विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांच्या आखणीचे काम चालू होते. कुलगुरूया नात्याने ती माझी थेट जबाबदारी आहे असे मी मानतो. उच्च शिक्षणाशी संबंधित असलेले अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि कोणीतरी उद्गारले, ‘It is not how to get meritocracy is an issue, but how to get rid of mediocracy is the real problem.’ त्या शिक्षणतज्ज्ञाचे हे वाक्य माझ्या मनात घर करून राहिले. आयुष्यात सर्वोत्तमता स्वागतार्ह आहे यात शंकाच नाही; पण समझोते करण्याची वृत्ती ही अनेकदा तापदायक ठरते.
क्षेत्र कोणतेही असो- वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन- दर्जातील दुय्यमता स्वीकारण्याची तयारी ही तुमच्या ऱ्हासास कारणीभूत ठरते. वैद्यकीय विश्वाबाबत मी हक्काने सांगू शकतो की, वयाच्या २३ व्या वर्षी तुम्ही एम. बी. बी. एस., २६ व्या वर्षी एम. एस./ एम. डी. आणि २९ व्या वर्षी डी. एम./ एम. सीएच. या पदव्या प्राप्त करू शकता. पण सर्वोत्तमता संपादन करायला वयाची चाळिशी यावी लागते. आणि पन्नाशीनंतरच्या दशकात काय करावयाचे, कसे करावयाचे, यापेक्षा काय आणि कसे करावयाचे नाही, याचा आत्मबोध होतो.
सर्वोत्तमतेचा ध्यास हा प्रवास शक्य करतो; पण ‘ठेविले अनंते तसेचि राहावे’ असा पवित्रा घेतला तर मग आपला प्रवास थांबतो, प्रगती खुंटते. कोणत्याही क्षेत्रात ज्ञान हे प्रवाहीच असते; त्याचे डबके होत नाही. माहिती ही धबधब्यासारखी खळाळती असते. तिचा पाठपुरावा केला नाही तर अल्पसंतुष्टतेची लागण होते. कार्यालयात, संस्थेत एक वेळ व्हायरल फिवर परवडला, पण complacency fever ची साथ पसरणे योग्य नाही. मग माणसे आहे त्यात समाधान मानू लागतात. आपण जे करतोय, त्याहून अधिक चांगले होणारच नाही, हा ग्रह डोक्यात बसला, की संपलेच सारे! मग हळूहळू ओहोटी लागू लागते. आणि ओहोटी सरली की मागे फक्त गाळ आणि गोटे उरतात.
रुग्णालये, आरोग्यव्यवस्था आणि विद्यापीठ, उच्च शिक्षण यांच्या व्यवस्थापनाचा बरोबर दहा वर्षांचा अनुभव आता माझ्या पदरी जमा झाला आहे. It is easy to buy machines, it is difficult to win the loyalty and commitment of men and women. यंत्रे विकत घ्यायची असतात; माणसे जोडायची असतात. संस्था माणसांना घडवितात. पण संस्था माणसांमुळे घडतात, हेही सत्यच आहे. उत्तम संस्थांचाही अनेकदा ऱ्हास होतो. आणि त्या ऱ्हासाच्या मुळाशी mediocracy ¨ाा केलेला स्वीकार हे कारण असते.
कोणतेही कार्यालय, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ हे प्रगतीच्या कार्यक्रमांनी सदोदित भारलेले असायला हवे. पुढच्या दिशा स्पष्ट हव्यात. क्षितिजे अंधुक असू शकतात, पायवाटा ठेचकाळणाऱ्या असू शकतात; पण म्हणून पाऊल पुढे टाकायचेच नाही, हे चालणार नाही. संचालक, अधिष्ठाता, कुलगुरू.. पदनाम काहीही असले तरी त्या व्यक्तीची थेट जबाबदारी संस्थेतून mediocracy हद्दपार करणे हीच आहे.
त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी हृदयाचे सूर जुळायला हवेत. कोणत्याही दोन व्यक्ती एकसारख्या नसतात. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वेगळी असते. ती जाणून घेऊन फुलविणे म्हणजे meritocracy ला खतपाणी घालणे होय.
कार्यालयात स्पर्धा असणेही जरुरीचे. ईष्र्या नको. प्रत्येकाची उत्तमता साधताना निर्माण झालेल्या मेळातून संस्थेचा उत्कर्ष व्हावा. सगळे सहकारी समान ताकदीचे असत नाहीत. ग्रहणशक्ती, गृहस्थाश्रमाच्या जबाबदाऱ्या आणि गोपनीयतेच्या क्षमता यांत फरक हा असतोच. पण त्या समजून घेण्याचे काम टीम लीडरचे.
Meritocracy ध्यास हा एखाद्या वणव्यासारखा पसरला की राष्ट्रप्रेम जागृत होते. Made in India चा अभिमान पुढच्या दशकात आपण अंगी बाळगायला हवा आहे. आणि मग तो सर्व जगात दूरवर पसरवायला हवा आहे. जपान, जर्मनी या दोन्ही देशांचे मला विलक्षण कौतुक आहे. महायुद्धाच्या झळा सोसल्यानंतर पुढच्या सत्तर वर्षांत त्या महासत्ता होण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत ठरली आहे; आणि ती म्हणजे सर्वोत्तमतेचा त्यांचा ध्यास!
..गोष्ट युरोपातली आहे. उंचच उंच चर्चच्या मनोऱ्याच्या गाभाऱ्यात घुमटाच्या आतील कोरीवकाम चालू होते. एक कलाकार एका छोटय़ा नक्षीवर पुन:पुन्हा मेहनत घेत होता. काहीतरी चुकत होते. त्याच्या मनासारखे होत नव्हते. ‘‘अरे, जाऊ दे ना, जमिनीपासून इतक्या उंचीवर असलेल्या घुमटाच्या नक्षीतील चूक कोणाला कळणार आहे? ती इथून प्रेक्षकांना दिसणारही नाही..’’कोणीतरी उद्गारले.
‘‘इतरांचे माहीत नाही, पण मला दिसतेय ना!’’.. तो कलाकार उद्गारला.
Meritocracy has no substitute, हेच खरे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2014 रोजी प्रकाशित
समझोते आणि सर्वोत्तमता
विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांच्या आखणीचे काम चालू होते. कुलगुरूया नात्याने ती माझी थेट जबाबदारी आहे असे मी मानतो.
First published on: 31-08-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meritocracy and mediocracy