News Flash

एक नाटककार, दोन रूपं

वास्तवता किंवा अतिवास्तवतेच्या माऱ्यात सापडलेलं आजचं नाटक अतिपरिचित प्रसंगांमुळे नाटय़ गमावून बसलं आहे.

| July 21, 2013 01:01 am

वास्तवता किंवा अतिवास्तवतेच्या माऱ्यात सापडलेलं आजचं नाटक अतिपरिचित प्रसंगांमुळे नाटय़ गमावून बसलं आहे. ‘मा अस साबरीन’सारख्या नाटकांमुळे कदाचित हरवलेलं ते नाटय़ पुन्हा गवसण्याची शक्यता आहे. जुन्या फॅशन्स दीर्घ कालावधीनंतर परत आल्या की त्या लोकप्रिय होतात असा अनुभव आहे. गेल्या कित्येक वर्षांत कल्पनारम्य नाटक रंगभूमीवर आलेले नाही. ‘मा अस साबरीन’च्या निमित्ताने ते परत आले तर ते लोकप्रिय होऊ शकेल असे वाटते.
डोंगरातली गुंफा. जवळच कुठेतरी समुद्र असावा. त्याची गाज ऐकू येतेय. चेहरा कोरलेला एक उभा स्तंभ. त्या स्तंभाला एका माणसाला जखडून बांधलेलं. त्याच्याभोवती आदिवासी जंगली लोकांचं नृत्य चालू आहे. बांधलेल्या माणसाचा चेहरा रडवेला. बहुतेक त्याला आता मारलं जाणार आहे. नृत्याचा तो जोश चालू असतानाच अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू येतात. टेकाडावर जाऊन कुणीतरी अंदाज घेतो. धावपळ, आरडाओरडा. नृत्य थांबतं. सगळी पांगापांग. कुणीतरी जंगली माणूस गोळी लागून पडतो. धावत कुणीतरी त्याचा आप्त येतो. रक्ताळलेल्या त्याला घेऊन जातो. खाड् खाड् बूट वाजवीत आणि रायफली उगारीत सैनिक येतात आणि या अपरिचित ठिकाणाचा सर्व बाजूने कानोसा घेतात. ‘अथं मनूस जगन ह!’ या प्र. ल. मयेकरांच्या नाटकाचा हा प्रारंभ आहे.
युद्धविरोधी भूमिका घ्यायची तर ज्याला विरोध ते प्रकट व्हायलाच हवं. युद्धसदृश परिस्थितीनंच या नाटकाची सुरुवात होते आणि प्रेक्षक सरसावून बसतो. ‘आकाशाखालचं नंदनवन’ असं नामाभिधान असलेलं एक अपरिचित बेट हे या नाटकाचं नाटय़स्थळ आहे. या बेटावरील माणसांची भाषा वेगळी, अनाकलनीय आहे. विशिष्ट भाषा, धर्म, संस्कृती वगैरे घटकांपासून वेगळी.. निखळ माणुसकी असलेली ही भूमी आहे आणि जंगली आदिवासी लोक इथले भूमीपुत्र आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात आनंदात जगणाऱ्या या माणसांच्या भूमीवर पावलं उमटतात ती सैनिकांची. बंदूकधारी आक्रमकांची. बर्मुडा ट्रँगलच्या शोधमोहिमेत बोट फुटल्यामुळे काही सैनिक आपल्या मोटारबोटीसह या बेटाला लागतात आणि मग मूळचे आदिवासी आणि हे बाहेरून आलेले शस्त्रधारी यांच्यात झडलेला संघर्ष म्हणजेच हे नाटक.
कॅप्टन, माईक, अ‍ॅम्फी, बॉब आणि डिकी हे पाचजण या अज्ञात प्रदेशात येतात तेव्हा त्यांना खांबाला बांधलेला कुकर दिसतो. त्याला बोटीवरल्या मोलकरणीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा म्हणून ते ओळखतात. तो यांच्यापूर्वीच कधीतरी या बेटावर पोचलेला असतो आणि इथेही त्याने पुन्हा तसाच गुन्हा केल्यामुळे जंगली लोकांनी त्याला वधस्तंभावर लटकावलेलं असतं. सैनिकांकडे तो गयावया करतो. या प्रदेशाची त्याला माहिती असल्यामुळे, त्यांची भाषा त्याला अवगत असल्यामुळे आणि उत्तम खानसामा असल्यामुळे उपयोगाचा माणूस म्हणून सैनिक कुकरला आपल्यात सामावून घेतात. अ‍ॅम्फी डॉक्टर आहे. तो कुकरला मलमपट्टी करतो.
सैनिकांच्या गोळीला बळी पडलेल्याचा भाऊ शाकुरा सूड घ्यायला पुढे सरसावतो. पण मुखिया त्याला थांबवतो. आपलं धर्मस्थळच बळकावल्यामुळे जंगली लोक सैनिकांवर संतापलेले आहेत. पण त्या सैनिकांकडे आधुनिक शस्त्रे- म्हणजेच बंदुका आहेत, त्यांच्याबरोबर जंगली लोकांचा टिकाव लागणार नाही, हे अ‍ॅम्फी त्यांना बंदुकीने पाखराची शिकार करून पटवून देतो. या आदिवासी लोकांनी रागाच्या भरात सैनिकांची मोटारबोट जाळली आहे आणि त्यांच्या त्या कृत्याने कॅप्टनही सूड घ्यायला सज्ज झाला आहे. कुकरच्या गुहेत एक आदिवासी लपून बसला आहे. त्याला पकडलं जातं. कॅप्टनच्या नकळत अ‍ॅम्फी त्याला सोडून देतो. आदिवासींना सैनिकांचा विश्वास वाटावा, हा अ‍ॅम्फीचा त्यामागे हेतू असतो.
कॅप्टन युद्धखोर आहे. या जंगली आदिवासींना नेस्तनाबूत  करण्यासाठी तो आपल्या हाताखालच्या सैनिकांना राबवतो. त्यांना पहाऱ्यावर बसवतो. टेहेळणी करायला लावतो. अ‍ॅम्फीला कॅप्टनचं धोरण पुरेपूर कळून चुकलं आहे. अ‍ॅम्फीला युद्ध नको आहे. शांततेसाठी तो हौतात्म्य पत्करायलाही तयार आहे. सैनिकांना सोडून तो आदिवासी लोकांत जाऊन मिसळतो. एका अडलेल्या बाळंतणीला सोडवतो. अ‍ॅम्फी त्यांचा होतो. प्रत्येक वेळी आदिवासींना लढाई करण्यापासून तो परावृत्त करतो. कॅप्टन आदिवासींवर चाल करून येताना अ‍ॅम्फी पाहतो आणि तो आपल्याकडचा बॉम्ब फेकतो. कॅप्टन पळून जातो, पण त्याच्या बंदुकीच्या गोळीला शाकुरा बळी पडतो. दुसऱ्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा कुणाला अधिकार नाही, ही अ‍ॅम्फीची धारणा असतो. शाकुरा हुतात्मा होतो आणि पूर्वार्धावर पडदा पडतो.
एक साठीतला वृद्ध जंगली मेणबत्तीच्या उजेडात आपली डायरी लिहितोय, वाचतोय- अशा प्रसंगानं हे नाटक उलगडत जातं. नाटकभर अधूनमधून निवेदकासारखा डायरीचा वापर केला आहे. अनाकलनीय जंगली भाषेतलं म्हणणं रूपांतरित करण्याचं, प्रसंग जोडण्याचं आणि युद्धाच्या भीषणतेवर भेदक भाष्य करण्याचं काम हे डायरीवाचन करतं.
रणांगणावर सतत काहीतरी घडत असतं. या नाटकातही सतत काहीतरी घडत राहतं. सततची अ‍ॅक्शन आहे. गोळीबार आहे. धमाका आहे. हत्या आहे. धावपळ आहे. रौद्र नृत्य आहे. आणि जिवावरचे प्रसंगही आहेत. काही प्रसंगांत भावनांचा सहृदय शिडकावा आहे; पण आवश्यक तितकाच. कुठेही नाटक भावविवश होत नाही. आणि या सगळ्या घटनाक्रमात कुठेही हिशेबीपणा जाणवत नाही. सगळेच प्रसंग स्वाभाविकरीत्या एकातून दुसरा उलगडावा तसे उलगडत जातात. नव्हे, गोळी सुटल्यासारखे थडथडत जातात.
आदिवासींची वेगळी भाषा ही नाटककाराची खासच निर्मिती आहे. काहीही कळू न देणारी, पण काहीतरी भयंकर घडतंय असा आभास निर्माण करणारी ही आदिवासींची बोलीभाषा आहे. प्रसंगांच्या गुंफणीतून ती मधूनमधून येते तेव्हा काहीच अर्थ लागत नसल्यामुळे त्या भाषेची गंमतही वाटते. या आदिवासींच्या भाषेने गंभीर विषयावरील या नाटकात क्षणभर रंजकताही निर्माण केलेली आहे.
यातला कॅप्टन तर शिव्यांशिवाय बोलतच नाही. ‘यू बास्टर्ड’ हा तर जणू त्याचा मंत्रच आहे. लाथांनी तुडवल्याशिवाय तो गप्प बसत नाही. सहकाऱ्यांना जरब दाखवणं आणि आदिवासींशी टक्कर द्यायला तयार करणं, ही त्याची कॅप्टनशिप आहे. त्याच्या शिवराळ भाषेमुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला क्रौर्याची आवश्यक ती धार आली आहे. अ‍ॅम्फीची भाषा ही समजूतदारपणाची आहे. सभ्यतेची आहे. युद्धाची निर्थकता पटवून देणारी आहे. ‘शस्त्र वापरणारे शस्त्रांनीच मरतात,’ हे त्याचे सांगणे आहे. युद्धाच्या सर्वात जवळ राहिल्यामुळेच युद्धाची अमानुषता त्याला पुरेपूर पटलेली आहे. ‘माणसांच्या धर्मस्थळांवर आक्रमण करू नका,’ हेही सांगायला तो विसरत नाही. या नाटकातील दोन ओळींमधल्या रिकाम्या जागेतून महासत्तांची युद्धपिपासा आणि म. गांधीजींचा शांततेचा दृष्टिकोन दिसत राहतो.
उत्तरार्धात अ‍ॅम्फी जंगली लोकांबरोबर तह करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना पटवून देतो. डिकी व माइकला ते पटतं. पण कॅप्टन अजिबात त्याच्याशी सहमत होत नाही. अखेरीस नाइलाजाने तो तयार होतो. तहाचे पांढरे निशाण घेऊन येणाऱ्यांपैकी एकाचा बळी कॅप्टन घेतो. त्यामुळे सगळंच फिस्कटतं. जंगली लोक चढाई करण्याची तयारी करतात. ‘अजूनही शरणागती पत्करायला हरकत नाही. हे युद्ध म्हणजे आत्मनाश आहे,’ असं सांगितलं तरी कॅप्टन ऐकत नाही. नाटकाची अखेर नाटककाराने अगदी रोमहर्षक आणि रणरणती रंगवली आहे. टेकाडावरून दिसतंय, की जंगली लोक चाल करून येत आहेत. कॅप्टन बॉम्ब घेऊन टेकाडावर चढतोय. डिकी त्याला जिवाच्या आकांताने मागे फिरायला सांगतोय. डिकीला जगायचंय. कॅप्टन ऐकत नाही. तो बॉम्बची पिन काढतोय हे बघून डिकी त्वेषाने जातो आणि रायफलचं बॉनेट कॅप्टनच्या पाठीत खुपसतो. गुहा थरथरतेय. वरून माती पडतेय. कॅप्टनच्या हातातला बॉम्ब कुठेतरी पडून स्फोट होतो. तितक्यात बोटीवरचा सर्चलाइट येतो. बेपत्ता झालेल्या लोकांना शोधणारी बोट येतेय. इकडे जंगली लोकांचा विजयाचा जल्लोष ऐकू येतोय. ते प्रथमच कॅप्टनसारख्या हुकूमशहाला, क्रूरकम्र्याला पाहताहेत. त्याचं शव न्याहाळताहेत. अखेरीस निवेदक डायरीवाचनातून म्हणतो- ‘तप्त लाव्हारस ओकणारा ज्वालामुखी आता शांत झालाय. युद्धाचा प्रणेता यादवीला बळी गेलाय. युद्ध हे अंती जन्मदात्यालाच गिळणारं निर्दय अपत्य आहे.. प्रत्येक स्फोटागणिक येशूच्या हृदयात होणाऱ्या नव्या जखमेतून उसळणारी रक्तधार विश्वाचं क्षितीज लांच्छित करीत आहे. कुणीतरी सांगेल त्यांना, की- तुम्ही प्रेषिताचा बळी घेतलात; पण आता माणसांना तरी जगू द्या. कुणी सांगेल त्यांना- इथं अजून माणूस जगतो आहे.. अथं मनूस जगन ह!’
नाटकातील प्रसंगांची वीण नाटककाराने अशा कसबाने गुंफली आहे, की प्रत्येक वेळी उत्कंठा व नाटय़ यांच्यात भरच पडत जाईल. वातावरणाचा आलेख चढत चढत अखेरीस कळसाध्याय होतो त्यावेळी प्रेक्षकही सुन्न होतो. हुकूमशहा, युद्धपिपासू वृत्ती, इतरांचे हक्क नाकारणे, यादवी युद्ध, संस्कृती आणि अस्मिता हे घटक विशिष्ट भाषेच्या पलीकडचे असतात. अशा अनेक शाश्वत छटा या नाटकात मिसळलेल्या आहेत.. कुठेही भाषणबाजी वा डोसबाजी न करता.
१९८४ सालच्या राज्य नाटय़स्पर्धेत या नाटकानं सवरेत्कृष्ट नाटय़निर्मितीचं पहिलं पारितोषिक मिळवलं. अन्य पारितोषिके- प्र. ल. मयेकर (सवरेत्कृष्ट लेखन), श्रद्धाकुमार (दिग्दर्शन- द्वितीय), कुमार सोहोनी (सवरेत्कृष्ट नेपथ्य), गिरीधर मोरे (सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना), अरुण नलावडे (अ‍ॅम्फी), उदय टिकेकर (डिकी)- वैयक्तिक अभिनयाची पारितोषिके! अशी एकूण सहा पारितोषिके पटकावणारे हे नाटक ‘संस्था, मुलुंड’ने सादर केलं होतं. या नाटकाच्या घट्ट, बांधेसूद प्रयोगाला प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद मिळाला होता.
स्पर्धेच्या या प्रयोगातील इतर कलावंत- बाजीराव पोपळकर (कॅप्टन), प्रसाद कावले (माइक), मिलिंद गुरव (बॉबी), संजीव कोलते (जॉन कुकर), अरुण वैद्य (जागुरा), नंदकुमार भंडारी (शाकुरा), वर्षां फाटक (आम्रुजा).
पौराणिक नाटकांचा काळ उलटल्यानंतर काल्पनिक ऐतिहासिक नाटकांचा काळ आला. ऐतिहासिक वाटावे असे काल्पनिक पात्रांची गुंतागुंतीची अशी ही नाटके असत. वीर वामनराव जोशी किंवा वासुदेवशास्त्री खरे आपल्या अशा प्रकारच्या नाटकांतून अप्रत्यक्षपणे देशभक्तीची ज्योत जागवीत असत. नाटककारांचा उद्देश त्या काळाला (१९००-१९३०) योग्य असाच होता. पण हा उद्देश बाजूला ठेवला तरी या नाटकांची कथानके जबरदस्त व विविध प्रसंगांनी खचाखच भरलेली असत. प्र. ल. मयेकरांचे ‘मा अस साबरीन’ हे नाटक अशा प्रकारच्या नाटकांची आठवण करून देणारे आहे. या नाटकाचा विशिष्ट असा उद्देश नसला तरी वीररस, करुणरस, प्रणय, उत्कंठापूर्ण प्रसंग, त्यांची विलक्षण गुंतागुंत, रहस्य या सगळ्या घटकांचं अनोखं आणि गुंतवून ठेवणारं मिश्रण म्हणजेच ‘मा अस साबरीन’! अरेबियन नाइट्समध्ये असलेली एखादी कथाच आपल्यापुढे सादर होतेय असा भास हे नाटक पाहताना होतो. काल्पनिक प्रदेश, पात्रांची काल्पनिक नावं, अल्लाची, प्रभूची आठवण, प्रेषिताचे वास्तव्य या सर्वाबरोबरच या नाटकात जादू वा हातचलाखीही आहे. प्रेक्षकांना विचार करायला अवसर न देणारे आणि एकाच जागी खिळवून ठेवणारे असे हे रसायन आहे. नाटककार होण्यापूर्वी प्र. ल. मयेकर हे ‘सत्यकथे’चे कथाकार होते आणि त्यांच्या ‘मसीहा’ या कथासंग्रहातील कथेलाच त्यांनी हे नाटय़रूप दिलेलं आहे.
‘मा अस साबरीन’ म्हणजे ‘जो धीर धरेल त्यालाच अल्ला साथ देईल.’ (हा अर्थ नाटककारानेच पात्राच्या संवादातून प्रकट केला आहे.) माबल हा अडाणी, दुबळा, शोषित समाज. मातृप्रधान समाजव्यवस्था मानणारा. भूमीला तो देवी मानतो. आणि म्हणूनच जमीन नांगरणं हे पाप आहे अशी त्यांची दृढ समजूत आहे. नव्हे, श्रद्धा आहे. समुद्रात मिळतील ते मोती राजाला द्यायचे आणि त्या बदल्यात राजाकडून दाणे घ्यायचे, असा या समाजाचा व्यवहार आहे. अर्धपोटी राहून ही प्रजा शाबल राजाच्या आश्रयाने जगत असते. प्रेषिताचा प्रतिनिधी मसायदा या बेटावर लोकजागृतीचं कार्य करीत असतो. देखणी आणि बुद्धिमान राणी शांबली ही मूर्ख व वेडसर राजा शाबल आणि त्याच्या तरुण मुलाला आपल्या वासनेचे लक्ष्य करते आणि आपले पाप दडवण्यासाठी मसायदला फितूर, राष्ट्रद्रोही ठरवते. अमान हा भुरटा चोर असलेला गारुडय़ाचा पोर मसायदाच्या गळ्यातील अमरत्वाची माळ हस्तगत करण्याच्या इच्छेने बेटावर येतो. तो चमत्कार करून दाखवतो आणि राजा त्याचा मित्र होतो. राणी त्याच्यावर आशिक होते आणि त्याला आपल्या जाळ्यात गुंतवण्याचा प्रयत्न करते. माबल समाजाला अमान हा ईश्वराचा दूत वाटतो. तो माणुसकीची शिकवण देतो आणि प्रजेला राणीविरुद्ध बंड करण्याची प्रेरणा देतो. अमानसह राजघराण्यातील माणसांचा आपसातील विद्वेषी कृत्यांमुळे अंत होतो. नियती माबल समाजाला स्वतंत्र करते.
अनेक कलावंतांना सामावून घेणारी आणि शैलीदार अभिनयाची मागणी करणारी ही कथा दिग्दर्शक नारायण घोसाळकर यांनी सुविहितपणे हाताळली. पात्रांच्या हालचाली, त्यांचे आकारबंध, नेपथ्य, प्रकाशयोजना, कलावंतांचे शब्दोच्चार आणि अभिनयपद्धती या सर्वच बाबतींत योग्य ती जाण ठेवून दिग्दर्शकाने या नाटकाला पूर्ण न्याय दिला.
१९८३ सालच्या नाटय़स्पर्धेत बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ या संस्थेने सादर केलेल्या या नाटकाने सवरेत्कृष्ट नाटय़निर्मितीचे पहिले पारितोषिक पटकावले. नारायण घोसाळकर यांना दिग्दर्शनाचे पहिले, तर अरुण नलावडे (अमान) व माधुरी जोशी (शांबली) यांना उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके मिळाली. या नाटकातील अन्य कलावंत- रमेश कोरगावकर (राजा), अरुण शेलार (मसायदा), गजानन चव्हाण (शिहाद) व इतर.
‘मा अस साबरीन’ म्हणजे एक चित्तचक्षुचमत्कारिक साप-शिडीचा खेळ आहे. वास्तवता किंवा अतिवास्तवतेच्या माऱ्यात सापडलेलं आजचं नाटक अतिपरिचित प्रसंगांमुळे नाटय़ गमावून बसलं आहे. ‘मा अस साबरीन’सारख्या नाटकांमुळे कदाचित हरवलेले ते नाटय़ पुन्हा गवसण्याची शक्यता आहे. म्हणून व्यावसायिक निर्मात्यांनी हे नाटक करून पाहायला हवं. शिगोशिग रंजकता हा या नाटकाचा गुण व्यावसायिक यशाची शक्यता निर्माण करणारा आहे.
जुन्या फॅशन्स दीर्घ कालावधीनंतर परत आल्या की त्या लोकप्रिय होतात असा अनुभव आहे. गेल्या कित्येक वर्षांत कल्पनारम्य नाटक रंगभूमीवर आलेले नाही. ‘मा अस साबरीन’च्या निमित्ताने ते परत आले तर ते लोकप्रिय होऊ शकेल असे वाटते. काहीही असो. वर परिचय करून दिलेल्या दोन नाटकांमुळे नाटककार प्र. ल. मयेकर यांचा व्यावसायिक रंगमंचाचा मार्ग खुला झाला.
एका नाटककाराची ही दोन रूपं कौतुकास्पद आहेत.
विंगेतून : ‘आणि म्हणून अमराठीही!’ (लोकरंग- ७ जुलै) या लेखातील मधु राय या गुजराती नाटककाराचे ‘पान कौर नाके जाके’ हे नाटक हिंदी होते. त्यात नाटककाराने अनेक बोलीभाषांचा वापर केलेला होता. ‘आंतरनाटय़’ या संस्थेने या नाटकाचा हिंदी प्रयोग सादर केला होता. तसेच ‘मी कुमार’ या नाटकाचे मूळ गुजराती नाव ‘कुमारनी आगाशी’ असे होते. ‘ऑथेल्लोचे आव्हान’ (लोकरंग- २३ जून) या लेखात, नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनीही ‘ऑथेल्लो’चे मराठी भाषांतर केले होते व त्याचा प्रयोग साहित्य संघाने केला, हा उल्लेख करायचं राहून गेलं.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2013 1:01 am

Web Title: playwright p l mayekar
टॅग : Natakbitak
Next Stories
1 ‘आणि म्हणून’ अमराठीही!
2 आव्हान ‘ऑथेल्लो’चे!
3 कृष्णसुखात्मिका आणि ‘कृष्ण’विना शोकात्मिका
Just Now!
X