जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी बालपणातल्या स्मरणांमध्ये निमस्यांच्या पारुताईच्या लग्नात त्यांच्या अंगणात उभारलेल्या मांडवाच्या कोपऱ्यात उंचावर बसवलेल्या कण्र्यातून पहिल्यांदा ऐकलेला लताबाईंचा स्वर आणि गाणं होतं- ‘राजा की आयेगी बारात.. रंगीली होगी रात.. मगन मी नाचुंगी..’
तेव्हापासून आजपर्यंत कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांत थोडा बदल करून-
‘तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला
तुझा सूर केवळ राही सदा सोबतीला..’
असा लताबाईंचा स्वर आपणा साऱ्यांच्या जगण्याला अमृतसंजीवन देत आलाय. किती गाणी आठवावीत. अक्षरश: हजारो. मराठी.. हिंदी.. बंगाली.. कळत्या वयात लता मंगेशकर या स्वरसप्तकानं गारुड घालायला सुरुवात केली तेव्हा अकोल्यासारख्या ठिकाणी वृत्तपत्रं, मासिकं, पाक्षिकं वा साप्ताहिकांतून लताबाईंविषयी छापून येणारे सर्व काही वाचायची आस असायची. छायाचित्रांमधून त्यांचं कधीतरी दर्शनही व्हायचं.
एक दिवस अकोल्याच्या माणिक टॉकीजमध्ये मुख्य चित्रपटापूर्वी दाखविल्या जाणाऱ्या भारतीय समाचार चित्र अर्थात् ‘इंडियन न्यूज रील’मध्ये सांस्कृतिक घडामोडींचा परामर्श घेताना तेव्हा नुकतेच दिवंगत झालेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार शकील बदायुनी यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या समारंभाच्या क्षणचित्रांमध्ये साक्षात् लताबाई गाताना दिसल्या. ‘बेकस पे करम किजिये सरकार- ए- मदिना’ हे संगीतकार नौशादसाहेबांनी संगीतबद्ध केलेलं ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटातलं अप्रतिम गाणं त्या गायल्या. ते संपूर्ण गाणं दाखवावं असं वाटत होतं, पण एखाद् दुसऱ्या कडव्यानंतर ते संपलंच. पंढरीच्या वारकऱ्याला पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या दर्शनानं जो आनंद मिळतो, तशीच माझी मन:स्थिती झाली. त्यानंतर पुढचा संपूर्ण आठवडा रोज संध्याकाळच्या खेळापूर्वी (कारण त्यानंतर त्या काळातल्या घडामोडी दाखविणारी भारतीय समाचार चित्राची नवी आवृत्ती येणार होती.) मी डोअरकीपरला पटवून दारातच पडद्याशेजारी उभा राहून फक्त ‘बेकस पे करम किजिये’चं दर्शन पुन: पुन्हा अनुभवत राहिलो..
कट् टू मुक्काम पुणे.. एकाहत्तर साली पुण्याला आल्यावर पुन्हा बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी लताबाईंनी गायलेल्या ‘मोगरा फुलला..’च्या आठवणी कुणाकुणाकडून ऐकताना मनातल्या मनात त्यांचा हेवा करत राहिलो..
अशीच काही वर्षे गेली. आणि.. १९७४ च्या सुमारास डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शन करीत असलेल्या ‘सामना’ या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाला उपस्थित राहायची संधी मिळाली. मुंबईत बांद्रा (पश्चिम) येथे असलेल्या मेहबूब स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण व्हायचं होतं. संगीतकार भास्कर चंदावरकरांनी दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायचं योजलं होतं. चार तासांच्या शिफ्टमध्ये (प्रादेशिक) चित्रपटाची दोन गाणी करण्याची मराठी चित्रपटसृष्टीला मुभा होती. त्यानुसार ‘या टोपीखाली दडलंय काय?’ आणि ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी..’ या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायला वाद्यवृंद संयोजक इनॉक डॅनियल्सजी त्यांच्या वाद्यवृंदासह सज्ज होते. प्रथम ‘या टोपीखाली दडलंय काय?’ या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू झालं..
मी पहिल्यांदाच चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिग अनुभवत होतो..
ताज्या दमाचा पाश्र्वगायक रवींद्र साठे, गायिका उषा मंगेशकर यांच्या गायनासह श्रेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूही गाण्यात काही मजेदार संवाद म्हणणार होते.. आयत्या वेळी एक-एक शब्द (कोकिळा आणि कबूतर) म्हणायला चित्रपटाच्या दृश्यातल्या जमावातल्या कुणा दोघांकरिता अस्मादिक आणि दिग्दर्शक जब्बार पटेलही त्या ध्वनिमुद्रणात सहभागी झाले. गाण्याचा संगीतकारांना अपेक्षित असा अप्रतिम टेक झाला. पुढल्या गाण्याची तयारी सुरू झाली. ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी..’ हे गाणं लताबाई गाणार होत्या. परंतु काही कारणानं कुठल्याशा हिंदी चित्रपटाच्या त्यांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण लांबल्यामुळे त्यांनी ‘पायलट’ (तात्पुरत्या) गायकाकडून गाण्याचं वाद्यवृंदासह ध्वनिमुद्रण करण्याची सूचना टेलिफोनद्वारा दिली. आयत्या वेळी मग अतिशय शीघ्र ग्रहणशक्ती असलेल्या पाश्र्वगायक रवींद्र साठेला संगीतकार चंदावरकरांनी गाण्याची चाल शिकवली आणि रवींद्र साठेनं पहिलाच टेक ओके गायला.
त्यानंतर काही दिवसांनी अखेरीस तो क्षण आला.. मेहबूब रेकॉर्डिग स्टुडिओच्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या चढून लताबाई ध्वनिमुद्रणाच्या दालनात प्रवेशल्या. त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच ठाऊक नव्हतं..
सुहास्य मुद्रेनं सर्वानी केलेल्या स्वागताचा स्वीकार करत त्यांनी गाण्याचे शब्द स्वत:च्या अक्षरात कागदावर लिहून घेतले. आणि रवींद्र साठेनं गायलेलं गाणं त्या अत्यंत एकाग्रतेनं ऐकत गेल्या. ऐकत असतानाच त्या पुढय़ातल्या गाण्याच्या (कागदावरल्या) ओळींवर सांकेतिक खुणा करत गेल्या. गाणं संपलं. तसं म्हणाल्या, ‘‘चला, टेक  करूयात..’’
मी पाहतच राहिलो..
गाण्याच्या आरंभीच्या तालमुक्त चार ओळी (‘हा महाल कसला.. रानझाडी ही दाट.. वगैरे) रवींद्रनं केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटार यांच्या सुटय़ा सुरांच्या लडींसह आणि गाणं वाजवणाऱ्यांच्या (नार्वेकरसाहेब) व्हायोलिनच्या साथीनं गायल्या होत्या. रवींद्रचा आवाज वगळून केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं त्या आता गाणार होत्या..
सुरुवातीच्या तालविरहित मुक्त पद्धतीनं गायलेल्या-
‘हा महाल कसला.. रानझाडी ही दाट..
अंधार रातीचा.. कुठं दिसंना वाट
कुन्या द्वाडानं घातला घाव.. केली कशी करनी..
सख्या रे.. सख्या रे..
सख्या रे, घायाळ मी हरिणी..’
यातल्या शेवटच्या ओळीतल्या ‘घायाळ मी हरिणी..’च्या ‘णी’वर ध्वनिमुद्रित तबल्याची सम अत्यंत स्वाभाविकपणे- म्हणजे जणू काही त्या क्षणी साथ करत असलेल्या तबल्याची सम यावी तशी आली आणि त्या पुढे पुढे गात राहिल्या. शब्दा-शब्दांतला भाव.. दोन शब्दांमधल्या विरामात लपलेला भाव स्वरांकित करत, त्या गाण्याला संजीवन देत त्यांनी आपल्या परिसस्पर्शानं त्या गाण्याचं त्यांनी सोनं केलं..
टेक संपल्यावर उपस्थित सर्व मंडळी भारावून गेली होती. कुठल्याशा तांत्रिक कारणास्तव ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक देण्याची विनंती केली. आणि दुसरा टेकही त्या अगदी तंतोतंत पहिल्या टेकसारखाच (म्हणजे खरं तर त्याला हल्लीच्या कॉम्प्युटरच्या भाषेत ‘कट्-पेस्ट’ म्हणता येईल!) गाऊन गेल्या. हे.. हे सगळं अशक्य होतं.. अतक्र्य होतं. म्हणजे पंधरा मिनिटांपूर्वी काहीच माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका.. फक्त एकाच श्रवणात आत्मसात करून त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी, लाखांनी गुणून त्याला सवरेत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं- हे मी प्रथमच अनुभवत होतो. ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांचं समाधान होताना त्या गायलेलं गाणं न ऐकताच (कारण गातानाच त्यांना माहीत होतं, की ते सर्वोत्तमच होणाराय!) सर्वाचा निरोप घेऊन गेल्यासुद्धा..
यानंतर सुमारे तीन वर्षांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलंच गाणं ध्वनिमुद्रित होणार होतं..
‘मी रात टाकली..’
मला या ध्वनिमुद्रणाला हजर राहायचं भाग्य लाभलं. एच.एम. व्ही.च्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये लताबाई वाद्यवृंदाबरोबर रिहर्सल करत होत्या. मी त्यांच्यापासून चार-पाच फुटांवर उभा होतो. पण त्या गात असलेले शब्द अगर सूरही मला भोवतीच्या वाद्यवृंदामुळे ऐकू येत नव्हते. टेकच्या वेळी मी ध्वनिमुद्रकाच्या दालनात जाऊन ऐकू लागलो तेव्हा मला कळलं की, मायक्रोफोनच्या शक्तीचा अत्यंत प्रभावी प्रयोग करत तंत्र आणि भाव यांचा जो काय बेमिसाल प्रत्यय आपल्या गाण्यातून त्या देतात, तो अकल्पनीय आहे! त्यांचं शब्दांच्या उच्चारणातील अद्भुत कौशल्य, श्वासाचा अप्रतिम वापर (जो त्या गाताना कधी आणि कुठे घेतात, हे आजवर त्यांच्या गाण्यात कधीच कळलेलं नाही!), त्यांचं लयीचं तत्त्व, अंदाज आणि भान, त्यांचा विशुद्ध सूर आणि कुठलाच अटकाव नसलेला पाऱ्यासारखा फिरणारा गळा, संगीतकाराच्या कथनातून त्याची शैली नेमकी टिपत त्या गाण्यातून तिचा तंतोतंत प्रत्यय देण्याचं अद्वितीय सामथ्र्य.. आणि हे सगळं श्रोत्यांना ऐकताना अगदी सहज, सोप्पं आणि स्वाभाविक वाटावं अशी पेशकारी..
खरं तर लताबाईंचा स्वर म्हणजे ईश्वरीय अनुभूतीच! कवयित्री शांताबाई शेळक्यांनी आपल्या एका कवितेत म्हणूनच ठेवलंय..
‘ईश्वराचे आम्हा देणे.. तुझे गाणे
आसमंती भरून आहे.. तुझे गाणे’

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू