणि स्वस्थचित्ताने त्याने इहलोकाचा निरोप घेतला.
दुसरा किस्सा असाच विलक्षण होता. एक खेडूत बाई बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. नवरा बरोबर होता. तिला मुलगी झाली, पण ती जन्मत: मृत होती. तरुण आई-बाप गलबलून गेले. हे त्यांचे पहिलेच मूल. डोळा हा मनुष्याचा एक असा अवयव आहे, की जो जन्मापासूनच पूर्ण विकसित असतो. कॉर्निया तयार झालेला असतो.
हॉस्पिटलच्या स्टाफने या शोकमग्न आई-वडिलांची गाठ विजय र्मचट यांच्याशी घालून दिली. त्या साधुतुल्य गृहस्थाने आपल्या स्निग्ध, निव्र्याज वाणीने दोघांना नेत्रदानाबद्दल माहिती सांगितली. त्यांच्या शंकांचं निरसन केलं. दृष्टी मिळालेल्या काही भाग्यवान मंडळींचे फोटो दाखविले. या मनमोकळ्या भेटीचा दोघांवर- विशेषत: आईवर खूप परिणाम झाला. आपली छोटी कोणत्या ना कोणत्या रूपाने मागे राहणार, या कल्पनेने ती माऊली हरखली. तिने तात्काळ मान्यता दिली. ‘हो, नाही’ करीत नवराही अखेर तयार झाला.
पण पुन्हा अडचण..
नेत्रदानाचा एकूण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे राबविला जातो. नेत्रदान करण्यासाठी फॉर्म भरावे लागतात. मुख्य म्हणजे हे दान करणाऱ्या व्यक्तीचे नाव स्पष्टपणे लिहावे लागते. त्याची सही लागते. त्याखेरीज व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. नवरा-बायकोनं एकमेकांकडे हताश नजरेने पाहिलं. मृत बाळाला कुठलं नाव?
आणि मग त्या वॉर्डमध्ये अभूतपूर्व घडलं. दहा-बारा लोकांच्या उपस्थितीत त्या निर्जीव नवजात मुलीचं बारसं झालं. तिचं नाव ठेवलं- स्मृती. फॉर्मवर रीतसर तिचं नाव लिहिलं गेलं : स्मृती शंकर खोडे. फॉर्मवर तिच्या पिटुकल्या अंगठय़ाचा ठसा उमटला. स्मृतीनं नेत्रदान केलं.
या डोळ्यांच्या गजऱ्याची प्रचंड चर्चा झाली. नेत्रदानाबद्दल माहिती विचारणारी असंख्य पत्रं, फोन आले. खूपजणांनी अर्ज पण भरले. चासकरकडे जी खूप पत्रं आली, त्यातलं एक आठवतं.. ‘तुमचा हा ‘गजरा’ डोळ्यात साठवून ठेवावा असा होता.’
यानंतर मी तीनएक ‘गजरे’ लिहिले. बसविले. एक होता जाहिरातबाजीवर. जाहिरातयुग नुकतंच सुरू झालं होतं. त्याची मनमुराद टिंगल या कडीमध्ये केली होती. परंतु मला त्याचा तपशील जवळपास काहीच आठवत नाही. तेव्हा तो ‘गजरा’ टवटवीत ताजा नसून प्लास्टिकचा होता की काय, अशी शंका मनात डोकावते. शेवटचा मी केलेला ‘गजरा’ मात्र छान आठवतो. विषय होता- दिवाळी.
विषयच एवढा चैतन्यदायी असल्यावर त्याला वश करण्यासाठी लेखणीला स्फुरण चढले नाही तरच नवल. मी संहिता लिहू लागले आणि कागदावर लिहिलेल्या शब्दांच्या जणू फुलबाज्या उडू लागल्या. माझ्या भोवतालचा परिसर उजळून गेला. या कार्यक्रमात मी तीन दिवाळ्या रेखाटल्या. एक- १०० वर्षांपूर्वीची जुनी, पारंपरिक दिवाळी. एक- सध्याची (म्हणजे तेव्हाच्या सध्याची!) आधुनिक दिवाळी. आणि एक- अगदी कपोलकल्पित, विक्षिप्त- १०० वर्षांनंतरची दिवाळी. जुन्या दीपावलीचे वर्णन अचूक करता यावे म्हणून आम्ही खूप परिश्रम घेतले. संदर्भग्रंथ अभ्यासले, मुलाखती घेतल्या, तपशीलवार माहिती मिळविली. तिन्ही भागांमधले कलाकार तेच होते, तेव्हा त्यांचे परिवर्तन पाहायला गंमत आली. शेंडय़ा, जानवी, धोतर, पंचा, नऊवारी, खोपे, नथ, बुगडय़ा.. ते जीन्स, शॉर्टस्, टी-शर्ट, पंजाबी ड्रेस, स्कर्ट, लांडे केस, लिपस्टिक.. आणि मग भविष्यामधले अगदीच अफलातून फॅन्सी ड्रेस- ‘स्टार वॉर्स’च्या धर्तीवर काहीसे. ‘भविष्य’ भागात दाखविलेला फराळ मजेशीर होता. लाडू, चकल्या, चिरोटे आता पारंपरिक रूपात उरले नव्हते. मंडळी एकमेकांच्या हातावर रंगीत कॅप्सुल्स (औषधाच्या गोळ्या असतात तशा) ठेवून फराळ करण्याचा आग्रह करीत होती. ‘शंकरपाळे फारच खुसखुशीत झाले आहेत हो!’ ‘कडबोळी एकदम खमंग’, ‘अनारसे अंमळ चामट झाले आहेत का?’.. इ. संवाद या गोळ्या गिळताना चालू होता.
‘दिवाळी’ गजरा पण लोकांना खूप आवडला. खूप पत्रं आली प्रशंसा करणारी. पण.. या पत्रांमध्ये एक अतिशय विसंवादी सूर असलेलं पत्र निघालं. ते मला संबोधून लिहिलं होतं. ‘का हो, दिवाळी हा काय फक्त ब्राह्मणांचा सण आहे? ती साजरी करण्याचा मक्ता केवळ त्यांनीच घेतला आहे काय? इतर जाती-जमाती, खेडय़ातली जनता, ब्राह्मणेतर जन हा आनंदोत्सव कसा साजरा करतात, हे तुमच्या गावी तरी आहे का? याचा छडा घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलात? तुमचा हा पक्षपात- ही मक्तेदारी कधी संपणार?’ इ. इ.
पत्र वाचून आधी तर माझी कानशिलं लाल झाली. पण मग मी पुन्हा ते पत्र वाचलं. त्याचं म्हणणं खरं होतं. टीकात्म असलं तरी ते तळमळीनं, पोटतिडिकीनं लिहिलं होतं. पण मला जे परिचित होतं, जे विश्व माझ्या ओळखीचं होतं, त्याचा आधार घेऊन मी गंमत म्हणून हे दीपावली प्रहसन लिहिलं होतं. ‘दिवाळी’ या विषयावरचा तो विद्वज्जड प्रबंध नव्हता. पण तरीसुद्धा मी अनाहूतपणे एका दर्शकाला दुखावलं होतं. मी खट्टू झाले. माझं काही चुकलं का? अजून मला या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, पण अद्याप आपण जातपात, वर्णभेद, उच्च-नीच हा भेद विसरू शकत नाही. विसरायचं म्हटलं तरी आपल्याला विसरू देत नाहीत. दुर्दैव!
माझ्या इतर अवधानांमुळे दिवाळी गजऱ्यानंतर मी पुन्हा ‘गजरा’ गुंफू शकले नाही. पण मुंबईच्या मराठी नाटक, चित्रपट, लेखन, पत्रकारिता अशा विविध रंजन आणि प्रसार माध्यमांमधून दमदार कामगिरी केलेल्या अनेक मान्यवरांनी तो दरवळत ठेवला. सुरेश खरे, शं. ना. नवरे, दिलीप प्रभावळकर, रत्नाकर मतकरी, सुमती गुप्ते, विनय आपटे, अरविंद देशपांडे इ. मातब्बरांनी गजऱ्याला आपली आपली खासियत बहाल केली. सुरेश खरे यांचे ‘परीक्षा’, ‘आनंदयात्रा’ अशासारखे कार्यक्रम, विनय आपटेची अफलातून ‘टेलिमॅच’ आणि दिलीप प्रभावळकरची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्सवर केलेली महामिश्कील पॅरडी- हे सर्व गजरे बहुचर्चित झाले.
यातले खूपसे कार्यक्रम दया डोंगरेने आपल्या मोहक आणि मनमोकळ्या शैलीमध्ये सादर केले. ज्ञानेश्वर नाडकर्णी या चोखंदळ परीक्षक महाशयांनी तिला ‘गजरा क्वीन’ हा किताब दिला, ते उगीच नाही.
चासकरने एकूण ऐंशीच्या वर गजरे प्रक्षेपित केले. या अभियानात मीही माझी पुष्पांजली अर्पण करू शकले, ही समाधानाची गोष्ट. lok02