मृदुला दाढे- जोशी

mrudulasjoshi@gmail.com

कथेला पुढे नेणारी आणि भूमिकांचा स्वभाव व्यक्त करणारी, उत्कृष्ट काव्यमूल्यं आणि सांगीतिक श्रीमंती असणारी गाणी हे आपल्या अनेक हिंदी चित्रपटांचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़. एखादी गोष्ट अफसाना कधी बनते? जेव्हा त्यात भावनिक संघर्ष असतो, कलाटणी असते, विस्मय असतो. सहजपणे काय योग्य, काय अयोग्य हे ठरवता येत नाही. अशा वेळी कथेच्या मदतीला गाणी येतात. ही गाणी जरी कथेसाठी जन्माला आली असली तरीही त्यांनी कथेबाहेरही स्वत:चं स्थान निर्माण केलेलं आहे. अशा निवडक गाण्यांचं, त्या- त्या चित्रपटाच्या कथेचा संदर्भ देत केलेलं विश्लेषण..

अमर आणि मीताच्या आयुष्यात शशीनं प्रवेश केलाय. पण मीता मात्र हे वादळ परतवण्याच्या प्रयत्नात आहे. त्या वादळाचा तडाखाच काय, लहानसा फटकासुद्धा आपल्या संसाराला बसू नये म्हणून घट्ट खिडक्या-दारं लावून घेतीय ती. दोघांमध्ये नाजूक क्षण गुंफण्यासाठी आतुर झालेली मीता आणि तिचं गाणं ऐकण्यासाठी उतावीळ झालेला अमर. मीताच्या मनातल्या भावना हलकेच स्वरात उमलतात. प्राजक्ताच्या पाकळ्यांएवढं नाजूक गाणं जन्म घेतं. जणू ती सांगतेय, गाणं असं फुलत नाही रे.. उमलावं लागतं स्पर्शातून. दोघांच्या मिसळलेल्या श्वासांतून आपोआप येतं ते ओठांवर. त्यावेळी मी फक्त तुझी सखी असते.

मेरी जां मुझे जां न कहो..

नकोच म्हणूस मला ‘मेरी जां’.. कारण जीवसुद्धा अल्पजीवी..! अजाणतेपणी लोक म्हणतात रे तसं!

‘जां ना कहो अनजान मुझे

जान कहाँ रहती है सदा

अनजाने क्या जाने

जान के जाये कौन भला?

सूखे सावन बरस गये,

कितनी बार इन आँखों से

दो बूँदे ना बरसी इन भीगी पलकों से’

डोळ्यांतला तो सावन किती कोरडा गेलाय आजपर्यंत.. ओल्या पापण्यांनी थोपवला त्याला.

‘होंट झुके जब होंटों पर सांस उलझी हो सांसों में

दो जुडवा होटों की बात कहो आँखों से!’ आणि आता हलकेच टेकवलेले ओठावरचे ओठ.. बाहेरची रिमझिम.. डोळ्यांतली नमी.. आणि तुझा स्पर्शगंध. ही रात्र संपूच नये. फक्त तू आणि मी- दोघांचंच आहे हे जग. डोळ्यातूनच बोलू या, कारण ओठांना स्वतंत्र अस्तित्व राहिलंयच कुठे..?

गीता दत्तचा आवाज.. ते आवाजात मिसळलेलं हसू की हसण्यात विणलेले सूर? त्या आवाजात कधीही न संपणारी रात्र आहे. तो दिवसाचा आवाज नाहीच मुळी. ‘मेरी जां’चे स्वर आहेत नी-नी-सा! सूरसुद्धा दोनच की! यातही तालवाद्य नाहीच. थेंबांचा फील देणारा व्हायब्रोफोन आहे. प्रत्येक वेळी ‘पलकों से’, ‘होटों से’ हे शब्द खाली येतात तेव्हा किती लाजरे होतात! अशा तऱ्हेनं षड्जाला येऊन बिलगणं आणि ‘मेरी जां’ म्हणत निषादावरून पुन्हा षड्जावर जाणं विलक्षण मोहक आहे. जणू एक लाजरी नजर खाली झुकतेय, पुन्हा वर बघतेय. किती रोमान्स आहे या चालीत! गाणं एकांतातलं असावं म्हणजे किती? ‘सांस ‘उलझी’ हो सांसो में’! हा ‘उलझी’ शब्द कसा सापडलाय? मिसळणं नाही, हे ‘गुंतणं’ आहे. गुंतण्यात उत्स्फूर्तता आहे. गुंत्यातून बाहेर येणं कठीण असतं. ठरवून केलेला प्रणय नाही हा. अचानक एका क्षणी शब्द संपल्यावर हलकेच र्अध राहिलेलं वाक्य स्पर्शानं पूर्ण करणं आहे हे. आणि तिथेही सांगता आलं नाही ते, डोळेच बोलतात एकमेकांशी. ‘सांसों में’ शब्दात गीतानं गुंफलेला तो उसासा, तिचं ते जीवघेणं हसू काळजाचं पाणी पाणी करतं.

अमरच्या आजारपणात त्याला खरी मीता सापडते. कधी बहीण, कधी मत्रीण, तर कधी चक्क आई होणारी. अत्यंत स्वाभाविक. त्याच्या- बरोबर खेळणारी, औषध घ्यायला लावणारी, डोकं मांडीवर घेऊन थोपटणारी. यात यत्किंचितही तिचा भूतकाळ काजळी धरत नाही! या अद्वैताला दृष्ट लागू नये असं वाटत असतानाच ती लागते. एका क्षणी अमरला जाणवतं, की मीता आणि शशीमध्ये ‘काहीतरी’ आहे. मग चव निघून जाते. चिडचिड. चढलेले आवाज. एकमेकांकडे पाठ करून झोपणं. मीताचं या क्षणी फक्त अमरवर प्रेम आहे.. पण हे त्याला कसं कळावं? तिच्या दृष्टीनं मनाची पाटी केव्हाच कोरी झालीय शशीबद्दल.. इथं मन्नादांचा आवाज पार्श्वभूमीवर समजावत राहतो.

‘फिर कहीं कोई फूल खिला

फिर कहीं कोई फूल खिला, चाहत न कहो उसको

फिर कहीं कोई दीप जला, मंजिल न कहो उसको..’

केवळ एक अनुरागाचा कोंब दिसला, एक फूल उमललं म्हणून ते पूर्णाशानं प्रेम झालं का? एक लुकलुकता दिवा दिसला म्हणून मंजिल आली असं समजायचं का?

‘मन का समंदर प्यासा हुआ

क्यूँ किसी से मांगे दुवा

लहरों का लगा जो मेला

तुफान ना कहो उसको’

मनात असंख्य तरंग उमटतच असतात. कुठंतरी अपूर्णत्व, ती प्यास असतेच.. त्या तरंगांनाच वादळ म्हणायचं? कोण देतं त्यांना हे नाव? आपणच ना! आपल्यालाच घाई झालेली असते त्या- त्या कप्प्यात आपल्या भावना घालायची..

‘देखे क्यों सब वो सपने

खुदही सजाये जो हमने

दिल उनसे बहल जाये तो

राहत न कहो उसको!’

स्वत:चं स्वप्नरंजन जर आपले भावनिक लाड पुरवत असेल तर त्यालाच ‘सुकून’ समजतोय का आपण? चुकत नाही का हे? आपण घटनांकडे तटस्थपणे बघूच शकत नाही.. आपल्याला जर दु:खी व्हायचंच असेल तर आपलं मन घटनांमधल्या कडय़ा बरोब्बर जोडून दाखवतं आपल्याला. आणि उत्तर माहीत असल्यामुळे आधीचं गणित त्याप्रमाणे रचलं जातं. आणि आपण आपल्याला हवा तसाच घटनांचा अर्थ लावतो. का घाई असते आपल्याला एवढी?

या गाण्याला मन्नादांचाच आवाज का निवडला असावा? मन्नादांच्या आवाजात एक वडीलधारी परिपक्वता आहे. तीच हवी होती इथं. ‘कही’वरची सुंदर जागा, ‘चाहत’ हा शब्द विशिष्ट झोल देत उच्चारणं! एक विलक्षण ‘समजूत’आहे या गाण्यात. कानउघाडणीही आहे. आयुष्याच्या या टप्प्यांवर खरंच असं कोणी सांगितलं तर? का जगायचं भूतकाळात? वेड पांघरण्यात एक शहाणा वेडेपणा आहे! आपल्यातलं आत्ता या क्षणीचं नातं आणि हा भूतकाळ याचा काहीही संबंध नाही.. का नाही विसरू शकत आपण?

स्वच्छ विचारांची मीता सरळ सांगून मोकळी होते.. की, ‘‘हो, वाटलं होतं मला आकर्षण शशीचं. कारण त्यात विलक्षण उत्कटता होती. माझ्यातली स्त्री मला जाणवून दिली त्यानं. माझ्या अनामिक ओढीला त्यानं आकार दिला. पण समाजानं ठरवलं, मी कुठे जायचं ते. आणि मी तो कोंब खुडून टाकला. स्पर्शही न करता त्यानं जेमतेम सहा तासांत मला जे दिलंय, ते तू सहा वर्षांतही देऊ शकलेला नाहीस. तरीही मी तुझ्या-माझ्यात ‘ती’ ओढ निर्माण करतेय. कारण मी ‘त्या’ भावनेला शोधतेय, जिनं माझ्या ‘प्यास’चं रूपांतर ‘प्यार’मध्ये केलं. तू मला सगळं दिलंस; पण माझी ‘ती’ तृष्णा अनुरागाच्या कवेत सामावून घेऊ शकला नाहीस. ती ‘तडप’ कुठं आहे? ते आयुष्याला झडझडून भिडणं कुठं आहे? सगळं कसं गुळगुळीत साबणाच्या वडीसारखं उच्चभ्रू. दुनियेतल्या सगळ्या प्रश्नांवर तुझ्याकडे अग्रलेखातून उपाय तयार आहेत अमर.. आपल्या या समस्येसाठी आहे?’’

अमर अंतर्मुख झालाय. ‘काल’च्या घटना ‘आज’आपल्यात विष का कालवतायत? आपण ‘आज’चा प्रत्येक क्षण जेव्हा समरसून जगत नाही तेव्हाच त्या कपारींमधून भूतकाळ आत घुसतो. तावातावानं शशीचा राजीनामा मागायला निघालेल्या अमरच्या हातात शशी आधीच आणलेला राजीनामा ठेवतो. त्या क्षणी एक लढाई अमर जिंकतो आणि एक हरतोसुद्धा! बुद्धिमान पत्नीनं शशीच्या जागी दिलेलं स्थान पुरुषी इगो सुखावून जातो. परंतु शशी कितीतरी जास्त संवेदनशील असल्याचं जाणवल्यानं एक भावनिक पराभवही आहे. एक ताणपर्व संपतं. तिरमिरलेला अमर घरी आल्यावर मीताकडून काहीतरी स्पष्टीकरण मागतो. आता मीताचा सर्वस्वी वेगळा अवतार दिसतो. ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण ती अस्तित्वातूनच काढून टाकते ते भन्नाट आहे. पाण्यात वाऱ्यानं उडून आलेलं एखादं लहानसं पान पटकन् फुंकरून टाकावं तसं या प्रकाराला तिनं ‘काढून’ टाकलेलं असतं. ती त्याला घोळात घेते. त्याच्या चिडण्याला शून्य भाव देते. आणि हलकेच कानात गोड बातमी सांगून टाकते. आणि सगळा नूरच पालटतो. आकाशवाणीच्या धूनने सुरू झालेला दिवस आकाशवाणीच्याच घोषणेत समाप्त होतो. एक शहाणी रात्र उमललेली असते.. दोघांना कवेत घेण्यासाठी!

(‘अनुभव’- उत्तरार्ध)