डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी

पर्यावरण पत्रकारितेमध्ये गेली २० वर्ष कार्यरत असलेले संतोष शिंत्रे सातत्याने पर्यावरणविषयक जाणीवजागृतीचं काम करत आहेत. त्यामुळे ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या त्यांच्या नव्या कथासंग्रहातील सहापैकी चार दीर्घकथा पर्यावरणाशी संबंधित आहेत, हा योगायोग नव्हे. पर्यावरणाच्या प्रश्नांमधली आर्थिक, सामाजिक व राजकीय गुंतागुंत, विकासाची पर्यावरणविन्मुख वाट, उद्योगपती, सरकार आणि वन्यजीव तस्कर यांची अभद्र युती यामुळे व्यथित झालेला हा लेखक त्याच्या कथांमधूनही पर्यावरणविषयक प्रश्न सातत्याने मांडतो आहे. ‘गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक’ या त्यांच्या २०१२ साली आलेल्या संग्रहानंतरचा हा दुसरा संग्रह! मागील सात वर्षांत केवळ सहा कथा ही निर्मितीची गती संथ खरीच, पण या कथांचा ऐवज पाहता हा संथपणा क्षम्य ठरतो. कारण शिंत्रे यांचे कथाविषय वेगळे आहेत आणि या विषयांवरील कथात्म लेखनासाठीही भरपूर अभ्यास आणि संशोधनाची गरज असते.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

काही सत्ये, काही तथ्ये आणि काही कल्पिते यांच्या एकमेळातून या कथा आकाराला आल्या आहेत. ‘नारकोंडम, रडार आणि निळावंती’, ‘खेळ तोवरी हा चालेल’, ‘द ग्रेट इंडियन डोप ट्रीक’ आणि ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या कथांची आशयसूत्रे थेटपणे पर्यावरणाशी संबंधित आहेत. ‘हिज इम्पोस्टर्स व्हॉइस’ ही कथा बालगंधर्वाच्या तोतयाच्या शोधाची आहे आणि ‘फेथ इज द बर्ड’ ही कथा पुरंदर किल्ल्यावरून ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेतून तीन जर्मन नागरिकांनी केलेल्या असफल पलायनाची आहे.

अंदमान द्वीपसमूहाजवळच्या नारकोंडम या छोटय़ाशा बेटावर रडार बसवल्यामुळे, तेथील हॉर्नबिल पक्ष्यांची दुर्मीळ प्रजाती व त्यांचा अधिवास नष्ट होण्याचा धोका उद्भवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सव्यसाची मोहापात्रा या तज्ज्ञ पर्यावरण अभ्यासकावर सर्वमान्य उपाय सुचविण्याची जबाबदारी न्यायालयाने सोपवली आहे. सव्यसाची व त्याचा तरुण सहकारी भार्गव शेलाट नारकोंडमला पोहोचतात. त्यानंतर पुढील दोन दिवसांत त्या छोटय़ा बेटावर जे घडतं, त्याची ही कथा. माणसं नि त्यांच्या महत्त्वाकांक्षांचं आणि त्यांच्या गाभ्यातील विवेकाचं दर्शन या कथेत घडतं.

भार्गवसारखा तरुण व उत्साही निसर्गर्-अभ्यासक, सव्यसाचीसारखा मुत्सद्दी पॅनल एक्स्पर्ट एका बाजूला आणि सेल्वराजसारखा महत्त्वाकांक्षी, पण प्रामाणिक सरकारी अधिकारी दुसऱ्या बाजूला. इथे अटीतटीच्या सामन्याची पाश्र्वभूमी तयार होते. माणूस म्हणून तिघेही त्यांच्या कामावर प्रेम करणारे आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे चर्चा, संवादाच्या पातळीवर येतात नि दोन्ही पक्षांतले भिडू सगळ्याच प्रश्नांचा विचार ‘आपले प्रश्न’ म्हणून  केला जावा, हे मान्य करतात.

‘खेळ तोवरी हा चालेल’ आणि ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या कथा वन्यजीवांच्या तस्करीशी संबंधित आहेत. वन्यजीवांची तस्करी करणारं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मोठं जाळं बारीकसारीक धागे जुळवत उघडकीला कसं आणलं, याची हकिगत म्हणजे ही कथा. वरकरणी ही कथा रहस्यकथेच्या वाटेनं जाणारी वाटते, पण लेखक  सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा घटितांमागील विचार आणि कृती अधोरेखित करतो.

‘द ग्रेट इंडियन डोप ट्रीक’ या कथेत बेसुमार जंगलतोड, विस्थापित वनजीवन आणि त्यावर आधारलेला आभासी विकास यांमुळे व्यथित झालेला एक सच्चा पर्यावरणवादी, खंतावलेल्या मन:स्थितीतून मनुष्यवधासारख्या कृत्याला प्रवृत्त होतो. त्यासाठी त्याचे वनस्पतिशास्त्राचे ज्ञान तो उपयोगात आणतो. अखेरीस सरनकुमार – त्याचे गुरु गौरकिशोर बंदोपाध्याय यांचेही समर्थन मिळवतो आणि काही काळापुरता तरी पर्यावरणाचा विनाश रोखून धरतो.

‘मनेर मानुषेर इंद्रजाल’मधला चकोर घटक हा मूळचा सुंदरबनचा रहिवासी! रस्त्यावर जादूचे खेळ करून पोट भरणारा. त्याला अचानक वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या किट्ट बहेलियाकडून डिलिव्हरी पॉइंट म्हणून काम करण्याची आणि त्यातून भरपूर कमाई करण्याची संधी मिळते. तो काही काळ या संभाव्य संपत्तीच्या मोहातही पडतो. पण त्याच्यातला ‘मनेर मानुष’(मनातला माणूस) जागा असतो. तो त्याला अशा मार्गाने श्रीमंत होण्यापासून परावृत्त करतो. हे सारं कसं घडतं त्याची ही कथा.

‘फेथ इज द बर्ड’ ही दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवरची पुरंदर किल्ल्यावर घडलेल्या एका घटनेवर आधारित कथा. युद्ध सुरू झाल्यावर भारतात असलेल्या जर्मन नागरिकांना ब्रिटिश सरकारनं जर्मनीला जायला अटकाव केला. त्यांचे पासपोर्ट काढून घेऊन त्यांना पुरंदर किल्ल्यावर स्थानबद्धतेत ठेवलं. त्यापैकी तीन जण पलायनाचा प्रयत्न करतात, पण तो असफल ठरतो. हा पलायनाचा प्रसंग व त्याची पाश्र्वभूमी रंगवताना, लेखकाने माणसाच्या मूलभूत स्वभावविशेषांवर प्रकाश टाकला आहे. अनेक बारकाव्यांमुळे ही कथा उत्कंठावर्धक झाली आहे. विचारवंत, बुद्धिवंत आणि संशोधक अशी तीन माणसं हे वेडं धाडस करायला प्रवृत्त होतात. त्यामागच्या प्रेरणेचाही आदर वाटावा अशी या कथेची रचना आहे.

बालगंधर्वाच्या नावानं गाणारा कुणीएक अनंत बडोदेकर नावाचा तोतया होऊन गेला, या घटनेवर आधारित ‘हिज इम्पोस्टर्स व्हॉइस’ हीदेखील एक आगळीवेगळी कथा. हा इम्पोस्टर कसा शोधला जातो, याचे धागेदोरे पार लंडनपर्यंत कसे जाऊन पोहोचतात आणि अखेरीस तोतयाचा लागलेला शोध हे अस्सल तपशिलांची जुळणी करत रचलेलं भन्नाट कथानक आहे.

अनवट विषयांबरोबरच वातावरणनिर्मिती हे शिंत्रे यांच्या कथांचं बलस्थान आहे. वनस्पती- प्राणी- पक्षी सृष्टी, भौगोलिक वैशिष्टय़े, जादू- भारतीय इंद्रजाल विद्या, भारतीय गुप्तचर संस्थेची कार्यपद्धती, स्वातंत्र्यपूर्व भारतातील रेकॉìडग कंपन्यांचा कारभार, महायुद्ध काळातील घटना आणि त्यांचे अस्सल तपशील, वन्यजीव आणि अवयव तस्करीसंबंधीचे कायदे, इ. क्षेत्रांचा अभ्यास या कथांमध्ये मुरवला गेला आहे. तांत्रिक माहिती अतिशय रंजकपणे देणं, हे या कथांचं आणखी एक वैशिष्टय़. खलनायकाच्या कारवाया भडकपणे रंगवण्यापेक्षा सकारात्मक कृती आणि त्या कृतीसाठी आवश्यक अशी पात्रांची मनोभूमी तयार करणं, लेखकाला महत्त्वाचं वाटतं.

शिंत्रे यांच्या कथारचना हे एक बांधकाम आहे. चुस्तपणे व एका निश्चित उद्देशानं होणारं, पण म्हणून ते कृत्रिम नाही. पर्यावरणाचा विचार या कथारचनांमधून प्रभावीपणे मांडला जातो.

या कथांमध्ये सहसा तृतीयपुरुषी निवेदकाची योजना लेखकाने केली आहे आणि हा निवेदक मुख्य पात्राशी समरस झालेला आहे. कथांमध्ये कधी दोन ठिकाणी व दोन भिन्न काळात घडणारे प्रसंग एकाआड एक गुंफत त्यांची रचना साकारते, तर कधी कथानक फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडत जाते.

‘रेम्याडोक्या’, ‘चपडगंजू’, ‘उटंटळपणा’ असे बोली भाषेतले शब्द जसे ते वापरतात तसंच ‘ज्ञानशांत डोळे’ किंवा ‘आनंददायी नष्कम्र्य’ असे शब्दही क्वचित, पण सहजपणे वापरतात. भाषेचे फुलोरे फुलवण्याचा या लेखकाचा पिंड नाही, पण क्व चित कधी प्रतिमांचं उपयोजन यात केलेलं आहे. यातील कथांची शीर्षकं काव्यात्मक (मात्र सहापैकी तीन इंग्रजी आणि एक बंगाली!) आहेत. तसंच संग्रहाचं मुखपृष्ठ हिरव्या रंगाचा मनमुराद वापर असलेलं आणि आशयाचा तोल राखणारं आहे. अतिशय पोटतिडकीने पर्यावरणासंबंधी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आवर्जून वाचावा असा आहे.

‘मनेर मानुषेर इंद्रजाल’

– संतोष शिंत्रे,

अभिजीत प्रकाशन,

पृष्ठे – १५१, मूल्य –  २०० रुपये