News Flash

रफ स्केचेस् : हवेहवेसे भास

सिंहगडावर पावसात भिजायला जाणारे आम्ही दोन-चार मित्र होतो. अंतुरकरकडे लॅम्ब्रेटा स्कूटर होती

(संग्रहित छायाचित्र)

सुभाष अवचट

रेखाचित्र : अन्वर हुसेन

सिंहगडावर पावसात भिजायला जाणारे आम्ही दोन-चार मित्र होतो. अंतुरकरकडे लॅम्ब्रेटा स्कूटर होती. म्हात्रेकडे एक जुनी जावा होती. फग्र्युसन कॉलेज रोडवरील अमृततुल्यच्या कट्टय़ावर आम्ही बसलो होतो. तुरळक पाऊस होता. म्हात्रे तोंडातल्या तोंडात बोलायचा. तो म्हणाला, ‘‘महाबळेश्वरला तुफान पाऊस पडतोय!’’

बस्स! एवढय़ावर दुसऱ्या दिवशी आम्ही पावसाच्या शोधात निघालो. ही आमची पहिलीच ट्रिप. काहीही प्लॅनिंग न करतानाची! एकच माहिती होती : तेथे श्रेयस हॉटेलचे मॅनेजर रोडे होते. ते भिकारदास मारुतीपाशी राहायचे. खरे तर ते बडोद्याचे! एका छोटय़ा ओळखीच्या भरवशावर आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. आणि मग ढगांचा खेळ सुरू झाला. मधेच पावसाच्या दाट सरी येत-जात राहिल्या. आम्ही ओलेचिंब झालेलो होतो. ढगांच्या धुक्याच्या परीकथेमधील राजपुत्र घोडय़ावर बसून रम्य नगरीच्या शोधात निघावा, असाच तो प्रवास होता. मनात जाम हुरहुर होती.

श्रेयस हॉटेल पेट्रोल पंपापाशीच होते. सारं जग ढगात गुंडाळलेलं. हॉटेल नारळाच्या झावळ्यांनी बंद केलं होतं. एका छोटय़ा झडपेतनं रोडे डोकावले खरे, पण त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहून जे भाव उमटलेले, ते आजही माझ्या लक्षात आहेत. ते मृदू स्वभावाचे होते. त्यांनी आम्हाला दमट टॉवेल दिले, ओले कपडे काढायला लावले आणि ब्लँकेट्स पांघरायला दिली. आम्ही जाम कुडकुडत होतो. त्यांनी गरम कोळशाच्या शेगडय़ा दिल्या. सारं हॉटेल बंदच. आम्ही शेकत बसलो असताना ते म्हणाले, ‘‘असे येत जाऊ नका! एसटीने या.’’ समोरच एसटी स्टॅण्ड आहे. खरं तर आम्हाला काही कळत नव्हतं. पुढे काय आहे, याचा अंदाज येत नव्हता. जेवून आम्ही गाढ झोपलो. रोडय़ांनी आम्हाला उठवलं तेव्हा सकाळ झाली असं वाटलं. त्यांच्या हातात पेटलेली उदबत्ती होती. त्यांनी आम्हाला उभं केलं. डॉक्टरसारखं तपासलं. म्हात्रेच्या पायावर दोन जळवा चिकटल्या होत्या. त्यांनी उदबत्तीचा डाग देऊन त्या बाहेर काढल्या. अर्थातच त्यांनी आम्हाला बाहेर जाऊ दिलं नाही. बाहेरच्या पांढऱ्या पडद्याकडे पाहत आम्ही दोन दिवस काढले खरे; आणि पुण्याला परतलो. त्या ढगांतल्या गावामध्ये काहीतरी विलक्षण दडले आहे, आता येथे परत यायचेच आहे, हा विचार पक्का झाला होता, तेव्हा आम्ही कॉलेजच्या सेकंड ईयरला होतो.

पावसाळे आले, गेले. पुढच्या काही वर्षांत माझा मित्र अंतुरकर अपघातात गेला. म्हात्रेही कोठेतरी परगावी गेला आणि पावसावर प्रेम करणारी आमची टोळी विस्कटून गेली. बराच काळ लोटला. मीही बिझी झालो. माझा स्टुडिओही सुरू झाला. स्टुडिओमध्ये काम करताना मधूनच मनात महाबळेश्वरचे पांढुरके ढग तरंगत असत. एकदा मी पेंटिंग करीत होतो आणि सारं चित्र मातकट झालं. म्हंजे मी स्टॅग्नंट झालो होतो. तेच ते! हे रूटिन त्रासदायक होतं. अशा वेळी चित्र उलटं ठेवायचं आणि तडक प्रवासाला निघायचं. मी गाडी काढली. म्युझिक ऑन केलं आणि महाबळेश्वरला निघालो. बाहेर पाऊस होता. गाडीचे वायपर्स फिरत होते. एकटं गाडी चालवताना तुमची स्वत:ची एक स्पेस असते. खरं तर मला पेंटिंग, स्टुडिओ, स्वत:पासूनच दूर जायचं होतं. या प्रवासात नकळत लय सापडत जाते. मनातल्या गचपणातून मोकळीक मिळायला लागते. जसे आपण वाईच्या रस्त्यावर लागतो तेव्हापासूनच मन सैल होत जातं. रस्त्यावरची वडाची झाडं, संपन्न शेतं, पलीकडच्या ढगांचा तरंगता पुंजका तोलत उभ्या असलेल्या टेकडय़ा, त्यामागच्या मिसळत गेलेल्या डोंगररांगा.. हे सारं वाईपासून वळताना मी उजवीकडे बघतो. वाईच्या आठवणी अलौकिक आहेत. प्राचीन, ज्ञानी गाव आहे ते. त्याबद्दल मी पुन्हा कधीतरी लिहीन.

पांचगणीत ढगांची विरळ चादर असते. धोम धरणाच्या पाण्यावर ती तरंगत असते. अधूनमधून वाऱ्यानं विस्कटली की मधूनच पाण्याचे चकाकते तुकडे खोलवर दिसतात. दुतर्फा उंच झाडांतून माझी गाडी जशी पुढे जाते तेव्हा हिरमुजी रंगातल्या बंद शाळा, त्यांची फाटकं, जुने ब्रिटिशकालीन टुमदार पोस्ट ऑफिस मागे पडते. कोपऱ्यावरच्या बेकरीची दारं किंचित उघडी असतात. जुन्या लायब्ररीच्या समोर एखादं गाढव पावसात निथळत स्थितप्रज्ञ उभं असतं. कानटोप्या घातलेली दोन-चार माणसं सोडली तर पांचगणी निर्मनुष्यच असतं. हे गाव मला आर्टिक्यूलट वाटतं. पारशी लोकांची रेखीव अग्यारी, डाव्या-उजव्या निमुळत्या गल्ल्या धुक्यात अस्पष्ट असतात. त्यावेळी कोणतेही पुतळे रस्त्यात नसतात. रस्ता अडवून गोंधळात उभे असलेले आठवडी बाजारही नसतात. सॅब ग्रीन, ब्राऊन रंगाच्या छटांत हे लहान मुलांच्या शाळांचं गाव लगेच संपतं.

इथून पुढं दृश्य बदलतं. दाट धुक्यावर गाडीच्या दिव्यांचे अ‍ॅबस्ट्रॅक्ट खेळ सुरू होतात. अचानक काळी-पिवळी वाई-महाबळेश्वर सवारी करणारी टमटम झटकन जाते तेव्हा जीव मुठीत धरावा लागतो. उजव्या बाजूला खूप खोल दरी असावी.. तळाशी छोटय़ा वस्त्या असाव्यात.. कोसळणारे धबधबे असावेत.. पण हे सारे मनाचे खेळ असतात. सारं धुरकट वातावरण असतं. मी गावात कधी पोचतो हे कळतही नाही. वेणा लेक दिसत नाही.

..तर त्या दिवशी महाबळेश्वरमधली सारी हॉटेल्स बंद होती. तुटपुंज्या माहितीवर मी ‘दिना’ हॉटेलला पोहोचलो. मला पहिल्या भेटीतच ते आवडलं. आपलं वाटलं. तेथे पहिल्यांदा हरमोज भेटला. तो ‘दिना’चा मालक. हा देखणा.. ऋषी कपूर! हसतमुख होता. त्यानं मला एक नंबरची रूम दिली. जुना कार्विग केलेला डबल बेड, कार्विग केलेलं मोठं कपाट, जुन्या आरामदायी खुर्च्या, मोठ्ठं बाथरूम, उंच छत, भिंतीवरचे बेल्जम ग्लासचे दिवे, छतावरून आलेली देखणी यलो रंगाची हंडी! मला जे आवडतं ते तिथं होतं. रूमच्या बाहेरचा व्हरांडा! त्याला लागून धुक्यात उघडणाऱ्या तृप्त, शोभिवंत सागवानी खिडक्या! मी कधी झोपून गेलो ते कळलंच नाही. शांत, गुरफटलेली झोप होती ती!

दारावरच्या टकटकीने मी उठून व्हरांडय़ामध्ये आलो. बाहेर म्हातारासा वेटर उभा होता. तो म्हणाला, ‘‘चहा, बिस्किटं ठेवली आहेत!’’

संगमरवरी छोटय़ा टेबलावर टी-कोझी, पांढरे कप आणि सिरॅमिकच्या प्लेटमध्ये बिस्किट्स होती. मी खिडकी उघडली. बाहेर तसाच ढगांचा पडदा होता. वेळ किती झालाय, हे कळलं नाही. त्या लाकडी व्हरांडय़ांत मी पाहिलं. सहा नंबरच्या रूमबाहेर कुणी देखणी व्यक्ती बसलेली होती. शाल पांघरलेली. हातात जाडसं पुस्तक होतं. पण सारं धूसरच होतं. मी खुर्चीत बसून खिडकीबाहेर पाहू लागलो. सारं विरळ होत निघालं होतं. चित्रं, स्टुडिओ, स्वत:ची ओळख! स्ट्रेंज!

मला कल्पना नव्हती, की पुढची ४०-५० वर्ष मी ‘दिना’ आणि त्या महाबळेश्वर फॅमिलीचा एक सदस्य बनणार आहे. हरमोजचं घरातलं लाडकं नाव- बाबा! या हॉटेलने आता शंभरी पार केली आहे. हरमोजच्या पणजोबानं त्याकाळी ते बांधलं. जांभा दगड आणि सागवानी लाकडाचा वापर करून स्थानिक कामगारांनी ते बांधलं. बाबाची आजी अलमाई. तिला डायनिंग हॉलमधल्या पहिल्या टेबलावर बसून जेवताना मी पाहिलीय. बाबाचं घर हॉटेलला जोडूनच पाठी आहे. समोर बाग आहे. अधूनमधून मी हिवाळ्यात आलो असता ती खुर्चीत उन्हात बसलेली दिसायची. तिच्या पायाशी ल्युसी नावाची जर्मन शेफर्ड कुत्रीदेखील असायची. शंभर वर्षांपूर्वी हे गाव कसं असेल? तिथला गर्द पाऊस कसा असेल? जंगल, पक्षी कसे असतील याची कल्पना करताना मी हरवून जात असे.

एका पावसाळ्यात बाबानं मला छत्री दिली. मी रबरी बूट आणलेच होते. तो म्हणाला, ‘‘कुठलेही पॉइन्टस् पहायला जाऊ नकोस! गाडी जाणार नाही. सारे डेंजरस् असते.’’ मी म्हणालो, ‘‘मला पॉइन्टस् अजिबात पहायचे नाहीत. इथे मला बसून पाऊस एक्सप्लोअर करायचा आहे!’’ तो हसला आणि म्हणाला, ‘‘संध्याकाळी व्हिस्की माझ्याबरोबर.’’

एका वेळेला (ही सकाळ, दुपार की संध्याकाळ?) मी बाहेर पडलो. चढ चढून बाजारापाशी आलो. कुठला तरी रस्ता पकडला. दुतर्फा झाडांवर, कंपाऊंडवर शेवाळं चढलेलं होतं. त्याचा ओला वास पसरलेला जाणवत होता.

समोरच्या धुक्यातून अचानक पक्ष्याची शीळ ऐकू यायची. डोक्यावर कांबळी घेऊन येणाऱ्या स्त्रिया म्हणजे काळा ठिपका! धुक्यातून त्या माझ्यापर्यंत यायच्या. सारं गाव नारळाच्या झावळ्यांनी बंद केलेलं होतं. त्यांचे आकार त्यामुळे पावसातल्या सरींमध्ये जी. ए. कुलकर्णीच्या गूढकथेमधले भासायचे. तेव्हा ब्ल्यू प्लॅस्टिकची एन्ट्री या गावात झाली नव्हती. त्यामुळे तो भकास रंग त्या वातावरणाला चिरत जात नव्हता. अचानक मोठी सर यायची. छत्रीवर धारांचा संथ आवाज यायचा. रस्त्याकडेने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज.. वाढलेली फर्न्‍स!

बहुधा मी बाजारपेठेत होतो. कोणती तरी आकृती दिसली. त्या ग्रे निवसर वातावरणात पिवळ्या प्रकाशाच्या उबदार रेघा हलत होत्या. जवळ गेलो तेव्हा दिसलं की तो टी-स्टॉल होता. त्याच्या बाहेर पावसात ओलीचिंब गाय उभी होती. त्या पत्र्याच्या छोटय़ा स्टॉलच्या आडव्या लाकडावर छत्र्या टांगलेल्या होत्या. त्यात दाटीवाटीने दाढय़ा वाढलेले गावकरी मित्र बसलेले होते. स्टोवर चहाचं भांडं होतं. स्टोच्या पिवळ्या प्रकाशात गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर सावली-प्रकाशाचा खेळ सुरू होता. चहाच्या भांडय़ातल्या वाफा, उबदार वातावरण, पसरलेला प्रकाश! मला तो प्रकाश रेब्रांच्या पेंटिंगमधला वाटला. आता हे पेंटिंग करणे आलेच. ते एक मी केले. पुढे त्याची सीरिज करायची होती. ती या गावातल्या वेळेसारखीच अधांतरी राहिली.

मी बाबाला विचारलं, ‘‘सहा नंबरच्या खोलीबाहेर दर पावसाळ्यात कोण बसतो?’’

‘‘शशी कपूर!’’ तो म्हणाला.

‘‘अरे! मी त्याला छान ओळखतो!’’

‘‘ नको! आम्ही कोणी त्याला डिस्टर्ब करीत नाहीत.’’

मीही केले नाही. डायनिंग हॉलमध्ये जेवताना तो दिसायचा. एकटा. सिनेमासारख्या ग्लॅमरपासून दूर येऊन हा नट इथे बसतो याचं कुतूहल मला होतं. एव्हाना बाबाचं लग्न होऊन त्याला मुलगीही झाली होती. तिचं नाव- निलोफर. निलोफरच्या नवज्योतला बाबाचं निमंत्रण होतं. फार सुंदर प्रोग्राम त्याने ‘दिना’वर ठेवला होता. सारे ‘दिना’  फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजलं होतं. पारशी फूडची मेजवानी होती. तिथे शशी कपूरही होता. समोरच्या बागेत आम्ही प्रथमच एकमेकांसमोर उन्हात बसलो होतो आणि मग थोडय़ाफार गप्पांना सुरुवात झाली. त्याच्या ‘बंद होठ’ नावाच्या, प्रदर्शित न झालेल्या एका चित्रपटासाठी मी काम केलं होतं. कपूर घराण्याची माझी ओळख होतीच. पण त्या गप्पा तिथेच थांबल्या. पुढच्या पावसाळ्यात नियमानं आम्ही ‘दिना’मध्येच होतो. एका संध्याकाळी मी व्हरांडय़ात पावसाच्या साक्षीने व्हिस्की घेत बसलेलो असताना तो शाल पांघरत माझ्यापाशी येऊन बसला. त्याने बहुधा मद्यपान सोडलं होतं. थोडय़ाफार गप्पा झाल्या खऱ्या; पण तो एकटक पावसाकडेच पाहत होता. तो उठताना म्हणाला, ‘‘उद्या एक चक्कर मारून येऊ या!’’

दुसऱ्या दिवशी मी आणि तो गाडी काढून पावसात भलीमोठी चक्कर मारून आलो. त्याला काहीतरी सांगावंसं वाटत होतं, पण तो शांत होता. सारं काही त्याच्या निळ्या डोळ्यांत साठलं होतं. तो स्थूल झाला होता. त्याच्या हालचालीही मंद झाल्या होत्या. ‘दिना’त परतल्यावर माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाला, ‘‘सुभाष, एंजॉइड अ लॉट!’’ ती माझी शेवटची भेट. तो गेला तेव्हा ‘माझा मान्सून दोस्त’ नावाचा सविस्तर लेख मी लिहिला होता.

‘दिना’मध्ये व्हरांडय़ात मी तासन् तास समोरच्या ढगांच्या पांढऱ्या पडद्याकडे अनेक वर्ष पाहत बसलो आहे. इथे काहीही घडत नाही. पलीकडच्या ढगांत गुंतलेल्या त्या छोटय़ा गावातही काही घडणार नाही. कुठल्याही पॉइंटला जायची मला इच्छा झाली नाही. नव्हे, मला पाहायचे नाही. मला ते पुरवून पुरवून सांभाळायचं आहे. इथे मनातले विचार धुक्यासारखे विरळ होत जातात. एक अनिश्चित क्रम त्यात असतो. सारा वेळ यावेळी अधांतरी असतो. वेळापत्रक दमट झालेलं असतं.

लहान असताना ओतूरवर सारे ढग दाटायचे तेव्हा मी माझी आई- इंदूताईला म्हणायचो, ‘‘सारं गाव घोंगडीखाली लपलंय!’’ त्यावर ती म्हणायची, ‘‘जा, छपरावर जाऊन सारं गाव बघून ये!’’

सारं गाव सुंदर वाटायचं. मोठे वाडे एकमेकांत एकत्र मिसळून छोटे वाटायचे. चौकात पत्र्यांवरून पावसाच्या धारा पडायच्या. समोरच्या विटांच्या ओल्या भिंतींत कोनाडय़ात चिमण्या माना वळून बघत असायच्या. पत्र्यावरचा वाजणारा पाऊस.. विजांचा कडकडाट.. सारा वाडा या आवाजात भरून राहायचा. शंभर ऋषी मंत्रोच्चार करताहेत असा भास व्हायचा. मी झोपाळ्यावर गाढ झोपून जायचो. इंदूताई म्हणे, ‘‘हा पावसाळ्यात

फक्त गाढ झोपतो! कोणाला त्याला झोके द्यावे लागत नाहीत!’’

इथे बसल्यावर अशाच आठवणींच्या सरी येत राहतात. सारा पाऊस अंगीभूत होतो. काही दिवसात माझ्याही अंगाला शेवाळं लागलंय की काय असा भास होतो. ही खरी भासांचीच वेळ असते. सत्य-असत्याची इथे भानगड नाही. गडद होत जातात ढग सारे. ‘दिना’तले मिणमिणते दिवे लागतात. कुठेतरी अस्पष्ट चित्रांचे भास होऊ लागतात. इथे प्रत्यक्ष चित्रं नाहीत. कॅनव्हास हा बाहेरचा धुक्यांचा पडदा आहे. त्यावर मनातल्या विचारांचे अ‍ॅबस्ट्रॅक्ट फॉर्मस् असतात. अशावेळी माझ्या मनात अचानक माझे मित्र रॉय किणीकरांच्या काही ओळी तरळून जातात..

‘आभाळ झिरपते भरलेल्या माठात

अन् निळा माठ बघ भरला आभाळात

आभाळ पलीकडे माठ फुटे इकडे

हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे!’

या तुकडय़ा तुकडय़ांच्या आठवणींचा भरोसा नाही. पसरणीचा घाट उतरल्यावर भपकन् अंगावर उन्हं येतात.. जशी आ वासून माझी रिअ‍ॅलिटी माझ्या अंगावर येते. सारं पावसाचं हे स्वप्न विरून जातं खरं; तरी स्टुडिओपर्यंत हे हवेहवेसे भास मनभर असतात, हेही खरं!

Subhash.awchat @gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:37 am

Web Title: loksatta lokrang rough sketch article by subhash avchat abn 97
Next Stories
1 अरतें ना परतें.. : डाव्या बाजूचं दुखणं
2 मोकळे आकाश.. : कोव्हिडायझेशन
3 अंतर्नाद : प्रार्थनेतील संगीत
Just Now!
X