मीना वैशंपायन

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला आता सात दशकांहून अधिक काळ लोटला आहे. भारताला राष्ट्र म्हणून स्वतंत्र अस्तित्व मिळालं आणि त्याचबरोबर एक लोकशाही राष्ट्र म्हणूनही त्याचा उदय झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा परदेशातील अनेक पत्रकारांनी, राजकीय अभ्यासकांनी असं भाकीत वर्तवलं होतं, की भारताची अफाट लोकसंख्या, बहुविध जाती-जमाती, अनेक भाषा, भिन्न धर्म आणि मोठय़ा प्रमाणावर असणारी निरक्षरता यामुळे लोकशाही स्वीकारणारा भारत लवकरच कोलमडेल. परंतु आज सत्तर वष्रे तो या सगळ्या भिन्नतेसह टिकून आहे. निवडणूक प्रक्रियेत त्रुटी आहेत, चुका होत आहेत, तरीही आजपर्यंत भारतातील लोकशाही टिकून आहे. भारतीय समाजाने या मंडळींची भाकिते खोटी ठरवली आहेत. हा चमत्कार कसा झाला, याचं कुतूहल सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक रामचंद्र गुहा यांना वाटत राहिलं. जगाच्या नकाशावर भारत ठसठशीतपणे अनेक बाबतींत लक्षवेधी कसा ठरला आहे, याचाही विचार करावासा त्यांना वाटतो आहे. या आधुनिक भारताचं वेगळेपण कशात आहे? येथील राजकीय परंपरा कशी आहे? भारत देश घडवणाऱ्या शिल्पकारांच्या राष्ट्रघडणीबाबत कोणत्या संकल्पना होत्या? भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत कितीतरी बाबतीत एकमेव म्हणावा असा आहे, तो का? याची कारणं शोधताना आधुनिक भारताची जडणघडण करणाऱ्या शिल्पकारांचा त्यांनी विचार केला. ते निष्कर्ष आणि त्याबाबतची आपली मते त्यांनी ग्रंथबद्ध करत आपल्यासमोर मांडली.

त्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा शारदा साठे यांनी केलेला नेटका मराठी अनुवाद म्हणजे ‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’! आधुनिक भारताच्या शिल्पकारांपकी १९ जणांच्या प्रयत्नांचा, विचारांचा, त्यांनी भारतीय समाजाला दिलेल्या योगदानाचा परिचय वाचकांना करून द्यावा आणि अधिक वाचनासाठी त्यांना दिशा दाखवावी, हा हेतू लेखकाने मनाशी ठेवला आहे. तो हेतू साध्य व्हावा यासाठी पुस्तकाची मांडणी वेगळ्या प्रकारे केलेली दिसते. एकूण पाच मुख्य भाग, त्या प्रत्येक भागासाठी आणि त्यातील विचारवंतांसाठी प्रास्ताविक, शिवाय उपोद्घात व उपसंहार अशी विभागणी, या विचारवंतांचे कर्तृत्व, त्यांच्या समग्र लेखनातील वेचक, महत्त्वपूर्ण उतारे असा क्रम आहे. लेखकाने मांडलेली निरीक्षणे आपले कुतूहल वाढवतात.

उपोद्घातात भारताचे निरनिराळ्या बाबींमधील  वेगळेपण सांगताना लेखक म्हणतात, ‘इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात कार्यप्रवण विचारवंतांची परंपरा प्रदीर्घ काळापासून आहे. दुसरं म्हणजे भारतीय राजकीय परंपरेत बहुविध विचारवंतांची रेलचेल आहे. याचा अर्थ असा, की अगदी गांधी-नेहरूंचा शब्द हा अंतिम असं कधीही मानलं गेलं नाही. त्यांचे जेवढे अनुयायी, तेवढेच विरोधक होते. याउलट, माओ-लेनिन यांना अखेरचा शब्द असणाऱ्या ‘अवलियाचं स्थान’ त्यांच्या त्यांच्या देशात मिळालेलं दिसतं. तिसरं कारण म्हणजे या पूर्वसुरींची सयुक्तिकता आजही कमी झालेली नाही. त्यांनी केलेला वैचारिक ऊहापोह वर्तमानातील प्रश्नांसाठीही सयुक्तिक ठरतो.’ ज्यांचे विचार आजही समाजात प्रभावी ठरत आहेत अशाच विचारवंतांची निवड लेखकाने केलेली आहे.

विचारवंतांची ही निवड सर्वानाच सर्वस्वी मान्य होईल असे नाही. परंतु त्या निवडीमागचे आपले निकष निष्पक्षपातीपणे लेखकाने स्पष्ट केले आहेत. याचबरोबर भारतात एकाच वेळी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत कसे मूलभूत बदल घडत होते आणि सामाजिक क्रांतीची प्रक्रिया अजूनही कशी चालूच आहे, हे सांगून आजच्या जगात भारत कुठे आहे, याचीही जाणीव लेखक करून देतात.

एखाद्या राष्ट्राची जडणघडण होताना काही गोष्टींना परिस्थितीनुसार आकार येतो, तर तेथील नेते राष्ट्रहितासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक घडवण्याचा आग्रह धरतात. स्वातंत्र्य चळवळीत, त्या- त्या काळातील राजकीय प्रक्रियेत भाग घेणाऱ्या आपल्या नेत्यांपकी जवळजवळ प्रत्येकाजवळ राष्ट्रउभारणीसाठीच्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या. त्यांनी गांभीर्याने गुणवत्तापूर्ण आणि विपुल लेखन केले आणि ते सगळेच लोकशाहीचे पुरस्कर्ते होते.

‘भारतीय मनोदर्शन’ या पहिल्या भागात राजा राममोहन रॉय या पहिल्या उदारमतवादी विचारवंताच्या विचारांची झलक दाखवणारे उतारे आहेत. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना मदत करणारे, त्यासाठीचा आग्रह धरणारे राममोहन रॉय आधुनिक शिक्षणाच्या गरजेचे प्रतिपादन करतात. स्त्रियांच्या अंगी असणारी गुणवैशिष्टय़े सांगत पुरुषांनी त्यांचा विचार करणे किती आवश्यक आहे, हेही ते सांगतात. परंतु विशेष म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्याविषयीचा त्यांचा लेख आजही कालसुसंगत आहे हे तीव्रतेने जाणवते. त्यातील उपरोध फार लक्षणीय आहे.

‘सुधारक आणि क्रांतिकारक’ या भागात सय्यद अहमद खान, महात्मा जोतिराव फुले, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आणि ताराबाई शिंदे यांचा समावेश आहे. या भागातील विचारवंतांच्या विचारांत थेट वाद-संवाद होता. ताराबाई शिंदे यांचा भर स्त्रियांचे समाजातील स्थान उंचावण्यावर होता, तर फुले यांना समाजातील खालच्या थरातील लोकांच्या उद्धाराची कळकळ होती. सय्यद अहमद खान हे पहिले मुस्लीम कार्यकत्रे होते- ज्यांनी मुस्लिमांनी आधुनिक शिक्षण घेतले पाहिजे असा आग्रह धरला होता. अलिगढ मुस्लीम विद्यापीठ ही त्यांचीच निर्मिती आहे. या सर्वाच्या भिन्न भिन्न स्तरांवरील प्रयत्नांतून एकूण भारतीयांना देशात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, हाच विचार पुढे येत होता.

‘राष्ट्राची जोपासना’ या महत्त्वपूर्ण भागात अर्थातच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, महंमद अली जीना, तामिळनाडूतील ‘क्रांतिकारक सुधारक’ ई. व्ही. रामसामी पेरियार, ‘समाजवादी स्त्रीवादी’ कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा समावेश होतो. गांधीजींनी टिळक-गोखले यांच्या विचारांना घासूनपुसून नवे रूप दिले आणि त्या काळाला अनुरूप असा व्यापक राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला, हे सांगून लेखक दाखवतात, की या सर्वच विचारवंतांनी गांधींना विरोध केला, तर कधी त्या विचारांना व्यापक रूप दिले. मात्र, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधीजी हेच त्यांच्या प्रतिपादनाचा आधार होते.

‘लोकशाहीची चर्चा’ या चौथ्या भागात पं. जवाहरलाल नेहरू, पुन्हा डॉ. आंबेडकर (येथे संविधानविषयक विचारांबद्दल), ‘हिंदू श्रेष्ठत्वाचे समर्थक’ गोळवलकर, ‘तळागाळातील समाजवादी’ जयप्रकाश नारायण, ‘या मातीतील समाजवादी’ राममनोहर लोहिया, ‘गांधीवादी उदारमतवादी’ चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि ‘आदिवासींचा रक्षणकर्ता’ व्हेरियर एल्विन यांचा समावेश आहे. या भागातील बरेच जण गांधीजींचेच अनुयायी होते. मात्र, त्यांच्या संकल्पनांना आपापल्या प्रवृत्तींप्रमाणे त्यांनी वळवले.. वाकवले. गोळवलकरांचा अर्थातच नेहरूंना पूर्णपणे विरोध होता. एल्विनच्या यातील समावेशाबद्दल मतभेद असू शकतो; पण आदिवासींच्या प्रश्नांबद्दल तोच जाहीरपणे बोलत होता.

‘ एका परंपरेचा पुनरुच्चार’ या भागात ‘शेवटचा आधुनिकतावादी’ म्हणून हमीद दलवाईंचा समावेश आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांची मात्र येथे अनुपस्थिती आहे. सर्वच विचारवंतांच्या साहित्यातील अत्यंत मौलिक उतारे फार काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. यातील अनेक नावेदेखील आज अनेकांना माहीत नसतील. वैचारिकतेतही पुस्तकाची वाचनीयता टिकली आहे, हे विशेष! अनेक संदर्भ, तळटीपा, संदर्भग्रंथ सूची इत्यादी उपयुक्त माहिती दिल्याने पुस्तकाचे मोल वाढले आहे.

‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’

– रामचंद्र गुहा, अनुवाद- शारदा साठे,

रोहन प्रकाशन,

पृष्ठे- ५९५, मूल्य-  ८०० रुपये.

meenaulhas@gmail.com