|| सुधीर शालिनी ब्रह्ये

मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तिचा वापर वाढू शकेल. भाषेची उपयोजितता वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते. भाषेच्या वापरात तिचं लेखन महत्त्वाचं ठरतं. भाषा शब्दबद्ध करण्यासाठी वापरली जाते ती लिपी. त्या लिपीची उपयोजितता आणि उपयुक्तता सर्वप्रथम वाढवायला हवी. हे कार्य कला करत असतात. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने (२७ फेब्रुवारी) यावर विचार व्हायला हवा.

मराठी जगली तरच महाराष्ट्र जगेल.. अनेकदा,अनेकांनी एकाच परिप्रेक्षातून वापरलेलं हे वाक्य, आज एक लोकप्रिय उद्धृत बनलंय. भाषेचा वापर थांबला तर ती भाषा मृत होते, हे गणेश देवींच्या संशोधनानंतर सिद्धच झालंय. भाषेच्या ऱ्हासाबरोबरच त्या भाषक समूहाची ओळखही नाहीशी होते. मातृभाषा व्यावहारिक भाषा झाल्यास तिचे आयुष्यमान वाढते. शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असावी या विचाराला कृतीची जोड नसेल तर ते केवळ आदर्शवादी तत्त्व ठरतं.

मराठी भाषकांचा इंग्रजी भाषेच्या शिक्षणाकडे कल वाढण्यास कोणतेही शासकीय धोरण कारणीभूत नाही. इंग्रजी भाषा अनेक वर्षांपासून व्यवहार भाषा असल्याने तिला मराठी भाषक पालकांनी स्वेच्छेने झुकते माप दिले. अमेरिकास्थित परदेशस्थ मराठी भाषकांमध्ये मागील काही वर्षांत मराठी, महाराष्ट्रीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले आहे. तथापि, भाषेच्या पुनरुज्जीवनाला त्याचा फार हातभार लागेल असे नाही. मातेइतकेच मातृभाषेचे प्रेमही सुप्तवास्थेत अस्तित्वात असतेच, एवढेच यातून अधोरेखित झाले आहे.

एस. एम. एस. भाषेवरून हे स्पष्ट झाले आहे, की संवाद आणि अभिव्यक्तीसाठी प्रमाणित भाषेची नव्या पिढीला गरज वाटत नाही. उपयुक्तता आणि नितांतता या घटकांमुळेच वस्तू आपल्याला हवीशी वाटते. वस्तूच्या वापरासाठी उपयुक्ततेबरोबरच तिची उपयोजितताही कारणीभूत ठरत असते. मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तिचा वापर वाढू शकेल. भाषेची उपयोजितता वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते. भाषेच्या वापरात तिचं लेखन महत्त्वाचं ठरतं आणि त्यासाठी वापरली जाते लिपी. या लिपीची उपयोजितता आणि उपयुक्तता सर्वप्रथम वाढवायला हवी. हे कार्य कला करत असतात.

लिपी ते ग्रांथिक भाषा.. असा सहज प्रवास करूनच प्रत्येक भाषा या प्रवासातल्या अनुभवानं, ज्ञानानं समृद्ध होत आली आहे. मानवी संस्कृतीचा विकास संशोधनाचा एक भाग भाषाविज्ञान तर दुसरा भाग कला. ‘शब्दशिल्प कला’ (कॅलिग्राफी) ही त्यापकी एक. सुंदर किंवा सुवाच्च्य लेखन आणि ‘सुलेखन’, (कॅलिग्राफीसाठी प्रचलित झालेला शब्द) यातला फरक स्पष्ट होण्यासाठी लेखन सौंदर्यानुभूतीला कलात्मन्याय मिळण्यासाठी शब्दशिल्प कला ही संज्ञा इथे वापरली आहे ती कॅलिग्राफीसाठी. विशिष्ट ओळख असणाऱ्या अक्षरातून व्यक्त होतो तो अर्थ. वळणदार अक्षराच्या सौंदर्याला लांबी, रुंदी, जाडी, उंची यांच्या चौकटीची मर्यादा असते. त्या मर्यादांपलीकडली मुळाक्षरांच्या वळणातील रेषांची नाजूकता, भरीवपणा, फर्राटय़ांतील ऊर्जा यातील सौंदर्याभिव्यक्ती म्हणजे शब्दशिल्प कला.

चित्रलिपी ते शब्दलिपी या प्रवासातच संस्कृती विकसित झाली आणि त्याच्या प्रगत टप्प्यावर विकसित झाली शब्दशिल्प कला. चिनी आणि जपानी भाषक समाजात ही कला खूपच लोकप्रिय आहे. दैनंदिन व्यवहारातील वस्तू, वस्त्र-प्रावरणे यावर होणाऱ्या वापरातून ती लोकाभिमुखही झाली आहे. शब्दांचे अर्थ समाजात नसले तरी त्यातलं सौंदर्य भावल्याने आपल्याकडला युवावर्गही हे टी-शर्ट्स वापरताना दिसतो.

र. कृ. जोशींनी प्रथम कवितेच्या प्रयोगात्मक लेखनातून ही कला (जनसामान्यांपर्यंत) रसिकांपर्यंत पोहोचवली. र. कृं.चे प्रयोग कवितेपुरतेच मर्यादित राहिले अन् त्यांच्या जाण्याने ते तेथेच थांबले. असेच प्रयोग कालांतराने षांताराम पवार यांनी केले. त्यांना ‘आलोचना’ हे दर्जेदार मासिक लाभले होते. मासिकाचा लौकिक मोठा होता. मात्र केवळ समीक्षेला वाहिलेल्या या मासिकाचा ठरावीक वाचक वर्ग हीच षांताराम यांच्या प्रयोगाची मर्यादा ठरली. त्यांच्या जाण्याने हे प्रयत्नही अपुरे ठरले.

शब्दशिल्प कलेच्या उपयोजिततेच्या सीमा अमर्याद आहेत. रंग-रूप-पोतादीमुळे तिला अनेक आयामही लाभले आहेत. निब किंवा बोरू या पारंपरिक लेखन-साधनांव्यतिरिक्त दाढीच्या ब्रशपासून रंगकामाच्या ब्रशपर्यंत, इंजेक्शन सीरिजपासून स्क्रीन पिंट्रिंगच्या स्टॉपपर्यंत वेगवेगळी साधने, रंग आणि आणि कागदाव्यतिरिक्त कापड, कपडे, छत्री अशा अनेकविध साधनांच्या वापराने ही कला अधिक लोकाभिमुख होत आहे. अनेक तरुण आज त्यात प्रयोग करीत आहेत. अच्युत पालव हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव.

भारतीय संस्कृतीची समृद्धी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील वैविध्यात सामावली आहे. हीच बाब भारतीय भाषांच्या संदर्भातही तितकीच सत्य आहे. लिप्यांचं सौंदर्य हाही भारताचा सांकृतिक वारसा आहे. लिप्यांच्या सौंदर्याचा शोध घेत त्यांच्या अंतरंगांपर्यंत पोहोचणारे लिपी अभ्यासक अशोक परब असं मानतात की, प्रत्येक भाषेची लिपी, ती बोलणाऱ्या समूहाच्या संस्कृतीचा, स्वभाव वैशिष्टय़ांचा आरसा असतो. युद्धाला सदैव तत्पर असणारा दोन हात करण्याचा स्वभाव या शीख संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. वार करतानाचा ऊर्जापूर्ण फर्राटा गुरुमुखित त्यातूनच आला आहे, असं परब म्हणतात. बंग बांधवांच्या जगण्यातली अभिजातता त्याच्या लिपीत प्रकटलीय. शाही अदब उर्दूत, पारंपरिक नृत्य-संगीत कलांतील लवचीकपणा द्राविडी भाषांच्या लिप्यांमध्ये वर्तुळाकार रचनेत तसेच सूर्योपासक संस्कृती असलेल्या ओदिशाच्या लिपीत सूर्य गोलाचं प्रतिबिंब शिरोरेषेची जागा घेणाऱ्या अर्धवर्तुळाकारात प्रकटलं आहे, असं स्पष्टीकरण ते देतात.

शब्दशिल्प कलेचा विकास भाषा व्यवहारास पूरक ठरू शकतो याचे प्रत्यंतर घनश्याम एरंडे या मूळ मराठी भाषक शब्दशिल्पकाराच्या प्रयोगातून प्रत्ययाला येते. गुजरातीला त्यांनी अक्षरांच्या सुरुवातीस आणि शेवटी छोटी शिरोरेखा देऊन मराठीच्या पंक्तीत आणून बसवले. या छोटय़ा शिरोरेखांमुळे सौंदर्यात मौलिक भर पडली आहे. शिवाय त्यांच्या ‘र’च्या फर्राटय़ांत मावळ्यांच्या तलवारीचा वार आणि धार यांची नजाकत अनुभूतीस आली. या शैलीत त्यांनी लिहिलेली गुजराती संस्कृतीची महती सांगणाऱ्या कवितेने सुरेश भटांच्या मराठी भाषा गीताची आठवण करून दिली.

भाषेची उपयोजितता एखाद्या कलेपुरती सीमित नाही. बापूराव नाईक यांच्या ‘भारतीय ग्रंथमुद्रण’ (१९८०) या पुस्तकातील मुद्दे या दृष्टीने मौलिक ठरतात. मुद्रित अक्षरे हे भाषेचं पार्थिव किंवा दृश्यरूप आहे, असे ते म्हणतात. मजकूर वाचताना शब्दांचे मूळ वाङ्मयीन स्वरूप वाचकाला प्रतीत व्हावे म्हणून मुद्राक्षरकलाकाराला मुद्राक्षरांची योग्य निवड, मुद्राक्षरपंक्तीची लांबी, पानांचा आकार, त्यावरील शब्दरचना, चित्रे इत्यादी अनेक साधनांचा सुयोग्य उपयोग करावा लागतो. ही जाण आणि हे भान जाहिरात एजन्सीजमध्ये विशेषत्वाने जणावते. परंतु मराठीची तिथेही ससेहोलपटच.

ज्या मराठी ग्राहकांना वस्तू विकण्यासाठी जाहिराती लिहिल्या जातात त्या मूलत: इंग्रजीत. जाहिरातीची विचार-प्रक्रिया, विचार-मंथन इंग्रजीतच होतं. म्हणून जाहिरात एजन्सीजमध्ये स्वतंत्र मराठी मसुदा लेखक (कॉपी रायटर) नेमण्याची पूर्वापार परंपरा नाही. मराठीत तयार होणाऱ्या जाहिराती नगण्यच. ‘‘कुठे नेऊन ठेवलाय..’’ सारखी जाहिरात जेव्हा यशस्वी होते तेव्हा तिच्या निर्मितीमागची विचारप्रक्रियाच त्या भाषेत झालेली असते. ते केवळ भावनिक आव्हान नसतं, तर वैचारिक आवाहन असतं.

इंग्रजीचं स्पेलिंग हा आमच्याकरता नतिक गुन्हा ठरतो, मात्र मराठीतील ऱ्हस्व-दीर्घाचे प्रमाद आम्हाला मान्य आहेत. ‘देखिले त्यातची समाधान पावले’ या वृत्तीने आम्हाला फक्त पाटय़ांवर ‘टाकलेली’ मराठी पाटी चालते. मराठी साहित्य व्यवहार आणि दैनंदिन व्यवहार यांची प्रयत्नपूर्वक सांगड घालण्यानेही भाषेची उपयोजितता वाढेल.

sudhir.brahme@gmail.com