28 February 2021

News Flash

अजब निराला उपजा

संगीत क्षेत्रातील विलक्षण चमत्कार मानल्या गेलेल्या पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ फेब्रुवारीला सुरू होत आहे.

पं. भीमसेन जोशी

संगीत क्षेत्रातील विलक्षण चमत्कार मानल्या गेलेल्या पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ फेब्रुवारीला सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अथांग, अफाट सांगीतिक वारशाबद्दल, त्याच्या वैशिष्टय़ांबद्दल सांगताहेत- त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी!

चार फेब्रुवारी १९२२ या दिवशी एका अवलिया व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला, म्हणजेच या वर्षी ४ फेब्रुवारीला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सुरुवात होत आहे. तसे सगळेच जन्मतात, जगतात आणि जातात. म्हणजे प्रत्येकाचीच जन्मशताब्दी कधी ना कधी येणारच असते. पण काही विशिष्ट लोकांचीच आठवण या रीतीने समाजाला करावीशी वाटते, इतके काहीतरी संस्मरणीय ते समाजाला देऊन गेलेले असतात. म्हणूनच पंडित भीमसेन जोशी या अवलिया कलावंताला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान दिला गेला.. आणि सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वानी त्यांना दिले प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची पावती! हे का झाले, याचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करू या. हा प्रयत्न करता करता त्यांची आठवणही करूया.

स्वातंत्र्यापूर्वी बहुधा राजेरजवाडे आणि सरदारदरकदार यांच्याकडे असलेले आणि त्या सुरक्षेत निश्िंचत असलेले शास्त्रीय संगीताचे गायक, वादक हे संस्थाने बुडताच एकदम त्या छत्राला पारखे होऊन प्रथमच सर्वसामान्य जनतेकडे आपले नवे आश्रयदाते म्हणून बघायला बाध्य झाले. (अर्थात हे ढोबळ विधान आहे. काही दशके आधीपासून सामान्य जनतेसाठी जलसे वगैरे सुरू झाले होते. नभोवाणीवर आणि तबकडय़ांवरही संगीत समाजात पसरले होते. पण मुख्यत: गायक, वादक राजाश्रयालाच होते.) एक पूर्ण नवीन, कधीही न घेतलेला अनुभव होता हा! हजारो वर्षांच्या परंपरेत आपल्या कर्मठ सांगीतिक रूढी- समजांपासून शास्त्राच्या कसोटीवर कट्टर राहणारे हे पंडित आणि उस्ताद एकीकडे; आणि कुठलेही शास्त्रीय संगीताचे वळण नसलेली बहुसंख्य जनता दुसरीकडे. या दोघांमध्ये दुवा होण्यासाठी आपला अभिजातपणा तर सोडायचा नाही, पण सामान्य लोकांनाही काळजाचा ठाव घेईल असे संगीत निर्मिणारी कुणी समर्थ व्यक्तीच असायला हवी होती. मला वाटते ती व्यक्ती ठरले.. पं. भीमसेन जोशी!

१९४७ मध्ये गायनाची कारकीर्द नुकतीच सुरूकेलेले ते पूर्ण तारुण्याच्या जोशात होते. शून्यापासून सामान्यजनांमधूनच संघर्ष करत आलेले असल्याने सामान्य रसिकाला काय हवं असतं याची त्यांना जाण होती. आणि विधिवत शास्त्रीय संगीताची तालीम झालेली असल्याने भारतीय संगीताचे कायदेकानू आणि त्याच्या अंतरात्म्याचीही त्यांना समज होती. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधून त्यांनी जो आवाज आणि जी गायकी निर्माण केली, जो साचा निर्माण केला, जो रस्ता बनवून ठेवला, तो संगीताच्या पुढच्या चार पिढय़ांना उपयोगी पडला, आणि पुढेही पडत राहील असं वाटतं. बरं, कु ठल्यातरी एकाच कोपऱ्यात गाजला असाही हा ‘प्रॉडक्ट’ नव्हता, तर तो सबंध भारतभर पसंतीस उतरला. त्या अर्थी त्यांनी बांधलेले आडाखे बरोबर होते हे दिसून येते. म्हणूनच संगीतविश्वात आणि समाजातदेखील त्यांच्याबद्दल कृतज्ञता आढळते.

यासाठी जी सामग्री लागते ती काही देवदत्त देणगीमुळे आणि काही अचाट परिश्रमांनी त्यांनी मिळवली होती. काय होती ही सामग्री? त्यांचा परिपूर्ण आवाज हा ऐकणाऱ्यावर प्रथम प्रभाव पाडतो. आवाज ही अत्यंत प्राथमिक गोष्ट. हा जो काही तुमचा असतो तो असतो, पण साधनेने तो घडवावाही लागतो. तसा तीनही सप्तकात सहज जाणारा, पाहिजे तेव्हा पाहिजे तसा जाड वा बारीक, पाहिजे तेव्हा कंपित, पाहिजे तेव्हा अचाट ताकदीचा आणि हवा तेव्हा हळुवार व नाजूक! दहा-बारा तरी आवाजाचे लगाव त्यांनी अर्जित केलेले त्यांच्या गायनात आढळतात.

दुसरं.. उत्कृष्ट सौंदर्यदृष्टी! विद्वत्ता आणि गायनकौशल्य ही गाण्यात सौंदर्य आणि आनंद निर्माण करण्याची साधने आहेत; अंतिम लक्ष्य नव्हेत.. ही त्यांची आम्हाला प्रत्यक्ष शिकवणच होती. कितीही अचाट, अफाट, कल्पनाचातुर्याचे असले तरी गाणं सुंदर आणि गोड पाहिजे असं ते म्हणत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

तिसरं.. परिपूर्ण तांत्रिक कौशल्य. सूर अचूकतेने त्या- त्या ठिकाणी, पाहिजे त्या टोनने आणि पाहिजे तेवढा लहान-मोठा आणि भावनायुक्त लागणे, लयकारी पक्की, अतिशय दाणेदार, बलयुक्त (‘बल’ हा शब्द संगीतात आघातांसाठी वापरतात.) आणि तयार तान, अचाट दमसास ही वैशिष्टय़ेही त्यांच्या गाण्यात बघता येतात.

मग यातून येणारी कलात्मक समज भारतभर ऐकलेल्या गायनशैलींमधून योग्य ती गोष्ट टीपकागदासारखी टिपणारी बुद्धिमत्ता, यातून स्वत:ची ‘भट्टी’ बनवण्याची (त्यांचाच शब्द!) प्रखर प्रज्ञा, जीवनभराच्या साधनेतून माणूस म्हणून आलेलं सखोलपण हे सर्व त्यांच्यामधून प्रस्फु टित होत असे.

शेवटचे म्हणजे त्यांचे सादरीकरण! शास्त्रीय वा इतर संगीत त्यांनी सामान्य श्रोत्यांच्या सांगीतिक भाषेत अनुवादित केले, असे गमतीने म्हणावेसे वाटते. एखादी गोष्ट सोपी करून सांगणं फार अवघड असतं. इथे तर नियमांची बंधनेही खूप. किचकट, कंटाळवाणेपणा आणि वारेमाप उच्छंृखलपणा यांच्यातून वाट काढणे ही करामत त्यांच्या मैफिलीमध्ये असे. मैफिलीत त्यांचे बैठकीवर आत्मविश्वासाने बसणे, गाण्यात हरपून जाणे, त्यांचे हातवारे, मुद्रा यांमुळे ती मैफल थ्रीडी व्हायची. एक चिंब करणारा अनुभव घेऊन श्रोते बाहेर पडत.

आता तुम्ही म्हणाल, अनेक क्षेत्रांत अशा प्रकारे लोक लोकोत्तर कामं करत असतात. याबाबतीत काय वेगळं आहे? मला वाटतं- आहे. आणि तेच बघू या. योग्य मराठी प्रतिशब्द माहिती नाही, पण गेली काही वर्षे एखाद्या देशाची ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द ऐकू  यायला लागला आहे. म्हणजे देशाची सैनिकी शक्ती, आर्थिक शक्ती वगैरे सोडून बाहेरच्या जगात आपल्या सांस्कृतिक शक्तींच्या प्रभावाने जगात शिरकाव करणे.. असा काहीसा याचा अर्थ आहे.

ठळक उदाहरण म्हणजे अमेरिकेतून हॉलिवुडचे चित्रपट, त्यांचे संगीत- ते पार त्यांचे मॅकडॉनल्ड यांचा जगावर प्रभाव पडला. इतका, की सोविएट युनियनबरोबरच्या संघर्षांत तो एक घटक ठरला. आपल्याकडेही आपले चित्रपट- पार हिंदी ते दाक्षिणात्य, आपले क्रीडापटू ही कामगिरी करत आहेत. उदा. रजनीकांत यांचे प्रचंड चाहते जपानमध्ये आहेत. आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील.

यात निखळतेने भारतात विकसित झालेल्या परंपरांद्वारे आपली ‘सॉफ्ट पॉवर’ वाढवता येईल, ही जाणीव अलीकडे आपल्याला व्हायला लागली आहे. यापैकी योग, आयुर्वेद यांचा जगात बऱ्यापैकी बोलबाला आहे आणि तो वाढत आहे.

यात तिसरी चीज आहे- भारतीय संगीत; मग ते शास्त्रीय असो वा लोकसंगीत. त्यातही वाद्यसंगीत पोहोचणे तुलनेने सोपे आहे. परदेशात भारतीय कंठसंगीताने भुरळ घालण्याचे काम प्रथम केले ते बाबांनी. त्यांच्या रेकॉर्ड्स ऐकून त्यांना निमंत्रण देण्याची शिफारस करणारी अफगाणिस्तानची शहजादी, त्यांची रेकॉर्ड ऐकून त्यांच्यावर फिल्म करायला आलेले हॉलंडचे लुई व्हॅन गॅस्टेन ही याची काही उदाहरणे.

आपल्या निखळ भारतीय परिवेशातून निघालेली कंठसंगीताची विद्यासुद्धा परदेशी लोकांना मोहिनी घालू शकते हे उदाहरण त्यांनी समोर ठेवले आहे. त्यानंतर यथासंभव अनेक गायक परदेशी गेले आणि त्यांनीही उत्तमच कलाप्रस्तुती केलेली आहे.

विशुद्ध संगीताची एक पूर्ण स्वतंत्र पद्धती एक पाश्चिमात्य अभिजात संगीत सोडले तर बहुधा आपल्याकडेच आहे, आणि जसजसा काळ जाईल तसतसा या सर्व भारतीय परंपरांचा अधिकाधिक प्रसार होईल अशी शक्यता वाटते. म्हणूनच यातले पथदर्शी म्हणून पं. भीमसेनजींचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांनी ‘भारतीयत्वा’ची ताकद आम्हाला दाखवली. आमचा आमच्यावरचाच विश्वास वाढला. म्हणूनच त्यांच्याविषयी समाजाला आपुलकी वाटते.

हे इतकं सर्व असूनही ते स्वत:विषयी वा स्वत:चे विचार समाजासमोर ठेवण्याच्या मोहापासून नेहमीच अलिप्त राहिले. ‘जे बोलायचं ते गाण्यातून’ हाच त्यांचा खाक्या होता. स्वत:बद्दलची इतकी अलिप्तता बघायला मिळणे दुर्मीळ आहे. म्हणूनच मी त्यांच्यावर के लेल्या एका बंदिशीचा मुखडा आठवतो आणि  म्हणावेसे वाटते..

‘अजब निराला उपजा’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 7:00 am

Web Title: pandit bhimsen joshi dd70
Next Stories
1 रफ स्केचेस् : चटका
2 अरतें ना परतें.. : जन्मानुजन्मांचे सोयरे
3 मोकळे आकाश.. : कांचनमृग
Just Now!
X