‘लोकरंग’ (७ जुलै) मधील ‘रसाळ गायक’ हा शौनक अभिषेकी यांचा लेख वाचला. ‘प्रिये पहा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ किंवा ‘हा नाद सोड सोड’ हे शब्दच नाही तर त्या नाटय़गीतांच्या सुरुवातीचे काही बोल कानावर पडताच संगीतप्रेमींच्या डोळ्यांसमोर आणि ओठावर आग्रा, ग्वाल्हेर घराण्यांची गायकी आणि अभिषेकी बुवांच्या शिष्यत्वाने संपन्न झालेले ‘प्रभाकर कारेकर’ हेच नाव सहज येते. गुरुबंधू या नात्याने आणि गायकीचे काही विशेष पलू, कंगोरे उलगडले जाणे महत्त्वाचे होते. परंतु शौनकजींची लेखणी केवळ कारेकरकाका आणि बुवांचे (पं. जितेंद्र अभिषेकींचे) आदर्श शिष्य याभोवतीच घुटमळल्यासारखी वाटली. लेखकाने बाबांच्या कार्यक्रमादरम्यान बाबांचे तंबोरे लावणे, स्टेजवरील व्यवस्था बघणे तसेच इतर वेळी काटेकोरपणे शिष्यत्व जपण्यासोबतच कारेकरकाका बाबांकडे शिकत होते, घरच्या सदस्यांसारखेच राहत, गुरुकुल पद्धतीने शिकत असल्याने मुलासारखेच घरी वास्तव्याला असत. बाबांसोबत जवळ जवळ २४ तास ते असायचे, बाबांच्या मफिलीत त्यांना साथ करायचे.. या बाबींचा उल्लेख केला आहे. अशा मनोगताने पोट भरले; पण तृप्तीचा ढेकर आला नाही.

– अनिल ओढेकर, नाशिक

 

उदारीकरण आणि वाढती विषमता

‘लोकरंग’ (१४ जुलै) पुरवणीतील ‘विषमतेचा भेसूर राक्षस: उच्च मध्यमवर्गाची जबाबदारी काय?’ हा छाया दातार यांचा लेख वाचला. या लेखात दोन संशोधन संदर्भ दिले आहेत, ते खूपच प्रभावी आहेत. आपल्याकडे आर्थिक विषमतेचे उपघटक म्हणून शैक्षणिक, आरोग्य, वाहतूक, कायदेपालन याकडे पाहता येईल. एकविसाव्या शतकातील उदारीकरणामध्ये सार्वजनिक गुंतवणूक कमी होत गेली. किंबहुना उदारीकरण म्हणजे फक्त एकल किंवा पीपीपीची- सार्वजनिक-खासगी भागीदारी, भागीदारीची टूम काढून परवाने, नियमनाचे सर्व अधिकार नोकरशहांनी स्वत:कडे ठेवले आणि सामान्य लोकांच्या बँकांमधील पशातून किंवा भांडवली बाजारातून गुंतवणुकीसाठी उचल करण्याची वारेमाप सोय केलेली दिसते. या आपल्या पशाचा उगम शासनव्यवस्था सोयीस्करपणे विसरते आणि जे गुंतवणूक करतील तेच देशाचे खरे विकासक ठरतात. हा नवभांडवलदार वर्ग व दहा कोटींचा सबळ, सुरक्षित मध्यमवर्ग सोबत घेऊन देशाच्या नागरी उच्चभ्रू भागात राहू लागला तो केवळ आपल्या शोषणधंद्याच्या सेवेसाठी. ही जी उदारीकरणाच्या अथवा रोजगार निर्मितीच्या नावाखाली शासनव्यवस्थेबरोबर हितसंबंधांची साठगाठ निर्माण झाली ती प्रत्येक क्षेत्रात दिसते. पाणी, जमीन, शिक्षण, आरोग्य, अन्न, कायदा, निवारा, वाहतूक अशा सर्वच क्षेत्रांत हे चित्र दिसते. त्यामुळे ग्रामीण भाग उद्ध्वस्त झाला. स्थलांतर वाढले. अशा वातावरणातही नीतिमत्ता पाळणारे, दानशूर, सामाजिक भान राखणारे भांडवलदार आहेत; पण त्यांचाही प्रभाव एवढय़ा विषमतेच्या पसाऱ्यात आणि असंवेदनशील व्यवस्थेत काय जाणवणार?

– प्रा. अभिजीत महाले, सिंधुदुर्ग