19 January 2019

News Flash

आफ्रिकन समाजमनाचं करुण आक्रंदन

उमेश कदम हे प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव. त्यांनी प्रशासकीय नोकरीच्या निमित्तानं आफ्रिका खंडातील विविध देशांमधून जी स्वैर नि डोळस भटकंती केली, त्यादरम्यान आलेल्या

| September 21, 2014 01:12 am

उमेश कदम हे प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव. त्यांनी प्रशासकीय नोकरीच्या निमित्तानं आफ्रिका खंडातील विविध देशांमधून जी स्वैर नि डोळस भटकंती केली, त्यादरम्यान आलेल्या अनुभवांतून, जिज्ञासू निरीक्षणांतून ‘शापित भूमी’ हा कथासंग्रह साकारला आहे. सत्यघटनांवर आधारित हा संग्रह आफ्रिकन भूमीचा गुलामगिरी, युद्धे, हिंसाचार यांनी माखलेला काळाकभिन्न इतिहास कथन करतो.  
सतराव्या-अठराव्या शतकांदरम्यान आफ्रिका खंडात असलेली अफाट खनिजं व निसर्गसंपत्तीच्या लालसेपोटी पाश्चात्त्यांनी तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यासाठी तिथल्या कृष्णवर्णीय जनतेला गोऱ्या राज्यकर्त्यांनी गुलामगिरीच्या जोखडात जखडलं. अनन्वित छळ नि अत्याचाराचं तांडव माजवून स्वत:च्याच भूमीत त्यांना उपरं केलं. अशातच देशांतर्गत सत्तांध राजकीय नेत्यांनी वंश-वर्णभेदाला खतपाणी घातलं नि यादवी युद्धांना, बंडाळीला व बेसुमार मानवी संहाराला तोंड फुटलं. एकीकडे भीषण दारिद्रय़, कुपोषण, रोगराई यांचा विळखा, तर दुसरीकडे चिघळत चाललेलं वंश-वर्णभेदाच्या विद्वेषाचं राजकारण- या धगीत आफ्रिकन जनता पार होरपळून निघाली. आजमितीस ही धग काहीशी थंडावली असली तरी पुरती विझलेली नाही. त्याचा प्रत्यय या संग्रहातून येतो.
आफ्रिकन जनतेनं भोगलेला हा सगळा दाहक इतिहास आणि आजचं अस्वस्थ, अराजकी वर्तमान कथांच्या माध्यमातून चित्रित करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. याकरता आवर्जून या देशाच्या राजकीय, ऐतिहासिक घडामोडी अभ्यासून त्याला अनुभवाची, ऐकलेल्या वा वाचलेल्या सत्य घटनांची कल्पक डूब देऊन या कथा घडवल्या आहेत. त्यायोगे आफ्रिकन समाजमनाचं करुण आक्रंदन कथारूपात व्यक्त होताना जाणवतं.
आफ्रिकेच्या वेगवेगळ्या प्रांतात घडलेल्या तत्कालीन घटनांचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक स्तरावरील अगदी बारीकसारीक तपशील लेखकाने तितक्याच सूक्ष्म संदर्भासकट या कथांमधून जागोजागी पेरलेले दिसतात. परिणामी या कथांना बरीच आशयसंपृक्तता प्राप्त झाली आहे. त्यातून आफ्रिकन समूहजीवनाचे अनेक अनभिज्ञ पैलू उलगडत जातात. उदा. सुदान व युगांडाचा स्वातंत्र्यलढा, सुदानमधील डिंका, नुयेर, झागवा इ. जमाती, रुवाण्डातील हुतू व तुत्सी वंशीय, त्याचप्रमाणे ‘मोलोखिया’ हा सुदानमधील पदार्थ आणि ‘तोबे’ हा पारंपरिक वेश, इ. थोडक्यात- आफ्रिकन भूमीतील  संस्कृतीव्यवहाराचं सम्यक दर्शन या कथा घडवतात.
बहुतेक सर्वच कथांमधून आफ्रिकन समूहजनांच्या वाटय़ाला आलेलं पाशवी अन्याय-अत्याचाराचं, अपरिमित रक्तपाताचं, सत्तांधांच्या जुलमी कारस्थानांचं बीभत्स वास्तव अधोरेखित झालेलं आहे. ते आपल्याला हलवून टाकतं.
 मात्र या संग्रहातील कथांची शीर्षकं अतिशय अलंकारिक, भडक पद्धतीने दिली गेली आहेत. उदा. ‘कर्दनकाळ नि दुष्काळ’, ‘शिक्षा आणि प्रतीक्षा’. लेखकापाशी सांगण्यासारखं बरंच काही असूनही, किंबहुना विपुल आशयद्रव्य असूनही या कथा अभिव्यक्तीच्या पातळीवर सामान्य ठरतात, हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं. पात्रांचे अतिशय कृत्रिम नि बटबटीत संवाद यामुळे ते कथा-प्रसंगांशी एकजीव होताना दिसत नाहीत; तसेच शब्दबंबाळ कथानिवेदन आणि तितकंच सरधोपट चित्रण यामुळे या कथा निव्वळ रिपोर्ताज धाटणीच्या भासतात.
निवेदनातून प्रकटणारी कथाविषय बनलेल्या घटनांबाबतची वा इतर घडामोडींची तपशीलवार माहिती कथानकाच्या ओघात सहजच आल्यासारखी न वाटता ती हट्टानं घुसडल्यासारखी वाटते. अशा बातमीवजा कथानिवेदनामुळे कथेला केवळ अहवालसदृश स्वरूप आल्यासारखं वाटतं.
कथानिवेदन, आशय-अभिव्यक्ती, पात्ररचना, संवादशैली या सर्वच स्तरांवर या कथा वाचकांना बऱ्याच निराश करत असल्या तरी आफ्रिकन भूमीचा शापित इतिहास आणि धगधगतं समाजवास्तव वाचकांपर्यंत पोहोचवण्याची लेखकाची तळमळ मात्र प्रामाणिक आहे. तसेच यातील हरएक कथा आफ्रिकन जनतेच्या व्यथा- वेदनांना जणू आवाज देऊ पाहतेय आणि तो ऐकण्यासाठी तरी या कथा  वाचायला हव्यात.
‘शापित भूमी’ : आफ्रिकेतील सत्य घटनांवर  – उमेश कदम, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे – २४६,
 मूल्य – २५० रुपये.

First Published on September 21, 2014 1:12 am

Web Title: shaapit bhumi by umesh kadam
टॅग Loksatta Lokrang