मुलाखत- नोकरीसाठी असो की उमेदवारीसाठी- आम्हांस मुळ्ळीच आवडत नाही.
मधे एकजण. हात खुर्चीच्या दांडीवर ठेवावेत की मांडीवर, अशा मूलभूत प्रश्नांनी आधीच त्याचा घामघाम झालेला असतो. आणि त्याच्या त्या अवस्थेची मौज लुटत मुलाखतकारांची टोळी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत असते. याबाबतीत आम्ही एक पाहून ठेवलेय- मुलाखत देणारा जेवढा गाळात रुतत जातो ना, तेवढा मुलाखत घेणाऱ्यांना चेव चढत असतो.  
बरे, हे प्रश्नही कसे?
तुमच्या शर्टाला गुंडय़ा किती आहेत?
का? तुम्हाला हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे त्या गुंडय़ांशी लाडे लाडे खेळायचे आहे? काय तरी प्रश्न!
पण हे झाले नोकरीसाठीच्या मुलाखतींचे. राजकीय मुलाखतींचे तंत्र आणि मंत्र याहून भिन्न असतात. परवा आमचे परमशेजारी व फेसबुकवरील राजकीय विश्लेषक रा. रा. लेले सांगत होते, की नक्श लायलपुरी यांनी त्याबाबत मागेच लिहून ठेवले आहे.
आम्ही म्हटले, ‘काय?’
तर लेले म्हणाले, ‘ये मुलाकात एक बहाना है.. प्यार का सिलसिला पुराना है!’(आता समजले ना, आम्ही या फेसबुकी विचारवंतांपासून लांब का राहतो ते? असो.)
तर ते राजकीय मुलाखतींचे परमगुह्यज्ञान आपणांसही व्हावे, जेणेकरून पुढे-मागे मुलाखती कशा द्याव्यात, या विषयावर आपणही काही बोलू शकू, या पवित्र हेतूने परवा आम्ही टिळक भवनी जाऊन आलो. तेथे आम्हांस जे चित्र याचि डोळा दिसले, ते खचितच सांगण्यासारखे नाही. असे चित्र यापूर्वी आम्ही नरिमन पॉइंटातल्या एम्प्लॉयमेन्ट एक्स्चेंजमध्ये पाहिल्याचे स्मरते.
केवढी ती गर्दी!
वाटले, वेळप्रसंगी डिपॉझिट कुर्बान झाले तरी चालेल, पण आम्ही लढणारच- अशा उमेदीने लढणारे उमेदवार ज्या पक्षात आहेत, त्याला या भूतलावर मरण नाही!
सादर आहे- टिळक भवनातील मुलाखतींची डोळां पाहिलेली गोष्ट..
पुढचा इच्छुक आत आला तेव्हा माणिकरावांच्या घशातून अशी लांबलचक जांभई भरून आली होती.. मस्त आ करावे, तोंडापुढे डाव्या हाताची पालथी मूठ धरावी आणि ‘आयायगो’ करून आपुल्या दीर्घ जांभईने टिळक भवन दणाणून सोडावे असे त्यांना क्षणभर वाटले. परंतु पक्षासाठी अनेक इच्छा-आकांक्षा दाबून ठेवाव्या लागतात! त्यांनी ओठ मिटून आतल्या आत जांभई जिरवण्याचा प्रयत्न केला. हातानेच समोरच्या इच्छुकाला विचारले, ‘काय?’
‘काय नाय! तिकीट पायजे!’
माणिकरावांना वाटले, त्यास विचारावे, सिंगल की रिटर्न? अरे, चेहऱ्यावर जातो काय आमच्या? रेल्वेचा बुकिंग क्लार्क वाटलो की काय? परंतु त्यांनी आपले पद व त्याचे मूल्य ध्यानी घेऊन जांभईबरोबर रागही गिळला.
त्यांनी विचारले, ‘नाव?’
‘इच्छुक.. आपलं ते.. झांबर देशमुक-पाटील औशेकर! उमर सत्तेचाळीस. धंदा समाजशेवा.. जात आन् मेरिट उघड सांगू का गपचूप?’
त्याला हाताने थांबवत माणिकरावांनी विचारलं,  ‘कुठनं पायजे उमेदवारी?’
‘तसा काय आपला हट्ट नाही. काय तुम्हाला वाटंल तिथनं दिली तरी चालंल..’
‘अहो, ही काय खिरापत हाय का? कुठूनपण दिली तरी चालंल म्हंजे काय? तुमचा मतदारसंघ कोण्ता?’
‘तसं तीन-चार फिक्स केल्यात आपन. त्येच्यापैकी कुटनंपन दिली तरी चालंल..’
माणिकरावांनी डावी भुवई बोटांच्या चिमटीत दाबत म्हटले, ‘अहो, असं नसतं उमेदवारीचं. त्या मतदारसंघात काम असावं लागतं आपलं.’ पक्षाध्यक्ष म्हणून आपल्याला प्रौढशिक्षणाचे खूप काम करावे लागणार आहे, हे माणिकरावांच्या एव्हाना लक्षात येऊ लागले होते.
‘काम हाय ना! गेल्या पंधरा दिवसांत चार मयती, सात दसपिंडं अटेन केलीत. एका दसपिंडात तर प्रवचनकार बुवा राह्यला बाजूला, आपुनच दनकून भाषान दिलं. बरं, पाच-पन्नास दहीहंडय़ा आन् गण्पती मंडळांच्या पावत्या फाडल्यात. काम चालू हाय आपलं.. त्येची काय काळजी नाय!’
‘मग या कामाच्या जोरावर तुम्ही निवडून येणार?’
‘आँ?’
‘तुम्ही निवडून येणार?’
‘हॅहॅहॅ!’  झांबर पाटलांना हसूच आवरेना. ‘निवडून यायचं कोन म्हण्लं?’
‘म्हणजे?’ माणिकरावांच्या मेंदूला झिणझिण्याच आल्या.
‘आपल्याला फकस्त तिकीट पायजेल हाय.’
‘ते कशाला?’
‘इथं तिकिटाचं नक्की झालं, म्हंजे बरं असतंय..’
‘काय बरं असतंय?’
‘आता कसं सांगावं तुम्हांला?.. आता आपन काय माजी आमदार नाय, पक्षाचं पदाधिकारी नाय, नाराजबी नाय, म्हटल्यावर आपल्याला कमळवाले कशाला हिंग लावतील? बराबर हाय का नाय? पूर्वी त्यान्ला कंचाबी पडीक माल चालायचा. आता त्यांची टेश्ट बदललीये.’
‘मग? त्यांच्या टेस्टचा इथं काय संबंध?’
‘नाही कसा? तिकीट मिळालं म्हंजे वट वाढंल ना आपली. पक्षांतर करून तिकीट मिळवायला सोपं जाईल. सोपं काय जाईल? काम फत्तेच होईल! तसंच तर चाललंय कमळवाल्यांचं सध्या..’
झांबर देशमुख-पाटील औशेकर यांची ही राजकीय वास्तववादी विचारमौक्तिके ऐकून माणिकरावांचे नेमके काय झाले, ते नीटसे समजलेले नाही. परंतु हल्ली ते सर्वत्र एकच प्रश्न विचारत फिरताना दिसत आहेत-
तिकीट वाटप ऑनलाइन करता येईल का?