News Flash

अरतें ना परतें… : खुज्या सावल्यांचा काळ

काल-परवापर्यंत खेड्यापाड्यांतल्या साठ-सत्तर टक्के गुण मिळालेल्यांचंही किती कौतुक वाटायचं.

|| प्रवीण दशरथ बांदेकर

गल्लीतला एक पुढारी परवा भेटायला आला होता. तो तसा आमचा माजी विद्यार्थी. त्यामुळे काही पोस्टर्स, बॅनर्स वा पत्रकं छापायची असली की हक्काने ‘सर, जरा मॅटरवर नजर टाका आणि काय ती तुमच्या शुद्द्लेखनात्ली मिस्टेक भेटली तर तेव्हडी करेक्ट करून टाका,’ म्हणून सांगायला येतो. येतो म्हणजे कालपरवापर्यंत स्वत: यायचा; आता कुणाला तरी पोरांना पाठवतो. गुरुपौर्णिमेच्या वगैरे दिवशी त्यांच्या पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून वेळ मिळाला तर रात्री उशिरा पुष्पगुच्छ घेऊन येतो. सोबत नवी पोरं- म्हणजे त्याच्या भाषेत ‘कार्यकर्ते’ असतात. त्यांना उद्देशून दरवेळी सांगतो, ‘हे माझे इंग्रजीचे सर. पण मराठीचा अभिमान म्हणून मराठीतून पुस्तकं लिव्हतात. आमचे साहेब वाडीत आले की मी सरांची भेट घड्वन आन्नार आहे. त्यांना सांगणाराय- सायेब, बघा… अशी मराठीवर प्रेम करणारी माणसं हायत तोपर्यंत आपल्या पक्षाला मरण नाय म्हणून.’

तर, त्या दिवशी काही हिंदू किंवा मराठी संस्कृती जिवंत ठेवणारा सण नव्हता. मग मध्येच याला माझी आठवण कशी काय झाली असावी, असं मनात म्हणतोय, तोवर तो म्हणाला, ‘सॉरी हा सर, तुम्ही बिझी असता; पण तुमचा थोडा वेळ घेतो.’ माझ्या होकार-नकाराची वाट न बघताच त्याने पुढे सुरू केलं, ‘‘सर, धाव्वी-बारावीच्या परीक्षांचा काय घोळ घालून ठेवलाय वो?’’

मी त्याचा अंदाज घेत काही बोलू पाहत होतो, तर तोच पुढे बोलला, ‘‘तुमची टीचर लोकांची काय्येक गल्ती नाय वो सर, तुम्ही तरी काय करणार म्हणा! आमचे साय्ब बोल्ले होते तुमच्या त्या शिक्षण मिनिस्टर बाईंना, की वीस लाख पोरांच्या जिवाशी खेळू नका. नाय एखाद्या वर्षी परीक्षा घेतली म्हणून काय जगबुडी नाय होणाराय. आमच्या केंद्राने आय्क्लं सायबांचं. केली का नाय कॅन्सल धाव्वीची सीबेस्सची परीक्षा? पण म्हाआराष्ट राज्याच्या बोर्डालाच काय झालं नस्ती शानपत्ती करायला? नुसतीच फुडे ढकलली परीक्षा! तेव्हा तरी करोना गेलेला असेल का? मग काय पुन्ना फुडे ढकलणार काय? पोरखेळ हाय काय परीक्षा म्हणजे? पोरं आणि त्यांचे मम्मी-पप्पा ऑलरेडी किती टेन्शनमध्ये असतात, तुमाला म्हायतीच आहे सर!’’

‘‘बरं, मग आपण काय करायचं म्हणतोस? मोर्चाबिर्चा काढायचा विचार आहे की काय?’’

‘‘ते तर करायचंच आपण… पण मी काय म्हण्तो सर, मला एक सॉलिडपैकी निषेधपत्र लिहून देता का? आपल्या विभागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या नि पेरेंट्सच्या सह्या घेतो- परीक्षा कॅन्सल करा म्हणून, नि देतो पाठवून शिक्षण मिनिस्टरकडे…!’’

या असल्या राजकीय खेळ्या करून काय होणार होतं, मला कळत नव्हतं; पण त्याला काही समजावू गेलो असतो तरी तो ऐकून घेणार नव्हता, हे मला माहीत होतं. प्रत्येक गोष्टीचं आपल्या सोयीचं राजकारण कसं करता येईल, एवढंच ही माणसं पाहत असतात. बाकी कुठच्या गोष्टींशी त्यांना देणंघेणं नसतं. मंदिरं बंद होती, मदिरालये बंद होती, तेव्हा ही मंडळी लोकांना चिथावून मोर्चा काढत होती, आंदोलनं करत होती; पण वर्षभर शाळा बंद आहेत, ग्रंथालये बंद आहेत, शिक्षण थांबलं आहे, त्यासाठी काही करावं असं नाही मनात येत यांच्या. आधीच गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे मुलं ‘अभ्यास करणं’ अशी काही गोष्ट असते, हेच विसरून गेली आहेत. ‘शिक्षण’ हा शब्दही लिहिता न येणारे विद्यार्थीसुद्धा मराठीसह सगळ्याच विषयांत ऐंशी-नव्वद टक्के गुण मिळवू लागले आहेत. वर्षभरात मुलाने लिहिलेल्या-वाचलेल्या एकूण शब्दांपेक्षाही त्याला मिळालेल्या गुणांची संख्या जास्त भरताना दिसते आहे. पोरानं एवढा जीव आटवून अभ्यास तरी कधी केला, हे पालकांना जाणून घ्यावंसं वाटत नाही. उलट, कुटुंबातल्या सगळ्यांचे आजवरचे गुण एकत्र केले तरी इतके भरणार नाहीत म्हणून पालक मंडळी भलतीच खूश होऊन गेली आहेत. पाठ्यपुस्तकंही न उघडता गुणांचा पाऊस पडतो आहे, पुढच्या वर्गात जायला मिळतं आहे म्हणून विद्यार्थी खूश; फारशी मेहनत न घेताच शंभर टक्के निकाल लागत आहेत म्हणून शिक्षक आणि संस्थाचालकही हवेत आहेत. गुणवत्ता घसरलीय. गुणपत्रिकेत पैकीच्या पैकी गुणांची रास असलेल्या विद्यार्थ्यांनाही दोन-चार वाक्यंदेखील नीट लिहिता येत नाहीत, स्वतंत्र विचार करता येत नाही, मते मांडता येत नाहीत, याविषयी कुणालाच खंत वाटत नाही. भाषा बिघडत चाललीय, वैज्ञानिक दृष्टी संपत चाललीय, तर्क करणं, कार्यकारणभाव शोधणं, संशोधक व चिकित्सक वृत्ती- सगळं लोप पावत चाललंय; संवेदना, नैतिकता, भूतदया यांसारखी मूल्ये नष्ट होत आहेत… याविषयी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुणालाही काही वाटत नाहीये.

काल-परवापर्यंत खेड्यापाड्यांतल्या साठ-सत्तर टक्के गुण मिळालेल्यांचंही किती कौतुक वाटायचं. मुलींसाठी तर शाळेत जायला मिळणं हेच मोठं असायचं. गावांतून फारशा भौतिक सुविधा पोचल्या नव्हत्या. घरातली, शेतातली कामं करून, डोंगर, रस्ते तुडवीत मुलंमुली शाळेत येत. आमच्या गावातल्या मुलामुलींना तर घाटी ओलांडून, नदी पार करून शहरगावातल्या शाळेत जावं लागे. किती वेळा किती जणांची वह्या-पुस्तकं, गणवेश आणि त्यासोबत शाळेची स्वप्नंही नदीने बुडवून टाकली असतील, गणतीच नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुलं चिकाटीने शिकत होती, मेहनतीने यश मिळवत होती. पण अचानक टी-ट्वेंटी सामन्यांसारखं काहीतरी घडू लागलं. कमी श्रमांत भरपूर माक्र्स मिळू लागले. तोंडी परीक्षा, प्रकल्प लेखन, ‘बेस्ट ऑफ फाय्’चा फॉम्र्युला, कृतीवर आधारित मूल्यमापन पद्धती अशा सगळ्यामुळे मिळणाऱ्या गुणांमध्ये अचानक वीस-पंचवीस टक्क्यांची वाढ झाली. वाढलेल्या निकालामुळे उत्तीर्ण मुलांना सामावून घेणाऱ्या विनाअनुदानित वर्गतुकड्या, त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाचे प्रश्न, अनियंत्रित फी-आकारणी, पायाभूत शैक्षणिक सुविधांचा अभाव, शैक्षणिक मूल्यांचा ऱ्हास, शिक्षणप्रक्रियेतील गांभीर्य हरवत जाणं… असे कितीतरी प्रश्न निर्माण झालेले दिसतात. त्यासोबतच शिक्षणप्रक्रियेतील ‘शिक्षक’ या मध्यवर्ती घटकाचं झालेलं अवमूल्यन, विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेली बेफिकिरी, अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचा होऊ लागलेला लोप अशा शैक्षणिक वातावरण प्रदूषित करणाऱ्या नि समाजव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी नव्याने समोर येऊ लागल्या आहेत.

आता तर काय, करोनामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती आली आहे. करोनाकाळात देवाला भेटता येत नाहीये, दारू मिळत नाहीये म्हणून कासावीस होणारे कुणी शिक्षणव्यवस्थेचे बारा वाजले आहेत, मुलं पुस्तकांपासून दुरावत चाललीत म्हणून अस्वस्थ झालेत असं काही दिसत नाही. खेड्यापाड्यांत ऑनलाइन शिक्षणाची काय परिस्थिती आहे याविषयी शिक्षण खाते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. पण अळीमिळी गुपचिळी! कुणीही याविषयी बोलत नाहीत; बोलणार नाहीत. वर्षभरात आपला पाल्य शाळेकडून, शिक्षकांकडून अवाक्षरही शिकलेला नाही, त्याने स्वतंत्रपणे काही अध्ययन केलेलं नाही, तरीही माझा पाल्य पुढच्या वर्गात गेला आहे, तो त्यासाठी सक्षम आहे का, असं करून मी काही चूक तर करत नाहीये ना, मुलाचं नुकसान नाही ना करत आहे, असा विचार करणारा पालक अडाणी ठरवला जाईल. म्हणजे काहीही न करता पुढे जात राहणे हाच आजच्या काळातला शहाणपणाचा विचार. असं वागणं हीच नवी नैतिकता. दुसरीकडे ज्या शिक्षकांकडे विश्वासाने आपण आपली मुलं सोपवतो, त्यांच्याही घसरत चाललेल्या गुणवत्तेविषयी आणि वाढत चाललेल्या बेफिकीर वृत्तीविषयी स्वतंत्रपणे बोलावं लागेल. करोनाकाळात तर हे अधिकच प्रकर्षाने जाणवून येते आहे. सरसकट सर्वांविषयी अर्थातच असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, माझ्या शेजारच्या शाळेतील समता मॅडम अशा अपवादात्मक समर्पित शिक्षकांपैकी एक आहेत. ऑनलाइन शिक्षणपद्धतीमध्ये आपली अनेक मुलं शिकण्याच्या प्रक्रियेपासून वंचित राहू लागलीत हे जाणवून आल्यावर धोका पत्करून त्या वाड्या-वस्तीवर जाऊन शिकवीत होत्या. कामाच्या तासांव्यतिरिक्त वेळ देऊन मुलांच्या घरी जाऊन अभ्यास देत होत्या, वह्या तपासून चुका सांगत होत्या. पदरमोड करून काही मुलांना त्यांनी इंटरनेटची सुविधाही उपलब्ध करून दिली होती. पण अशा काही शिक्षकांच्या पलीकडे एक मोठा वर्ग असा आहे, की ‘आम्ही घराबाहेर पडलो आणि आमच्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर त्याची जबाबदारी कुणाची?’ म्हणत नियमावर बोट ठेवून कसलीही अतिरिक्त जबाबदारी घेणं टाळत होते. ऑनलाइन पद्धतीमध्ये यातले अनेक शिक्षक उघडे पडले आहेत. आपण वर्षभर या पद्धतीने मुलांना किती आणि काय दिले, हे तेही चांगलंच जाणून आहेत.

खरं तर गुणवत्तापूर्ण शिक्षण हा कुठल्याही शासनव्यवस्थेचा प्राधान्यक्रम असायला हवा. शिक्षणातूनच विचारांची जडणघडण होते, भूमिका निश्चित होते. आजवरची सगळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिवर्तने शिक्षणामुळेच घडून आली आहेत. म्हणूनच शिक्षणप्रक्रियेशी निगडित असलेल्या घटकांची उपेक्षा, त्यांची होणारी अवहेलना, शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण भविष्यातील धोक्याची नांदी ठरू शकते. ज्या देशाच्या शिक्षण- व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत त्या देशाच्या भविष्याचाही बोऱ्या वाजायला वेळ लागणार नाही, हे नक्की. कारण शिक्षण म्हणजे केवळ लिहिणं-वाचणं वा बेरजा-वजाबाक्या करायला शिकणं नसतं. शिक्षण हे परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, विशुद्ध चारित्र्याचा आणि स्वतंत्र विचारांचा माणूस बनण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचं पाऊल असतं. नेमकी हीच गोष्ट आपण विसरून गेलो आहोत, किंवा आपल्याला तिचं महत्त्व वाटेनासं झालं आहे. निव्वळ भौतिक सुखसाधनांच्या मागे लागलेल्या नि त्यापायी मूल्यविवेक हरवून बसलेल्यांना पर्यावरण, लोकशाही स्वातंत्र्ये, शेवटच्या माणसाविषयीची आस्था, किडामुंगीविषयीची संवेदना, ग्रंथ आणि ज्ञान यांसारख्या गोष्टींचे महत्त्व असं सगळंच कवडीमोलाचं वाटू लागलं तर त्यात नवल ते काय?

आज जवळपास सगळ्या क्षेत्रांत नुसतीच खुरटी झुडपं दिसू लागलीत. आभाळाला भिडेल, आपल्या विस्तीर्ण सावलीत पोळलेल्या जीवांना सामावून घेईल असं दिलासा देणारं उंच झाड अपवादानेच दृष्टिक्षेपात येत आहे. तरीही आम्ही आमच्याच खुज्या सावल्या पायांखाली घेत, माझीच सावली कशी सगळ्यांपेक्षा लांब-रुंद म्हणत आत्मानंदात मश्गूल आहोत. आपल्या खुजेपणाचंही भान येऊ नये इतकी आपली वैचारिक वाढ खुंटून जावी अशी भक्कम व्यवस्था या नव्या शिक्षणप्रक्रियेनेच करून ठेवली नसेल ना, कसं कळावं?

samwadpravin@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:04 am

Web Title: matt spelling mistake for printing alumni posters banners or leaflets akp 94
Next Stories
1 मोकळे आकाश… : बटर आणि सुरी
2 अंतर्नाद : राम निरंजन न्यारा रे
3 पडसाद : आता ‘निकम्मे’ कोण?
Just Now!
X