News Flash

फायटिंग

अरिनचा वाढदिवस जवळ आला तसं त्याला आनंदाऐवजी भीतीच वाटायला लागली होती.

|| डॉ. आशुतोष जावडेकर

अरिनचा वाढदिवस जवळ आला तसं त्याला आनंदाऐवजी भीतीच वाटायला लागली होती. त्याच्या रूममेटच्या- अस्मितच्या वाढदिवसाला सगळ्यांनी त्याला कसं धुतलं होतं हे त्याला आठवत होतं. एकाने त्याला भिंतीकडे पाठ करून उभं केलं, धरून ठेवलं आणि मग सगळ्यांनी बाविसावा वाढदिवस म्हणून बावीस लाथा त्याच्या पेकाटात हाणलेल्या. अरिनला हे भयानक वाटलं होतं. एकतर त्याच्या पाल्र्यामध्ये त्याचे कुणीही दोस्त असलं काही करत नसत वाढदिवसाला. मस्त खायचं, ड्रिंक्स आणि मग मित्र-मत्रिणींसोबत पबमधे नाचायचं भन्नाट. हा धांगडिधगा, हुल्लडबाजी त्याला अपरिचित होती.

पण या खेपेस वाढदिवसाला नेमका तो इथे होता. त्यात त्याने नुकताच नेमका तो व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिलेला आणि ‘विशी.. तिशी.. चाळीशी..’ ग्रुपवर टाकलेला.

रात्री रेळेकाका आणि तेजस सोसायटीच्या बागेत बाकडय़ावर बसून पान खात होते तेव्हा सहज तेजसने तो उघडला, रेळेकाकांना दाखवला आणि ते दोघे हतबुद्ध झाले. आयआयएम कॉलेजमधला तो विद्यार्थी. सगळी मुलं त्याला त्याच्या खोलीत घेरत आहेत. शेजारी दोन केक ठेवलेले आहेत. वीसेक मुलं त्या बर्थडे बॉयला खाली जमिनीवर पाडतात आणि त्याच्यावर तुटून पडतात. कुणी कोपराने पोटात, पाठीत मारतंय. कुणी त्वेषाने बुक्के मारतंय. एक पोरगा खटाखट जोरात लाथा मारतोय. दुसरा डोक्याजवळ बेभान होऊन मारतो आहे. पुरुषार्थाचे खोटे अन्वय लावत गेलेली ही विशीची मूर्ख मुलं त्याला सगळीकडून घेरून बदडत आहेत! मग कधीतरी हे नष्टचर्य थांबतं आणि कुणी त्या मुलाला हात देऊन उठवतो..

‘‘साले, वाढदिवस साजरा करत आहेत का खून करताहेत?’’ तेजसने नकळत चढलेल्या आवाजात म्हटलं. रेळेकाकांनी मोबाइलमध्ये खालच्या पोस्टवर बोट ठेवलं. तो मुलगा दुसऱ्या दिवशी उठला ते पोटदुखीची तक्रार घेऊन. इस्पितळात नेलं तर त्यांचं पॅनक्रियाज तुटलेलं. मग त्यावरचं ऑपरेशन करताना तो मुलगा मेलाच.. ते वाचून तर तेजसने ‘भ’च्या सगळ्या शिव्या वापरत त्या पोरांचा उद्धार केला. रेळेकाकांनी तोवर अजून माहिती गुगलवर मिळवली. वीरेंद्र सेहवागने हा व्हिडीओ शेअर करून ‘असं वर्तन करू नका’ असं तरुणांना बजावलेलं. नेटवर अनेकांनी या व्हिडिओचा धिक्कार केलेला. तेजसकडे वळून ते म्हणाले, ‘‘तू कॉलेजात असताना होतं का हे असं?’’

तेजसला आठवलं की ‘बर्थडे बम्प्स’ तेव्हा नवीनच प्रकार होता हॉस्टेलमध्ये. पण त्या लाथा एकूण हलक्या, मस्करीकडे झुकणाऱ्या होत्या. रेळेकाका म्हणाले, ‘‘हिंसक आहे हा व्हिडीओ. या पिढीची रग नीट जिरत नाहीये का? का सध्या जे मारहाणीचे सिनेमे आणि सीरियल्स येतात त्याचा हा परिणाम आहे?’’

तेजस काही बोलला नाही. त्याने रात्री उशिरा काकांना व्हॉट्सअ‍ॅपवर दीर्घ रिप्लाय केला.. ‘‘काका, पुरुष म्हटलं की रग असतेच. खुमखुमीही असते आतूनच फायटिंगची. पण तुम्ही म्हणता आहात ते खरंय. आम्ही क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी खेळायचो. ही अरिनची पिढी ‘पबजी’सारख्या गेम्समध्ये संगणकाच्या पडद्यावर मुडदे पाडते तसं आम्ही काही केलेलं नाही! किंवा कॉलेजवयात आम्ही फायटिंग पाहिली ती साधी सनी देओलची. ‘मिर्झापूर’मध्ये किंवा ‘सेक्रेड गेम्स’मध्ये जसा स्क्रीन अख्खा लालेलाल होतो तसं काही आम्ही त्या वयात पाहिलं नाही. होत असेल याचा काहीतरी परिणाम. नजरच निबर होत असेल. माझ्या पोराच्या शाळेतही वाढदिवसाला पाठीत बुक्क्या मारतात सध्या!’’

काकांनी बेरात्री उत्तर लिहिलं.. ‘‘हिंसा असतेच आत माणसाच्या. हिटलरने का मारलं लाखो ज्यूंना? जर्मनीतल्या कुणालाही त्याविरुद्ध आवाज का उठवावासा वाटला नाही? खूनच चढलेला सगळ्यांना तेव्हा.’’

..तेजसने नंतर ‘विशी-तिशी’ ग्रुपवर एक निषेध खलिता लिहिला. माहीनेही तोवर तो व्हिडीओ पाहिलेला. तिने लिहिलं- ‘‘मुली करत नाहीत बहुदा अजून असं. पण मी ऐकलं आहे की अशा वेळेस त्या शेजारी असल्या तरी शांतपणे बघत उभ्या राहतात. मला तशाही या विशीच्या मुली कळतच नाहीत.. आणि आमच्या ऑफिसमध्ये असं काही नसतं. म्हातारेच झालो आहोत आम्ही पंचविशीच्या पुढचे सगळे जण. वाढदिवसाला केक कापायचा.. एखादी पोस्ट टाकायची.. कामाला लागायचं. बस.’’

तेजसने मग दुसऱ्या दिवशी जागून ‘ऑपरेशन फिनाले’ हा चित्रपट हेडफोन्स कानाला लावून पाहिला. आइशमन या नाझी अधिकाऱ्याचं ते क्रौर्य! खणलेल्या चरात उभी असलेली ती हजार ज्यू माणसे. एक बाई आइशमनकडे बघत आपलं बाळ आशेने उंचावते. तेव्हा तो आइशमन बाहीला लागलेला शाईचा डाग (शाईचा!) पुसण्यात मग्न आहे ! मग बंदुकीच्या फैरी झडतात. निघालेली गोळी त्या बाळाचं डोकं भेदून त्या बाईलाही मारून कुठेतरी गरगरत जाते. कुठला सतान गरगर फिरत असतो अशा वेळी आसमंतात..? तेजसला काही झोप लागेना. तो नेहमी म्हणायचा की- ‘मला मुलगी नाही, मुलगा आहे हे बरं. काही टेन्शन नाही.’ आता त्याला जाणवलं, की या क्रूर जगात आपल्या मुलग्याला मोठं झाल्यावर आपल्याला ढकलायचं आहे! मुलगा काय आणि मुलगी काय! आणि मग एकदम त्याला प्रेमाने ‘तेजसदा’ असं म्हणणारा अरिन त्याच्या डोळ्यापुढे आला आणि मग मोठय़ा भावाने करावा असा काही निर्धार त्याने केला.

आठवडय़ाने जेव्हा अरिनचा वाढदिवस त्याचे कॉलेज मित्र रूमवर येऊन साजरा करणार होते तेव्हा तेजसने गाडी त्याच्या फ्लॅटवर वळवली. अरिनला दारातून हाक मारत त्याने सरप्राइज दिलं तसा अरिनचा चेहरा उजळला. अरिनचे मित्र तोवर आलेले. एक-दोन मत्रिणीही आलेल्या त्याच्या. मागे ‘होली ग्रील’ हे गाणं सुरू होतं. तो ठेका आदिम, पाशवी होता. एकाने जोशात येऊन अरिनला उचलायला घेतलं तसं तेजस म्हणाला, ‘‘वेट! बम्प्सने तो एक पोरगा नुकताच मेलाय हे पाहिलंत ना? नको करायला आपण हे.’’

थोडी कुजबुज झाली. मुलींनी लगेच होकार भरला. काही पोरंही लगेच मागे सरली. पण एक पोरगा म्हणाला, ‘‘काका, आमची स्टाईल आहे पण ही!’’ तेजसने त्याला ‘काका’ म्हणाल्याचं दु:ख आणि राग गिळत म्हटलं, ‘‘ओके.. एक काम करू या. लाथा मारण्याऐवजी आपण ‘वन टू वन बॉक्सिंग’ करू या का? मजा येईल.’’

मागे उभ्या असलेल्या अस्मितने  म्हटलं, ‘‘हे बेस्ट आहे!’’ मग तो मघाचा पोरगा थेट अस्मितच्याच अंगावर धावून गेला आणि फायटिंग सुरू झाली. काही झालं तरी अस्मित गावाकडच्या माती-पाण्यावर वाढलेला दणकट पोरगा होता. बघता बघता त्याने कुस्तीच्या पद्धतीने त्या दुसऱ्या पोराला दमात घेतलं आणि मग हसण्याच्या, टाळ्यांच्या गजरात ती मॅच थांबली. लगेच अजून एक-दोघांनी आपले हात मोकळे करून घेतले. आता काही अरिनला आज इजा होणार नाही हे मनोमन कळून तेजसमधला दादा निवांत झाला आणि मग स्फुरण येऊन त्यानेच थेट अरिनकडे झेप घेत एक उजवीकडून ‘हुक’ लगावला! अरिन एक क्षण गांगरला. पण मग त्यानेही झपाझप बॉक्सिंगच्या मूव्ह केल्या आणि थोडी मारामारी करून दोघे हसत थांबले.

तितक्यात माही हातात फुलं घेऊन आली. तिला दारात उभं बघून तेजस आणि अरिन दोघांनाही आश्चर्य वाटलं. माहीलादेखील एकूण काळजी वाटली होती तर अरिनची! मग तिने फुले त्याच्या हातात दिली. मस्त विश केलं. बाकीची पोरं अरिनच्या या ‘ताई-कम-मत्रिणी’कडे पाहत बसली. आणि मग माहीने एकदम एक ‘राइट अपरकट’ची ठोसा अ‍ॅक्शन करत अरिनकडे वळत  म्हटलं, ‘‘चलो, फिर हो जाये बॉक्सिंग?’’

अरिन आणि तेजस बघतच राहिले!

‘‘अमेरिकेत असताना शिकायचे मी बॉक्सिंग फावल्या वेळात..’’ हसत माहीने म्हटलं आणि मग मागे काहीशा भेदरून उभ्या असलेल्या, नुसत्या नटलेल्या अरिनच्या विशीच्या मत्रिणींकडे तिने एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला.

केक कापला गेला. मेणबत्त्या विझल्या. एक ओंगळ रीत थांबवून दुसरीकडे तरुण रग जिरवल्याचं तेजसला समाधान लाभलं. तोवर रेळेकाकांनी अरिनच्या चिंतेने मेसेज केलेला. तसं त्यांना तेजसने आश्वस्त केलं. मग रेळेकाका शेक्सपीयरला स्मरत चॅटवर म्हणाले, These violent delights have violent ends…

प्रेम आणि हिंसा या एकाच नाण्याच्या दोन बाजूंना तेजसने सावकाश निरखलं आणि मग सगळे वेफर्स खात होते तेव्हा मूठ वळवून घट्ट करत तो नुसताच हवेत क्रॉस आणि हुक मारत राहिला!

ashudentist@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 3:07 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by dr ashutosh javadekar
Next Stories
1 माय-मातीच्या स्मरणाची चित्रलिपी
2 चित्रात्म शैलीतली काव्यात्म कथा
3 स्त्रीजीवनाचे गतकालीन उद्गार
Just Now!
X