हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

‘कुटुंबवत्सल इथे फणस हा, कटिखांद्यावर घेउनि बाळे..’ ही इंदिराबाई संतांची नितांतसुंदर कविता. मध्यमवर्गात मोडणाऱ्या किंवा मध्यमवर्गीय मानसिकता असलेल्या भारतीय समाजाला आणि इथल्या सामाजिक मानसिकतेत कौटुंबिक सौख्याचा गोडवा हे सुखाच्या सर्वोच्च अभिव्यक्तींपैकी एक अभिव्यक्ती समजली जाते. केवळ भारताच्याच नव्हे, तर मानवी समाजव्यवस्थेच्या सबंध इतिहासात कुटुंब, रक्ताची नाती, नातीगोती या गोष्टींना अनन्य महत्त्व आहे. झपाटय़ाने ‘शहरी’ होत गेलेल्या/ होत असलेल्या भारतीय समाजात अजूनही कुटुंबव्यवस्था एखाद्या मजबूत भुईकोट किल्ल्यासारखी स्वत:चं अस्तित्व भक्कम मिरवत उभी आहे. इथल्या लेण्यांतली चित्रे, अद्भुत कोरीवकामे ल्यालेल्या मंदिरांच्या भिंती, पौराणिक आख्याने, पूजाविधी, उपासना, सार्वजनिक सोहळे, सण, उत्सव, नाटके, साहित्य, महाकाव्ये या कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करीत आली आहेत.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

भारतातल्या वेगवेगळ्या जनसमूहांतील जीवनशैलींचे बहुतांश सर्वच आयाम- मग त्यात लैंगिकता, सुफलन असो, नवजात अर्भकाच्या जन्मापासून सुरू होणाऱ्या संस्कारांच्या मालिका किंवा पालकत्व असो, माणसाच्या मृत्यूनंतरचे विधी, जन्म-मृत्यूविषयीच्या वार्षिक स्मृती असोत, सनातनी, कर्मठ आणि बहुजन या दोन्ही सामाजिक-सांस्कृतिक वर्गात कुटुंब व कौटुंबिक मूल्ये या गोष्टी केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. भारतीय समाजाच्या संदर्भात कुटुंबव्यवस्थेची जी काही मुख्य ठळक म्हणावी अशी वैशिष्टय़े आहेत, त्यापैकी सर्वात मोठा घटक हा आहे की, कुटुंब ही गोष्ट व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील लौकिक आणि पारलौकिक ध्येयांच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते अशी धारणा भारतीय श्रद्धा तत्त्वज्ञान विश्वात दृढमूल आहे. व्यक्तिवादासारखे आधुनिक मूल्य समजून घेताना अजूनही चाचपडणाऱ्या समाजात अध्यात्म नामक मार्ग विलक्षण महत्त्व राखून असला तरी ‘आत्म/स्व’ या तत्त्वाभोवतीच केंद्रित असलेल्या या मार्गाचे सार्वजनिकीकरण करण्याची पहिली पायरी इथेच दिसून  येते.

प्राचीन, मध्ययुगीन काळातील व त्या काळांत रमणाऱ्या हिंदू, बौद्ध आणि जैन भावविश्वांत वेगवेगळ्या देवतांना वर्णित करताना त्यांच्या चरित्रलीलांना जे मानवी मापदंड लावले गेले त्यातून खुद्द देवतांना किंवा ईश्वरस्वरूप अभिव्यक्तींना लिंगभाव, मानवी भावना इत्यादी मानवी वैशिष्टय़ांसोबत कौटुंबिक आयामही चिकटवले गेले. पुराणांमध्ये शिव आणि त्याची सहचरी गौरी सारीपाट खेळतात. एकीकडे मानवी किंवा अतिमानवी वैशिष्टय़ांनी युक्त अशा रूपात प्रकट झालेल्या या देवतांची कुटुंबे सामान्य कौटुंबिक जीवनात घडतात तसेच त्यांच्यातील कलह, वाद आणि अन्य मानवी संवेदनांचे होणारे प्रकटीकरण देवत्वाला मानवी स्तरावर आणतात. तर दुसरीकडे काही महत्त्वाच्या कर्मकांडांमध्ये चक्क संबंधित विधी करणाऱ्या व्यक्तींनाच देवत्वाने अंकित करून त्यांना विशिष्ट अधिकार दिले जातात. याचा दुसरा अर्थ असा की, विश्वातील काही विशिष्ट व्यवहारांना  दैवी अधिष्ठान देताना मानव आणि देवता या दोन्ही घटकांचे एकमेकांशी असलेले पूरकत्व किंवा एकमेकांशी तादात्म्य साधण्याचे त्यांचे सामथ्र्य दाखवून देण्यास परंपरेला काहीही संकोच वाटत नाही. उदाहरणार्थ, सोमयागासारख्या विधींमध्ये दीक्षित होणाऱ्या यजमानाला- म्हणजे यज्ञकर्त्यांला यज्ञाची दीक्षा दिल्यावर त्याच्यामध्ये कल्पिलेले, अंकित केलेले सामथ्र्य हे जवळपास देवत्वाला समांतर किंवा काहीसे जवळ जाणारे असते. विवाह विधींमध्ये किंवा विशिष्ट रोगांच्या चिकित्सेत संबंधित विधी करताना किंवा औषधांचे प्रयोग करताना संबंधित व्यक्तींच्या देहाला ‘यजमान’ समजून त्यात काही विशिष्ट दैवी वैशिष्टय़े परिकल्पित केल्याचे दिसून येते. याचेच एक स्वरूप म्हणजे राजा, गुरू, माता, वडील यांना विष्णू, शिव, पार्वती, ब्रह्मा अशा वेगवेगळ्या देवतारूपात पाहण्याची रीत. अँथनी गूड या अभ्यासकाने दाखवून दिल्यानुसार, ‘या गुंतागुंतीच्या श्रद्धाविश्वातल्या धारणा आणि आचारांचा अभ्यास या समाजात खोलवर रुजलेल्या नातेसंबंधांच्या अभ्यासाला आवश्यक अशी अनेक अभ्यास साधने पुरवतो.’ या वैशिष्टय़ाला पूरक दुसरे वैशिष्टय़ असे की, शिव किंवा विष्णूसारख्या देवतांच्या परिवारातल्या अन्य देवता व उपदेवतांमध्येही संबंधित मुख्य देवतेचे गुण प्रतिबिंबित झालेले दिसतात. उदाहरणार्थ, शिवगणांमध्ये असलेल्या शिव किंवा कार्तिकेयस्वामीसारख्या, भैरवासारख्या देवतांवर शिवाच्या गुणांचे, त्याच्या लीला-कर्तृत्वाचे अध्यारोपण झालेले दिसते. थोडक्यात, अनेक स्थानिक देवतांची रूपे एका मुख्य देवतेभोवती केंद्रित असतात. अगदी त्याच रीतीने समाजातल्या कौटुंबिक व्यवस्थांमध्ये महत्तम स्थान असलेल्या पातीभोवती वेगवेगळ्या पाती/ गटांमध्ये विभागल्या गेलेल्या कुटुंबसमूहांच्या जाणिवा केंद्रित असतात. विशिष्ट राजकीय परिस्थितींमध्ये या सर्व कौटुंबिक ‘आयडेंटिटीज्’ या केंद्रीय अस्मितेच्या नावाने जागृत होतात. कुटुंबव्यवस्था ही वेगवेगळ्या भूभागांत राहणाऱ्या मानवी समाजांतील समाजरीती स्वीकारूनच विकसित होत असल्याने भारतीय समाजरचनेच्या संदर्भात कौटुंबिक व्यवस्था, त्यातील सांस्कृतिक अनुबंध व श्रद्धा, धार्मिक आणि अन्य विवाहादी, गृसंस्कारादी व्यवहार जातव्यवस्थेच्या छत्राखाली विकसित होतात. त्यामुळे ओघातच कौटुंबिक धारणा, त्यांच्याशी साधम्र्य दाखवत असलेल्या समान/ समांतर/ निकटच्या धारणा बाळगणाऱ्या समूहांशी सलगी दाखवत संबंधित सांस्कृतिक अनुबंधांना व पर्यायाने जातव्यवस्थांनाही बळ देतात. या ओळखी अनेकदा कर्मकांडप्रवण शुद्धाशुद्धतेच्या धारणा आणि उतरंड या गोष्टींशी समांतर संबंध राखत समाजात उतरतात. या शुद्धाशुद्धतेच्या धारणा स्वच्छताविषयक सेवा, आहार, पाकक्रिया इत्यादी कामांशी किंवा विष्ठा, थुंकी/ उष्टे, स्त्रीसंबंधीचे मासिक धर्म यासंबंधीच्या क्रियांशी  निगडित असतात. त्यांना यथावकाश वर्गीय, नागरी परिमाणे लागून या व्यवस्थांना साचेबद्धता आणि संबंधित अस्मितांशी निगडित कर्कश्श अभिनिवेशादी धारणांची पुटे चढतात.

समाजातील आचार-आहारविषयक रीती, श्रद्धा आणि शुद्धाशुद्धतेविषयीच्या धारणांनी साचेबद्ध होत गेलेल्या रचना यांतही जातव्यवस्थेच्या सूत्रांच्या मर्यादांनी वेढलेली दुसरी उपव्यवस्था म्हणजे लग्नसंस्था. पुरुषसंस्थेच्या प्रभावातून वराकडची बाजू स्त्रीचा स्वीकार करणारी, तर वधूकडील बाजू कन्यादान करणारी अशी साधारण धारणा या ‘संस्कारा’च्या मुळाशी आहे. आपल्या वर्णातील ‘बुद्धिमान’ पुरुषाला (आजच्या संदर्भात ‘आर्थिकदृष्टय़ा सुस्थापित’ हा एक निकष) कन्यादान करावे अशा आशयाची पूर्वअट शास्त्रकारांनी घालून दिलेली असे. अगदी अलीकडेपर्यंत मामे-आतेभावंडांचे आपसात लग्न लावून देण्याची रीत आपल्या समाजात रूढ होती.त्यातही स्त्री ऋतुमती होण्याआधी विवाह लावून देणे यासारख्या धारणांतून बालविवाहादी रूढी समाजात बळावल्या होत्या. वैदिक धार्मिक रीतीने व भारतीय धर्मव्यवस्थेनुसार होणाऱ्या विवाहांतील मंत्रांपासून ते विवाहोत्तर गृविधींत स्त्रीचे स्थान हे घरातल्या ‘कर्त्यां’ पुरुषाच्या बाजूला बसून त्याला हातभार लावणारी सहचरी अशा स्वरूपाचे असे व आजही आहे. यज्ञविधी असो किंवा घरातील साधे पूजादी विधी असोत, पुरुषाच्या हाताला हात लावून स्त्री या विधींत सहभाग घेते. याच भूमिकेतून स्त्रीला कौटुंबिक विधी/उपचारांमध्ये स्थान दिले गेल्याचे आजही सर्वत्र दिसून येते. विवाह विधींसोबतच लैंगिक जीवनाविषयीच्या धारणादेखील पुरुषकेंद्री समाजव्यवस्थेची सर्व वैशिष्टय़े लेवून समाजात कशा उतरतात याचा ऐतिहासिक आढावा आपण ‘लिंगभावाची ऐतिहासिकता’ लेखात यापूर्वी घेतलेला आहेच.

लिंगभाव व विवाहासोबतच उपासनाविषयक अधिकार, मुक्ती याबाबतीतही कौटुंबिक व्यवस्थेत आणि सामाजिक संरचनांमध्ये काही  विशिष्ट धारणा आणि रीती दिसतात. मोक्षासारख्या  गोष्टी वेदाचरण, अध्ययन, अध्यापन, अन्य  उपासना इत्यादींद्वारे साध्य होतात. पारंपरिक समाजव्यवस्थेनुसार हे अधिकार त्रवर्णिक पुरुषाला असल्याने आणि त्रवर्णिकेतर मनुष्यांना त्रवर्णिकांची सेवा हे सामाजिक कर्तव्य आणि  प्राकृत पुराणश्रवण, नामसंकीर्तनांतून मोक्ष अशी मर्यादा घातल्याने शूद्र आणि स्त्री यांचा मोक्षाधिकार सामाजिक दुय्यमतेशी अनुस्यूत अशा मार्गातूनच असल्याचे भगवद्गीतेसारख्या ग्रंथांतून दिसून येते.

अशावेळी स्त्रीचे मातृत्व, तिन्ही जगाच्या स्वामी असलेल्याहून मोठे असलेले तिचे स्थान, तिचे देवीस्वरूप अधोरेखित करून, तिच्या कल्याणी अशा रूपाच्या हातात पाळण्याची दोरी देत तिला जगाची उद्धारकर्ती असल्याचे सांगत  तिच्या स्थानाचे कृतक उदात्तीकरणदेखील  समाजात तितकेच जोरकस पद्धतीने होते. स्त्रियांच्या या उद्धारकर्त्यां रूपाला त्याग, नि:स्वार्थता यांसारख्या मूल्यांशी जोडले जाणे हा सद्गुण समाजात गौरविला जातो. मात्र, मृत्यू झालेल्या स्त्रीसाठी तर्पणादी विधींना मात्र मर्यादांची कक्षा घालून, पुरुष सहचराला उद्देशून केलेल्या तर्पणादींतून तिच्या मुक्तीची सोय लावल्याचे दिसून येते.

कुटुंबव्यवस्थेचा इतिहास आणि समाजशास्त्र हे भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासण्याच्या दृष्टीने अविभाज्य व टाळता येणार नाहीत असे घटक आहेत. या व्यवस्था सामाजिक उतरंड, लिंगभावाच्या पुरुषकेंद्री जाणिवा व त्याच्याशी अनुस्यूत अशी शुद्धाशुद्धता यांभोवती केंद्रित झालेल्या दिसतात. गेल्या आठ-नऊ दशकांत आलेल्या आधुनिकता, लोकशाही, सामाजिक समता व अर्थकारण इत्यादी तत्त्वांच्या प्रसारामुळे, याविषयी मोठय़ा प्रमाणावर चर्चा आणि चळवळी झाल्याने समाजातील शतकानुशतके दृढ राहिलेल्या भिंती हादरू लागल्या आणि समाजात मोठी घुसळण सुरू झाली. अर्थकारणाच्या दृष्टीने जमिनीचे वितरण, त्याविषयीच्या व्यवस्थांचे विकेंद्रीकरण, सर्व व्यवस्थांमध्ये लिंग आणि जात या तत्त्वांच्या पलीकडे जाऊन समता आणण्याचा किमान आग्रह आणि त्याविषयीच्या किमान जाणिवा समाजात पसरू लागल्याने आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ाचा जोर दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याने ही घुसळण अधिक वेगवान होईल. आणि त्यासोबत काही दशकांनी नाही, तरी किमान शतकभराने किंवा दोन शतकांनी इथल्या समाजरचनेत काही लक्षणीय बदलाचे चक्र फळ धरू लागेल अशी किमान आशा करायला यानिमित्ताने हरकत नाही.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)