X

‘समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ!’

खरं तर मराठी साहित्याला तत्पूर्वी संतसाहित्यामुळेच ओळखले जायचे.

|| शरणकुमार लिंबाळे

साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना नुकताच देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्य, त्यातली दलित साहित्याची वेगळी चूल आणि त्याची वेळोवेळी बदललेली भूमिका, वर्तमान समाजवास्तव आणि या वास्तवात दलित साहित्याने घेणे अपेक्षित असलेली सकारात्मक भूमिका.. अशा अनेकानेक मुद्दय़ांचा सविस्तर ऊहापोह करणारा दस्तुरखुद्द त्यांचाच लेख..

 

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मराठी साहित्यामध्ये खूप वाङ्मयीन प्रवाह निर्माण झाले. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, विज्ञान साहित्य, बालसाहित्य, कामगार साहित्य, ख्रिस्ती साहित्य, जैन साहित्य, गुराख्यांचे साहित्य, भटक्या विमुक्तांचे साहित्य.. देशाच्या इतर कोणत्याही भाषेत इतके प्रवाह निर्माण झालेले नाहीत. मराठी साहित्याचा हा जिवंतपणा आहे. या जिवंतपणाच्या वातावरणातच मी लेखनाची सुरुवात केली. तेव्हा मराठी साहित्यात नव्या लेखकांना घडवण्यासाठी खूप अनुकूल वातावरण होते. तसे अनुकूल वाङ्मयीन वातावरण आता मला दिसत नाही. मराठी प्रदेशामध्ये ज्या अनेक चळवळी झाल्या- दलित, भटक्या विमुक्तांची, शेतकऱ्यांची, कामगारांची, डॉ. बाबा आढावांची ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ, सुधीर बेडेकरांची प्रबोधन चळवळ, इथल्या पुरोगामी समाजाने दलितांसाठी केलेल्या चळवळी, दलितांनी दलितांच्या प्रश्नांसाठी केलेल्या चळवळी असतील- या साऱ्यांतून जीवनवादी साहित्याची लाट निर्माण झाली. विशेषकरून या जीवनवादी साहित्याचे नेतृत्व दलित साहित्याने केले. जीवनवादी विचार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित साहित्य निर्माण झाले. दलित साहित्य आणि दलित पँथर चळवळ महाराष्ट्राबाहेरही पोहोचली.

खरं तर मराठी साहित्याला तत्पूर्वी संतसाहित्यामुळेच ओळखले जायचे. संत-साहित्याची समृद्ध परंपरा आपल्याकडे आहे. त्यानंतर दलित साहित्यामुळे महाराष्ट्राबाहेरील इतर लेखक आकर्षित झाले. मराठीत दलित साहित्य निर्माण होत आहे आणि त्यात चांगले लेखक लिहीत आहेत, हे निदर्शनास आल्यामुळे दलित साहित्याकडे महाराष्ट्राबाहेरच्या आणि जगभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले. इथल्या दलित साहित्याचे अनुवाद झाले. अनुवादामुळे आम्ही मराठीबाहेर पोहोचलो. आमची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. अभ्यासक्रमात पुस्तकांचा समावेश झाल्यामुळे आणि साहित्यविषयक कार्यक्रमांतील सहभागामुळे आमचा परिचय निर्माण झाला. मराठीत जिल्हा, तालुका आणि अखिल भारतीय स्तरावर जी साहित्य संमेलने होतात, तशी इतर भाषांमध्ये कोठे पाहावयास मिळत नाहीत. अखिल भारतीय संमेलनापासून ते जागतिक मराठी संमेलनापर्यंत सर्वत्र मराठी समाज उत्साहाने सहभागी होतो. या वातावरणामुळे लेखकामध्ये विश्वास निर्माण होतो आणि आपण लिहिले पाहिजे, ही चेतना त्याला मिळते. असा कार्यकर्त्यांचा आवेश असलेला मराठी समाज मोठय़ा संख्येने महाराष्ट्रात आहे. साहित्य परिषदा चांगले काम करीत आहेत. वाङ्मयीन नियतकालिके आणि दिवाळी अंक परंपरेने अनेक लेखक घडविले. दलित साहित्याचे १९६०-७० च्या दशकांत जे उदंड स्वागत झाले, ते मराठी वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्यांनी केले आहे. पुरोगामी समाजाने, वाचकांनी हे जे स्वागत केले, त्यामुळे मराठीतील दलित साहित्य समृद्ध झाले आणि ते देशाबाहेर पोहोचले. त्याचा आता ‘सरस्वती सन्माना’ने गौरव होत आहे याचा मला आनंद आहे.

आम्हाला मोठे पुरस्कार मिळत नाहीत, आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे आजवर आम्ही म्हणायचो. ते खरेही आहे. दलितांचे लेखन आक्रस्ताळे असते, शिवराळ असते, प्रचारकी व उरबडवे असते अशी टीका सातत्याने होत असे. त्यात गुणवत्ता नाही, असेही बोलले जात होते. दलित लेखक चांगले लिहू शकतो आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी तो पात्र ठरू शकतो, हे सरस्वती सन्मानाने सिद्ध केले आहे. त्यामुळे देशभरातून शुभेच्छांचा वर्षांव होतो आहे. ‘आपने साबित कर दिया की आप अच्छे लिख सकते है..’ असे आनंद व सार्थ अभिमानाचे उद्गार दलित बांधवांकडून मला ऐकायला मिळताहेत. जेव्हा मला के. के. बिर्ला फाउंडेशनने या पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा दूरध्वनी केला तेव्हा ‘सरस्वती सन्मानामुळे दलित साहित्याला मोठी प्रतिष्ठा मिळेल आणि दलितांचे प्रश्न चर्चिले जाऊन ते सुटण्यास मदत होईल,’ असे मी त्यांना म्हणालो. ‘तुमची जात आम्ही पाहिली नाही. तुम्ही कोणत्या विचारांचे आहात, हे पाहिलेले नाही. एका महान लेखकाच्या श्रेष्ठ कलाकृतीला आम्ही पुरस्कार दिलेला आहे,’

असे मला तेव्हा सांगण्यात आले. याचा अर्थ दलिताच्या हातूनसुद्धा श्रेष्ठ कलाकृती निर्माण होते. अजंठा-वेरूळ असेल, मंदिरे असतील की मशिदी- त्या दलितांनी, मजुरांनीच बांधलेल्या आहेत. सामान्य माणसांनी संस्कृती, परंपरा, शिलालेख आणि सौंदर्य उभे केले, त्यांचा उद्गार मी माझ्या साहित्यातून व्यक्त करतो. आणि त्याचा सन्मान झाला याचा मला मोठा आनंद होत आहे. याचे सारे श्रेय मराठी भाषेला आणि वाङ्मयीन व्यवहाराला आहे.

एक तर हजारो वर्षे आम्हाला नाकारले गेले होते. त्यामुळे आम्हाला खूप काही भरभरून सांगायचे होते. आमच्याकडे कसली तपश्चर्या नव्हती. कसं लिहावं, काय लिहावं यासंबंधी साहित्याचा कसलाही अनुभव नव्हता. साहित्य म्हणजे काय, समीक्षा म्हणजे काय, ते कशाशी खातात हेसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. फक्त आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे होते. आम्हाला आमची वेदना सांगायची होती. हे सांगितले पाहिजे आणि समाज बदलला पाहिजे, हा आवेश आमच्याकडे होता.  या आवेशातून कार्यकर्तापण आले आणि त्यातून ‘तुमच्यामुळे आम्ही या अवस्थेला आहोत’ ही भूमिका व्यक्त झाली. ही प्राथमिक अवस्था होती. त्या काळात अशा पद्धतीने लिहिले गेले. नंतर दलित साहित्य बदलत गेले. आजचे दलित साहित्य उरबडवे नाही. दलित साहित्य केवळ मराठीमध्यचे नाहीए, तर सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये असे साहित्य निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर अन्य प्रदेशांमध्ये जे दलित स्थलांतरित होऊन स्थायिक झाले, तिथेही दलित साहित्य निर्माण होत आहे. हे साहित्य चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होत आहे. मराठीपेक्षाही मोठय़ा प्रमाणावर ख्रिश्चन दलितांचे लेखन इंग्रजीत येत आहे. हिंदीतील दलित लेखकांचे लेखन येत आहे. तमीळ, तेलगू, गुजराती, बंगाली, मल्याळम्मध्येही खूप चांगल्या पद्धतीने लिहिले जात आहे. परंतु हे आपल्याला माहिती नाही. केवळ आपण मराठी साहित्याला धरून संपूर्ण दलित साहित्याचे आणि चळवळीचे मूल्यमापन करतो. मला ते चुकीचे वाटते. दलित साहित्य सर्व भारतभर लिहिले जात आहे आणि त्याची प्रेरणा मराठी दलित साहित्य आहे. प्रथम आमची भूमिका आक्रमक, आक्रस्ताळी आणि शिवराळ होती. त्यावेळी तसेच असणे स्वाभाविक होते, म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो. झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आम्हाला थोडाशा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात ‘आम्हीही माणसे आहोत’ हे ओरडून सांगावे लागले. त्यामुळे त्यात आवेश आहे. पण तो स्वाभाविक आहे. आणि त्याचे कौतुकही झाले.

‘आम्हीही माणसं आहोत. आम्हालाही नाक, डोळे आहेत. तुमच्याप्रमाणेच आमच्या अंगातही लाल रक्तच आहे. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून समजून घ्या..’ अशी विनंती करणारे, आग्रह करणारे लेखन आम्ही करत होतो. ‘आम्हाला माणुसकीची वागणूक द्या’ ही वेदना त्यात व्यक्त होत होती. पण वेदना व्यक्त करून आणि याचना करूनही आमचे प्रश्न सुटत नव्हते. त्यामुळे यास नकार दिला पाहिजे अशी भावना व्यक्त होऊ लागली. त्यामुळे दलित साहित्यामध्ये नकाराच्या साहित्याची दुसरी लाट आली. आम्ही देव नाकारला. इथली व्यवस्था नाकारली. संपूर्ण नाकारणं सुरू झाल्यानंतर लोकांचे आमच्याकडे लक्ष गेले. ‘केवळ नाकारून नवी संस्कृती निर्माण होत नाही,’ असे मग सांगितले गेले. त्यामुळे ह्य़ांना आणखी ठोकले पाहिजे, या मानसिकतेतून विद्रोहाची भूमिका घेतली गेली. दलित आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विद्रोहाची भूमिका घेत आम्ही लिहायला लागलो. तेव्हा ‘वेगळी चूल मांडू नका. या विराट समूहाचे तुम्हीही एक भाग आहात,’ अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू व्हावी म्हणूनच आम्ही आक्रमकपणे मांडत होतो. त्याला यश आले. आम्ही विद्रोह केला याचा अर्थ आम्हाला या समाजापासून तुटून, फुटून वेगळे व्हायचे नाहीए. हा सृजनात्मक विद्रोह होता. विषमतेवर आधारलेली जुनी व्यवस्था नष्ट करून समतेवर आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही लिहीत होतो. ही दलित साहित्याची तिसरी पायरी होती. आज दलित साहित्य ‘आम्हाला आमचे हक्क, अधिकार द्या,’ या चौथ्या पायरीवर आहे. विधानसभेत आमदार आणि लोकसभेत खासदार जे बोलतात, त्या पद्धतीने या समाजाच्या प्रश्नांविषयी आम्ही बोलले पाहिजे. ती आमची ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती पार पाडली नाही तर इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही. आणि आम्ही सांस्कृतिक गुन्हेगार ठरू. म्हणून आम्ही हिरीरीने भूमिका घेऊन लिहीत आहोत. आमचे साहित्य राजकीय, सामाजिक बांधिलकीने प्रेरित झालेले आहे.

‘या देशाच्या चेहऱ्यावर जातिव्यवस्थेचे काळेकुट्ट डाग पडले आहेत, ते नष्ट झाले पाहिजेत,’ असे महात्मा गांधी म्हणायचे. खरं तर दलित लेखक हेच करतो आहे. या समाजव्यवस्थेच्या चेहऱ्यावरचे काळेकुट्ट डाग पुसून हा देश आणि समाज अधिक सुंदर झाला पाहिजे, या उदात्त हेतूने आम्ही लेखन करीत आहोत. भारतातील तळागाळातला माणूस सुंदर झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सामान्य माणसाचा उद्गार बळकट करण्याच्या विचारांतून मी लेखन करतो. माझे शब्द हे शब्द नाहीत, तर ते परिवर्तनाचे हत्यार आहे. मनोरंजनासाठी नाही, तर परिवर्तनासाठी आणि सामाजिक बदलांसाठी मी लिहितो. जीवनवादी मूल्ये मांडताना पुरस्काराच्या रूपाने मिळणारे प्रेम हे लेखकाची हिंमत आणि ताकद वाढवणारे असते.

समाजाने आपल्यातील लेखकाला जगविले पाहिजे. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कलावंताप्रती निष्ठा दाखविली पाहिजे. कलावंत निराश झाला, एकाकी पडला तर समाजाचे फार मोठे नुकसान होऊ शकते. संस्कृतीचे रक्षण करणारे कलाकार एकटे पडू नयेत याची दक्षता घेतली गेली पाहिजे. देशाचे रक्षण बंदुकीने करता येते, पण समाज आणि संस्कृतीचे रक्षण लेखक आपल्या कुंचल्याने आणि लेखणीने करतो. त्याची लेखणी समृद्ध ठेवण्यासाठी लेखकाच्या पाठीशी समाज उभा राहिला पाहिजे. गेल्या काही काळामध्ये समाज फार अल्पसंतुष्ट झाला आहे. लेखक आणि कलावंतांच्या मनात उदासीनता दाटते आहे. विचारवंतांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. त्याबद्दल चर्चाही झाल्या. परंतु या हत्यांची अजूनही उकल होऊन गुन्हेगार पकडले जात नाहीयेत. लोकशाही निर्भयपणे माणसाला बोलू देते. ही व्यवस्था आजही आहे. पण व्यवस्थेवर पसरलेले काळे ढग नष्ट करण्यासाठी समाजानेसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. चळवळींनासुद्धा आज मरगळ आल्यासारखी वाटते. ६०-७० च्या दशकांमध्ये झालेल्या चळवळींनी महाराष्ट्रामध्ये जे नवचैतन्य निर्माण केले, तशा प्रकारच्या चळवळी आज थंडावल्यासारख्या दिसतात. मराठीमध्ये नवे लेखक दिसत नाहीत. असे वातावरण निर्माण होण्यास जुनेजाणते प्रस्थापित लेखक कारणीभूत आहेत. त्यांनी नेतृत्व करून नव्या लेखकांना उमेदीने लिहिण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. मोठे लेखक कळप करून आपल्या कळपातील लेखकांना मोठे करत आहेत. पण त्याने भाषेची अधोगतीच होईल. नव्या अंकुरांना जोपासणारे पुरोगामी वातावरण पुन्हा निर्माण झाले पाहिजे.

सामान्य लोकांसाठी लेखन करणारा मी एक सामान्य लेखक आहे. विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार हे मोठे लेखक आहेत. त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याची संधी या पुरस्काराने दिली ही गोष्ट मला सरस्वती सन्मानापेक्षाही मोलाची वाटते. हे माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत. मराठीमध्ये एक चांगला लेखक आहे याची दखल या पुरस्काराने घेतली गेली आहे. मराठी भाषेबद्दल माझ्या मनात गर्वाची भावना आहे. आपण मराठी भाषा आणि समाजाची सेवा करू शकलो याचे आज मला समाधान वाटते. ‘अक्करमाशी’चा लेखक म्हणून लोक मला ओळखतात याचा आनंद आहे. पण ‘अक्करमाशी’च्या तोडीचे लेखन मी पुढेही केले आहे. ते वाचले जात नाही का, की त्याकडे दुर्लक्ष केले जाते, या विचाराने मी निराश होतो. माझ्या पुस्तकांचा अनुवाद झाला नसता तर मी इतका मोठा लेखक झालो नसतो. मला लेखक म्हणून मोठे करण्यामध्ये अनुवादकांचा सिंहाचा वाटा आहे. मी केवळ मराठीमध्येच लिहीत राहिलो असतो तर इथल्या गटबाजीने दुर्लक्ष करून मला संपवले असते. लेखक आणि समीक्षकांनी माझ्या लेखनाचे कधी भरभरून कौतुक केले नाही. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मला केवळ २५ मते मिळाली. तिथे काही वेळा सुमार दर्जाची माणसे निवडून येतात. यामुळेच कुठेतरी लेखकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. चांगल्या लेखकांना बाजूला टाकले जाते आणि चुकीची माणसे सोंग घेऊन नाचविण्याचे काम साहित्य परिषदा करतात.

संपूर्ण भारतात आणि मराठीमध्ये माझ्या पुरस्काराचे स्वागत होत असताना एक-दोन निषेधाचे सूरदेखील उमटले. ‘दलित लेखकाने सरस्वती सन्मान का स्वीकारावा?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्याने मी व्यथित झालो. या सन्मानाचे नाव काय ठेवावे, हा

के. के. बिर्ला फाउंडेशनचा विषय आहे. व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्यामुळे यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारल्याची चर्चा झाली. तीच भावना माझ्या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा व्यक्त झाली. आमच्या नातेवाईकांमध्ये दोन महिलांची नावे ‘सरस्वती’ आहेत. त्यांना कुटुंबातून काढून टाकायचे का? असे कसे करता येईल? गंगाधर (पानतावणे), वामन (निंबाळकर), केशव (मेश्राम) ही सर्व हिंदू देवतांची नावे आहेत. म्हणून आपण त्यांची नावे काढून टाकली का? आपण एका मिश्र संस्कृती असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये राहतो. काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. किती नकार द्यायचा? नकार केवळ संत म्हणून देऊन नका. खळबळजनक प्रसिद्धी मिळावी म्हणून देऊ नका. त्यामुळे नकारात्मक वातावरण निर्माण होते. आपण एकमेकांमध्ये मिसळून मने जोडली पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. ‘आम्ही वेगळे आहोत, वेगळेच राहणार आणि वेगळी भूमिका घेणार..’ हे आता फार झाले. बाबासाहेबांनंतर ७० वर्षे आम्ही हीच भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही वेगळे पडू आणि समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ असे वातावरण निर्माण होण्याची भीती मला वाटते. समाजाबरोबर राहायचे असेल तर विधायक भूमिका घेतली पाहिजे. इतकी मोठी हिंदू लोकसंख्या नाकारून चालणार नाही. काही हिंदू जातीयवादी असतीलही; पण आता हिंदू समाजामध्ये प्रचंड बदल झाला आहे. नवीन पिढी लढत आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवायला नको. पुरस्कार मिळत नाहीत तेव्हा मिळत नाहीत म्हणून तक्रार करायची. मिळतात तेव्हा नाकारायला लागतो. हा कुठेतरी एकलकोंडेपणातून आलेला आक्रमकपणा आहे. तो आपल्याला पुढे घेऊन जाणार नाही. एखाद्या महाविद्यालयाचे नाव सरस्वती असेल तर तेथील ग्रंथालयात आपण पुस्तके ठेवू देणार नाही का? माझे सगळे प्रकाशक, अनुवादक ब्राह्मण आहेत. सर्वानी प्रेम केले म्हणून मी मोठा झालो. जातीयवादी असतील त्यांना विरोध केलाच पाहिजे, परंतु आपले स्वागत करणाऱ्यांवर अविश्वास दाखवता कामा नये.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

lokrang@expressindia.com

20
READ IN APP
X