News Flash

रफ स्केचेस् : अरण्य

माझी एक पंचाईत तुम्ही लक्षात घ्यावयास हवी. मला फोटोजनिक मेमरी आहे

रेखाचित्र : अन्वर हुसेन

सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.com

ओतूरमध्ये माझ्या वडिलांना सर्व जण ‘डॉक्टर’ म्हणायचे. आम्ही भावंडं त्यांना ‘काका’ म्हणायचो. १९३५ सालच्या सुमारास त्यांनी दवाखाना उघडला. ते त्या पंचक्रोशीतले पहिलेच डॉक्टर होते. ते बैलगाडीतून नद्या, जंगलं पार करीत आसपासच्या खेडय़ांत व्हिजिटला जायचे. त्यांच्या हाताला गुण होता.

ओतूरच्या भोवती सह्यद्री पर्वताचं अद्भुत रूप एकवटलं आहे. कळसूबाई, हरिश्चंद्रगड, शिवनेरी ही तर माहीत असलेली शिखरं; पण अजूनही मनुष्यजात पोहचली नाही अशा आणे माळशेजच्या आसपास दऱ्या, गुहा आहेत. त्यावेळी वीज, रस्ते नव्हते. आड, विहिरी, मोठे अंधारे वाडे, तळघरं घेऊन ही खेडी वसलेली होती. वेशीपलीकडे गर्द जंगलं आणि त्यात राज्य करणारे बिबळे, कोल्हे होते. घरात गुळाच्या ढेपीवर ताव मारणारी उदमांजरं होती. गारांचा पाऊस, विजांच्या कडकडाटात हे गाव असे. खुंटीवरची कोट-टोपी घालताना झटकून घ्यावी लागे. सहजतेने दोन-चार विंचू बाहेर पडत असत. देवळाच्या गाभाऱ्यात हमखास दोन-तीन साप, त्यांची पिल्लं असत. डोहात हिरवे विरोळे फिरत असत. ऋतूप्रमाणे भोवतालच्या टेकडय़ांवर पिवळ्या नाजूक फुलांची चादर पसरलेली असे. घराच्या छपरांवर पिंगळे, कोनाडय़ातल्या चिमण्या, आंब्यांनी लगडलेल्या आमराया.. पहाटे देवळातली टाळ-एकतारीत मिसळलेली भजनं चालू असत. भिंतीवर, अंगणात, सडय़ावर काढलेल्या रांगोळ्या, माजघरात लटकलेले कंदील, देवघरातल्या समया आणि झाडापाशी गरम पाण्याचे बंब असत. बिबळ्यानं कुत्रं मारलं, शेतात डुकरांनी धुडगूस घातला, संभुसाच्या गाईला बछडा झाला, नथूच्या पोराला साप डसला.. अशा बातम्या आपोआप पसरत. गावामध्ये रेडिओ, वर्तमानपत्रं नव्हती. असं असूनही हे माझं गाव, त्याच्या आसपासची खेडी लिंबाच्या, पिंपळाच्या, वडांच्या सावल्यांमध्ये नामाच्या गजरात सह्यद्रीशी एकरूप झालेली होती.

 

काका व्हिजिटला गेले की परतायला बहुतेक रात्र व्हायची. वाडय़ाच्या दगडी ओटय़ावर माझी आई इंदुताई आम्हाला घेऊन बसायची. काका सुखरूप येवोत म्हणून उंबरठय़ावर ती फुलपात्र पालथं घालून ठेवायची.

त्यावेळी ती गोष्ट सांगायची : ती लग्न करून दोन नद्या पार करून, बैलगाडीतून येथे सासरी आली तेव्हा वडाच्या मोठमोठय़ा झाडांच्या रांगा रस्त्यावर असायच्या. आजूबाजूला जंगलं होती. भर दुपारी उन्हं जमिनीवर पोहचायची नाहीत. सूर्य डुबल्यावर सारं अंधाराचं राज्य असायचं. जंगलातून नानाविध श्वापदांचे आवाज वाडय़ापर्यंत पोहचत. अशा अवस्थेत काका सुखरूप पोहचतील का, याची काळजी तिला असायची. आकाशातल्या नक्षत्रांच्या गोष्टी ऐकताना आम्ही पेंगत असू. मग अचानक दुरून बैलगाडीच्या चाकांचा, बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज येई. बैलगाडीला लटकवलेल्या कंदिलांचे हलते प्रकाश अंधारातून जवळ येताना दिसले की वाटायचे, काका आले.. आणि आम्ही झोपी जायचो. मी जंगलातून चाललो आहे अशी स्वप्नं मला पडायची. अजूनही कधीमधी पडतात.

दुपारी बाराच्या सुमारास वाडय़ाच्या दरवाजाबाहेर एक संन्यासी माधुकरी मागायला येत असे. तो चार-पाच घरं हिंडून वेशीबाहेरच्या जंगलाशेजारी असलेल्या धर्मशाळेकडे जाई. मला त्याचं आकर्षण होतं. मी एकदा त्याचा पाठलाग करीत गेलो. तो धर्मशाळेबाहेरच्या झाडाच्या सावलीत माधुकरी खात होता. त्याच्या भोवती जमलेल्या कावळ्यांना तो घास टाकीत होता. त्यानं माझ्याकडे दुरून पाहिलं आणि मला भीती वाटली. ती दुपार, तो संन्यासी, त्या पाठीमागचं जंगल.. सारं स्तब्ध. मी पळत घरी आलो. मला कशाची भीती वाटली? संन्याशाची की पलीकडच्या अनोळखी जंगलाची? त्याची  उत्तरं माझ्यापाशी नव्हती.

सदा डुम्बरे हा माझा एकुलता एक मित्र त्या गावात होता. सदा आणि मी संध्याकाळी पलीकडच्या देवीच्या देवळापाशी फिरायला जायचो. तेथे गर्द आमराई होती. आंब्याच्या एका झाडाची फांदी अगदी जमिनीला टेकली होती. आम्ही त्या फांदीवर बसून गप्पा मारीत असू. सदा खूप वाचत असे, शाळेत भाषणं करीत असे. तोच मला गोष्टी सांगत असे. कधीतरी आम्ही नदीपलीकडच्या सुटुंबा टेकडीवर जात असू. मला ती टेकडी अजूनही आवडते. उन्हाळ्यात ती जेव्हा पिवळं गवत पांघरत असे, तेव्हा ती पाय पसरून गावाकडे बघत राहणाऱ्या ढाण्या वाघासारखी दिसे.

मी अनेकदा तात्या माडगूळकर आणि जयंतराव टिळकांबरोबर सिंहगडावरील टिळकांच्या बंगल्यात रात्री मुक्कामाला असे. त्याकाळी सिंहगडाचा रस्ता जंगलातूनच जायचा. रात्री रानातल्या त्यांच्या शिकारीच्या कथा ऐकायला मिळायच्या. मला बंदूक कशी धरावी, जपावी हे त्यांनीच शिकवलं होतं. मी कधी शिकार केली नाही. त्या दोघांनीही त्रास देणारी डुकरं सोडली तर इतर प्राण्यांच्या शिकारी केल्या नाही. ‘वीरधवल’, ‘कालिकामूर्ती’ अशा कादंबऱ्यांतील जंगलांची वर्णनं वाचून नकळत लहानपणापासूनच जंगलांबद्दलचं माझं कुतूहल अधिक गडद होत गेलं.

शाम घाणेकरची माझ्या आयुष्यात अचानक एन्ट्री झाली. तीही टिळक रोडच्या ‘उदय विहार’ या छोटय़ा, चहापाणी, सिग्रेटी, टवाळकीसाठीच्या अड्डय़ावर. शामचे डोळे भुरे होते. तो अचानक मित्र झाला. उन्हाळ्यात तो कोकणातल्या कुठल्यातरी त्याच्या नातेवाईकाच्या गावाला मला घेऊन गेला. मला गावाचं नाव ठाऊक नाही. माझी एक पंचाईत तुम्ही लक्षात घ्यावयास हवी. मला फोटोजनिक मेमरी आहे; पण गावं, रस्ते, माणसांची नावं माझ्या स्मरणात राहत नाहीत. फक्त मला भावलेलं दृश्यमान अनेक वर्षांनी मला तंतोतंत आठवतं. तर- ते कोकणातलं गाव जरी नारळ माडांनी भरलेलं होतं, तरी प्रचंड गरम होतं. घामाच्या धारा लागल्या होत्या. गावातली एक छोटी गल्ली.. त्याला लागून नारळ, कुंकू, उदबत्त्यांची, हारांची दुकानं होती. पुढे कोठेतरी देवालय होतं. भटक्या देवाच्या गाई उन्हात फिरत होत्या. दूर कोठेतरी समुद्र असावा असा अंदाज होता. नातेवाईकांचं टिपकल घर, झोपाळ्यावर बसलेला त्रासिक चेहऱ्याचा माणूस, विटलेल्या संसाराला कंटाळलेली दारात उभी कुणीतरी स्त्री असं दृश्य होतं. पाणी पिऊन शामने मला घराबाहेर काढलं. चालत गावाबाहेर पडलो. पुढे बांधलेली, आटलेल्या पाण्याची एक घळ आणि त्यापलीकडे गर्द मोठय़ा हिरव्यागार झाडीचा भलाथोरला तंबू. ‘‘ही देवराई!’’ शाम म्हणाला. त्याला मला इथं का घेऊन यायचं होतं? पण मी म्हणतो तसं- आयुष्यात कधी काय घडेल याचा भरवसा नाही.

माझ्या छोटय़ा आयुष्यात अनेक माणसांबरोबर भेटीगाठी झाल्या. मला एक डिरेक्शन मिळाली, शिक्षणं मिळाली; पण एक खंत देवराईत शिरताना जाणवली, ती म्हणजे ‘देवराई’ ही संकल्पना रुजवणाऱ्या त्या जाणत्या पुराणपुरुषांना मला भेटता आलं नाही. कोण होते ते? या पृथ्वीचा, मानवजातीचा, पर्यावरणाचा, जातपात-धर्म- अंधश्रद्धा यापलीकडचा भविष्यकाल जाणून त्यांनी सहजतेने ही कल्पना या पृथ्वीवर रुजवली. हजारो वर्ष झाली ती अस्तित्वात आहे. हे शास्त्रज्ञ? मनोवैज्ञानिक? की अद्भुत शेतकरी? की भूमीचे रक्षण करणारे हे ऋषीमुनी?

देवराई सर्वासाठी एक गाभारा आहे. बाहेरच्या त्रासांच्या भगभगाटातून येथे विसाव्याला यावं. येथे ठरावीक पूजा नाही. मनाच्या तळाशी घेरून जाणारा शांत गारवा आहे. आचार नाहीत, तर वृक्षांच्या समूहमौनांच्या सावल्यांचा अंगभर फिरणारा मऊ स्पर्श आहे. मी पाहिलं, शाम झाडांना स्पर्श करत फिरत होता. जाताना परत त्याच्या त्या नातेवाईकांच्या घरी निरोप घ्यायला गेलो. आणि गंमत म्हणजे मला ते त्रासिक जाणवले नाही. शाम एकदा ट्रेकिंगला गेला असताना कडय़ावरून खोल दरीत कोसळून नाहीसा झाला. जाता जाता ‘देवराई’ नावाचं जन्मभर पुरेल असं बक्षीस मला देऊन गेला.

पुराणात लिहिलं आहे, खरं ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला अरण्यात जावं लागेल.

मला जंगलातले प्राणी वगैरे पाहण्यात अजिबात रस नव्हता. अथवा टुरिस्ट म्हणून सफारीही करायची नव्हती. पशुपक्षी, प्राणी, आदिवासी, प्रचंड वृक्ष, वेली, झरे, धबधबे, नद्यांसह जंगल बनतं. प्रत्येक जंगलाची वृत्ती, चेहरा वेगळा असतो. ऋतुचक्राप्रमाणे तो बदलतो. मला जंगलाचा फक्त अनुभव घ्यायचा होता.

‘झेन फ्लेश, झेन बोन्स्’ नावाचं एक छोटुसं झेन-कथांचं पुस्तक माझ्या हाताशी आलं. ग्रामायनच्या वसंतराव देशपांडे यांनी मला ते भेट दिलं होतं. त्यात एक कथा आहे : गुरुजींनी शिष्यास सांगितलं, इथलं तुझं शिक्षण पूर्ण झालं. आता तू अरण्यात जा आणि ज्ञान घेऊन तीन वर्षांनी भेटायला ये. शिष्य अरण्यात जातो. थोडय़ा दिवसातच त्याला बैलाच्या हुंकारण्याचे आवाज ऐकू येतात. कधीतरी मोठय़ा फांद्या तुटलेल्या दिसतात. चिखलात त्याच्या खुरांचे भलेमोठे ठसे दिसतात. कधीतरी गर्द झाडीत त्याच्या शिंगाने धडक मारण्याची चाहूल येते. तर अधूनमधून त्याची दमदार उधळलेली शेपूट दिसते. तरीही तो तपाला बसतो. काही दिवसांनी बैलाची चाहूल लागत नाही. तीन वर्षांनी परतल्यानंतर गुरुजी विचारतात, ‘‘अरे, अरण्यात बैल पाहिला का?’’ शिष्य म्हणतो, ‘‘नाही. अरण्यात बैल नव्हताच. तो माझ्या मनात होता.’’ गुरुजी त्याच्याकडे पाहत स्मित करत म्हणतात, ‘‘बैस. आता खरा अभ्यास सुरू करू.’’

मेळघाटात मी मारोतराव चित्तमपल्ली आणि तात्या माडगूळकरांबरोबर सामील झालो खरा; पण मला ज्ञान, अनुभूती वगैरे काही मिळवायचं नव्हतं. मेळघाटातल्या अनेक वस्त्या या प्रकल्पासाठी उठवल्या होत्या. मधेच काही नद्याही कोरडय़ा पडल्या होत्या. मारोतरावांची कल्पना अशी की, आपण तेथे उरलेले काही अवशेष, झालेले बदल यावर काम करू! मारोतराव म्हणजे या अरण्याचे स्वामी, तात्या म्हणजे बारीकसारीक अनुभवांचे जाणकार आणि मी म्हणजे सारी स्केचेस करणे व त्यावर एक पुस्तक करणे, हा इरादा. प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे होते. माझा जे मिळेल त्याचा स्वीकार करून आनंद लुटायचा.. हा एक खासगी मुद्दा होता.

देवराईपेक्षा या मेळघाटचा चेहरा, आवाका फार मोठा होता. हत्ती बुडेल एवढं गवत, अनेक उंच डोंगरांच्या रचनेनं तयार झालेला भूलभुलैया, एका टेकडावर असलेलं एकमेव जुनं रेस्टहाऊस, त्यातला वायरलेस आणि एक खानसामा. आसपास दूपर्यंत वस्ती नाही. माणसं नाहीत. पाळीव गाई, म्हशी नाहीत. सारं सररिअ‍ॅलिस्टिक पेंटिंगसारखं. आकाश, जमीन, दिशांचा संबंध तुटलेलं हे अरण्य. इथे हॅट, गॉगल, वॉटर बॅग, जीप्समधून फिरणारे, उगीचच प्राणी बघून आ करणारे टुरिस्टही नाहीत. इथे पुढे काय, मागे काय, याचा पत्ता नाही. पत्ता विचारायला जनावरंही नाहीत. स्थितप्रज्ञ असतं हे अरण्य!

प्रात:काली आम्ही बाहेर पडलो. तात्या नेहमीच अपटुडेट असायचे. मी माझं स्केचबुक आणि शहरी बूट घालून निघालो. गप्पा मारीत, निरीक्षण करीत दूर गेल्यावर मला कळलं की मी एकटाच चालत आलो आहे. ते दोघं कुठेतरी वेगळ्या दिशेने वळले असावेत. काही हरकत नाही. परत वळून रेस्टहाऊसला जाऊ असं मनात आलं. काही वेळ गेला खरा; मी एका ढोली असलेल्या झाडाखाली उभा होतो. खालची जमीन थोडी ओलसर होती. पूर्वेचा सूर्यप्रकाश जसा येतो तसं अरण्य वेगळं दिसू लागतं. मावळतीच्या प्रकाशात त्याचा चेहरा परत वेगळंच रूप धारण करतो. या छायाप्रकाशात भास-आभासांचे खेळ येथे चालूच असतात. मी परत निघालो तेव्हा मला जाणवलं की, त्या गर्द अरण्यातून माझ्याकडे कोणीतरी पाहतं आहे. मन अस्थिर झालं असलं की हे भ्रम अधिक खरे वाटू लागतात. मी दीर्घ श्वास घेतला. थांबलो. तरीही वाटलं, खरंच कोणीतरी माझ्याकडे पाहतं आहे. मला या स्थितीची थोडीफार सवय होती. मी चक्क खाली बसलो. हातातलं स्केचिंग पॅड दूर ठेवलं. तो भाग छोटय़ा दगडगोटय़ांचा होता. बहुधा तिथं पूर्वी नदी असावी. मी डोळे मिटले. कान टवकारले. लक्षात आलं, माझ्याकडे शस्त्र नाहीये. पळायचं तर चांगले बूट नाहीत. मी डोळे उघडले. दोन-चार गोटे हातात घेतले आणि पाहिलं तर समोरच्या फांदीवर मोठं घुबड बसलं होतं आणि माझ्याकडे पाहत होतं. त्याच्या आकारावरून ते हुमाघुबड असावं असा माझा अंदाज! बहुतेक मी ज्या झाडापाशी उभा होतो त्या झाडावर त्याची पिल्लं असावीत. मी बिनधास्त चालू लागलो तसं ते फेरी मारून परत माझ्यासमोरच्या फांदीवर येऊन बसे. त्याचं मान गोलाकार फिरवणं, तोंडातून केसांचा गोळा काढणं, मध्येच घशातून आवाज काढणं आणि माझ्याभोवती घिरटय़ा घालणं.. हा खेळ जसा वाढत गेला तसा मी चालत एक टप्पा गाठला. तेथून टेकडावरचं रेस्टहाऊस दिसत होतं. मी बसलो. पूर्ण श्वास घेऊन एका दमात पळत सुटलो. माझ्यामागे ते हुमाघुबड मोठे पंख पसरून डोक्यावरून पाठलाग करीत होतं. खानसाम्यानं हे पाहिलं असावं. तो दरवाजा उघडून उभा होता. मी धापा टाकत आत शिरलो तसा त्यानं दरवाजा बंद केला. पुढचे दोन-तीन दिवस रेस्टहाऊसच्या समोरच्या झाडांवर ते घुबड आवाज काढत बसत असे. मारोतरावांनी हा किस्सा ऐकला व म्हणाले, ‘‘बहुतेक त्यानं पिल्लासाठी हे केलं असावं.’’

किर्लोस्कर प्रेसमध्ये मी गेलो असताना संपादक महाबळ म्हणाले, ‘‘अरे, एकदा  झाडावरून पिंगळ्यांचं पिल्लू खाली पडलं होतं. माझ्यात किडा असल्याने मुलाला खेळायला म्हणून मी पिशवीत घालून ते पिल्लू घरी आणलं. माझ्या घरात पिंजऱ्यात पोपट होताच. मी जसं पिंगळ्याचं पिल्लू घरात आणलं तसा तो मिठू पोपट पंख फडकवायला लागला. त्याने शीर्षांसनच केलं. पिंगळ्याला मी नवीन पिंजरा आणला. पोपटाला झाकून ठेवलं. संध्याकाळ झाली की हे पिल्लू घशातून आवाज काढीत असे. आणि मला समजलं की बाहेरच्या बागेतल्या झाडांवर दोन पिंगळे तसाच आवाज काढीत त्याला शोधत आले होते. शेवटी मी ते पिल्लू सोडून दिलं. त्याला आई-बापांपासून दूर करण्याचं पातक उगाच कशाला? आपल्या पिल्लांसाठी हे अरण्यातले आई-बाप सारं आयुष्य पणाला लावतात.’’

दिवसाचा पडदा पडला की अरण्यात रात्रीचा दुसरा अंक सुरू होतो. संध्याकाळ होताना अरण्य हळूहळू आपला चेहरा बदलतं. समोरचं झाड, पिवळं गवत तेच आहे का असे प्रश्न सुरू होतात. सारं कॅमॅप्लाज व्हायला लागतं. बॅकग्राऊंडला माकडं, मोर, पक्षी यांचं पार्श्वसंगीत सुरू होतं. हे सिग्नलिंग असतं. म्हणजे राजा बाहेर पडला आहे, काळजी घ्या. या वाघाची एवढी जरब मी कोठेही पाहिली नाही. त्यानं केलेली गाईची शिकार मी प्रत्यक्ष पाहिली आहे. त्याचा रुबाब, त्याची ताकद, त्याची चपळता पाहिली की आपण किती थिटे आहोत हे जाणवतं.

जंगलातल्या रात्रीचं सौंदर्य मला मारोतरावांनी दाखवलं.. ते म्हणजे अर्जुनाचं झाड. या झाडाच्या सालीचा रंग ऑइल पेंट लेपावा तसा लाल असतो. जसं ते वयात येतं तशा साली गळून पडतात आणि ते शिंपल्यासारखं संगमरवरी शुभ्र चकाकायला लागतं. त्याच्या या साली अत्यंत औषधी असतात. कोरकूंच्या आदिवासी वस्तीवर आम्ही एका रात्री निघालो. चंद्र आकाशात होता. आणि त्या धूसर अरण्यात एकाएकी एखादी बॅले डान्सर उभी असावी तसा हा वृक्ष चकाकत उभा होता. आदिवासींच्या या अंधारातल्या खुणा आहेत. त्यामुळे वस्तीत परतताना ते चुकत नाहीत. होळीअगोदर कोरकू आपली जुनी घरं पाडून बांबू आणि चिकणमातीत ती घरं परत बांधतात. ती कलात्मक असतात. चिकणमातीच्या भिंतीवर ते वेली काढतात आणि त्यांच्या टोकांवर फुलं म्हणून छोटे आरशाचे तुकडे चिकटवतात. त्यांच्या घरांसमोर गोऱ्यापान गवळ्यांची, गवळणींची वस्ती असते. ते डोक्यावर मोरपीसं लावतात. त्यावर सविस्तर पुन्हा कधीतरी लिहीन.

वायनाडच्या अरण्यात हत्तींचे कळप राहतात. तिथं मी माझ्या एका मित्राकडे राहत होतो. त्याने एक अजब गोष्ट सांगितली. हत्तीचं मरण हत्तीला समजतं. ते जेव्हा जवळ येतं तेव्हा तो पाऊल न वाजवता कळप झोपला असताना, त्यानेच लहानपणी शोधून ठेवलेल्या गुप्त जागेवर जातो. तेथे उभा राहून तो शांतपणे प्राण सोडतो. हे इच्छामरण या अरण्यातला एक नियम असावा. अरण्य हे सिंबायोसिस आहे. येथे खूनखराबा नाही. पोट भरलं असताना शिकार होत नाही. आणि मला एक जाणवतं, ते हे की, ते सर्वाना जगण्याची इजाजत देतं. ते विश्रांतीही घेतं.

मागच्या वर्षी मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत देवराईवर माझं मोठं प्रदर्शन झालं होतं. त्या पेंटिंग्जमध्ये हेच अरण्यांचे भास-आभास आहेत. सत्य-असत्यात गुंतलेल्या जंगलातील पाऊलवाटा आहेत. चित्र पाहताना अरण्यात जसं वाटतं, की तुमच्याकडे कोणीतरी पाहत आहे असे भासही आहेत. संत-शिष्यासारखा मलाही तेथे कधी बैल दिसला नाही, हे खरं आहे. तसंच आईनं लहानपणी सांगितलेल्या जंगलातल्या गोष्टींचे पुरावेदेखील त्यात आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:35 am

Web Title: rough sketches subhash awchat article on paintings zws 70
Next Stories
1 अरतें ना परतें.. : बहिऱ्यामुक्यांची दिंडी
2 मोकळे आकाश..: टोल की टाळाटाळ :
3 अंतर्नाद : डमरू  हर कर बाजे..
Just Now!
X