प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

गेल्या शतकात विज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड म्हणावे असे दोन शोध लागले. एकाने मानव हा किती नीचतम पातळी गाठू शकतो, हे अणुबॉम्बच्या प्रत्यक्ष प्रयोगाने दाखवलं. तर दुसऱ्याने मानव हा सदेह चंद्रावर जाऊन सुखरूप परत येऊ शकतो हे सिद्ध केलं. एकामुळे माणुसकीची मान खाली गेली, तर दुसऱ्याने ती इतकी उंचावली, की अनेक शक्य-अशक्य अशा आकांक्षांना धुमारे फुटले.. पालवी फुटली.

मानवाच्या चंद्रावरच्या पहिल्या पदस्पर्शाचे १९६९ हे साल सर्वात क्रांतिकारी मानावं लागेल. कारण जगभर या ‘अपोलो ११’ मोहिमेबद्दल प्रचंड उत्सुकता होती. सुदैवाने सर्व अंतराळवीर सुखरूप चंद्रावर पोहोचले आणि मुख्य म्हणजे सुखरूप परतही आले. यानिमित्ताने ‘दि न्यू यॉर्कर’ या अमेरिकन मासिकाने काही व्यंगचित्रं त्या काळात छापली. त्याची प्रस्तावनाच मजेशीर आहे. त्यांनी म्हटलंय, ‘१९६१ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी जनतेला असं वचन दिलं की, या दशकाअखेर अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल! पण त्यांनी यानिमित्ताने अनेक व्यंगचित्रकार या विषयावर व्यंगचित्रं काढतील असा उल्लेखही कोठे केला नाही!’ असो! यानिमित्ताने खरोखरच जगभरात कितीतरी व्यंगचित्रं काढली गेली. त्यातील काहींचा आस्वाद आपल्याला घेता येईल.

अंतराळवीरांनी अवकाशाचं वर्णन करताना म्हटलं होतं की, ‘तिथे भयाण शांततेचा अथांग महासागर होता!’ यावर एका व्यंगचित्रकाराची प्रतिक्रिया बोलकी (!) आहे. बीअर पब- जिथे प्रचंड गोंगाट असतो, तिथे एकजण बीअर पित असताना म्हणतो, ‘‘जर तिथे एवढी भयाण शांतता होती, याचा अर्थ एक ना एक दिवस माणूस तिथे जाऊन भयाण गोंगाट करणारच!’

आणखी एक विलक्षण वेगळा दृष्टिकोन दाखवणारं व्यंगचित्र आहे. चंद्रावरच्या त्या पहिल्या पदस्पर्शानंतर अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे.. ‘Thatls one small step for a man, one giant leap for mankind!!’ (मानवाचं हे छोटं पाऊल म्हणजे संपूर्ण मानवजातीची उत्तुंग झेप आहे!) वास्तविक विज्ञानप्रेमींसाठी हे अत्यंत अभिमानानं मिरवण्यासारखं वाक्य! पण काही नकारात्मक आणि भांडखोर व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधत असतात. अशा लोकांची खिल्ली उडवताना व्यंगचित्रकार म्हणतो, ‘‘आर्मस्ट्राँग याचं हे वाक्य भयंकर आहे!  मॅन का? वुमन का नाही? आणि तृतीयपंथीयांचं काय? आणि ‘लीप’ म्हणणं हे तर साऱ्या अपंगांचाच अपमान करणारं वाक्य आहे..’’ वगैरे, वगैरे, वगैरे!

याच विषयावर आणखी एक व्यंगचित्र आहे. अमेरिकेने अंतराळ संशोधनावर अधिक खर्च करायला नकार दिला. त्यावरच्या व्यंगचित्रात चंद्रावरच्या आर्मस्ट्राँगच्या पावलाचा तो सुप्रसिद्ध ठसा ‘वन स्मॉल स्टेप’ एका बाजूला आणि दुसरीकडे ‘अंतराळ संशोधन अर्थसंकल्प’ या ग्रंथावर सरकारने लाथाडलेल्या पावलाचा ठसा ‘वन बिग स्टेप’ असं लिहून भेदक भाष्य केलंय.

दुसऱ्या एका व्यंगचित्रात चंद्रावरच्या मानवाच्या या एका फूटप्रिंटसाठी मानवाने पृथ्वीवरचे किती ‘कार्बन फूटप्रिंट’ इंधनासाठी निर्माण केले, वगैरे वगैरे असा वेगळाच पर्यावरणीय दृष्टिकोन मांडला आहे.

अमेरिकेने अंतराळयानांमध्ये प्रचंड प्रगती केली, पण बाकीचे अनेक देश अजून मागेच आहेत.. या विषयावर एका व्यंगचित्रकाराने रॉकेट उड्डाणाच्या वेळेस रॉकेटऐवजी ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ एक भलंमोठं बुमरँग चंद्रावर सोडत आहेत असं चित्र रेखाटलंय आणि  शास्त्रज्ञ विश्वास व्यक्त करताहेत की, ‘हे नक्की परत येईल!!’

अमेरिकन लोक आणि कोकाकोला यांचं नातं अतूट आहे. इतकं, की ते चंद्रावरतीही तितकंच घट्ट असतं, हे जपानी व्यंगचित्रकार हिरोशी ओबा यांनी मिश्कीलपणे दाखवलं आहे.

एखाद्या ओसाड जागी नव्या इमारती उभ्या राहतात. मोठे रस्ते,आलिशान मॉल उभे राहतात. कालांतराने एकेकाळी हा भाग कसा होता, हे फक्त काही लोकांच्याच स्मृतीत शिल्लक राहतं. अशा वेळी असं एखादं वाक्य हमखास ऐकू येतं, ते म्हणजे- ‘‘तुला कल्पना नसेल, पण पंचवीस वर्षांपूर्वी हा भाग म्हणजे एक ओसाड, खडकाळ माळरान होतं नुसतं.’’

हीच संकल्पना घेऊन व्यंगचित्रकार रोवलँड बी. विल्सन याने एक गमतीशीर व्यंगचित्र रेखाटलं आहे. चंद्रावर नियमित शहरी वस्ती झाल्यावर जणू काही आपण न्यू यॉर्कच्या रस्त्यावरून फिरत आहोत असं वाटावं आणि एखाद्यानं म्हणावं, ‘‘काही वर्षांपूर्वी इथे फक्त मोठमोठे खड्डे होते!’’ रेखाटनातल्या गमती म्हणजे चंद्रावर प्राणवायू नसल्याने सर्वानी काचेची हेल्मेट्स घातली आहेत आणि मागे अवकाशात चंद्राऐवजी पृथ्वी ग्रह दिसतोय.. ज्यावर  प्रामुख्याने अमेरिका खंड दिसतंय!

पण या साऱ्या तत्कालीन व्यंगचित्रांमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि विशाल दृष्टिकोन दाखवणारं व्यंगचित्र आहे वेन स्पेकल या व्यंगचित्रकारांचं. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर झेंडा रोवत आहेत आणि इतर तिघं त्यांना मदत करत आहेत असं हे चित्र आहे. हे चौघेही पाठमोरे आहेत. नीट पाहिलं तर लक्षात येतं की, बाकीच्या तिघांची नावं ओळखीची नाहीत. आणखी एक लक्षात येतं की, नील आर्मस्ट्राँग यांच्यापेक्षा इतरांचा पेहेराव थोडा उजळ दाखवला आहे. या चित्राची कॅप्शन अशी आहे की, ‘नील आर्मस्ट्राँग जिंकले नसून, आपण सारे जिंकलो आहोत. अपोलो ११ जिंकलं नसून, अपोलो १ ते अपोलो ११ हे सारे जिंकले आहेत.’ आता या चित्रातील ते उर्वरित तिघं म्हणजे ग्रिसम, व्हाइट आणि श्याफी. हे तिघेही अंतराळवीर अपोलो १ या मोहिमेतील दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले होते. विज्ञानातील यश हे अनेक अपयशांनंतर साकार झालेलं असतं, हे सत्य या व्यंगचित्रकाराने फार प्रभावीपणे दाखवून दिलं आहे.

याच विषयावरचं वसंत सरवटे यांचंही चित्र असंच खूप काही सांगणारं आहे. (‘रेषा’ : वसंत सरवटे, राजहंस प्रकाशन) चंद्रयान अपोलो ११ येणार म्हटल्यावर चंद्रावरचा सुपरिचित ससा टुणकन् उडी मारून घाबरून बाहेर पडतो, ही गमतीशीर कल्पना त्यांनी रेखाटली, हे खरं आहे. पण हे चित्र एवढंच सांगत नाही, ते त्याही पुढे जातं. भारतीय मानस हे अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा, समजुती यांमध्ये अडकलेलं असतं. चंद्राची प्रतिमाही अशीच आहे. पण आता प्रत्यक्ष मानवाने तिथे जाऊन आपल्या आधुनिक विज्ञानाच्या पावलाचा ठसा उमटवला. नुसताच उमटवला नाही, तर तो उमटवून हा मानव यशस्वीपणे परतही आला. हा एक प्रकारे श्रद्धाळू मनाला बसलेला धक्काच होता. या धक्क्यामुळे हा श्रद्धाळू भारतीयाच्या मनातील ससा घाबरून बाहेर पडला, असं चित्रातून प्रतीत होतं. साधी वाटणारी चित्रं गंभीर आणि वैचारिक आशय व्यक्त करतात ती अशी!