डेव्हीड लीनच्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’नं एकेकाळी सिनेरसिकांना चांगलीच भुरळ घातली होती. ७० मिलीमीटर प्रक्षेपणातून साकार झालेलं पडदा व्यापून टाकणारं अरबी वाळवंट, त्याचे विविध मूड, आणि त्या पाश्र्वभूमीवर लॉरेन्स या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या भूमिकेत अरबी पेहरावात झोकात वावरणारा पीटर ओ टूल हा देखणा गुणी नट.. ही या सिनेमाची प्रमुख आकर्षणं होती. सिनेमाची दृश्यात्मक भूल इतकी जबरदस्त होती की, त्या मोहक आविष्कारात लॉरेन्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची कहाणी हरवून गेली होती. कोण हा लॉरेन्स हे समजून घेण्यासाठी लॉरेन्सच्या चरित्राकडे वळणं भाग होतं. लॉरेन्सची चरित्रं एक-दोन नाही तर पन्नासेक आहेत. त्यातली अनेक लॉरेन्सविषयी पसरलेल्या दंतकथांवर आधारित. त्यातल्या त्यात सत्यकथनाच्या जवळ जाणारा मजकूर गोळा करून ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चरित्रग्रंथ सिद्ध करून मराठी वाचकांसमोर लॉरेन्सचे रोमहर्षक जीवन मांडायला यशवंत रांजणकरांना किती प्रयास पडले असतील याची आपण कल्पना करू शकतो.
कोण होता हा लॉरेन्स? हा ब्रिटिश नागरिक अरब प्रदेशात जाऊन कसा पोचला? अरबस्तानात जाऊन त्यानं अरब टोळ्यांना संघटित केलं; स्वातंत्र्याचे धडे दिले म्हणजे काय केलं?  सशस्त्र उठाव करून त्यांना तुर्की आक्रमणाविरुद्ध उभं राहायला सज्ज कसं केलं? ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या पुस्तकाची पानं उलटत गेलं की या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातात. यशवंत रांजणकरांच्या या पुस्तकात अरबांच्या स्वातंत्र्याचा स्तिमित करून सोडणारा इतिहास आहे आणि हा इतिहास घडवणाऱ्या लॉरेन्स या व्यक्तिमत्त्वाच्या अद्भुत कर्तृत्वाचा वेध आहे.
लॉरेन्सची अरबस्तानातील कामगिरी हा अरबांच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनून गेला आहे. मध्य आशियातल्या राष्ट्रांची भौगोलिक रचना, या राष्ट्रादरम्यानचं राजकारण, सत्ताकारण, परक्या राष्ट्रांचे तिथले हस्तक्षेप आणि त्यामागचे त्याचे हितसंबंध, अरबस्तानातल्या भिन्न संस्कृती, त्यांचे आपसातले ताणतणाव हे सारं जाणून घेतल्याशिवाय अरबांच्या इतिहासाला वेगळं वळण देण्याच्या कामी लॉरेन्सनं वठवलेली भूमिका समजणं मुश्कील आहे. लेखकानं सुरुवातीची काही पानं या सर्वाचा परिचय करून देण्यासाठी खर्ची घातली आहेत. पण हे काम पहिल्या चारसहा पानांत संपत नाही; तिथलं राजकारण, सत्ताकारण इत्यादींचे उल्लेख नंतरही पानोपानी येत राहतात.  अरबस्तानच्या जडणघडणीत टी. ई. लॉरेन्स या ब्रिटिश व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. आणि लॉरेन्सच्या  सुखदु:खमय जीवनप्रवासात अरब प्रदेशातल्या सर्व राजकीय हालचालींचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. अरबस्तान आणि लॉरेन्स यांच्यामधलं हे अद्वैत यशवंत रांजणकरांनी फार प्रभावीपणे या चरित्रग्रंथात मांडलं आहे.
अरब राष्ट्राच्या जडणघडणीचा हा इतिहास लढाईनं व्यापलेला आहे. पुस्तकातला ७० टक्के अवकाश या लढायांच्या आणि त्यामागील राजकीय हालचालींच्या वर्णनांनी व्यापलेला आहे. अर्थात, या लढायांना लॉरेन्सच्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. युद्धशास्त्रावरील त्याचं प्रभुत्व, त्याचं मुत्सदीपण, तारतम्य, प्रसंगावधान असे मोलाचे गुण या समरप्रसंगी आपल्या प्रत्ययाला येतात. लॉरेन्सप्रमाणे अरबांच्या गुणदोषांचा परिचयही या लढाईच्या हकिगतींमधून होतो. अरबांच्या उठावाचं लॉरेन्सनं नेतृत्व केलं ते ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून, असं नमूद करून रांजणकर लिहितात – ‘‘लॉरेन्स अरबांशी समरस झाला; त्यांची सुखदु:खं, आशा-आकांक्षा आपल्या मानू लागला. ब्रिटिशांपेक्षा तो अरबांचाच प्रतिनिधी होऊन बसला.’’ पराक्रमी सेनानी बरेच होऊन गेले, पण या सर्वात लॉरेन्सच्या जीवनशैलीचं आणि कामगिरीचं विशेष कौतुक वाटण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. अरबांसारख्या परक्या संस्कृतीचा त्याला वाटलेला जिव्हाळा, कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा न बाळगता अरबांच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी त्यानं वेचलेला आयुष्यातला मोलाचा कालखंड.. हे सर्व विस्मयकारक आहे.
लॉरेन्सचं हे वैशिष्टय़ त्याला कुठे घेऊन गेलं हे या चरित्रातून वाचकांपुढं येतं. वाळवंटात भटकंती करत िहडणाऱ्या, अकारण आपसात झगडत बसणाऱ्या अरबी टोळ्यांना एका छत्राखाली आणण्याचं; स्वातंत्र्य, बंधुभाव, स्वदेश, राष्ट्रीयता या संकल्पना अरबी समाजात रुजवायचं काम सोपं नव्हतं. लॉरेन्सचं मुत्सदेगिरीतलं कौशल्य इथं कामी आलं.
आपल्याला सनावळ्या आणि अनावश्यक तपशिलांची भरताड असलेला रूक्ष विद्वज्जड इतिहास लिहायचा नाही, असं धोरण हे लेखन करताना पक्कं ठरवलं होतं असं लेखकानं प्रस्तावनेतच म्हटलं आहे. आणि ते पाळलंही आहे.  
लॉरेन्सच्या आयुष्यातल्या युद्धकाळानंतरचा कालखंडही पहिल्या कालखंडाइतकाच वेधक आहे. ब्रिटिशांनी अरबांना दिलेली आश्वासनं युद्ध समाप्तीनंतर पाळली नाहीत, तुर्क गेले त्यांच्या जागी ब्रिटिश आणि फ्रेंच आले. तुर्काविरुद्धची आपली सगळी झुंज वाया गेली या भावनेनं लॉरेन्स अस्वस्थ झाला. ब्रिटिश भूमीवरून या अन्यायाविरुद्ध त्याला लढा द्यावा लागला. लॉरेन्सला व्यवस्थेविरुद्ध करावं लागलेलं हे युद्धही रांजणकरांनी पुरेशा तपशीलानं वाचकांसमोर ठेवलं आहे. युद्धानंतरची बौद्धिक आणि भावनिक युद्धं लॉरेन्सला कशी क्लेशदायक ठरली त्याची वर्णनं वाचताना आपल्यालाही क्लेश होतात. अरबांच्या फसवणुकीचा दोष लॉरेन्सनं स्वत:वरही घेतला. एकप्रकारची अपराधी जाणीव तो आयुष्यभर  बाळगत राहिला. नंतरच्या काळात त्यानं आत्मपीडन केल्याचे उल्लेख पुस्तकाच्या उतरार्धात वाचायला मिळतात. अविश्वसनीय वाटाव्यात अशा बऱ्याच गोष्टी या अखेरच्या पानात आहेत. स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी युद्धोत्तर काळात लॉरेन्सनं केलेल्या धडपडी तर चक्रावून टाकणाऱ्या आहेत.
रणभूमीवरल्या शहाण्या हालचाली आणि निर्णय या प्रकारची पत्रं आणि नियतकालिकेतून केलेलं लिखाण यातूनही लॉरेन्सचं व्यक्तिमत्त्व उभं राहतं; आणि हा माणूस जगावेगळा आहे याची खूण पटते.
‘परिशिष्टा’मध्ये रांजणकरांनी लॉरेन्सच्या अरब राष्ट्र घडवण्याच्या प्रयत्नांमागील सच्चेपणाबाबत इतर चरित्रकारांनी व्यक्त केलेले संशय आणि लॉरेन्सच्या जनमानसातील प्रतिमेला छेद देणारे संशोधन मांडून धमाल उडवून दिली आहे. . रांजणकरांची शैली वाचक-स्नेही आहे. मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झालं आहे.  चित्रपट कितीही भव्यदिव्य असला तरी तो वाङ्मयीन कलाकृतीच्या जवळपास कसा व का पोचू शकत नाही, हे ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांना हा चरित्रग्रंथ वाचल्यावाचून इलाज नाही.    ल्ल                                      
‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’- यशवंत रांजणकर, राजहंस प्रकाशन, पुणे,  पृष्ठे- ३८०, मूल्य- ३०० रुपये.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक