‘लोकरंग’(१४ जून)मधील आसाराम लोमटे यांचा ‘आलो उल्लंघुनि दु:खाचे डोंगर’ हा स्थलांतरित मजुरांच्या गावपरतीच्या वाटेवरील प्रचंड हालअपेष्टा आणि दु:खांना वाचा फोडणारा लेख वाचला. हा लेख वाचल्यावर औरंगाबादजवळ मजुरांच्या अंगावरून गेलेली अजस्र रेल्वेगाडी आपल्याही काळजावरून धडधडत गेल्याचा क्षणभर भास झाला. मन सुन्न आणि विषण्ण झालं. स्थलांतरित मजुरांच्या पहाडाएवढय़ा दु:ख-वेदनांचे लेखकाने अतिशय वास्तववादी शब्दांत चित्रण करून वाचकांना अक्षरश: अंतर्मुख केले आहे. उदाहरणार्थ, एक अभागी बालक त्याच्या मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, हे दृश्य कल्पनेपलीकडे भयाण आहे. सात जन्माच्या वैऱ्यावरही अशी वेळ कधी येऊ नये इतके ते भयानक आहे. हे सारे वाचताना मनाला पुन:पुन्हा प्रश्न पडतो.. ही माणसेही भारतीयच आहेत ना? मग त्यांची ही अशी फरपट का व्हावी? यासंदर्भात कवी मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवली.. ‘त्यांच्यावर छत्र धरील असे राष्ट्र कोणते?’

स्थलांतरित मजूर आपल्या मायभूमीतच विस्थापित झाले आहेत, नकोसे झाले आहेत. यावर कळस करणारी गोष्ट म्हणजे ज्या आपल्या गावाच्या ओढीने जिवाचा आटापिटा करून, प्रसंगी लाखमोलाचा जीव गहाण ठेवून ते गेले, त्या गावानेच त्यांना धिक्कारले, त्यांचे स्वागत केले नाही. आपल्याच लोकांना आपण नकोसे झालो आहोत, ही भावना किती वेदनादायी आहे! औरंगाबादला रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या मजुरांविषयी जनमानसातून व्यक्त झालेल्या काही असंवेदनशील प्रतिक्रिया लेखकाने उद्धृत केल्या आहेत. त्या वाचताना आपल्या अवतीभवती कशा प्रकारची माणसे राहतात, या जाणिवेने मन उद्विग्न झाले. निवडणूक काळात वापरलं जाणारं जातिधर्माचं कार्ड अशा वेळी कुचकामी ठरतं, हेच खरं! अशा वेळी धावून येतो तो फक्त माणुसकीचा धर्म! स्थलांतरित मजुरांच्या परतीच्या वाटेवर असे असंख्य माणुसकीचे झरे ठिकठिकाणी पाहायला मिळाले. जणू ती अंधारातील प्रकाशाची बेटेच! अनेक व्यक्ती आणि संस्थांनी या मजुरांना अन्नपाणी पुरवून मदतीचा हात दिला, तर काही उदार व्यक्तींनी त्यांना सायकली देऊन प्रवासाचे साधन उपलब्ध करून दिले. यामुळे जगण्यावरचा आणि जीवनावरचा विश्वास वाढला आहे.

– फादर फ्रान्सिस दिब्रिटो