सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

वैश्विक टाळेबंदीच्या या काळात क्रिकेट- विश्वामध्येही अपेक्षित सामसूम आहे. परंतु पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या तोंडाचा पट्टा सुरू असून, त्यातून अनेक रंजक आणि उद्बोधक गोष्टी ऐकायला मिळताहेत. नैराश्येच्या या वातावरणात औटघटका मनोरंजन पुरवण्याचे काम पाकिस्तानी क्रिकेटपटू करत असल्यामुळे त्यांचे आभारच मानले पाहिजेत. १९८० आणि १९९० च्या दशकांत जगातील पहिल्या तीन संघांमध्ये पाकिस्तानचा समावेश नक्कीच करायला हवा. किंबहुना, ८० पेक्षाही ९०च्या दशकातला पाकिस्तानी संघ अधिक परिपूर्ण आणि बलाढय़ होता. उत्तम गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज यांचा योग्य समतोल होता. त्यामुळे सुमार क्षेत्ररक्षक, मूडी क्रिकेटपटू आणि नेतृत्वसातत्याचा अभाव या वैगुण्यांनी त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. पण.. असे नुकसान झाले नाही म्हणण्यापेक्षा ते १९९२ नंतर किमान आणखी एक विश्वचषक जिंकण्याची क्षमता नक्कीच बाळगून होते; मात्र तसेही घडले नाही. ऐंशीच्या दशकात इम्रान खान आणि जावेद मियाँदाद यांच्याभोवतीच पाकिस्तानी संघाची सारी गणितं फिरायची. या दोघांच्या साथीला ऐंशीच्या मध्यावर सलिम मलिक, वासिम अक्रम, सलिम युसुफ, वकार युनुस, रमीझ राजा असे अनेक गुणवान क्रिकेटपटू पाकिस्तान संघात दाखल झाले होते. या नावांवर नजर टाकल्यास जवळपास एक नवा, गुणवान संघच उदयाला येऊ लागला होता. वेस्ट इंडिजचा संघ ऐन भरात असताना त्यांना ज्या एका संघाची भीती वाटायची, तो होता पाकिस्तानचा संघ! विख्यात विंडीज गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हे मान्य केलंय. वेस्ट इंडिजच्या तोडीचा वेगवान मारा पाकिस्तानकडे होता. वेगवान मारा निडरपणे खेळू शकतील असे फलंदाज होते. १९९२ मध्ये तर आमिर सोहेल, मुश्ताक मोहम्मद, इंझमाम उल हक, आकिब जावेद, इजाझ अहमद, राशीद लतिफ, बासित अली यांसारख्यांची भर या गुणवान संघात पडत गेली. पुढे सईद अन्वर, साकलेन मुश्ताक, शोएब अख्तर, अब्दुर रझाक, अझर मेहमूद, युनुस खान, युसुफ योहाना (मोहंमद युसुफ).. या काळात पाकिस्तानच्या दृष्टीने कमकुवत दुवा होता तो एकच.. प्रभावी नेतृत्वाचा अभाव! वासिम हा अक्रम इम्रान-जावेदच्या अस्तानंतर खरा तर सर्वात सीनियर; पण त्याचे आणखी एक सीनियर क्रिकेटपटू वकार युनुसशी अजिबात पटत नव्हते. सलिम मलिक या सीनियर क्रिकेटपटूची वागणूक सदैव संशयास्पद राहिली. पुढे मॅच फिक्सिंगमध्ये तो अडकला आणि त्याच्याविषयीच्या संशयाला पुष्टीच मिळाली. परवाच आमिर सोहेलने आरोप केला, की १९९२ नंतर पाकिस्तानला संधी असूनही एकदाही विश्वचषक जिंकता येऊ शकला नाही, याचे कारण म्हणजे वासिम अक्रम! १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताविरुद्ध काही तास आधी अक्रमने माघार घेतली. त्याच्या त्या कृतीबद्दल सर्वाधिक चर्चा व संशय आजही पाकिस्तानमध्ये व्यक्त होतो.

त्या दशकात तीन वेळा- म्हणजे १९९२, १९९६ आणि १९९९ या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा मुकाबला पाकिस्तानशी झाला. हे तिन्ही सामने भारताने जिंकले, हे तर सर्वज्ञात आहेच. पण तिन्ही वेळा पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा भारी होता. पण तरीही तो हरला; कारण भारताविषयी इतर कोणताही विचार पाकिस्तानी मानसिकतेत शिरू शकत नव्हता. याच दशकात इतर बहुतेक स्पर्धा-मालिकांमध्ये पाकिस्तान भारताला नेस्तनाबूत करत असे. त्यामुळे आपण भारतापेक्षा सरस आहोत, ही घमेंड होतीच. तीच विश्वचषक सामन्यांदरम्यान प्रतिकूल परिणाम करू लागली असावी क़ाय? यातही पाकिस्तानी माध्यमांनी अनेकदा असा दावा केला आहे, की ‘त्या’ तिन्ही सामन्यांमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली होती. पाकिस्तान धावांचा पाठलाग योग्यरीत्या करू शकत नाही, तसा तो भारतालाही करता येत नाही. २००३ मधील विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या झपाटय़ासमोर तो दावाही फोल ठरला. कारण त्या सामन्यात भारताने जवळपास पावणेतीनशे धावांचे लक्ष्य गाठून दाखवले! गुणवत्ता असूनही पाकिस्तानला नव्वदच्या दशकात आणि नंतरची काही वर्षे एकापेक्षा अधिक विश्वचषक जिंकता आले नाहीत, याचे एक कारण नेतृत्वाचा अभाव. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतापलीकडे त्यांना दुसरे कधी काही दिसले नाही. याउलट, पाकिस्तानची भीती घालवून पाकिस्तानपलीकडे भारतीय संघ पाहायला शिकला. म्हणूनच नवीन सहस्रकात केवळ पाकिस्तानविरुद्धच नव्हे, तर इतरही संघांविरोधातही अधिक सातत्याने भारत जिंकू लागला. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मनातून तेव्हाही भारत जात नव्हता आणि आताही जात नाही. त्यामुळेच ‘भारतीय फलंदाज स्वतसाठी खेळायचे, आम्ही संघासाठी खेळायचो,’ असे हास्यास्पद विधान इंझमाम उल हक करता झाला. कोण स्वार्थीपणे खेळायचे? सचिन? द्रविड? अझरुद्दीन? सौरव? हे वैगुण्य खास पाकिस्तानी फलंदाजांचे होते. इंझमाम कारकीर्दीत सर्वाधिक वेळा धावचीत झाला, त्याला एक कारण त्याची बोजड शरीरयष्टी. पण दुसरे तितकेच महत्त्वाचे कारण- धाव घेण्यासाठी दुसऱ्यासाठीही धावावे लागते! आमिर सोहेल म्हणतो, ‘अक्रममुळे एकापेक्षा अधिक विश्वचषक आम्ही जिंकू शकलो नाही.’ १९९६ मधील त्या सामन्यात पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध सुस्थितीत असताना वेंकटेश प्रसादला उचकवण्याची आमिरची उन्मादी खोड वासिम अक्रम थोपवणार होता? तो उन्माद आमिरला आणि अखेरीस पाकिस्तानलाही नडला. पाकिस्तानी फलंदाजच वैयक्तिक विक्रमांसाठी किंवा ‘आणखी कोणत्या’ तरी कारणासाठी खेळायचे किंवा स्वतची विकेटही फेकायचे! शोएब अख्तर भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आज उतावीळ आहे. त्यातून उभा राहणारा पैसा पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या कल्याणासाठी आवश्यक आहे असे तो म्हणतो. परवाच त्याला भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याचीही हुक्की आली. कोणाला हवा आहे शोएब हा गोलंदाजी प्रशिक्षक? या देशात आता मोठय़ा संख्येने गुणवान वेगवान गोलंदाज तयार होत आहेत, हे त्याला ठाऊक नाही असे नाही. पण मनाने अजूनही ही मंडळी नव्वदच्या दशकात वावरतात. तरीही गरज यांना मोठय़ा प्रमाणात भारतीय प्रेक्षकांचीच लागते. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी यू-टय़ूब कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यात विद्यमान संघाच्या लक्तरांविषयी चर्चा कमी आणि भारतविजयाच्या सोनेरी दिवसांना उगाळा-उजाळाच अधिक दिसतो. रमीझ राजा, राशीद लतिफचा सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक जण एक तर भारताविषयीच्या विजयांची चर्चा करणार नि उरलेले अकारण नको इतकी तारीफ करणार. जग इकडचे तिकडे होऊ दे, पण यांच्या डोक्यातून भारत काही जात नाही! अलीकडे प्रसृत झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वक्तव्यांतून हेच दिसून येते. भारतापलीकडे न पाहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे खेळाचा आनंद लुटण्याची त्यांची सवयही सुटत चालली आहे. पाकिस्तानी क्रिकेटसाठी ते अधिक घातक ठरू लागले आहे.