|| संजय चिटणीस

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ सालचा विश्वचषक जिंकला आणि सगळेच उलटेपालटे झाले. क्रिकेटमध्ये अनेक नवी समीकरणे उदयास आली. भारत ही क्रिकेटमधील एक सर्वार्थाने प्रबळ शक्ती म्हणून झपाटय़ाने विकसित होत गेली. त्याचे पडसाद जागतिक क्रिकेटमध्ये ही उमटले.

काही तारखांना दुहेरी महत्त्व असते. उदाहरणार्थ.. २ ऑक्टोबर घ्या. त्या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. इथे हा दाखला देण्याचे कारण म्हणजे- २५ जूनलाही भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने असेच असाधारण महत्त्व आहे. ३६ वर्षांपूर्वी याच दिवशी लॉर्डस्वर भारताने बलाढय़ आणि पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या वेस्ट इंडिजचा पराभव करून इतिहास घडवला. भारताने विश्वचषक जिंकल्यावर तेव्हा विश्वचषकाचा एक दावेदार असलेल्या पाकिस्तानच्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते चटकन् म्हणाले, ‘‘विश्वचषक आशियात आला आहे याचा आम्हाला आनंद झाला आहे.’’ भारताच्या त्या ऐतिहासिक विजयामागील ‘स्पिरिट’ तथा चतन्य कसे होते याची यावरून कल्पना यावी.

परंतु २५ जूनचे भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने आणखी एक महत्त्व आहे. ८७ वर्षांपूर्वी- म्हणजे १९३२ साली याच दिवशी सी. के. नायडूंच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आणि तेही लॉर्डस्वरच पदार्पण केले होते. त्यावेळी इंग्लंडच्या संघाचे कर्णधार होते- गाजलेले, पण वादग्रस्त डग्लस जार्डिन.. ‘बॉडीलाइन बोलिंग’ फेम!

खुद्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचा आढावा घेतला तर आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून आतापर्यंत काही महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यात विजय हजारेंच्या नेतृत्वाखाली १९५२ मध्ये मिळवलेला पहिला कसोटी विजय आहे, तसेच पतौडीच्या नेतृत्वाखाली १९६८ मध्ये भारताने परदेशात जिंकलेली पहिली कसोटी मालिकाही आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकलेल्या त्या मालिकेबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. त्याचप्रमाणे अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये आधी वेस्ट इंडिज व नंतर इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत जिंकलेल्या मालिका आहेत. त्यावेळी वेस्ट इंडिजचे नेतृत्व साक्षात् सर गारफिल्ड सोबर्स करीत होते. त्यानंतर १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेली वर्ल्ड चॅम्पियनशीप क्रिकेट स्पर्धा सुनील गावस्करच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली, तर आठ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ‘विश्वचषक’, तसेच २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धाही जिंकली. भारतीय क्रिकेटच्या

या एकंदरीत प्रभावी क्रिकेट इतिहासाच्या पार्श्वभूमीवरदेखील २५ जून १९८३ चे महत्त्व आगळेवेगळे आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यावर पतौडीने त्या दिवसाचे वर्णन ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम दिवस’ (single finest day) असे केले होते, हे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. आणि यातच या दिवसाचे सोनेरीपण आहे. सर्व तऱ्हेच्या प्रतिकूलतेवर मात करून भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी व्यक्त केलेली भावना समस्त भारतीयांना प्रेरणा देणारी होती. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मनात आणले तर भारतीयांसाठी काहीही अशक्य नाही, हेच या विजयाने दाखवून दिले आहे.’’ भारतीय संघाचा तेव्हाचा कर्णधार कपिलदेव याने त्यासाठी ‘सेल्फ बीलिफ’ असा शब्दप्रयोग केला होता. खरोखरच तो विजय चित्तथरारक होता.

त्या विजयामुळे भारतीय क्रिकेटचाच नव्हे, तर जागतिक क्रिकेटचाही चेहरामोहरा बदलला. जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा आवाज बुलंद झाला व त्याचा परिणाम पुढच्याच- म्हणजे १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आला. तोपर्यंत ही स्पर्धा भरविण्याच्या बाबतीत असलेली इंग्लंडची मक्तेदारी संपून १९८७ ची विश्वचषक स्पर्धा भारत व पाकिस्तानमध्ये संयुक्तपणे भरविण्यात आली. इम्रान खानचे उद्गार खरे ठरले. इतकेच नव्हे, तर कालांतराने जगमोहन दालमिया, शरद पवार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही झाले. त्याचे बीज १९८३ च्या या विजयात होते हे वास्तव आहे.

खुद्द भारतात त्या स्पर्धेच्या आदल्या वर्षी इंदिरा गांधींच्या पुढाकाराने आशियाई स्पर्धा झाली होती. भारतासारख्या गरीब देशाने अशा स्पर्धेवर खर्च  करण्याची गरज आहे का, असा प्रश्न तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. पण त्या स्पर्धेच्या निमित्ताने रंगीत टीव्ही प्रथमच भारतात आले आणि त्याचा फायदा नंतर क्रिकेटला झाला. त्या ८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताचा उपान्त्य व अंतिम सामना जवळजवळ संपूर्ण देशाने पाहिला. त्यामुळे क्रिकेट घराघरात पोहोचले, तसेच कॉर्पोरेट जगतातही पोहोचले. भारत बघता बघता क्रिकेटमय झाला. उद्योगपती क्रिकेटकडे  ‘ब्रॅण्ड’ म्हणून पाहू लागले आणि क्रिकेटमधील अर्थकारणाला विलक्षण चालना मिळाली. जेमतेम काही हजारांचे स्वप्न पाहणारे भारतीय क्रिकेटपटू आधी लक्षाधीश व नंतर कोटय़ाधीश झाले. सचिन तेंडुलकर, धोनी प्रभृती तर अब्जाधीश झाले. १९८० च्या सुमारास क्रिकेट नियामक मंडळाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवून सुनील गावस्करने भारतीय क्रिकेटपटूंना सुबत्तेचा मार्ग दाखविला, तर कपिलदेवने तो मार्ग प्रशस्त करून दिला.

तसे पाहता १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेआधी झालेल्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये भारतीय संघाची कामगिरी यथातथाच होती. सबब १९८३ मध्ये भारतीय संघाकडून मर्यादितच अपेक्षा होत्या. त्यामुळे या संघावर दडपण नव्हते. परिणामी खेळाडू अगदी मोकळेपणाने खेळले. कुठल्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असेल तर प्रथम तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळायला हवा. १९८३ चा भारतीय संघ जिद्दीने खेळला असला तरी खेळातून जास्तीत जास्त आनंद मिळवायचा प्रयत्न या संघाने केला. ‘नो टेन्शन’ हे या संघाचे ब्रीद होते. अंतिम सामन्यात- तेही वेस्ट इंडिजसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध केवळ १८३ धावांत डाव आटोपल्यावर क्षेत्ररक्षणासाठी बाहेर पडण्यापूर्वी कपिलदेवने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, ‘‘इथपर्यंत आपण मजल मारली आहे हाच आपला विजय आहे. निकालाची पर्वा न करता सर्वस्व पणाला लावून खेळा.’’ संदीप पाटीलने एका मुलाखतीत मला हे सांगितले होते.

स्वत: कपिलदेवने त्या सामन्यात व्हिविअन रिचर्डस्चा जो झेल घेतला, तो कपिल स्वत: टेन्शनखाली असता तर घेऊच शकला नसता. भारतीय क्षेत्ररक्षकाने घेतलेला निदान माझ्या पाहण्यातील तरी तोच सर्वोत्कृष्ट झेल आहे. ‘समिथग आऊट ऑफ धिस वर्ल्ड’ असे त्याचे वर्णन करता येईल. मिड् विकेटला उभा असलेला कपिल १५-२० यार्ड मागे धावत जाऊन ढगात गेलेल्या चेंडूवरील नजर न हटवता ज्या उत्कंठेने चेंडूकडे पाहत होता, त्यामुळे हा झेल म्हणजे ‘विश्वचषक’ याची त्याला जणू खात्री वाटत असावी. ‘कपिल सोडून इतर कोणीही तो झेल घेऊ शकला नसता,’ हे स्वत: रिचर्डस्चे मत सर्व काही सांगते. १९८७ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेआधी सुधीर नाईक यांची ‘लोकसत्ता’साठी विस्तृत मुलाखत घेतली होती. त्यावेळी कपिलची वैशिष्टय़े सांगताना त्यांनी त्याच्या क्षेत्ररक्षणाचा खास उल्लेख केला होता. ‘‘त्याची गोलंदाजी व फलंदाजी यावरच सगळ्यांचे लक्ष असते. त्यामुळे कपिल किती नैसर्गिक क्षेत्ररक्षक आहे याकडे जाणकारांचेही दुर्लक्ष होते,’’ असे नाईक म्हणाले होते. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेपुरते बोलायचे तर अस्सल कर्णधाराप्रमाणे स्वत: आघाडीवर राहून कपिलने संघाचे नेतृत्व केले. त्या स्पर्धेत कपिलने ६०.६० च्या सरासरीने एकूण ३०३ धावा केल्या, तर २०.४१ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. फलंदाजीतील सरासरीत भारतीय फलंदाजांमध्ये कपिलच आघाडीवर होता. झिम्बाब्वेविरुद्धचा त्याचा १७५ धावांचा डाव हा तर स्पर्धेतील सर्वात निर्णायक क्षण (टर्निंग पॉइंट) होता. तो डाव ‘करो या मरो’सारखाच होता. बीबीसीच्या संपामुळे दुर्दैवाने त्या सामन्याचे प्रक्षेपण झाले नव्हते.

१९७५ व १९७९ च्या तुलनेत १९८३ मध्ये भारतीय संघात झालेला मोठा बदल हा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत होता. ग्राउन्ड फिल्डिंग व झेल घेण्याच्या बाबतीत या संघाने किमया केली. अंतिम सामन्यात तर त्याचा पूर्ण प्रत्यय आला. या संघाचे वैशिष्टय़ म्हणजे गरजेनुसार गोलंदाजी करू शकणारे काही फलंदाज- उदा. कीर्ती आझाद, यशपाल शर्मा या संघात होते, त्याचप्रमाणे अष्टपलू खेळाडूही होते. त्यामुळे त्या- त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्याकडून हवी ती कामगिरी करून घेता यायची. भारतीय संघाच्या यशाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू चमकले. स्पर्धेत भारतीय संघ आठ सामने खेळला. त्यापैकी सहा सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू सामनावीर ठरले. त्यात यशपाल शर्मा, मदनलाल, कपिलदेव, रॉजर बिन्नी व मोहिंदर अमरनाथ हे होते. मोहिंदर तर अंतिम सामन्यासह दोन सामन्यांत सामनावीर ठरला. थोडक्यात, खऱ्या अर्थाने ती सांघिक कामगिरी होती. एक-दोन खेळाडूंच्या जिवावर एखाद् दुसरा सामना जिंकता येतो, पण सातत्याने जिंकण्यासाठी सांघिक कामगिरीच लागते. १९८३ च्या विजयाचा हाच खरा अर्थ होता!

sanjay.chitnis@outlook.com