News Flash

अलौकिकात अडकलेला नीरस अनुवाद

व्यासांच्या महाभारताला आपण भारतीय महाकाव्य म्हणतो. भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक म्हणून या कथाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

| November 2, 2014 05:01 am

व्यासांच्या महाभारताला आपण भारतीय महाकाव्य म्हणतो. भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक म्हणून या कथाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो लहान-मोठय़ा व्यक्तिरेखा आणि नानाविध घटनांचा महागोफ उलगडत जाणारी महाभारत ही एक महान कलाकृती आहे. महाभारताविषयी असे म्हटले lok20जाते की, जगात जे अनुभवास येते ते सर्व या कलाकृतीत पाहावयास मिळते. अनेक कथानकांची गुंफण असणाऱ्या या महाकाव्यात अवघी जीवनमूल्यं कसोटीला लावणारे प्रसंग येतात. जनसामान्यांमध्ये दैवत्व प्राप्त झालेल्या अन् आभाळाएवढय़ा उंचीच्या अनेक व्यक्तिरेखा या महाकाव्यात आहेत. या प्रत्येक व्यक्तिरेखेचे व्यक्तिमत्त्व निराळे आणि प्रेरणाही वेगळ्या आहेत.
शतकानुशतकांपासून महाभारत वाचले, ऐकले जात आहे. कारण ते व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे मानवी जीवन प्रतििबबित करते. सत्ता, संपत्ती, कौटुंबिक कलह, त्यातून आलेले वैमनस्य, कपट-कारस्थानं, नातेसंबंधांतील ताणतणाव, भावसंघर्ष, दु:खं, आनंद, मनाची कुचंबणा, हेटाळणी, अपमान, शौर्य, त्याग अशा कितीतरी गोष्टींनी महाभारत समृद्ध झालेले आहे. त्याचबरोबर चमत्कार, दैवी शाप, उ:शाप, वर, अलौकिक घटना-प्रसंग यांनी ही कथा व्यापलेली आहे. सामान्य वाचकाला सहज न उकलणाऱ्या अनेक घटना- प्रसंगांमुळे हे महाकाव्य गुंतागुंतीचे, अद्भुत वाटते. त्यामुळेच ते अनेक लेखकांना नवनव्या पद्धतीने सांगावेसे वाटते. म्हणूनच कदाचित कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी जवळपास अकराशे पृष्ठांचे द्विखंडात्मक ‘कथारूप महाभारत’ अलीकडेच अनुवादित केले असावे.
या कथारूप महाभारताच्या मूळ लेखिका कमला सुब्रह्मण्यम यांनी हा ग्रंथ विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून इंग्रजी भाषेत लिहिला आहे. त्यांनी ही कथा इंग्रजी भाषेत संक्षेपाने अणि कथारूपाने दहा अध्यायांच्या माध्यमातून सांगितली आहे. महाभारताची कथा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जावी, ऐकली जावी अशीच आहे. परंतु मोठा गाजावाजा करीत मराठीत आलेले हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र पूर्ण भ्रमनिरास होतो. कारण यातून नवे, वेगळे असे काही हाती लागत नाही.
कमला सुब्रह्मण्यम यांच्यासमोर जो बहुतांश वाचक होता तो ही कथा माहीत नसलेला, नवखा होता. त्यामुळे त्यांच्यासाठी कथारूपात, प्रासादिक शैलीत आणि सुबोध पद्धतीने त्यांनी ही कथा सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यांनी या पद्धतीनेच श्रीमत् भागवत आणि वाल्मीकी रामायण इंग्रजी भाषेत सांगितले आहे. महाभारतासारख्या महान ग्रंथाच्या वाचनाने मिळणाऱ्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा उद्देश असावा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजीतील महाभारतावरील इतर ग्रंथ त्यांना समाधानकारक न वाटल्याने त्यांनी हे लेखन केले आहे. त्या आपल्या भाषांतराला ‘मुक्त भाषांतर’ म्हणतात. त्यामुळे त्यांनी आपल्या कल्पनेला आणि लेखनाला सोयीनुसार वाव दिलेला आहे. त्यांनी मूळ महाभारतातील केवळ नाटय़पूर्ण अशा अलौकिक घटना-प्रसंग, शाप, उ:शापाच्या फेऱ्यांत अडकलेली व्यक्तिमत्त्वे, त्यांचे दु:ख प्रभावीपणे (त्यांच्या भाषेत, नाटय़पूर्ण रीतीने) सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी काही ठिकाणी महाभारताधारित नाटकातील कल्पित आणि मूळ महाभारतात नसलेल्या परीक्षिताला जिवंत करण्याचा प्रसंग (त्यांच्या मते उदात्ततेची भर घालण्यासाठी) लिहिलेला आहे. यावरून त्या मूळ महाभारताशी पूर्णत: प्रामाणिक राहिलेल्या नाहीत हे स्पष्ट होते.
सुब्रह्मण्यम यांचे ‘कथारूप महाभारत’ वाचताना आपल्याला केवळ दैवी शाप-उ:शापात अडकलेल्या अलौकिक माणसांची कथा वाचत असल्याचा अनुभव येतो. त्यांच्या सुख-दु:खांना, भावभावनांना, कौटुंबिक कलहातील ताणतणावांना, कपट-कारस्थानांना जे स्थान द्यायला हवे होते ते दिलेले दिसत नाही. अतिशय गतिमानतेने कथानक पुढे नेताना मूळ कथेतील सुटलेल्या या जागा प्रकर्षांने जाणवतात. आजअखेर अनेकांनी महाभारतातील व्यक्तिरेखा आणि घटनांचे दैवतीकरण करून ही कथा भारतीय लोकमनावर िबबवली गेली आहे. सुब्रह्मण्यम यांनी त्याच पद्धतीचे लेखन या पुस्तकात केलेले स्पष्ट दिसते. त्यांनी सर्वसामान्य लोकांना हवे असणारेच महाभारत पुन्हा सांगितले आहे. कथनाची पद्धत म्हणून स्वीकारलेला आकृतिबंधही सुब्रह्मण्यम यांना व्यवस्थित हाताळता आलेला नाही. पुढील घटना-प्रसंगांचे निवेदनाच्या ओघात उतावीळपणे करीत राहिलेले सूचन कथनपद्धतीत बाधा आणते. त्यामुळे ही केवळ आबालवृद्धांसाठीच लिहिलेली कथा वाटते.
मंगेश पाडगावकर मराठीतील एक महत्त्वाचे सिद्धहस्त कवी आहेत. त्यांनी यापूर्वी अनुवादित केलेले काही ग्रंथ बरेच गाजले आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अधिकार मोठाच आहे. परंतु त्यांनी सुब्रह्मण्यम यांच्या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद करण्यापेक्षा स्वतंत्र रचना केली असती तरी ती नक्कीच यापेक्षा दर्जेदार झाली असती. शिवाय मराठी अनुवाद करताना पाडगावकरांनी संस्कृतप्रचुर भाषेचा, अनावश्यक प्रतिमांचा बराच हव्यास धरला आहे. त्यामुळे ही कथा खूपच कृत्रिम भाषेत समोर आली आहे. निवेदनाच्या, तपशिलाच्या भाषेत आलेली कृत्रिमता नजरेआड केली तरी संवादांमध्येही येणारी अशाच प्रकारची भाषा मात्र खटकते. हा अनुवाद म्हणजे शब्दश: भाषांतर आहे. त्यामुळे वाक्यांची पुनरावृत्ती, सामान्य प्रतिमांचा सतत वापर वाचनाचा उत्साह घालवणारा आहे. पुस्तकाची भाषा पांडित्यप्रदर्शन करणारी असल्याने पौराणिक कथेचा बाज राखण्यात ती यशस्वी होत नाही.
या ग्रंथाची खटकणारी अजून एक गोष्ट म्हणजे पुढील संकटांचे, घटनांचे अनावश्यक असे सूचन निवेदनातून लेखिका करीत राहते. अशा सूचनांमुळे आणि घटना-प्रसंगांवरील त्यांच्या भाष्यांमुळे त्यांनी गृहीत धरलेला वाचक लक्षात येतो. तो सुब्रह्मण्यम यांच्या दृष्टीने ठीक होता. मात्र प्रत्येक भारतीयाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने महाभारताची कथा परिचित असते. हा अनुवाद वाचताना डॉ. एस. एल. भरप्पा या विख्यात कन्नड कादंबरीकाराच्या ‘पर्व’ कादंबरीची आठवण होते. महाभारतावरील या मूळ कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद बराच लोकप्रिय आहे. ‘पर्व’ कादंबरीवर िहदूंच्या श्रद्धा आणि परंपरांना धक्का दिला म्हणून बरीच टीका झालेली आहे. परंतु तेवढेच तिचे कौतुकही झालेले आहे. कारण या कादंबरीने महाभारतातील व्यक्तिरेखांना मातीचे पाय दिले. दैवतीकरण, शाप, उ:शापापेक्षा त्यांच्या सुख-दु:खाला, भावभावनांना महत्त्वाचे स्थान दिले. ‘पर्व’ ही कादंबरी असली तरी तेथे कल्पितापेक्षा समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय चिकित्सेला, गहन धर्म आणि तत्त्वचच्रेला विशेष स्थान आहे. तरीही या कादंबरीने आपले कथारूप कायम ठेवले आहे. ही कादंबरी वाचताना ती कन्नडमधून अनुवादित होऊन मराठीत आली आहे असे वाटत नाही. सुब्रह्मण्यम यांच्या महाभारताचे मात्र तसे होत नाही. हे पुस्तक अनुवादितच आहे हे सतत वाटत राहते.
मंगेश पाडगावकर हे सिद्धहस्त कवी असून शब्द आणि भाषावापराबाबत हा अनुवाद निराशाजनक आहे. या अनुवादित महाभारतातील असंख्य जागा खटकणाऱ्या आहेत. ‘नेहमीच्या वहिवाटीचे बोलणेही त्याने टाकले होते,’ (१२) ‘रथ सुरू केला की..,’ (१९), ‘वसुकी आपल्या दांडग्या शिपायांसह.’ (५७), ‘लोकमानस थरारून टाकणारी ही घटना होती’ (२१६), ‘अर्जुनानं भीतिदायक शपथ घेतली’ (२५७), ‘तू शहाणपणाला रजा दिली आहेस, असं दिसतं आहे.’ (५११), ‘स्मिताने उजळलेल्या सुंदर मुखाचा कृष्ण आपल्या रत्नजडित आसनावर जाऊन बसला’ (५५७) यांसारखी असंख्य सदोष वाक्ये या पुस्तकामध्ये आहेत.
व्यक्तिरेखांच्या तोंडचे बाळबोध संवाद, बऱ्याच ठिकाणी पुनरावृत्त होणारी वाक्यं, शब्दवापराबाबत अनेक ठिकाणी झालेला घोळ, युद्धाची साचेबद्ध वर्णने, तोचतोपणामुळे युद्धवर्णनं कंटाळवाणी आणि रटाळ झालेली आहेत. काही ठिकाणी तर प्रसंगचित्रणंच बाळबोध झालेली आहेत. उदाहरणार्थ, एके ठिकाणी भीम हत्तींना उचलून फेकतो तर  तिथेच हत्ती भीमाला उचलून फिरवतो, पुन्हा तो हत्तीच्या खाली जाऊन हत्तीला फिरवतो.
महाभारत ही चिंतनाला वाव देणारी, आवाहक कथा आहे. कल्पित-रंजक गोष्टी सांगून मनोरंजन करणारी ही कथा नाही. प्रत्येक वाचनात ती नवी अनुभूती देत असते. त्यामुळे हा एक फसलेला अनुवाद आहे असेच म्हणावे लागेल. तथापि, उत्कृष्ट नसले तरी मुखपृष्ठ, आतील रेखाचित्रे पौराणिक कथेचा बाज सांभाळणारी आहेत. कागद, छपाई आणि एकूणच पुस्तकाची निर्मिती मात्र राजहंसच्या परंपरेला शोभेल अशी आहे.
‘कथारूप महाभारत’ – मूळ लेखिका – कमला सुब्रह्मण्यम, अनुवाद – मंगेश पाडगावकर, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १०७७, मूल्य – ६०० रुपये. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 5:01 am

Web Title: krishna katha mahabharata
Next Stories
1 चिन्मय केळकर
2 ती आत्ता असायला हवी होती..
3 स्वास्थ्यजागृतीसाठी उपयुक्त पुस्तक
Just Now!
X