25 February 2020

News Flash

अंतर-ज्ञान

माझा अतिअभ्यासू सन्मित्र प्राध्यापक मनोहर नाकावर घसरलेला जड आणि जाड चष्मा डोळ्यांवर ढकलून मला म्हणाला, ‘‘तो टीव्ही आधी बंद कर आणि मला सांग, तू बरॅक

| December 8, 2013 12:05 pm

माझा अतिअभ्यासू सन्मित्र प्राध्यापक मनोहर नाकावर घसरलेला जड आणि जाड चष्मा डोळ्यांवर ढकलून मला म्हणाला, ‘‘तो टीव्ही आधी बंद कर आणि मला सांग, तू बरॅक ओबामाला ओळखतोस?’’
टीव्हीला मौनव्रतात पाठवून मी त्याला खुळ्यात काढला, ‘‘हा काय प्रश्न झाला? तो अमेरिकेचा राष्ट्रपती आहे. जगात सगळ्यांनाच तो माहीत आहे.’’
‘‘गुड! तो तुला ओळखतो?’’
‘‘हा काय प्रश्न झाला? तो कशाला त्याच्या आसपास मला फिरकू देईल?’’
‘‘गुड! मग तुझ्या ओळखीतल्या कोणाला तो ओळखतो?’’
‘‘तुला ओळखतो?’’
घसरलेला चष्मा कपाळावर सरकवून मन्यानं मला दरडावलं, ‘‘सध्या मी प्रश्न विचारतोय. तू सवालका जवाब सवालानं द्यायचा नाही.’’
‘‘तुला ओळखत असला तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो. नाही तर नाही.’’
‘‘गुड! तुला असा कोणी ओळखतो का जो अशा एका माणसाला ओळखतो की ज्याला ओबामा ओळखतो?’’
‘‘माझं मस्तक गरगरायला लागलंय. थांब. मी व्हर्टनिची गोळी घेऊन येतो. तोवर तू ओबामाला फोन लाव आणि त्यालाच समक्ष विचार.’’
‘‘त्याला विचारायची गरज नाही. तूच नीट विचार कर रात्रभर. उद्या संध्याकाळी मॉìनग वॉकला आलास की उत्तर दे.’’
मी मन लावून विचार केला. रात्रभर नाही. नसत्या भाकड कारणासाठी मी निद्रासुख कधीच अव्हेरत नाही. सकाळी वर्तमानपत्रांचं समग्र वाचन करून नाश्ताबिश्ता झाल्यावर समाधी लावली. भरल्या पोटी माझा मेंदू चटाचटा कामाला लागतो. थोडय़ाच वेळात मेंदूकडून मेसेज आला की दोनच दिवसांपूर्वी पेपरमध्ये ओबामा एका तल्लख भारतीय सद्गृहस्थाशी सहर्ष मुद्रेनं हस्तांदोलन करत असतानाचा फोटो आला होता. त्या विद्वानाची अमेरिकन सरकारच्या कोणत्यातरी महत्त्वपूर्ण पोस्टवर खास नेमणूक ओबामासाहेबांनी स्वत:च्या अखत्यारीत केलेली होती. फोटोखालच्या बातमीमध्ये त्या दोघांनी काही वर्ष एकत्र काम केल्याचं आणि ओबामासाहेबांना त्याच्या बुद्धिचातुर्याची पुरेपूर खात्री पटल्याचं वृत्त होतं. मी ते धर्मपत्नीला दाखवल्यावर तिनं त्या सदगृहस्थाचं नाव तिच्या मावसबहिणीच्या नवऱ्याच्या तोंडून काही वेळा ऐकल्याचं ठामपणे सांगितलं होतं.
मी मेंदूला ‘थँक्स’ देऊन बायकोला पाचारण केलं. ती ‘हो’ म्हणाली. तिनं ठामपणे केलेल्या विधानात बहुधा भयानक गफलत असते. मी तशी शंका व्यक्त केल्याक्षणी तिनं प्रथम मावसबहिणीला आणि तिच्याकडून नंबर घेऊन तिच्या पतीदेवांना फोन केला. त्यांनी प्रथम इकडच्या तिकडच्या चौकशा केल्या आणि शेवटी बातमी कन्फर्म केली. ते दोघे म्हणे, अनेक वर्षांपूर्वी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत राहायचे. सध्या कामानिमित्त महिनाभर मुक्काम जपानमध्ये. त्यामुळे या वायफळ शंकानिरसनानं माझ्या प्रीपेड मोबाइल फोनचा बॅलन्स झपाटय़ानं उतरवला. तो अव्वाच्या सव्वा खर्च मन्याकडून वसूल करण्याचं ठरवलं.
संध्याकाळी मन्याला हे सांगितलं. फोनबिलाच्या मुद्दय़ाला बगल देऊन तो आíकमिडिजसारखा, पण कपडे न सोडता चीत्कारला, ‘‘युरेक्का! मी एक प्रयोग केला रे तुझ्यावर. आणि तो संपूर्ण यशस्वी झाला. म्हणजे बघ. तू आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बरॅक ओबामा यांच्यामध्ये फक्त चार माणसं आहेत. वहिनी, तिची बहीण, बहिणीचे यजमान आणि तो विद्वान.’’
‘‘चार कसे? तीन. माझ्या बायकोला तिच्या मावसबहिणीचा नवरा डायरेक्टली ओळखतो की.’’
‘‘अरे, हे माझ्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे इन फॅक्ट दोनच.’’
‘‘दोन कसे?’’
‘‘सिंपल! तू आणि वहिनीचा मावसमेहुणा एकमेकांना थेट ओळखत असणारच की. म्हणजे ओबामाला जर कधी तुझी गरज पडली तर फक्त दोन स्टेप्समध्ये तो तुझ्याशी संपर्क साधू शकतो. केवळ तासाभरात.’’
‘‘खरंच की.’’ आता ओबामाला माझी गरज का पडावी, हाच एक बारीकसा मुद्दा शिल्लक राहिला होता.
‘‘या सिद्धांताला ‘सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन’ म्हणतात. त्यानुसार जगातला कोणताही माणूस जास्तीत जास्त पाच स्त्री-पुरुषांच्या साथीनं जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या कोणत्याही संपूर्ण अनोळखी माणसाशी जोडला जाऊ शकतो. याला सहा अंशांचं अंतर असं म्हणतात. तू आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचं सोडच रे, पण पहिला माणूस अगदी नगण्य अणि सहावा माणूस आलतूफालतू असला तरीही हा नियम लागू होतो.’’
‘‘असं कोण म्हणतं?’’
‘‘एका हंगेरियन लेखकानं १९२९ साली चेन्स नावाची एक गोष्ट लिहिली आणि त्यात हा सिद्धांत मांडला. २० वर्षांनंतर ही साहित्यिक कल्पना दोन शास्त्रज्ञांनी संख्याशास्त्राच्या साहाय्यानं तपासली. नंतर १९६७ मध्ये एका समाजशास्त्रज्ञानं काही स्वयंसेवकांना हाताशी धरून एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्यावर त्याला ‘सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन’ हे नाव दिलं. पण हा प्रयोग खूपच छोटय़ा स्तरावर केलेला होता असा आक्षेप घेतला गेला. मग २००१ साली १५७ देशांमधल्या तब्बल ४८ हजार लोकांच्या साहाय्यानं इंटरनेटवरून एक प्रयोग केला गेला आणि आश्चर्य म्हणजे त्याचं उत्तरही सहा हेच आलं. तरीही लोकांचा विश्वास बसला नाही. शेवटी २००६ मध्ये मायक्रोसॉफ्टनं १८ कोटी लोकांनी पाठवलेले ३० हजार कोटी ई-मेल्स किचकट प्रमेयांच्या आधारे तपासले आणि साडेसहा हे उत्तर काढलं.’’       
माणसांमाणसांमधलं अंतर मोजण्याचं हे ज्ञान मला पसंत पडलं. ते समक्ष वापरण्याचा छंदच लागला. माझीही उत्तरं चारच्या पुढे कधीच गेली नाहीत. जेव्हा दाउद इब्राहिमच्या संदर्भात तीन हा आकडा लागला तेव्हा मी चरकलो आणि खेळ बंद केला.
रात्री टीव्हीवर ‘मिस्टर नटवरलाल’ हा जुना धमाल चित्रपट लागला होता. तो पेंगुळलेल्या अवस्थेत बघताना अनवधानानं मनात प्रश्न उमटला की अमिताभ बच्चन आणि मी यांच्यात किती मनुष्यअंतर असेल? दुसऱ्या क्षणाला अमिताभचे एक डॉक्टर हे आपले जिवश्च कंठश्च दोस्त असल्याचं आमचे फॅमिली डॉक्टर म्हणाले होते, ते आठवलं. अरेच्चा! आम्हा दोघांमध्ये इतकी जवळीक असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
तितक्यात सिनेमातलं रेखा-अमिताभचं ‘परदेसिया, ये सच है पिया’ हे सुपरहिट नृत्यगान सुरू झालं. पुढचा निष्कर्ष माझ्या मेंदूत निमिषार्धात उगवला. माझी झोपच उडाली. वॉव! म्हणजे रेखा आणि मी केवळ तीन सहृदय सद्गृहस्थांच्या संयुक्त  सौजन्यानं एकमेकांशी कनेक्ट होऊ शकलो असतो. परमेश्वरा, वाचतो आहेस ना हे?
अडचण एकच होती. जर रेखानं अमिताभला फोन केला आणि त्यानं तो घेतला, तर सिनेसृष्टीमधले सगळे चमचमीत विषय सोडून ती माझी चौकशी का करेल? म्हणजे करेल का?

First Published on December 8, 2013 12:05 pm

Web Title: inter knowledge
Next Stories
1 परिभक्षक
2 स्वातंत्र्य
3 खो-खो
Just Now!
X