केरळच्या साधारणत: मध्यभागी असलेला कुट्टानाड हा भारतातील सर्वात कमी पातळीवरील आणि फारसा ज्ञात नसलेला प्रदेश. समुद्रसपाटीच्या पातळीखालीही जिथे शेती होते अशी जी काही जगात थोडी ठिकाणं आहेत, त्यापकी कुट्टानाड हे एक. दूरदूपर्यंत विस्तीर्ण अशी भातशेती, त्यातून आडवेतिडवे वाहणारे कालवे, रमणीय लगुन्स, लहान लहान बेटं आणि सरोवरं यांनी समृद्ध असा हा प्रदेश ५००  कि.मी. क्षेत्रफळांवर कोचीन ते कोल्लमपर्यंत पसरला आहे. हा प्रदेश पूर्वी समुद्राच्या पातळीखाली सात फुटांपासून समुद्रसपाटीच्या वर दोन फुटांपर्यंत होता. येथील जमिनीत अजूनही शिंपले सापडतात. या प्रदेशातला बहुतेक भाग बॅकवॉटरने व्यापलेला असल्याने कुट्टानाडला ‘भारताचे नेदरलँड’ असेही म्हटले जाते.
हिरव्याकंच भातशेतीने बहरलेल्या या प्रांतावर पूर्वी चेरन चेंगुट्टावन घराण्याने राज्य केले. तेव्हा बौद्ध विचारसरणीचे केंद्र असलेल्या या ‘बुद्धनाड’चे पुढे ‘कुट्टानाड’ झाले. करुमाडी येथे बुद्धाची मोठी मूर्ती आहे. ती नवव्या वा दहाव्या शतकातील असावी असा कयास आहे.  
कुट्टानाड हा इलाखा प्रामुख्याने वेंबनाड सरोवराकाठी आहे. बोटीतून फिरताना बॅकवॉटरमध्ये समुद्रसपाटीच्या खाली असलेली बेटं, त्यावरील शेती आणि तेथील जनजीवन आपल्याला चकित करते. अ‍ॅलेप्पी ते कोटायममधील चंगनासेरी गावापर्यंत किंवा उलटय़ा दिशेने बोटीतून वा मोटारीतून भाताची विस्तीर्ण शेतं न्याहाळत केलेली सफर रमणीय असते. आम्ही चंगनाशेरी ते अ‍ॅलेप्पी हा २७ कि.मी.चा प्रवास टॅक्सीने केला. सूर्योदयापूर्वीच निघालो होतो. रस्त्यालगतच्या कवलम या पंबा नदीकाठच्या सुंदर खेडय़ात भटकंती करताना तिथलं लोकजीवन तसंच नदीत मासे पकडणाऱ्या कोळ्यांची धांदल अनुभवायला मिळाली. पाण्याचे प्रवाह, हिरवीगार भातशेती, नदीच्या पात्रात होडय़ांतून पर्यटकांचं भटकणं.. हे सारं जवळून निरखणं हा एक आनंददायी अनुभव होता. रस्त्याला खेटून असलेली हिरवीकंच भातशेती बघत बघत आम्ही अ‍ॅलेप्पी जिल्ह्य़ातील चंपाकुलम येथील चर्च पाहण्यासाठी थोडीशी वाकडी वाट केली. पंबा नदीकाठी असल्याने या चर्चला आपसूकच रम्य परिसर लाभला आहे. चर्चच्या गोलाकार छतावरील अप्रतिम भित्तिचित्रांबद्दल आमच्या शेजाऱ्यांकडून ऐकले होते. ती सुंदर म्युरल्स पाहतच राहावं अशी होती.  
कुट्टानाडमधील पंपा, मिनाचिल, अचनकोविल आणि मणिमाला या नद्या व कालव्यांमुळे या भागात वाहतुकीचा स्वस्त मार्ग उपलब्ध झाला आहे. सृष्टीसौंदर्याने नटलेल्या स्थळांव्यतिरिक्त कुट्टानाडमध्ये विशेष प्रसिद्ध नसलेली, पण पाहण्याजोगी अनेक देवळं, चच्रेस, म्युझियम्स आहेत. पकी अ‍ॅलेप्पीपासून १४ कि.मी.वरील अंबालापुळा येथील श्रीकृष्णमंदिर कृष्णभक्तांमध्ये अत्यंत प्रिय आहे. इथला कृष्ण  पार्थसारथी रूपातील असून त्याच्या एका हातात चाबूक, तर दुसऱ्या हातात शंख आहे. या देवळामुळेच हे गाव प्रसिद्धी पावलं आहे. टिपू सुलतानने त्रिचुर जिल्ह्य़ातील गुरुवायूर मंदिरावर स्वारी केली, तेव्हा तेथील मूर्ती याच अंबालापुळा देवळात काही काळ ठेवली होती. त्यामुळे याला ‘परतीगुरुवायूर’ असेही संबोधले जाते. येथे प्रसाद म्हणून दिली जाणारी तांदळाची खीर भक्तांना अतिशय प्रिय आहे.  
अंबालापुळापासून चार कि.मी.वर जिथे अंबालापुळा, पंबा आणि कोल्लम या तीन नद्यांचा संगम होतो तेथील एका मंदिरात दहाव्या शतकातली बुद्धाची मूर्ती आहे.
अंबालापूळाहून आठ कि.मी.वर तकळी गावी- जिथे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक तकळी शिवशंकर पिल्ले वास्तव्यास होते, ते त्यांचे घर म्युझियममध्ये रूपांतरीत करण्यात आले आहे. ते पाहण्यासारखे आहे.
दक्षिणेत श्रीगणेशाच्या भावाचे सुब्रमण्याचे महत्त्व खूप आहे. अंबालापुळाच्या दक्षिणेला १५ कि.मी. वरील हरिपाड येथील त्याचे मंदिर आणि त्याच्या पुढे पाच कि.मी.वरील मन्नारशाला येथील नागराजाचे देऊळ पाहण्यासारखे आहे. या देवळातील नागराजाला शिव व विष्णूचा अवतार मानले जाते. जगदंबा वा भद्रकालीच्या रूपातील केरळमधील लोकप्रिय चेट्टीकुलंगरा मंदिर अंबालापुळापासून २५ कि.मी.वर आहे. केरळमध्ये ज्या पाच देवळांची प्रतिष्ठापना भगवान परशुरामाने केली अशी समजूत आहे, त्यापैकी चेट्टीकुलंगरा हे एक!
अंबालापूळाहून २० कि.मी.वर महिला भक्तांचा मान ठेवला जाणारे चकलतुकावू देवीचे मंदिर आहे. डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास येणाऱ्या मल्याळी महिन्यात पहिल्या शुक्रवारी इथे येणाऱ्या प्रत्येक महिला भक्तास देवीस्वरूप मानून पुजाऱ्यांकडून त्यांचे पाय धुतले जातात, आरती ओवाळली जाते आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षांव केला जातो.
अ‍ॅलेप्पीच्या दक्षिणेस ४७ कि.मी. अंतरावरील कायमकुलम गावात कृष्णपुरम पॅलेस ही आता म्युझियममध्ये रूपांतरित झालेली एक सुंदर वास्तु आहे. केरळीय वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या या वास्तुत सुंदर पेंटिंग्ज, जुनं फíनचर आणि केरळमधील सर्वात मोठे गजेंद्रमोक्षाचे दहा फूट उंचीचे भित्तिचित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वर चेपौडच्या सेंट जॉर्ज चर्चमधील मूळची फ्रेस्कोज व म्युरल्स अत्यंत देखणी आहेत. तकळीपासून दहा कि.मी.वर पंबा नदीकाठी वसलेले एडतुवा चर्च समुद्रसपाटीखाली आहे, हे विशेष. या चर्चच्या भक्तांमध्ये जसे ख्रिश्चन आहेत तसेच हिंदूही आहेत. चर्चच्या आवारातील ध्वजस्तंभ व पादत्राणे बाहेर काढून ठेवण्याची रीत आपल्याला चकित करीत असली तरी हिंदू धर्माचा या भागात किती प्रभाव आहे याची त्यावरून कल्पना येते.