29 October 2020

News Flash

‘विचारभ्रम’र सकल करीतसे..

सध्या अभिनेता आणि अभिनेत्रींच्या चर्चेने माध्यमांचा पडदा आणि पर्यायी बहुसंख्य जनांचे वैचारिक अवकाश व्यापलेले आहे.

उत्तम वक्तृत्व असणारा माणूस हा बुद्धिमान, कणखर, सक्षम वगैरे असतो असा सर्वसामान्यांचा समज होतो.

निशांत मल्हारराव सूर्यवंशी – brandnishant@gmail.com

उत्तम वक्तृत्व असणारा माणूस हा बुद्धिमान, कणखर, सक्षम वगैरे असतो असा सर्वसामान्यांचा समज होतो. तसेच एखादी अभिनेत्री बरी कलावंत आहे म्हणजे तिला इतरही विषयांमध्ये गम्य आहे असेही बहुतेक जण धरून चालतात. तसेच मुखदुर्बळ व सौम्य प्रकृतीची व्यक्ती ही कमी बुद्धिमान आणि अक्षम असते हा गैरसमजही यातूनच प्रचलित होतो. खरे तर असा चुकीचा समज होणे ही लोकांच्या ‘विचारभ्रमित्वा’ची लक्षणे होत. वर्तणूक मानसशास्त्रात ज्याला ‘अभीय  परिणाम’ (हॅलो इफेक्ट) म्हणतात, तो मुख्यत्वेकरून अशा समजाला कारणीभूत असतो.

सध्या अभिनेता आणि अभिनेत्रींच्या चर्चेने माध्यमांचा पडदा आणि पर्यायी बहुसंख्य जनांचे वैचारिक अवकाश व्यापलेले आहे. अभिनेत्रीच्या विधानांवर प्रतिक्रिया देण्याच्या सवंग पोरखेळात अगदी उच्चपदस्थ राजकीय नेतेही सामील झालेले दिसताहेत. मात्र, एखाद्या अभिनेत्रीला अभिनयातील थोडी समज असली म्हणजे तिला सारासार विचारशक्ती असेलच असे नाही. माझ्या मते, तिच्या बौद्धिक वकुबाबद्दल कोणताही संदेह न घेता तिच्या वक्तव्यांना अवाजवी महत्त्व देण्यामागे जितकी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय नेत्यांची लोकानुनयाची चूष जबाबदार आहे, तितकाच कारणीभूत आहे वर्तणूक मानसशास्त्रातील एक परिणाम : ‘अभीय परिणाम’ (हॅलो इफेक्ट)!

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थॉर्नडाइक यांनी १९२० मध्ये ‘अभीय परिणामा’चे प्रतिपादन केले. त्यांनी संशोधनांती असे सिद्ध केले की, एखाद्या व्यक्तीचा एखादा गुण आपल्याला भावला तर त्या प्रभावाचा सकारात्मक, पण अस्थानी परिणाम त्या व्यक्तीतील इतर गुणांच्या मूल्यमापनावर होतो. तथाकथित सौंदर्याच्या निकषांत बसणाऱ्या व्यक्तींबाबत हा परिणाम अधिक ठळक होतो असेही त्यांना दिसून आले. उदाहरणार्थ, एखाद्या आकर्षक स्त्रीचे गाणे इतरांच्या तुलनेत जास्त सुरेल वाटते.. जरी  बाह्य़ सौंदर्याचा आणि आवाजाच्या सुरेलतेचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नसला, तरीही! कारण अभीय परिणाम नेणिवेच्या स्तरावर यासाठी काम करतो. या परिणामामुळेच अभिनेत्रीचे समाजरूढ सौंदर्यचौकटीत बसणारे बाह्य़रूप आणि तिची एखाद्या विषयातील वैचारिक अर्हता यांमध्ये अजाणतेपणी गल्लत होऊन तिच्या मताला अवाजवी किंमत दिली जात असली पाहिजे. अर्थातच याला अभिनेत्रीच्या चेहऱ्याआडून चालविल्या जाणाऱ्या माध्यमकेंद्री राजकीय षड्यंत्राची फूस असते, ही बाब अलाहिदा.

अभीय परिणामाचा अतिशय चलाखपणे वापर करतात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू. लांब दाढी आणि थोडेफार बोलण्याचे कौशल्य असलेली व्यक्ती वैचारिक पातळीवर उन्नतच असते अशी अनेकांची भाबडी समजूत असते. समाजापासून दूर समाधीवस्थेत किंवा साधनामस्त असताना शरीर-मन-भान विसर्जन झाल्याने अथवा काही परिस्थितीजन्य अपरिहार्यतेतून केशसंभार वाढणे स्वाभाविक आहे. पण समाजात राहून पंचतारांकित आणि वलयांकित जीवनशैली जगणाऱ्या या स्वयंघोषित गुरूंनी लांब दाढीला गणवेशाचे रूप दिलेले आहे. विवक्षित पोशाख आणि बाह्य़रूपाद्वारे असे गुरूत्यांच्या भक्तांवर गारूड घालतात. आणि भक्त मुळातच गुंगून जाण्यासाठी येत असल्याने गुरूच्या प्रथमदर्शी बाह्य़प्रभावाने संमोहित होऊन त्याच्या बोलण्यातील छद्मविज्ञान तसेच अतार्किकता ओळखण्याचे वैचारिक भान गमावून बसतात. मानसशास्त्रज्ञ असे मानतात की, जादूगार जादूचे प्रयोग करू शकतो, कारण त्याचे प्रेक्षक मुळातच काहीतरी अतार्किक, जादूमय पाहण्याच्या मिषाने आलेले असतात. त्यामुळे जादूगाराची हातचलाखी त्यांच्या नजरेआड होते. स्वयंघोषित गुरूआणि त्यांच्या भक्तांबाबत काहीसे असेच होत असावे. खरा वैचारिकदृष्टय़ा उन्नत गुरू असे गणवेशाचे, बाह्य़रूपाचे कसलेही अवडंबर न माजवता त्याला आकळलेले जीवनतत्त्व अतिशय तटस्थपणे लोकांपुढे त्यांचे स्वीकार-नकाराचे निवडस्वातंत्र्य कोणत्याही पातळीवर प्रभावित न करता मांडत असतो. याबाबत वानगीसाठी भारतीय तत्त्वचिंतकांच्या मांदियाळीतील महत्त्वाचे तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा दाखला देता येईल.

आणखी एका अभीय परिणामाने सध्या भारतीय समाजमनास ग्रासलेले आहे. तो म्हणजे उत्तम वक्तृत्वकौशल्य असलेली व्यक्ती अभ्यासू, दूरदर्शी आणि निर्णयक्षम असते, हा अपसमज. खरे पाहता भाषणाची पूर्वलिखित संहिता, पाठांतर, मुद्राभिनय आणि देहबोलीचा सराव, आवाजाची अचूक फेक, तसेच जोडीला टेलिप्रॉम्प्टरसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या कुबडय़ा यांच्या साहाय्याने फडर्य़ा वक्तृत्वाचा आभास निर्माण करणे सहज शक्य आहे. मात्र, आपल्या प्रभावी भाषणकौशल्याने भुरळ पाडून लोकाधार आणि निवडणूकपश्चात भक्ताधार मिळालेले नेते निर्णयक्षमतेच्या पातळीवर निष्प्रभ ठरत असल्याची अनेक बोलकी उदाहरणे वर्तमानात अनुभवास येतात. त्यामुळे मोठय़ा सभा गाजवणारे, स्वनियंत्रित माध्यमांद्वारे एकतर्फी संवाद साधणारे नेते अत्यंत खुबीने जिथे स्वत:च्या बौद्धिक क्षमता, विषयाचा अभ्यास आदींच्या मर्यादा अनावृत होतील अशी वादविवादाची, प्रश्नोत्तरांची व्यासपीठे टाळत असावेत.

अभीय परिणामाचा दुसरा आयाम असा की, हा परिणाम नकारात्मक प्रभावदेखील निर्माण करू शकतो. जसे की, मुखदुर्बळ, सौम्य स्वभावाची व्यक्ती कितीही विद्वान आणि चिंतनशील असली तरी तिला जनाधार लाभू शकत नाही, हेही आपण भारतीयांनी अनुभवले आहेच. त्याचबरोबर आंग्लभाषेवर प्रभुत्व असणाऱ्या वृत्तनिवेदकास आपण नकळत वैचारिक सघनता लाभलेल्या पत्रकाराचा दर्जा देतो, हीसुद्धा अभीय परिणामाचीच यथार्थता!

अभीय परिणाम हा एक ‘विचारभ्रम’ (कॉग्निटिव्ह बायस) आहे. ‘बायस’ या शब्दाचे शब्दकोशीय भाषांतर ‘कल अथवा पूर्वग्रह’ असे असले तरी त्यामधून अपेक्षित अर्थवहन होत नसल्याने ‘विचारभ्रम’ हा शब्द उपयोजित आहे. यापेक्षा चपखल शब्द माहीत असल्यास वाचकांनी जरूर कळवावे. अशा प्रकारच्या अनेक विचारभ्रमांवर नोबेल पारितोषिकविजेते वर्तणूक अर्थशास्त्रज्ञ डॅनिअल काहनेमन यांनी अतिशय साकल्याने संशोधन केले आहे. त्यांनी कीथ स्टेनोविक आणि रिचर्ड वेस्ट या मानसशास्त्रज्ञांच्या संकल्पनांचा आधार घेत असे मांडले आहे की, आपल्या मेंदूत विचार नियमन  करणाऱ्या दोन यंत्रणा असतात. यातील यंत्रणा-१ जलद, स्वयंचलित, सहज आणि अनैच्छिक असते. तर यंत्रणा-२ संथ, प्रयासाने कार्यरत होणारी आणि काहीशी ऐच्छिक असते. काहनेमन यांच्या मते, यंत्रणा-१ ही यंत्रणा-२ ला बऱ्याचदा प्रभावित करीत असल्याकारणाने विचारभ्रम निर्माण होतात. उदाहरणार्थ, तुम्हाला विचारले, एक पेन्सिल व खोडरबर यांची एकत्रित किंमत १ रुपये १० पैसे आहे आणि पेन्सिलची किंमत रबरापेक्षा १ रुपयाने जास्त आहे, तर रबराची किंमत किती? तर बहुश: याचे तात्काळ उत्तर ‘१० पैसे’ असेच असेल. पण हे उत्तर चुकीचे आहे. कारण थोडे गणित मांडले तर कळून येईल की, योग्य उत्तर ‘५ पैसे’ आहे. परंतु अंत:प्रेरणेच्या जोरावर जलद प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा-१ ला ‘१० पैसे’ हे उत्तर सयुक्तिक वाटते. आणि या उत्तराचा जात्याच आळशी असलेली यंत्रणा-२ स्वाभाविकपणे स्वीकार करते आणि एक विचारभ्रम साकारते.

विचारदुष्टतेपेक्षा विचारभ्रम अतिशय सूक्ष्म असतात. कारण विचारभ्रमात आपण अतिशय योग्य आणि तार्किक विचार करत आहोत अशी मेंदूतील यंत्रणा-२ ची नि:संदेह समजूत यंत्रणा-१ करून देत असते. जसे की, सोबतच्या चित्रात प्रसिद्ध मुल्लर-ल्येर दृष्टिभ्रम दाखविला आहे. यामधील दोन्ही आकृतींतील समांतर रेषा समान लांबीच्या आहेत; पण पट्टीच्या साहाय्याने मोजल्याशिवाय आपल्यापैकी अनेकांना याची खात्री पटणार नाही. अशा दृष्टिभ्रमासारखेच अनेक विचारभ्रम आपल्या वैचारिक संवेदनांमध्ये अध्याहृतच असतात. अगदी विचारवंतांची, संशोधकांची, इतिहासकारांची, पत्रकारांची, लेखकांचीसुद्धा यामधून सहजी सुटका नाही. विशेषत: अलीकडेच प्रशांत भूषण यांना सुनावलेल्या दंडात्मक शिक्षेला दिलेला विकल्प पाहता न्यायाधीशदेखील विचारभ्रमग्रस्त आहेत असे म्हणावयास प्रत्यावाय नाही. परंतु न्यायालयीन अवमानाच्या संदिग्ध, धूसर मर्यादेविषयीचे माझे ज्ञान सीमित असल्याने यावर अधिक भाष्य करीत नाही.

काहनेमन यांनी मांडलेल्या सर्वच विचारभ्रमांबद्दल विस्तारभयास्तव इथे लिहिता येणार नाही; पण बहुसंख्यांना बाधित केलेला आणखी एक सांप्रतकालीन विचारभ्रम म्हणजे- ज्या गोष्टी आपल्याला समजतात, त्या खऱ्याच असतात अशी ठाम धारणा! परंतु सत्य हे अतिशय गुंतागुंतीचे आणि आपल्या वैयक्तिक आकलनक्षमतेच्या परिघाबाहेरचे असू शकते असा पुसटसाही विचार अनेकांना स्पर्शत नाही. त्यामुळे मूलत: जटिल असलेल्या प्रश्नांची सोपी, पण चमकदार शब्दांतील उत्तरे देऊन या विचारभ्रमाचा अतिशय बेमालूम फायदा राज्यकर्ते उठवतात. आणि सर्वसामान्य जनतेचा अशी विधाने त्यांच्या आकलनकक्षेत असल्याने त्यावर लगेचच विश्वासही बसतो. जसे की, चीनच्या गुंतवणूक धोरणाची व आंतरराष्ट्रीय व्यापाराची सांगोपांग समज नसलेल्या अनेकांची ‘चिनी मालावर अथवा काही फुटकळ अ‍ॅप्सवर घातलेली बंदी म्हणजे चीनविरुद्ध उचललेले कठोर पाऊल आहे’ अशी गंभीर समजूत होते. या विचारभ्रमाचा गैरफायदा घेण्यासाठी राजकीय पक्ष सत्याची मोडतोड तसेच त्याचे सुलभीकरण आणि काही प्रमाणात अपभ्रंश करून संदेश प्रसृत करणारी यंत्रणा राबवतात आणि मग असे संदेश व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठीय स्नातक इमानेइतबारे पुढे ढकलीत असतात.

विचारभ्रमांवर इतकं सविस्तर लिहिण्यामागचा हेतू कोणाही नेत्यावर अथवा गुरूवर वैयक्तिक टीका करून कोणाचीही श्रद्धास्थाने दुखवण्याचा नसून, आपल्या मेंदूतील विचारयंत्रणेतील फटी आणि त्यांचा अवाजवी फायदा उठवणाऱ्या बाह्य़ यंत्रणा यांविषयी सजग करण्याचा आहे. माहितीच्या महापुरामुळे भंजाळलेल्या समाजमाध्यमपतित अनेकांच्या मेंदूला सततची तात्काळ उद्दीपनाची आस, आकुंचित पावलेली अवधानक्षमता आणि स्मृतिऱ्हास या तीन विकारांनी ग्रासलेले आहे. परिणामत: मेंदूतील यंत्रणा-२ ही पूर्णत: यंत्रणा-१ च्या कह्य़ात गेलेली आहे. या साऱ्यामुळे आपली एकंदरीत संवेदनक्षमताच दिवसागणिक विकलांग होत आहे. इतकी, की एका घरकाम करणाऱ्या महिलेचा अठराशे रुपयांचा हिशोब जुळवताना झालेल्या प्रासंगिक गोंधळाची ध्वनिचित्रफीत विधिनिषेधशून्यतेने एकमेकांस समाजमाध्यमांवर पाठवताना एखाद्याचे अज्ञान हा कुचेष्टेचा विषय होऊ शकत नाही, असा आदर्श विचार करणे तर सोडाच; पण त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय असे करणे म्हणजे तिच्या खासगीपणावर अतिक्रमण केल्यासारखे आहे, याचेही वैचारिक भान सुटणे हे केवळ विदारकच नाही, तर पराकोटीचे भयावहही आहे. समाजमाध्यमे त्यांचे अर्थकारण चालण्यासाठी वापरकर्त्यांचा क्रमश: तारतम्यलोप घडवून त्यांना ‘जे जे खासगी, ते ते सार्वजनिक’ करण्याचे व्यसन लावीत आहेत. विचारभ्रमाचे एक अभ्यासक रॉल्फ डबेली यांच्या मते, विचारभ्रमांबद्दल जितके आपण सजग होऊ तितका त्यांचा प्रभाव कमी होतो. म्हणजे या लेखाच्या वाचकांवर यापुढे कदाचित अभीय परिणाम काम करणार नाही, कारण तो त्यांच्या मेंदूतील यंत्रणा-२ ला आता ज्ञात झालेला आहे. त्यामुळे आपण बुद्धिमांद्य झटकून अधिकाधिक विचारभ्रम हे प्रयासाने जाणिवेच्या प्रतलावर आणणे गरजेचे आहे. अन्यथा विचारभ्रमित अवस्थेतून विचारभ्रष्ट अवस्थेकडे अटळपणे चाललेला आपला प्रवास अधिक गतिमान होईल आणि सर्व स्तरांवर विस्कटलेल्या भविष्याची कारणमीमांसा तुकारामांच्या ओळीची पुनर्जुळणी करून करावी लागेल..

‘विचारभ्रम’र सकल करीतसे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 4:14 am

Web Title: psychology communication skills halo effect dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : विचित्र, विक्षिप्त आणि बंडखोर
2 इतिहासाचे चष्मे : पवित्रतेच्या इतिहासाची मीमांसा
3 पडसाद : पंचमदा आणि पाश्चात्त्य सुरावट
Just Now!
X