|| विकास कशाळकर

उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी नसरीन मुन्नी कबीर यांनी त्यांच्या सांगीतिक कार्याविषयी आणि जीवन प्रवासाविषयी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. ‘माझं तालमय जीवन’ हे त्या संवादाचे पुस्तक! झाकीर हुसेन यांच्या कलासाधनेचा प्रवास, त्यांची वैयक्तिक जडणघडण, तबलावादनात त्यांनी केलेले विविध प्रयोग यांची एक सुंदर मैफील ऐकतो आहे, अशी जाणीव हे पुस्तक देते. नसरीन कबीर यांनी विचारलेल्या अतिशय छोटय़ा आणि मार्मिक प्रश्नांना झाकीर हुसेन यांनी अत्यंत प्रामाणिक उत्तरे दिली आहेत. त्यातून त्यांच्या कलाविषयक चिंतनाचा व जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा सुंदर आलेख या पुस्तकातून अनुभवायला मिळतो.

सदैव संगीताच्या विश्वात रमणारे उस्ताद अल्लारखाँ हे शांत स्वभावाचे आणि प्रेमळ होते. त्यांनी झाकीरजींना लहानपणापासूनच तबलावादनाचे शिक्षण दिले. पहाटे पाच वाजता उठवून तबल्याचे बोल त्यांच्याकडून घोटून घेतले. लहानपणापासूनच ते झाकीरजींना आपल्यासोबत घेऊन जात असल्यामुळे मोठमोठय़ा गायक, वादक, नर्तक यांच्याशी झाकीरजींची नित्यनेमाने भेट होत असे. वयाच्या सातव्या वर्षांपासून वडिलांच्या सोबत ते बसायचे आणि वादनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असत. त्यामुळे पुढील काळात पं. रविशंकर, उस्ताद अली अकबर, सितारादेवी यांच्यासोबत वादन करण्याची संधी मिळाल्यावर त्या संधीचे त्यांनी सोने केले. साथसंगत हा संवाद असतो. त्यामुळे ज्या कलाकाराला साथ करायची, त्याला समजून घेणे गरजेचे असते असे ते मानतात.

सुरुवातीच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांत तालवादन कसे केले, याची माहिती देताना गीताचा भाव लक्षात घेऊन वादन करण्याचे प्रशिक्षण त्यांना कसे मिळाले, हेही उलगडून सांगितले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात झाकीरजींच्या अमेरिकेतल्या मुशाफिरीबद्दल माहिती मिळते. सॅन राफाएल येथे उ. अली अकबर खाँ यांनी सुरू केलेल्या ‘अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिक’मध्ये तबला शिकवण्यासाठी खाँसाहेबांनी त्यांना बोलावून घेतले. त्यातून एक समृद्ध वादक, अभ्यासक, गुरू, संवादक आणि संवेदनशील कलाकार कसा घडत गेला, हे कळते.

पुस्तकाच्या तिसऱ्या भागात झाकीरजींनी भारतीय आणि पाश्चात्त्य संगीतात केलेल्या विविध उपक्रमांची मनमोकळी चर्चा आहे. आपल्या सांगीतिक विचारांच्या कक्षा कशा रुंदावल्या, हे ते अतिशय सोप्या शब्दांत व्यक्त करतात. चौथ्या भागात गायक, वादक आणि नर्तक यांची साथसंगत करताना काय वेगळेपण ठेवावे लागते, याबाबत मौलिक विचार झाकीरजींनी मांडले आहेत. उ. बडे गुलाम अली खाँ यांच्या सहवासात झाकीरजींना संगीतातले रसतत्त्व समजले. प्रेम, विरह, दु:ख, आनंद हे संगीतातून कसे व्यक्त करायचे, याची दीक्षा मिळाली. त्यामुळे जे उ. अल्लारखाँ यांच्याकडून मिळाले, ते अशा महान गायकांच्या साथसंगतीतूनही त्यांना अनुभवता आले. गिरिजादेवी, पं. जसराज यांच्यासोबत केलेल्या वादनातून तबल्यातील भावनिर्मितीला चालना मिळाली. नृत्यासोबत तबलावादन हे एक वेगळे आव्हान असते. सितारादेवी आणि चौबे महाराज यांच्या संगतीत त्यांना नृत्यसंगतीच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.

प्रात्यक्षिकातून मिळालेल्या ज्ञानासोबतच झाकीरजींनी संगीताच्या शास्त्रपक्षाचाही अभ्यास केला आहे, हे जाणवते. प्रत्येक वाद्याची रचना व त्याच्या ध्वनीनिर्मितीचे तत्त्व यांचाही त्यांचा अभ्यास आहे. ‘तबला, त्याची लवचिकता, त्याची कंपने, निकास, हाताचा दाब या साऱ्याचा अभ्यास केला, तर तबल्यातून निघणारी अक्षरे छान उमटतील. तालक्षम आणि स्वरक्षम असे वाद्यांचे वर्गीकरण वाद्यवादनाच्या परिणामासाठी उपयोगी ठरते,’ हा विचार त्यांनी मांडला आहे.

पुस्तकात कलाकारांचे वैयक्तिक व सामाजिक जीवन, कलाविचार, लोकप्रियता अशा विविध विषयांना स्पर्श केला आहे. नसरीन कबीर यांनी अतिशय मोजक्या शब्दांत प्रश्न विचारून अतिशय उद्बोधक माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

  • ‘माझं तालमय जीवन’- झाकीर हुसेन,
  • संवादक- नसरीन मुन्नी कबीर,
  • अनुवादक- प्रणव सखदेव, रोहन प्रकाशन,
  • पृष्ठे- १८०, मूल्य- २९५ रुपये