03 June 2020

News Flash

सांगतो ऐका : मोझार्ट इफेक्ट सत्य आणि मिथक

मोझार्टचं संगीत ऐकून तुमची मुलं जास्त स्मार्ट होतील असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचं साधं आणि सरळ उत्तर ‘नाही’ असं आहे.

मोझार्ट इफेक्ट

मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

मोझार्टचं संगीत ऐकून तुमची मुलं जास्त स्मार्ट होतील असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचं साधं आणि सरळ उत्तर ‘नाही’ असं आहे. तरीही १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते पुढची दोन दशकं पाश्चिमात्य जगतातल्या असंख्य तरुण पालकांना मात्र असं खरंच वाटत होतं. या समजाच्या किंवा गैरसमजाच्या मुळाशी ‘मोझार्ट इफेक्ट’ नावाची एक संकल्पना होती. ही संकल्पना कशी फोफावली, तिच्या पॉप आवृत्तीचा धंदेवाल्यांनी पैसा देणाऱ्या दुभत्या गायीसारखा (Cash Cow) कसा उपयोग करून घेतला, आणि शेवटी तिचा फुगा कसा फुटला, हे दोन भागांतल्या या लेखातून मी सांगणार आहे. ही कहाणी थोडीशी खंतावणारी, थोडी चक्रावणारी, पण बहुतांशी भारावून टाकणारी आहे.

१९ व्या शतकातील बहुतेक काळ मोझार्टकडे कसं दुर्लक्ष केलं गेलं, २० व्या शतकात त्याचं पुनर्वसन कसं झालं, आणि १९८३ साली हॉलीवूडमधल्या ‘अमॅडिअस’ या सुपरहिट्  सिनेमानंतर पहिल्यांदा संशोधकांनी त्याला एका ‘परिणामा’पुरतं (‘मोझार्ट इफेक्ट’) मर्यादित कसं केलं आणि पुढे चतुर उद्योजकांनी त्याची पैसे देणारी एक दुभती गाय कशी बनवली याची ही कहाणी. अशा प्रकारे अप्रतिष्ठित केल्यामुळे मोझार्ट आपल्या थडग्यात अस्वस्थ होत असेल की नाही, हे कोणालाच ठाऊक नसणार. याचं कारण मोझार्टचं दफन एखाद्या दरिद्री आणि सामान्य माणसाप्रमाणे झालेलं असल्यामुळे त्याचं थडगं नक्की कुठे आहे, हे अजून कोणालाच माहीत नाही.

१९ व्या शतकातल्या टोकाच्या रोमँटिक मंडळींनी मोझार्टला ‘संगीताच्या जगातील राफेल’ म्हणून हिणवलं होतं यावर आज विश्वास ठेवणं कठीण आहे. हा शेरा टीकात्मक होता. आणि त्यातून त्यांना सुचवायचं होतं ते असं की, या दोन्ही जिनियसनी अत्यंत चलाखीने क्लिशेचा (cliche) वापर करून मास्टर मानल्या गेलेल्या कलाकारांची नक्कल केली. राफेलने पेतरो पेरूजिनो आणि जिओवानी सान्ती यांची, तर मोझार्टने बाख आणि हायडन यांची. आणि संगीताच्या इतिहासातील दुसरा दुर्दैवी भाग म्हणजे अगदी त्याच्या चाळीसेक सिंफनीज्सह मोझार्टचं संगीत १९ व्या शतकातील बहुतांश काळ कॉन्सर्टला जाणाऱ्या अनेकांना फारसं प्रिय नव्हतं. पण अखेर या महान जिनियसचं केवळ पुनर्वसनच झालं नाही, तर बाख आणि बिथोवनच्या बाजूला असलेलं त्याचं योग्य ते स्थानही त्याला बहाल करण्यात आलं. समीक्षक आणि संगीतातील व्यावसायिक या दोघांच्याही अखेर लक्षात आलं की, मोझार्टच्या संगीतामध्ये जाणवणारा वरवरचा गोडवा हा केवळ त्या संगीताच्या पृष्ठभागावरील एक तरंग आहे. पण त्याखाली आहे ती त्याच्या संगीतामधील प्रचंड ताकद, वैविध्य, नजाकत आणि सौंदर्य.

१९ व्या शतकातल्या शेवटच्या दशकामध्ये मोझार्टकडे परतण्याची चळवळ सुरू झाली ती चायकोव्हस्कीने त्याला ‘म्युझिकल ख्राइस्ट’ हा किताब बहाल करून, देबुसीने असंदिग्ध शब्दांत त्याची तुलना बिथोवनसारख्या जिनिअसशी करून, आणि रिचर्ड स्ट्राऊसने ज्याची केवळ पूजा करू शकतो असा हा ‘दैवी’ संगीतकार असल्याचं जाहीर करून. या चळवळीला विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वेग आला आणि इतरांसह ब्रुनो वॉल्टर, फेलिक्स वाईनगार्टनर आणि सर थॉमस बीचम या त्यांच्या काळातल्या अत्यंत नामवंत अशा कंडक्टर्सनी त्याला हातभार लावला. १८९१ मध्ये मोझार्टच्या जन्मशताब्दीच्या वेळेस एकेकाळच्या संगीत समीक्षकाने आणि ज्याच्या मतांना अतिशय किंमत दिली जात असे अशा जॉर्ज बर्नाड शॉने आपलं निरीक्षण व्यक्त करताना- त्याच्याच शब्दांत सांगायचं तर- म्हटलं होतं, ‘‘मोझार्ट हा बाखच्या समान पातळीवरचा आणि त्याने साध्य केलेल्या उच्चतम स्तरावर बिथोवनपेक्षा कसदार असा संगीतकार आहे.’’

मोझार्टचं अखेर पुनर्वसन झालं खरं, पण शॉने पाश्चात्त्य संगीताच्या त्रिमूर्तीमध्ये मोझार्टला एवढं उच्च स्थान दिल्यानंतरही २० व्या शतकातील बराच काळ मोझार्टला लोकप्रियता आणि समीक्षात्मक गुणवत्ता या दोन्ही निकषांवर बाख आणि बिथोवनपेक्षा खालच्या स्थानावर ठेवलं गेलं होतं. पण १९८३ च्या सुरुवातीला घडलेल्या एका सांस्कृतिक घटनेनं ही संपूर्ण परिस्थितीच पालटून जाणार होती. ही घटना म्हणजे मिलॉश फोरमनचा १९८३ साली प्रदर्शित झालेला, हॉलीवूडमध्ये सुपरडुपर हिट् ठरलेला सिनेमा.. ‘अमॅडिअस’! या मोझार्टच्या चरित्रात्मक आणि आठ ऑस्कर पुरस्कारविजेत्या सिनेमानंतर मोझार्टिआनाचा स्फोट कसा झाला, हे थोडक्यात सांगतो.

मोझार्टच्या संगीताला उच्चभ्रूंमध्ये चाहते नेहमीच होते. मात्र, ‘अमॅडिअस’ला (आणि त्याच्या डीव्हीडीलाही!) टीव्हीच्या झगमगाटाची जोड लाभली आणि कोणाही शास्त्रीय संगीतकारासाठी त्याआधी किंवा त्यानंतर करमणूक करणाऱ्या कुठल्याही माध्यमाने केलं नसेल ते मोझार्टसाठी केलं गेलं. त्यांनी या महान संगीतकाराला जगभरातल्या (अगदी बिगर- पाश्चात्त्य जगातल्या काही भागांमध्येही!) कोटय़वधी लोकांच्या थेट बेडरूममध्ये पोहोचवला. परिणाम..? ज्यांनी मोझार्टविषयी कधीही ऐकलं नव्हतं किंवा ज्यांनी अगदी जेमतेम ऐकलेलं होतं, त्यांना पहिल्यांदाच या अद्वितीय अशा संगीतकाराची आणि त्याच्या संगीताची जाणीव झाली. शिवाय ज्या अनेकांना मोझार्टबद्दल माहिती होती, पण शास्त्रीय धून म्हणजे काय याचा गंधही नव्हता अशांनाही आता ‘आईन क्लाईन नाखट्म्युझिक’ (ए लिटील नाईट म्युझिक- एक छोटंसं रात्रसंगीत) आणि ‘मॅरेज ऑफ फिगारो’ या ऑपेराचं ‘ओव्हर्चर’ ओळखता येऊ लागलं. या सिनेमाच्या साऊंड ट्रॅकचा अल्बम बिलबोर्ड मॅगझिनच्या क्लासिकल अल्बम्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर तर गेलाच, शिवाय पॉप चार्टमध्येही त्याने उच्च स्थान पटकावलं. आणि संगीताच्या कलेतील अत्युच्च स्थानी असलेल्या या देवाची मायकल जॅक्सन किंवा मिक जॅगर यांच्या पातळीवर घसरण झाली, किंवा त्याला बढती मिळाली असंही म्हणता येईल. संगीतातल्या कोणत्या बाजूचे तुम्ही आहात यावर ते अवलंबून आहे.

‘अमॅडिअस’ या सिनेमाने मोझार्ट नावाचं एक वादळच निर्माण केलं. आणि या वादळाचा परिणाम म्हणून त्यापूर्वी कधीही न घडलेल्या काही घटना घडल्या. एका महान शास्त्रीय संगीतकाराला बात: संशोधनाच्या निमित्ताने प्रथमच विज्ञानाने आपल्या ताब्यात घेतलं आणि नंतर नफ्यासाठी व्यावसायिकांनी त्याला स्वत:कडे पळवून नेलं.

या लेखाच्या पुढच्या भागात विज्ञान, प्रसार माध्यमं आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टी आजच्या धंदेवाईक जगात एकत्र येणं कसं धोकादायक ठरलं आणि ‘मोझार्ट इफेक्ट’ या सुरुवातीला अवास्तव मोठय़ा केलेल्या, अतिशय वादग्रस्त अशा खोटा आविर्भाव आणणाऱ्या संकल्पनेची विचारवंत आणि बाजारवंत यांनी कशी खेळी केली, याबद्दल मी लिहिणार आहे.

तुम्ही मोझार्टच्या अतिशय लोकप्रिय संगीतरचनांबद्दल ऐकलं असेल किंवा नसेल, पण तुम्ही ‘मोझार्ट इफेक्ट’विषयी निश्चितच ऐकलं असणार. याचं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट अशा दोन्ही प्रकारच्या प्रसार माध्यमांमध्ये हा परवलीचा शब्द इतक्या वेळा आणि इतक्या प्रकारे वापरला गेलाय की तुमच्या नजरेतून तो सुटला असण्याची शक्यता फारच कमी. ‘मोझार्ट इफेक्ट’ ही संज्ञा पहिल्यांदा वापरली ती फ्रेंच फिजिशियन- संशोधक आल्फ्रेड तोमातिस याने.. १९९१ साली! लहानपणी होणाऱ्या अनेक प्रकारच्या रोगांसाठी तसंच मोठेपणी नैराश्यासारख्या होणाऱ्या अनेक प्रकारच्या मानसिक विकारांसाठी औषधाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत तोमातिसने श्रवण उत्तेजक म्हणून मोझार्टच्या संगीताचा उपयोग केला. त्याच्या संशोधनातल्या एका भागात त्याला असं दिसून आलं की मोझार्टचं संगीत ऐकल्याने ‘स्पेशल टेम्पोरल रिझनिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक प्रकारच्या मानसिक आजारावर उपचार करताना कमी काळासाठी का होईना, सुधारणा दिसू शकते. पण या संकल्पनेला मोठय़ा प्रमाणावर मान्यता दिली ती १९९३ साली इर्विन येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधल्या गॉर्डन शॉ आणि ‘मानसिक प्रक्रियांचा विकास’ या विषयातला तज्ज्ञ आणि संगीतकार (कॉन्सर्टमध्ये चेलो वाजवणाऱ्या) फ्रान्सेस रॉशर या दोन भौतिकशास्त्रज्ञांनी! १९९३ साली ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात एक लेख त्यांनी प्रकाशित केला. या लेखात या दोन संशोधकांनी असा दावा केला की, दहा मिनिटांसाठी मोझार्टच्या ‘सोनाटा इन डी मेजर फॉर टू पियानोज्’ची पहिली मूव्हमेंट ऐकलेल्या कॉलेजातल्या विद्यार्थ्यांच्या एका गटामध्ये ‘स्पेशल टेम्पोरल रिझनिंग’मध्ये तात्पुरती सुधारणा दिसून आली.

(पूर्वार्ध)

शब्दांकन : आनंद थत्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 1:08 am

Web Title: mozart effect sangato aika dd70
Next Stories
1 या मातीतील सूर : बंदिशकार..
2 ते कामगार-शेतकरी आज कुठे आहेत?
3 खेळ मांडला.. : काय होता तुम्ही, काय झाला तुम्ही?
Just Now!
X