|| सीमा भानू

नीला सत्यनारायण यांचे नाव मराठी वाचकांसाठी अजिबात नवीन नाही. लोकप्रिय सनदी अधिकरी म्हणूनही त्यांची ओळख आहेच. आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली, वाढवली आणि लेखनातून त्या व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडते. ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’ हा त्यांचा कथासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यातल्या सगळ्या गोष्टी ‘खऱ्या’ आहेत. म्हणूनच त्याचे नाव- ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’!

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

या कथासंग्रहात एकूण २१ कथा समाविष्ट आहेत. मानवी नातेसंबंध हे जितके गुंतागुंतीचे तितकेच हळुवारही असतात. त्याकडे बघताना त्याचे अनेक बरे-वाईट पलू जाणवतात. या संग्रहातील कथा वाचतानाही हे जाणवते. विशेष  म्हणजे, या बहुतेक सगळ्या कथांचा केंद्रबिंदू  स्त्रीच आहे. अपवाद ‘आनंद’ या कथेचा आणि काही प्रमाणात ‘बाबांची शाळा’चा. सत्यकथा असल्याने स्वत: लेखिकेनेही ही पात्रे पाहिली आहेत. त्यांच्या आयुष्यातील घटना पाहिल्या आहेत. या कथांत त्या स्वतही एक पात्र बनून येतात. त्यामुळे आपल्या नजरेतून या घटना मांडायचा त्यांचा हा प्रयत्न आहे.

यातील काही स्त्रिया परंपरेला छेद देणाऱ्या आहेत, तर काही त्याचे जोखड  खांद्यावर बाळगतही जगणाऱ्या आहेत. काही जे समोर आले ते मुकाटय़ाने स्वीकारणाऱ्या आहेत, तर काही त्यातून वाट काढणाऱ्या आहेत. कथानायिका या सामान्य स्त्रिया आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्नही रोजच्या जगण्यातील. हे लक्षात घेऊन लेखिकेनेही सरळसाध्या पद्धतीने त्या मांडल्या आहेत. हा साधेपणा हेच या संग्रहाचे वैशिष्टय़ आहे.

यातल्या शालिनीताई (न्यायनिवाडा), रीमा (जगावेगळी), नियती, वरदा या अडचणीतून मार्ग काढणाऱ्या, सरावाच्या वाटा सोडून दुसऱ्या निवडणाऱ्या अशा आहेत. दत्तक मुलीच्या चुका माफ करून पुन्हा तिला आपलेसे करण्याचा मोठेपणा शालिनीताई नवऱ्याचा विरोध झुगारूनही दाखवतात. नियतीसारखी अल्पशिक्षित स्त्री मुलीची जबाबदारी एकहाती पेलून ती निभावून दाखवते. रीमाचा निर्णय वरवर दिसायला विचित्र वाटणारा, पण आपल्या मनाशी पूर्ण प्रामाणिक राहून तिने तो घेतलेला. नवऱ्याकडून फसवले जाऊनही आणि मोठय़ा आजाराचा सामना करावा लागूनही स्वत:ची संवेदनशीलता जपलेली वरदा हीदेखील अशीच मनस्वी. या दोघी आपल्या निर्णयांची जबाबदारीही घेणाऱ्या आहेत. गौराक्का, ऐश्वर्या, सोनाली (‘बाबांची शाळा’), सायली, यशोधरा, विशाखा यांनीही आपले स्वत्व राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. प्रतिकूल परिस्थितीतही त्या मोडून पडत नाहीत. काही ना काही मार्ग काढत राहतात. पण मिताली (‘सहचर’), अनन्या, मीरा, मधुरा, अवनी, सुमित्रा या सगळ्याच समोर आलेले दु:ख वा अडचणी मुकाटय़ाने सहन करणाऱ्या आहेत; तेही शिक्षित आणि स्वतकडे निरनिराळी प्रतिभा असताना. काहीही कारण नसताना इतकी पड  खाणाऱ्या बायका ही गोष्ट आजच्या समाजातही अगदी दिसत नाहीत असे नाही. पण या नकारात्मक नायिका इतक्या ठळकपणे मांडण्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी चीडच येते. यातील ‘ऋण’ ही कथा तर अंगावर येणारी आहे. ‘मीरा-मधुरा’तील मधुराची व्यक्तिरेखाही अशीच. नाते महत्त्वाचे की व्यक्तिस्वातंत्र्य, असे प्रश्न या सुविद्य नायिकांना पडले आहेत. पण व्यक्तिस्वातंत्र्याचा एक पलू आत्मसन्मानही आहे, हे मात्र त्यांच्या गावीही नाही.

त्यांच्या कथा, त्या खऱ्या असल्या तरी लेखिकेला का मांडाव्याशा वाटल्या असाव्यात? कारण त्यागमूर्ती, सगळे अन्याय सहन करणारी, त्याविरुद्ध चकार शब्दही न काढणारी, नवरा कसाही असला तरी त्याच्याबरोबर राहण्यात धन्यता मानणारी, तकलादू नाती टिकवायच्या  नादात स्वतचा कोंडमारा करणारी स्त्री तर आपण खूपदा आजूबाजूला आणि साहित्यातही पाहिलेली आहे. मात्र अनाठायी सोशिकपणा हे भूषण नव्हे, हे पटवून घ्यायची वेळ आता आली आहे. त्यामुळे या खऱ्या गोष्टींत काही निराळे वागू, करू पाहणाऱ्या आणखी स्त्रियांचा समावेश झाला असता, तर हा संग्रह अधिक वैशिष्टय़पूर्ण झाला असता असे वाटते. अशा वेगळ्या वाटांवरच्या प्रवाशांची आणि त्यांच्या उदाहरणांची आज जास्त गरज आहे.

  • ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’ – नीला सत्यनारायण,
  • कॉन्टिनेन्टल प्रकाशन,
  • पृष्ठे- १८०, मूल्य- २०० रुपये