21 October 2019

News Flash

मध्यलयीतला मजकूर

आज पाच वर्षांनंतर निवडणुकांचे निकाल त्या लेखातला युक्तिवाद किती वास्तव होता, हेच सिद्ध करतात.

|| गिरीश कुबेर

शेजारी आहे २२ एप्रिल २०१४ या दिवशी ‘लोकरंग’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची प्रतिमा. म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकांआधी प्रकाशित झालेला हा लेख. त्या लेखाचा मथळा होता- ‘नाही अध्यक्षीय म्हणून..’!

भारतात संसदीय लोकशाही आहे. म्हणजे संसदेसाठी निवडणुका होतात आणि सगळ्यात जास्त प्रतिनिधी निवडून आलेल्या पक्षाचे सदस्य आपला नेता निवडतात. पण हे दाखवायला. प्रत्यक्ष परिस्थिती अशी, की जवळपास सर्व पक्ष हे एक व्यक्ती वा कुटुंबकेंन्द्रित आहेत. आणि ते- ते पक्ष निवडून आल्यावर कोण त्यांचं नेतृत्व करणार, हे आधीच निश्चित असतं. म्हणजे आमदार/खासदारांनी आपला नेता निवडावा असं काही होत नाही. तेव्हा देशात आपण अध्यक्षीय लोकशाहीचाच स्वीकार प्रामाणिकपणे का नाही करायचा, असा त्या लेखाचा सूर होता. तो प्रकाशित झाल्यावर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतले. लिहिलेले किती अयोग्य आहे, वगरे सांगितले.

आज पाच वर्षांनंतर निवडणुकांचे निकाल त्या लेखातला युक्तिवाद किती वास्तव होता, हेच सिद्ध करतात. त्याचे श्रेय अर्थातच नरेंद्र मोदी यांना. अनेकांचा विरोध असूनही त्यांनी तो मोडून काढला आणि निवडणुका अध्यक्षीय पद्धतीच्या मार्गानेच जातील याची व्यवस्था केली. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांचे महत्त्व भाजपच्या विजयातून समजून घेता येईल. यात आक्षेप घ्यावा असे काही नाही.

व्यवस्थापनशास्त्रात मुलाखत कलेवर मार्गदर्शन करणारे नेहमीच एक सल्ला देतात. मुलाखत द्यायची वेळ आली तर ती देणाऱ्याने आपल्या बलस्थानांभोवतीच प्रश्न विचारले जातील यासाठी चातुर्य दाखवायचे असते. म्हणजे ज्यांची उत्तरं ठाऊक आहेत तेच प्रश्न समोरचा विचारेल याची खबरदारी घ्यायची.

ही कला कशी साध्य करायची, हे मोदी यांचा विजय दाखवून देतो. मोदी यांनी सातत्याने ही निवडणूक ‘मी विरुद्ध समोर आहेच कोण?’ या प्रश्नाच्या भोवतीच फिरत राहील याची खबरदारी घेतली. ती घ्यायची तर निवडणुकीचे आणि प्रचाराचे कथानक स्वत: सिद्ध करावे लागते. तेही त्यांनी केले. आपले जे हुकुमी एक्के आहेत ते चालणार नाहीत अशी उतारी समोरचा करणार नाही अशी काळजी घ्यायची. ती त्यांनी चोख घेतली. त्यामुळे निवडणुकीचा संपूर्ण प्रचार हा मोदी यांना हव्या असलेल्या मुद्दय़ांवरच फिरत राहिला.

अपवाद फक्त एकच : काँग्रेसचा जाहीरनामा! विशेषत: देशातील गरीबांना दरमहा सहा हजार रुपयांचे उत्पन्न देणारी त्यातील ‘न्याय’ ही योजना. ही योजना आखण्यासाठी जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांची मदत काँग्रेसने घेतली. तिची परिणामकारकता इतकी होती, की ही योजना जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांत ती सर्वदूर पोचली. शेतकरी, गरीब यांच्यात तिची चर्चा होणार याचा अंदाज आल्या आल्या मोदी यांनी राजकीय प्रचार चर्चा ‘न्याय’पासून दूर जाईल अशी खबरदारी घेतली. त्यासाठी त्यांनी केले काय?

तर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिली. ती जाहीर झाल्या झाल्या भाजपला जशी हवी होती तशीच प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे अपेक्षित होता.. किंवा असणार.. तसा दुभंग साधला गेला. ‘हिंदू दहशतवादी’ असा शब्दप्रयोग करणाऱ्याविरोधात सत्याग्रह म्हणून आपण साध्वी यांना उमेदवारी दिली असे भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले. उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या साध्वी यांनी आपला इंगा दाखवला आणि करकरे यांना त्यांनी दिलेल्या शापवाणीपासून ते महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त ठरवण्यापर्यंत सर्व दिशांना वाग्बाण सोडून आपण काय करू शकतो, हे दाखवून दिले. त्यांचा परिणाम इतका, की साक्षात् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याची दखल घ्यावी लागली. गांधींच्या मारेकऱ्याला देशभक्त ठरवणाऱ्यास मी कधी माफ करू शकणार नाही, असे खुद्द मोदीच म्हणाले. आता त्यांना आपला शब्द खरा करून दाखवावा लागेल, ही बाब वेगळी. पण त्यामुळे हिंदू मन ढवळले गेले यात शंका नाही.

ही हिंदू मनाला घातलेली उघड साद हे मोदी यांचं राजकीय वैशिष्टय़. साध्वी ही काय चीज आहे, हे मोदी वा अमित शहा यांना माहीत नसण्याची काहीही शक्यता नाही. तेव्हा त्या काय करू शकतात याच्या परिणामांचा अंदाज त्यांना नसेल, हेदेखील अशक्यच. तरीही त्यांनी साध्वीस रणांगणात उतरवले. म्हणजेच मुळातील हिंदुत्ववादी मोदी यांना अधिक तीव्र अशा हिंदुत्ववाद्याची मदत घ्यावी असे वाटले. मोदी यांच्याआधी कोणी लोकप्रिय असे हिंदू नेते झालेच नाहीत असे नाही. पण त्या आधीच्यांनी कधी आपलं हिंदुत्व मिरवलं नाही. ते मिरवणं योग्य की अयोग्य, हा मुद्दा वेगळा. पण या देशातील बहुसंख्यांची हिंदुत्व मिरवणाऱ्या नेत्याची तहान मोदी यांनी ओळखली आणि प्रच्छन्नपणे हिंदुत्ववादी भूमिका घेतली. वास्तविक इतिहास दाखवतो की, काँग्रेस हा या देशातील सर्वात हिंदुबहुल पक्ष. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक मौलाना अबुल कलाम आझाद यांचा एक आणि स्वातंत्र्यपूर्व काळात तीन (नवाब सय्यद महंमद बहादूर, सय्यद हसन इमाम आणि रहिमुल्ला सयानी) इतकेच अपवाद वगळले तर १३४ वर्षांत काँग्रेसचे सर्व अध्यक्ष हे हिंदूच राहिलेले आहेत. पण त्यातील कोणालाही आपले हिंदूपण मिरवावे असे वाटले नाही. त्याची गरज नव्हती.

पण तेव्हा त्यास सर्वसामान्य हिंदूंचा आक्षेपही नव्हता. कारण तेव्हा कॉंग्रेस हा पक्ष प्रामाणिक निधर्मीवादी होता. मदनमोहन मालवीय यांनाही त्या पक्षात आदर होता. आणि डाव्यांचे पुरस्कर्ते मोहन कुमारमंगलम् आदींनाही मान होता. धर्म हा त्यावेळी कॉंग्रेसच्या राजकारणाचा मुद्दा नव्हता. तो नंतर झाला. त्यातून तयार झाले छद्म निधर्मी.. म्हणजे स्युडो सेक्युलर. त्यामुळे परंतु गेल्या साधारण पाच दशकांतल्या काँग्रेसच्या राजकारणामुळे हिंदूंमध्ये त्या पक्षाविषयी खदखद दाटू लागली. त्यातही विशेषत: राजीव गांधी यांनी मंडल आयोगाच्या वादळाची दिशा बदलण्यासाठी शहाबानो प्रकरणातील न्यायालयीन निकालात जो हस्तक्षेप केला, ‘सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावर असमर्थनीय बंदी घातली तेव्हापासून काँग्रेसविरोधात हिंदू जनमत जाऊ लागले. त्याला व्यवस्थित राजकीय खतपाणी घालण्याचे काम लालकृष्ण अडवाणी यांचे. त्या मशागत केलेल्या मानसिकतेचा परिपाक म्हणजे नरेंद्र मोदी.

त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेच्या मुळाशी हिंदू बहुसंख्याकांची आपल्यावरच्या अन्यायाची भावना आहे, हे नाकारता येणार नाही. ती किती अयोग्य, अनाठायी आहे वगरे युक्तिवाद होऊ शकतील. पण ती आहे, हे मान्य करावे लागेल. ती तशी मान्य केली तरच ती का आहे आणि ती कशी दूर करता येईल यावर चर्चा होऊ शकेल. पण आपल्याकडील पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी ती कधी केली नाही वा करूही दिली नाही. तसे करण्यात त्यांना नेहमीच कमीपणा वाटला. यातून कशी सामाजिक गोची झाली हे समजून घेण्यासाठी एका आदरणीय समाजवादी नेत्याचे उदाहरण द्यावे लागेल. ते हयात नसल्याने त्यांचे नाव घेणे उचित नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ए. आर. अंतुले यांची निवड झाल्यावर त्या नेत्याची प्रतिक्रिया होती : ‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधीस मुख्यमंत्रीपदी बसवण्यात मोठेपणा आहे.’

परंतु त्यानंतर काही काळाने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी डॉ. फारूख अब्दुल्ला पुन्हा आरूढ झाल्यावर ते म्हणाले, ‘बरोबरच आहे. त्या राज्यात मुसलमान बहुसंख्यांक आहेत, तेव्हा मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार.’

त्या राज्यातल्या काश्मिरी हिंदू पंडितांवर अत्याचार होत तेव्हा त्यांनी वा तशा पुरोगामी मंडळींनी कधीही त्याचा घसघशीत निषेध केला नाही. या अशा घटनांचा आणि चतुर दुटप्पीपणाचा नाही म्हटले तरी समाजमनावर परिणाम होत असतो.

दुसरा एक प्रसंग.. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या एका मराठी लेखकाच्या आयुष्यातला. अलीकडे मुंबईत लेखक- कलावंतांच्या मेळाव्यात घडलेला. हा लेखक नुकताच ऋषिकेशला फिरायला जाऊन आलेला. त्याला गंगेचं प्रेम. तर तो सहज बोलता बोलता म्हणाला, ‘ऋषिकेशजवळ गंगेचं पात्र पाहिल्यावर किती प्रसन्न वाटतं!’

ते ऐकल्यावर समोरच्या पुरोगामी गटातल्या एका लेखकाची प्रतिक्रिया होती.. ‘म्हणजे तू हिंदुत्ववादी आहेस की काय?’

तिसरा प्रसंग- माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या मुंबईतल्या एका भाषणाचा. ते सुरू करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या परंपरेप्रमाणे काही संस्कृत श्लोक म्हटले. त्यावेळी आम्हा बातमीदारांच्या रांगेत बसलेला एक समाजवादी नेता म्हणाला, ‘शेषन हिंदुत्ववादी दिसतायत.’

असे अनेक दाखले देता येतील. पण त्यातून एकच मुद्दा स्पष्ट होतो. तो म्हणजे आपल्याकडे समाजातील बुद्धिवंत, पुरोगामी वगरेंनी हा असा लादलेला हिंदुत्ववाद! ते अन्याय्य होते. आणि त्यामुळे हिंदूंत एक प्रकारचा कानकोंडेपणा तयार झाला. आपण हिंदूू आहोत म्हणजे आपल्यातच काही कमीपणा आहे असे वाटायला लावण्याइतपत टोकाचे या मंडळींचे वागणे होते. हिंदू आहे म्हणून त्यात काही ‘गर्व से कहो’ हे जसे काही नाही, तसेच त्यात लाज वाटावे असेही काही नाही. पण पुरोगाम्यांच्या अतिरेकामुळे हिंदू असणे म्हणजे काहीतरी कमअस्सल असे दाखवले गेले. बाबरी मशीद पडली आणि या सगळ्याचे मग आयामच बदलले. राजकीय आणि सामाजिक भावनांचा लंबक एकदम दुसऱ्या बाजूला गेला.

तसे झाल्याने बहुसंख्यांकवादाचे जे राजकारण सुरू झाले त्यावर मोदी यांनी मांड ठोकली आणि त्या हिंदुत्ववादी रथाचे सारथ्य अडवाणींच्या हातून आपल्या हाती घेतले. म्हणजेच मोदी ही  एक घटना नाही. ती इतक्या वर्षांच्या घटनाक्रमाची प्रतिक्रिया आहे. ती मान्य करायची असेल तर आधीच्या घटनाक्रमाचेही अस्तित्व मान्य करावे लागेल.

मोदी यांच्या हाती हे रथाचे सारथ्य अशा काळी आले, की ज्यावेळी जगात सर्वत्र जागतिकीकरणाच्या विरोधात भावना दाटून येत होती. या जागतिकीकरणाचा फायदा विशिष्ट वर्गालाच मिळाला, आपल्यापेक्षा आपल्या शेजारच्याचे वा प्रतिस्पध्र्याचेच भले झाले, आपला उदार दृष्टिकोन हेच आपल्या अधोगतीचे कारण आहे असे मानणाऱ्यांची संख्या देशोदेशी वाढत होती. स्थलांतरितांच्या खांद्यावर उभ्या असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशातच स्थलांतरितांना विरोध होऊ लागलेला असताना आणि त्यांना आपल्या विवंचनांचे कारण मानले जाऊ लागले असताना भारतासारखा मुळातलाच तिसऱ्या जगातला देश या अशा भावनेपासून अलिप्त कसा राहील? २००१ सालचे ९/११, नंतर इराक आणि पश्चिम आशियातला संहार, तालिबानचा प्रसार, अल् काईदाचा संहार ही जागतिकीकरणाविरोधातील धार्मिक प्रेरणा. त्यामुळे इस्लामधर्मीय हे जागतिक स्थलांतरितांचे- म्हणजेच अमेरिका, युरोप आदी देशांतील स्थानिकांच्या समस्यांचे कारण मानले जाऊ लागले. थोडक्यात, इस्लामविरोधात जगातच वातावरण तापले.

मोदी हे हिंदुत्ववादाच्या रथात आरूढ झाले ते या पाश्र्वभूमीवर. वास्तविक युरोप वा अमेरिका आदी देशांतील आणि आपल्याकडील परिस्थिती यात मूलभूत फरक आहे. काही प्रमाणात का असेना, त्या प्रदेशांत मुसलमान हे खरोखरच स्थलांतरित आहेत. स्पेनसारखा एखादा देश वगळला तर युरोपीय देशांना इस्लामचा तितका जुना इतिहास नाही. युरोप आणि आशियाच्या सीमेवरील टर्कीसारख्या देशांना तो आहे. पण त्या देशातील इस्लामला युरोपीय आधुनिकतेचा स्पर्श झाल्यामुळे आणि केमाल पाशासारख्या नेत्यामुळे त्या इस्लामचा चेहरा सौदी वा तत्सम देशांप्रमाणे अलीकडेपर्यंत नव्हता. पण आपल्याला ही उदाहरणे तशीच्या तशी लागू होत नाहीत.

कारण काही प्रमाणात आपल्याकडे इस्लाम हा फक्त स्थलांतरितांचा नाही. आता यासंदर्भात  देशात खरे स्थानिक कोण, आर्य मूळचे कोण, ते कोठून आले वगरे ऐतिहासिक तपशिलात जाण्याचे हे स्थळ नाही. पण सध्याच्या राजकीय वातावरणात इस्लामचा उगम मुसलमान आक्रमक, गझनीचा महमूद, सोमनाथ उद्ध्वस्त होणे येथपासूनच सुरू होतो आणि तो पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरच्या समस्येपर्यंत संपतो असेच मानले जाते. हे सर्व एका अर्थी कालबा आणि देशबा घटक. त्यांना खलनायकत्वाचा काटेरी मुकूट चढवण्याइतके अगदीच सोपे.

मोदी यांनी नेमके तेच केले. एका बाजूने जागतिकीकरणाविरोधातील जागतिक नाराजी त्यांनी काँग्रेसच्या काळात प्रस्थापित बनलेले नेते आणि घराण्यांशी जोडली आणि दुसऱ्या बाजूला विकसित देशांत स्थलांतरितांशी निगडित असलेला स्थानिकांचा संताप मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश यांच्याशी जोडला. म्हणून मग ‘काँग्रेसमुक्त भारता’ची हाक आणि म्हणूनच सतत पाकिस्तानला सबक शिकवण्याची भाषा. पाकिस्तानचे जनरल मुशर्रफ यांच्याविरोधात (तेव्हा) गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांनी कटकारस्थानांचा आरोप करण्यापासून ते ‘उरी’ चित्रपटातील जोशभावनेची विक्री हे सर्व मुद्दे त्यामुळेच खपवले गेले. यातील पाकिस्तानच्या आघाडीवर खरे तर आपण स्वत:हून करावे असे काही नाही. कारण पाकिस्तान हा स्वतंत्र देश आहे. त्याचे अस्तित्व मिटवणे काही शक्य नाही. पण पुलवामा घडले आणि मोदी यांना आपण काहीतरी घडवून दाखवू शकतो, हे सिद्ध करण्याची संधी मिळाली. कोणत्याही चतुर राजकारण्याने ती साधलीच असती. मोदी यांनी तेच केले.

ही अशी राष्ट्रप्रेमाची भावना स्वत:शी जोडून घेणे हे मोदी यांचे यश. पृष्ठभागावरील त्या यशाखाली निश्चलनीकरण ते वाढती बेरोजगारी अशा अनेक आघाडय़ांवरचे अपयश दडलेले आहे. पण राष्ट्रप्रेमभावनेची झूल इतकी जाड, की त्याखाली सगळे झाकण्याची सोय असते. त्याचबरोबर असे करण्यातील दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शत्रुराष्ट्रास धडा शिकवणे हे आपल्या देशात बहुसंख्यांकांच्या धर्मभावना सुखावणारे आहे, हे वास्तव. पाकिस्तान हे साधेसुधे शत्रुराष्ट्र नाही, ते इस्लामधर्मीय आहे. म्हणून पाकिस्तानचे नाक कापणे हे देशातील सर्व इस्लामधर्मीयांचे नव्हे, पण त्यांचा कैवार घेणाऱ्या पुरोगाम्यांचे तसेच त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेसचे नाक कापणे. आणि म्हणजेच अल्पसंख्याकधार्जण्यिा धोरणांचा पराभव करणे. या दोन भावना मोदी यांनी अत्यंत सहजपणे बहुसंख्याकांच्या मनात भरवल्या. आणि आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बाळगणाऱ्या बहुसंख्यांनी त्या आनंदाने स्वीकारल्या.

परिणाम.. भाजपचा हा भव्य विजय. वरील प्रतिपादनाच्या पुष्टय़र्थ एकच मुद्दा पुरे. ज्या- ज्या राज्यांत काँग्रेस मजबूत वा दखलपात्र होती, त्या- त्या राज्यात भाजपचा विजय आकाराने मोठा आहे. आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू आदी राज्यांत काँग्रेस नाही वा नगण्य आहे. तेव्हा या राज्यांत भाजपचे अस्तित्वही नोंद घ्यावी असे नाही.

तेव्हा जे झाले ते असे आहे आणि त्यामागे हे सारे आहे. धर्माचा उपयोग राजकीय यशासाठी केले जाण्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. तथापि तसे केल्यानंतर देशाच्या अणि व्यक्तीच्या इतिहासात एक वळण असे येते, की धर्माचे बोट सोडावे लागते. ते तसे का करायचे, हे साध्वी प्रज्ञा यांच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.

दुसरा मुद्दा- आíथक प्रगतीचा. तिला धर्म वा राष्ट्रप्रेम हा पर्याय नाही. असूच शकत नाही. नेपोलियनसारखा युद्धनेता ‘सन्य पोटावर चालते’ असे म्हणून गेला. याचाच अर्थ युद्धं केवळ देशप्रेम या एकाच भावनेवर यशस्वीपणे लढता येत नाहीत. या भावनेवर ती सुरू करता येतात, पण फार काळ लांबवता येत नाहीत आणि त्यामुळे विजयही मिळू शकत नाही.

मथितार्थ- आíथक प्रगती अपरिहार्य. पहिल्या खेपेस मोदी ती साधण्यात यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांना दुसरी संधी मिळाली. किंवा आपल्या राजकीय चातुर्याने त्यांनी ती मिळवली. त्या यशात काँग्रेस आणि विरोधकांचा कर्मदरिद्रीपणा याचा वाटा आहेच. पण तो तसाच राहील असे मानण्याचे कारण नाही. आपल्या समाजाला समाजपुरुषापेक्षा मोठय़ा नायकाचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर असे नायकत्व आपण अनेकांना देत आलो आहोत. पं. नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे असे अनेक दाखले देता येतील. सध्या हे नायकत्व मोदींकडे आहे. अशा नायकांचे तरुणांना विशेष आकर्षण वाटू शकते. यातील प्रत्येकाच्या नायकत्वाची कारणे वेगळी. मोदी यांचेही तसेच. कॉंग्रेसच्या छद्म-निधर्मीवादाला मोदी यांनी दिलेले करकरीत हिंदुत्ववादी प्रत्युत्तर पाहून तरुण त्यांच्याकडे आकर्षिले गेले. त्याचप्रमाणे अन्यायग्रस्त मानसिकतेत जगणाऱ्या अन्य हिंदू नाही तो आपलासा वाटला. बाकी काही सुखावणारे असेल-नसेल, पण धर्मभावना कुरवाळणे अनेकांना सुखकारक वाटते. त्यात विजयाचा आनंद असतो.

आता धोका संभवतो तो नेमका या टप्प्यावर. कॉंग्रेस जोपर्यंत प्रामाणिक निधर्मीवादी होती तोपर्यंत सर्व जनतेसाठी आपलीशी होती. पुढे त्यात छद्म-निधर्मी घुसले आणि कॉंग्रेस भरकटली. त्याचप्रमाणे तो क्षण आता भाजपसाठी आला आहे. त्या पक्षाच्या राजकीय यशाकडे पाहत नव आणि छद्म-हिंदुत्ववाद्यांची मोठी गर्दी तिथे जमा होऊ लागली आहे. छद्म-निधर्मीवाद्यांनी कॉंग्रेसला सुरुवातीला यश दिले, पण ते नंतर टिकले नाही.

याचा अर्थ इतकाच, की भाजपला आता आपली मध्यलय गाठावी लागेल. मध्यलयीत गाणे तसे अवघड. पुढे द्रुतलयीतली दाद, टाळ्या खुणावत असतात. आणि परत मध्यलयीत गायचे तर मजकूरही असावा लागतो. त्या मजकुराचा शोध आणि भरणी आता भाजपला करावी लागेल.

राष्ट्रप्रेमाची भावना स्वत:शी जोडून घेणे हे मोदी यांचे यश. पृष्ठभागावरील त्या यशाखाली निश्चलनीकरण ते वाढती बेरोजगारी अशा अनेक आघाडय़ांवरचे अपयश दडलेले आहे. त्याचबरोबर असे करण्यातील दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शत्रुराष्ट्रास धडा शिकवणे हे आपल्या देशात बहुसंख्याकांच्या धर्मभावना सुखावणारे आहे, हे वास्तव. पाकिस्तान हे साधेसुधे शत्रुराष्ट्र नाही, ते इस्लामधर्मीय आहे. म्हणून पाकिस्तानचे नाक कापणे हे देशातील सर्व इस्लामधर्मीयांचे नव्हे, पण त्यांचा कैवार घेणाऱ्या पुरोगाम्यांचे तसेच त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेसचे नाक कापणे. या दोन भावना मोदी यांनी अत्यंत सहजपणे बहुसंख्याकांच्या मनात भरवल्या. आणि आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बाळगणाऱ्या बहुसंख्यांनी त्या आनंदाने स्वीकारल्या.

हिंदू मनाला घातलेली उघड साद हे मोदी यांचं राजकीय वैशिष्टय़. त्यास राष्ट्रवादाची फोडणी देऊन त्यांनी ती यशात परावर्तित केली. आपल्या निरनिराळ्या आघाडय़ांवरील यशापयशाकडे लोकांनी डोळेझाक करावी इतपत त्यांना यात यश आले.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on May 26, 2019 4:34 am

Web Title: lok sabha election 2019 results analysis by girish kuber