|| मकरंद देशपांडे

गुपित काळजात बंद करून जगता येतंच असं नाही. मग काही जण ते एखाद्या मोठय़ा झाडाच्या डोलीत किंवा डोंगराच्या दरीत सांगून टाकतात. असंही ऐकीवात आहे, की डोंगराला म्हणे भोक पाडून त्यात पुटपुटतात आणि डोंगर पृथ्वीवर हयात असेतोवर ती सांभाळून ठेवतो. दुसऱ्यांची गुपितं सांभाळणं हे खूपच मुश्कील काम, त्यातून मानवी गुपित! त्या डोंगराचं विशाल असणंच जणू त्याच्यासाठी घातक ठरतं.

‘स्टेशन पाड’ ही एकांकिका इप्टा (आयपीटीए) आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत डॉ. अनिल बांदिवडेकरांनी दिग्दर्शित केली, मी लिहिली.

ग्रामीण भाषेत पहाडला ‘पाड’ बोललं जातं. म्हणून त्या स्टेशनच नाव ‘पाड’. अशा छोटय़ाशा स्टेशनवर एक आजोबा सायकलवरून आपल्या नातवाला घेऊन पोहोचतात. पण गाडी नेमकी वेळेवर येऊन गेल्यामुळे आता त्यांना पुढच्या गाडीची वाट पाहत थांबावं लागणार असतं. म्हणजे अख्खी रात्र! त्या रात्रीत आजोबा आपल्या नातवाला त्याच्या वडिलांचं गुपित सांगतात. गुपित असं : नातवाला सांगितलेलं असतं की त्याचे वडील मृत्यू पावलेत, पण खरं तर ते ‘काळुबा’ या डोंगरात गेले ते परतलेच नाहीत.

काळुबा डोंगर हा आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांचा देव. त्याच्या अंगाखांद्यावर गावकरी, त्यांच्या शेळ्या, गुरं-ढोरं वाढली. डोंगराखाली शेती. काहीही कमी नव्हतं. तेव्हा ब्रिटिशांनी काळुबाला पोखरून काढत भुयार बनवलं आणि त्यातून रेल्वेची गाडी आणली.

गावाला शहराशी जोडताना गाववाल्यांचा देव पोखरला गेला. आजोबा स्वत: ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. त्यांचा मुलगाही- म्हणजे नातवाचा बाप- काळुबाच्या डोंगरात जाऊन लढता लढता परत आलाच नव्हता. पण ती लढाई ब्रिटिशांशी नव्हती. ती आपापसातच होती. आजोबांना वाटायचं, काळुबा देवाला आपण पोखरू दिलं म्हणून चिडून त्यानं आपला पोरगा घेतला आणि आता नातवालासुद्धा नेण्याआधी त्याला शहराकडे पाठवून देऊ या. पण शहराची गाडी गेली होती आणि दुसरी गाडी यायच्या आधीच गुपित बाहेर आलं होतं. नातू आपल्या बापाला शोधायला जाणार की काळुबाला पोखरून काढलेल्या भुयारातून आलेल्या गाडीनं शहराकडे जाणार? पुन्हा विषय भविष्य आणि भूतकाळातल्या भूतातला आहे.

इप्टा स्पर्धेत जेव्हा पडदा उघडला, तेव्हा प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला समीर नाडकर्णी या जीनिअस नेपथ्यकारानं अंधारानं भरलेलं भुयार बनवलं होतं आणि दिग्दर्शक अनिल बांदिवडेकरांनी अंधार दाखवण्यासाठी भुयारातून एक रेल्वे गार्ड लॅन्टर्न घेऊन येताना दाखवला व त्याच वेळी साऊंडवाल्यांनी गाडीचा आवाज आणि बॅकस्टेजमधून धूर. असं एका मिनिटात ‘स्टेशन पाड’ उभं झालं होतं!

स्पर्धा म्हटली की दुसऱ्या कॉलेजचे जे मित्र असतात ते सगळे स्पर्धक बनतात. पण त्या एका मिनिटाच्या वातावरणावर खूश होऊन सगळेच कॉलेज मित्र स्पर्धा विसरून ‘रंगभूमीमित्र’ झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला.

डोंगर, भुयार, रेल्वे गाडी आणि रेल्वे स्टेशन हे रंगमंचावर उभं करणं सोपं नव्हे आणि स्पर्धेत तर खूपच अवघड; कारण मोजून एक तास मिळतो. त्यात लाइट्स, सेट आणि परफॉर्मन्स करायचा असतो. कदाचित अर्धा तास जास्त असेल; पण आपण दिवाळीला घर साफ करताना आपल्या घरातलं साधं फर्निचर हलवतो आणि ते पुन्हा जागेवर लावतानासुद्धा दोन तास लागतात.

पण स्पर्धेच्या स्पिरिटमुळे अशक्य गोष्टी घडून जातात. एकांकिका पहिल्या तीनमध्ये आली की नाही, आठवत नाही; पण आजोबाला ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ मिळालं. डॉ. बांदिवडेकरांना दिग्दर्शन (कदाचित), शीतलला लाइट्स (कदाचित). मला बक्षीस मिळालं ते कौतुकाचं!

कुंदन शाह- ज्यांनी खऱ्या अर्थानं चाकोरीबाहेर काम केलं, त्यांनी तो शो बघून मला दंडाला पकडून (आजही आठवतंय), ‘‘मकरंद, क्या लिखा है! पर्दा खुलने के बाद काळुबा पुरा स्टेज तोड के ऑडियन्स में आ गया.

ते पृथ्वीला माझं नाटक बघायला यायचे तेव्हा एकच म्हणायचे, ‘‘मकरंद, तेरा क्या है, तुने अपना अलगसे ग्रामर बना डाला है. अपना थिएटर लँग्वेज. इसलिए अब तुझे कोई चैलेंज नहीं कर सकता!’’ ते मला कधीच नाटक चांगलं-वाईट असं काही बोलले नाहीत. ते फक्त दंड पकडायचे, मग वाक्य सुरू करताना हसायचे आणि जे बोलायचं असायचं तेसुद्धा न बोलता हसण्यातून सांगून टाकायचे. ते २०१७ साली झोपेतच काही न बोलता गेले. मी स्मशानात पोहोचलो, पण इलेक्ट्रिक दाहिनीत त्यांना ठेवलं होतं. शेवटचं दर्शन मग आठवणीतलंच.. त्यातली ‘स्टेशन पाड’ ही एक.

या सदरामुळे कुंदन शाह या दिग्गज दिग्दर्शक आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाबद्दल मला लिहिता येतंय, याचं श्रेय ‘लोकरंग’ला आहे. कुंदन शाहना मी कुंदनच म्हणायचो. त्यांच्या ऑफिसमध्ये टेबल, खुर्ची, काही कपाटं आणि त्यात फक्त स्क्रिप्ट्स. कुंदनने स्क्रिप्ट्सचे २८ ड्राफ्ट्स लिहिलेले. त्यांच्याएवढा स्क्रिप्टवर काम करणारा दिग्दर्शक मी पाहिला नाही. मुख्य म्हणजे चांगलं झालेलं स्क्रिप्टसुद्धा त्यांना अपूर्ण वाटायचं. त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर, एखाद्या स्क्रिप्टचे किती ड्राफ्ट्स लिहिले असं एखाद्या लेखकाने म्हटलं तर मी मनात कुंदनला आठवून हसायचो. जय कुंदन!

किकू शारदा- जो कपिल शर्माच्या शोमुळे आता खूप फेमस झालाय; पण त्या वेळी असा कोरा करकरीत कागद होता, की त्या कागदावर जे लिहिलं ते खरंच ठळक उठून दिसलं. त्यानं साकारलेला आजोबा हा ग्रांट रोडच्या ऑगस्ट क्रांती मैदानाजवळच्या तेजपाल थिएटरमध्ये आपली आठवण सोडून गेला.

नंतर मला असं वाटलं, की ही एकांकिका दीर्घाक बनवू या.. आणि मी दीर्घाक लिहूनही टाकला! मग विचार केला, नेहमीप्रमाणे ‘पृथ्वी’मध्येच याचा प्रयोग करायचा, की काळुबा डोंगरासाठी आणि स्टेशन पाडसाठी मोठी, मोकळी जागा शोधू या? आणि ठरलंही, की एशियाटिक लायब्ररीसमोरील हॉर्निमन सर्कलच्या बागेत आपण हे नाटक करू या. या दीर्घाकाला दुसरं नाव दिलं गेलं-  स्वातंत्र्यासाठी ‘१९४७’ आणि ‘ऊठ’ त्यानंतरच्या फाळणीसाठी. ट्रेन हे रूपक प्रतीकात्मक होतं.

बागेत टेडी मौर्याने एक भुयार उभं केलं. साधारण एक सात फुटी माणूस जाऊ  शकेल एवढं. प्रेक्षकांपासून ते लांब होतं आणि प्रेक्षकांसमोर, म्हणजे अगदी हाताच्या अंतरावर, जमिनीपासून पाच फूट उंचीवर एक टॉय ट्रेन दोन दोरींवर अडकवली. ओढण्यासाठी आणखी दोन दोऱ्या बांधल्या. बाकी- स्टेशन मास्तरचं टेबल, खुर्ची, स्टेशनवर पेटवलेली शेकोटी, स्टेशन मास्तरनी वाळत टाकलेले कपडे, धुतलेली भांडी, पाण्याची भरलेली बादली आणि त्याचा एक कुत्रा.

असं वातावरण तयार करून सूर्यास्ताची वाट पाहत बसलो. आजोबाची भूमिका मी करत होतो. मेकअप करून झाला होता. पांढऱ्या केसांचा विग होता आणि दाढीही होती; पण काय वाटलं कुणास ठाऊक, मी दाढी काढून टाकली. असं वाटलं, की आधीच आपण मोकळ्या जागेत, आकाश हेच छप्पर अशा मंचावर नाटक करणार आणि त्यातून स्वत:च्या चेहऱ्याला किती झाकणार?

सूर्य उगाच हळूहळू पश्चिमेच्या अशोकाच्या झाडावरून उतरत होता, जणू काही त्यालाही प्रयोग पाहायचा होता! कानावर प्रेक्षकांत कोण कोण बसले आहेत, ती नावं आली आणि कान टवकारले. सारिका आणि कमल हसन बसलेत. त्या काळी माझी नाटकं बघायला कुणीही येऊ  शकतं याबद्दल मला प्रेम वाटायचं, आश्चर्य नाही.

थोडंसं चर्र्र यासाठी झालं, की मी नाटकाच्या सुरुवातीला, दुसऱ्या प्रवेशाच्या शेवटी आणि अगदी शेवटी असे तीन इफेक्ट्स ठेवले होते. त्यासाठी काही मुलं बागेच्या आत आणि बाहेर उभी होती. सगळं काही टायमिंगचं काम होतं आणि एक इफेक्ट मी स्वत:च करणार होतो. फक्त फटाक्याची दारू मातीत जास्त टाकली गेली नाहीयेना, असा विचार आला होता.

सूर्यास्त झाला आणि नाटक सुरू झालं. भुयारातून आधी लाइट्स, मग शिट्टी जवळ यायला लागली. समोर अधांतरी अडकवलेली टॉय ट्रेन प्रेक्षकांना जणू टाटा-बायबाय करत गेली आणि तिला खेचणारा स्टेशन मास्तर मग लाइट्स व झेंडा घेऊन आपल्या टेबलजवळ आला. त्याचा कुत्रा लालू (खरा कुत्रा!) शेपटी हलवत त्याच्याजवळ आला. जणू ती गाडी जायची वाट बघत बसला होता. कारण गाडीची ती शिट्टी त्याच्या कानाला दडा देत असावी. सुरुवातीचं वातावरण हे एखाद्या भव्य पण साधेपणानं यशस्वी झालं.

तुम्ही म्हणाल, कुत्रा कसा नाटकात? तर.. मला वाटलं, की खरी झाडं आहेत, तर कुत्राही असू दे. स्टेशन मास्तरचं पात्र करणाऱ्या अनिल यादवचा तो ओळखीचा आणि त्यातून तो पृथ्वी थिएटरच्या आवारातला कुत्रा, म्हणून त्याला घेऊन आलो. प्रेक्षकांना खरंच काही तरी वेगळं आणि खरं पाहतोय असा भास झाला.

पुढचा इफेक्ट होता युद्धाचा. त्यासाठी मी बागेबाहेरून काळुबाच्या डोंगरामागून आक्रमण दाखवलं. मुकेश, आकाश आणि भूपेश यांनी अगदी वेळेत फटाक्याचे बाण सोडले आणि त्याचबरोबर साऊंड इफेक्टही. ते बाण नुसते हवेत उडालेले बघून लोकांना तो उत्सव वाटेल, आक्रमण नाही; म्हणून मी जेव्हा प्रेक्षकांची नजर वर गेली तेव्हा मातीत दडवलेल्या फटाक्याच्या दारूला माचीसची जळती काडी लावली आणि अचानक एक स्फोट झाला. प्रेक्षकांना धक्का बसला. धूर आणि माती बाजूला झाली. मी माझा पाय पकडून होतो. प्रेक्षकांना अंदाज येत नव्हता. काहींना वाटलं, हा बॉम्ब पडल्याचा इफेक्ट, तर काहींना वाटलं काही तरी गडबड झाली आहे.

त्या आवाजानं कुत्रा स्टेशन मास्तरच्या टेबलाखाली गेला आणि भुंकायला लागला. नेमका माइक तिथेच होता. त्याचं भुंकणं ऐकून रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले आणि अचानक सारिकाचं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. माझं उजवं पाऊल भाजलं गेलं होतं.. एखाद्या भरिताच्या वांग्यासारखं. पण शो मस्ट गो ऑन. मी बादलीत ठेवलेलं पाणी पावलावर टाकलं. शो पूर्ण केला आणि नंतर हॉस्पिटल.

जय प्रेक्षक. जय लालू. जय नाटक!