16 January 2021

News Flash

साक्षेपी इतिहासकार!

अद्वितीय इतिहासकार म्हणून ख्यातकीर्त असलेल्या सर जदुनाथ सरकारांच्या जन्माला नुकतीच दहा डिसेंबरला १५० वर्षे पूर्ण झाली.

इतिहासकार सर जदुनाथ सरकार

पंकज घाटे – pankaj.ghate@resgjcrtn.com

महाराष्ट्रातील शिवकालीन कालखंडाचा संशोधनपर साक्षेपी इतिहास लिहिणारे प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या जन्माला नुकतीच १५० वष्रे झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या मौलिक कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप..

अद्वितीय इतिहासकार म्हणून ख्यातकीर्त असलेल्या सर जदुनाथ सरकारांच्या जन्माला नुकतीच दहा डिसेंबरला १५० वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रात जन्माला न आलेल्या, तरीही या भूमीत घडलेल्या धगधगत्या इतिहासाच्या साक्षेपी मांडणीने जदुनाथ सरकारांनी अनेक देशी-विदेशी संशोधकांना त्याकडे आकृष्ट केले. बंगाली असूनदेखील महाराष्ट्राशी त्यांची नाळ जुळली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल इंग्रजी चरित्र लिहिले. त्यांना महाराष्ट्र हे आपलं दुसरं घरच वाटे.

जदुनाथ सरकारांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहासामध्ये बी. ए.ची पदवी घेतली आणि इंग्रजीत एम. ए. केलं. ते कोलकाता विद्यापीठाच्या प्रेमचंद रायचंद फेलोशिपचे मानकरी ठरले. त्या काळात वर्षांला ५००० रुपये याप्रमाणे पाच र्वष मिळणारी ती ‘श्रीमंत’ स्कॉलरशिप होती. या फेलोशिपसाठी वेगळी परीक्षा घेतली जात असे. त्याकाळी ती मिळवणारे खरोखरच विद्वान असत. या फेलोशिपचा भाग म्हणून जदुनाथांनी ‘औरंगजेबकालीन हिंदुस्थान : प्रादेशिक, सांख्यिक वर्णन’ हा अभ्यासविषय निवडला. या अभ्यासाकरता फारसी कागदपत्रं वाचता यावीत म्हणून ते फारसी शिकले. बंगाली ही तर त्यांची मातृभाषाच. इंग्रजी परीक्षेचा विषय म्हणून; तर संस्कृत दुय्यम भाषा म्हणून ते शिकले. हे बहुभाषाप्रभुत्व जदुनाथांना त्यांच्या पुढच्या कार्यात फार उपयुक्त ठरले. मराठय़ांचा इतिहास अभ्यासताना ते मराठीही वाचू-लिहू लागले. जुन्या अभिजात भाषा व साहित्याचा केलेला सखोल अभ्यास त्यांना कमावलेल्या भारदस्त लेखनशैलीसाठी पोषक ठरला.

रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्याशी त्यांची चार तपांहून अधिक काळाची मैत्री होती.  सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या गोपाळराव देवधर यांच्यामुळे १९०४ साली जदुनाथ सरकार आणि सरदेसाई यांची भेट झाली. जदुनाथांचा त्यांच्याशी ५० वर्षांहून अधिक काळ पत्रव्यवहार होता. सितामाऊचे राजकुमार रघुवीरसिंह, डॉ. कानुगो यासारख्या शिष्यांशीही त्यांचा पत्राद्वारे संपर्क असे. हरिराम गुप्ता यांनी संपादित केलेल्या ‘Life and Letters of Sir Jadunath Sarkar’ (१९५६) या पुस्तकात ही पत्रं वाचायला मिळतात. इतिहासाची अस्सल साधने, साधनग्रंथ, ऐतिहासिक पुराव्यांसंबंधी व्यक्त झालेली वेगवेगळी मतं, विशिष्ट घटनांच्या तारखांची निश्चिती, कागदपत्रे व काही ऐतिहासिक विधानांचे अर्थ लावणे, ठिकाणांची निश्चिती करणे वा त्यांना भेटी देणे, त्याचप्रमाणे मोगल आणि मराठय़ांच्या दप्तरांतील इतिहासाच्या कागदपत्रांचं संकलन, संपादन आणि प्रकाशन यासारखे कितीतरी विषय त्यांच्या या पत्रांमध्ये चर्चिलेले दिसतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातले सुखदु:खाचे प्रसंगही ते एकमेकांना कळवीत. त्याचबरोबर इतिहास संशोधन व अभ्यासाची पद्धती, त्यात आलेल्या अडचणी तसंच त्या कशा रीतीने सोडवल्या याचं मार्गदर्शनही त्यांत आढळते. रियासतकार सरदेसाईंना पाठवलेल्या एका पत्रात जदुनाथ सरकार लिहितात, ‘‘टिकाऊ’ इतिहास लिहायचा म्हणजे नुसती ‘लिहिण्याची’ मेहनत घेऊन चालत नाही, तर त्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी खटपट करावी लागतेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य म्हणजे व्यापक वाचन (एखाद्याच विषयाचा खास अभ्यास नव्हे!), दीर्घ विचारशक्ती आणि गतेतिहासाचा वर्तमानाशी संबंध जुळवता येणे, हे होय. तौलनिक विवेचनासाठी परराष्ट्रांतील घडामोडींचा आपल्या देशातील घटनांशी असलेला संबंध सांगता आला पाहिजे. खरा इतिहासकार ‘जठरा’सारखे काम करतो.’’

आणखी एका पत्रात जदुनाथ लिहितात, ‘‘ज्या साधनाबद्दल संशय घेतला जात नाही त्याच्या आधारे सत्यशोधन करणे यात मला विशेष रस असतो. आणि माझ्या पुस्तकातील एखादे विधान जर नंतर सापडलेल्या पुराव्याच्या आधारे खोडून काढले तर त्याबद्दल मला वाईट वाटेल इतका गर्विष्ठ मी नाही.’’

मध्ययुगीन भारतीय इतिहासाच्या शास्त्रशुद्ध संशोधनाचा पाया ज्यांनी घातला त्या विद्वानांत जदुनाथांचे स्थान अद्वितीय आहे. अशा इतिहासकाराने पत्रांत व्यक्त केलेले मुद्दे, धरलेले आग्रह आजही गैरलागू नाहीत. पिढय़ान् पिढय़ा जो इतिहास वाचला जाईल असा इतिहास लिहिला जावा, असा त्यांचा इतिहास लेखनाबद्दलचा दृष्टिकोन होता.

औरंगजेबाचा पाच खंडांत इतिहास लिहिताना, त्याची दक्षिणेकडील राजनीती अभ्यासताना जदुनाथ सरकार मराठय़ांच्या इतिहासाकडे वळणे अपरिहार्य होते. चौथ्या खंडात त्यांनी मराठय़ांविषयी चार प्रकरणे लिहिली. हे काम चालू असतानाच त्यांचा ‘Shivaji and His Times’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. मराठी सत्तेचा उदय आणि छत्रपती शिवाजीराजांविषयीचे ‘हिंदू जमातीने निर्माण केलेला शेवटचा रचनात्मक प्रतिभा असलेला राजा’ हे त्यांचे विश्लेषण आज सर्वमान्य झाले आहे.

जदुनाथांच्या ‘Shivaji and His Times’ची पहिली आवृत्ती १९१९ मध्ये, तर त्यांच्या हयातीतच १९५२ साली त्याची पाचवी आवृत्ती निघाली. या सर्व आवृत्त्यांत जदुनाथांनी सतत नवीन साधनं शोधून त्यांचा त्यात समावेश केला. प्रस्तावना, नवीन माहितीची भर, सनावळ्यांची दुरुस्ती, साधनांची चिकित्सक सूची अशा कितीतरी गोष्टींची भर नव्या आवृत्तीत पडत गेली. या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत सरकार लिहितात, ‘या आवृत्तीतील अध्र्याहून अधिक लिखाण हे संपूर्णपणे पुन्हा लिहिले आहे. इतर ठिकाणी जुनी विधाने, जुनी निरीक्षणे नव्याने झालेल्या संशोधनानुसार बदलली आहेत. त्यामुळे ती आवृत्ती म्हणजे खरं तर नवेच पुस्तक म्हणायला हवे.’

जदुनाथांच्या शिवचरित्रामुळे मराठय़ांचा छत्रपती राजा जगभरात कीर्तिमान झाला. १९२६ मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीने या ग्रंथासाठी त्यांना सर जेम्स कॅम्बेल सुवर्णपदक बहाल केलं. व्हिन्सेट स्मिथसारख्या इतिहासकारानेही श्रेष्ठ ग्रंथ म्हणून त्याचं स्वागत केलं. १९४० साली जदुनाथांनी ‘House of Shivaji’ हा मराठय़ांच्या इतिहासावरील आणखी एक ग्रंथ लिहिला. यात त्यांनी इतिहास संशोधनाची वाट दाखवणारे श्रेष्ठ संशोधक वि. का. राजवाडे, का. ना. साने, वासुदेवशास्त्री खरे आणि द. ब. पारसनीस यांच्या चरित्रांचा समावेश केला आणि त्यांच्या संशोधनाचे यथायोग्य मूल्यमापनही केलं. मराठी जगतातले हे विद्वान जदुनाथांमुळे अमराठी अभ्यासकांना माहीत झाले.

मोगलांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचे दोन खंड यांत जदुनाथांनी मराठय़ांचा इतिहास लिहिला. भारतीय उपखंडाच्या इतिहासात मराठय़ांच्या इतिहासाला स्वतंत्र शाखा म्हणून अधिष्ठान देण्यात सरकारांच्या लिखाणाचा मोलाचा वाटा आहे. Fall of Mughal Empire (मुघल साम्राज्याचा ऱ्हास) चे प्रकरण लिहिताना त्यांनी सरदेसाई यांना पत्र लिहिले. त्यात ते लिहितात, ‘या प्रकरणाचा खरा विषय ‘मराठा स्वराज्याचा ऱ्हास’ हा आहे.’ पुढे ते लिहितात, ‘मी हे लिखाण शाईने केले नसून, माझ्या अंत:करणातील रक्ताने केले आहे असे मी म्हणू शकतो. राज्यकर्त्यांचा मूर्खपणा आणि दुर्गुण, त्यांचे भ्याड सेनापती, त्यांच्या मंत्र्यांची स्वार्थी, बेइमानी वृत्ती अशा या कहाणीने भारताच्या प्रत्येक सच्च्या पुत्राची मान शरमेने खाली जाते.’ या पुस्तकात जदुनाथांनी जी कारणं मुघल सत्तेच्या पतनाची दिली आहेत, तीच मराठय़ांच्या अस्तालाही कारणीभूत ठरली, असे त्यांचे म्हणणे होते.

सरकारांनी मराठी ऐतिहासिक कागदपत्रे आणि त्यांच्या लेखकांविषयी अनुदारपणे टीका केली आहे. मराठी- त्यातही पुण्यातल्या इतिहासकारांनी त्यांच्यावर पुष्कळ आक्षेप घेतले. सुरुवातीच्या आवृत्तीत जदुनाथांनी छत्रपती शिवाजीराजांचा ‘शिवा’ असा एकेरी केलेला उल्लेख मराठी माणसाला बोचला. फार्सी साधनांमध्ये तसा एकेरी उल्लेख पुष्कळदा येत असल्यामुळे सरकारांनी तो शब्द उचलला. खुद्द सरदेसाईंनी पत्र पाठवून पुढच्या आवृत्तीत बदल करावा असे त्यांना सुचवले. नव्या आवृत्तीत सरकारांनी तो अपमानास्पद उल्लेख दुरुस्त केला. त्यांच्यावर ‘फार्सी व इतर कागदपत्रे आणि मराठी कागदपत्रांचा एकमेकांशी पडताळा करण्याचा प्रयत्न केला नाही; त्याचप्रमाणे मराठी साधनांसंबंधी अमराठी अभ्यासकांनी पुढे सरकारांचाच कित्ता गिरवला,’ असे आरोप अभ्यासकांनी केले. अर्थात त्यांची काही मतं पूर्वग्रहदूषित असली तरी ते पक्षपाती इतिहासकार नव्हते. राष्ट्रवादी जाणिवेतून इतिहास लिहिताना त्यांनी ऐतिहासिक संशोधनात कायम वस्तुनिष्ठतेचा कठोर आग्रह धरला.

१९२६ मध्ये सर जेम्स कॅम्बेल सुवर्णपदक तसेच त्याच वर्षी सी. आय. ई. हा किताब आणि १९२९ मध्ये ‘सर’ ही पदवी त्यांना मिळाली. तोवर त्यांचे औरंगजेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रसिद्ध झाले होते. मात्र, सरकारांची थोरवी विदेशमान्य ठरली ते विल्यम आयर्विनचे उरलेले काम त्यांनी पूर्ण केले म्हणून. आयर्विनचा अभ्यासाचा विषय ‘उत्तरकालीन मोगल बादशहा’ हा जदुनाथांच्या अभ्यासाशी जुळणारा होता. या ब्रिटिश आय. सी. एस. अधिकाऱ्याने या अभ्यासापायी नोकरी सोडली. मात्र, त्यांचं निधन झाल्यामुळे हे काम अपूर्ण राहिलं होतं. आयर्विनच्या मुलीनं जदुनाथांना ते पूर्ण करण्याचा आग्रह केला. त्यासाठी आपल्याकडील सर्व साहित्य जदुनाथांच्या हवाली केलं.

आयर्विनचा इतिहास पूर्ण करताना सरकारांनी तीन प्रकरणे लिहिली. हे करताना त्यांनी आयर्विनने लिहून ठेवलेले कागद तपासले. त्याच्या विस्तृत टीपांचा संक्षेप केला. मराठी व इतर कागदपत्रांचा वापर करून फार्सी इतिहासातली विधानं तपासली. पुष्कळ टिपा जोडून स्वत:चं पुस्तक असल्याप्रमाणे त्यांनी हे काम तडीस नेलं. या कार्यामुळे जदुनाथांचं मोठेपण जगाला पटलं. या त्यांच्या कर्तबगारीमुळे ‘केम्ब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाची चार प्रकरणे लिहिण्याचा मान त्यांना मिळाला.

हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनची स्थापना झाल्यानंतर पेशवे दप्तरातील कागदपत्रं निवडून ती छापावीत असं ठरलं. रियासतकार सरदेसाईंनी जदुनाथांच्या सहकार्याने पेशवे दप्तरातले निवडक कागद ४५ खंडांत, तर याला जोडून जदुनाथांनी संपादित केलेले ‘रेसिडेन्सी रेकॉर्ड’चे १५ आणि फार्सी पत्रांचे २ असे एकूण ६२ खंड संपादित केले. या दोन विद्वानांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे राष्ट्रीय कार्य पूर्ण होऊ शकलं. त्यांच्यासोबत कृ. पा. कुलकर्णी, डॉ. वि. गो. दिघे, वा. सी. बेंद्रे, मा. वि. गुजर, य. न. केळकर ही मंडळीही काम करत होती. पेशवे दप्तर प्रकरणात दोघांना पुष्कळ त्रास सोसावा लागला.

श्री. रा. टिकेकर यांना जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई या दोघांचा सहवास लाभला. ते जदुनाथांविषयी लिहितात, ‘‘मातृभूमीइतकाच मान महाराष्ट्राला देणारा हा श्रेष्ठ बंगाली इतिहासकार महाराष्ट्रात लोकप्रिय झाला नाही. श्री शिवछत्रपतींचे श्रेष्ठत्व जगाला पटवून सांगणारा हा शिवचरित्रकार मराठय़ांच्या आदराला पात्र ठरला नाही. त्यांच्या उत्कृष्ट ग्रंथांची महाराष्ट्रीयांनी उपेक्षा केली. त्यांच्या ग्रंथांकडे मराठी अभ्यासकांनी ढुंकूनही पाहिले नाही. सरदेसाईंच्या अभ्यासाचे, परिश्रमांचे, व्यासंगाचे चीज व्हावे म्हणून जदुनाथ अखेपर्यंत झटले. दोन्ही विद्वानांची मैत्री काही मतभेद असूनही अखंड टिकली. दुखावण्याचे पुष्कळ प्रसंग घडल्यामुळे पुणेकर अभ्यासकांविषयी जदुनाथांच्या मनात कायमची अढी होती. शिवछत्रपतींचे अखिल भारतीय कर्तबगारीचे मोजमाप त्यांनी केलं ते सर्वमान्य झालं. मुंबईत शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवला गेला त्यावेळी महाराजांची थोरवी सांगण्यासाठी संपादकांना जदुनाथांच्याच शब्दांचा आधार घ्यावा लागला.’’

औरंगजेब हा जदुनाथांचा जन्मभर अभ्यासाचा विषय होता. कुणीही त्यांना भेटायला आला तर त्याला जेमतेम तीन मिनिटंच भेट मिळत असे. जदुनाथ हातात घडय़ाळ घेऊनच भेटत असत. साधारण अडीच मिनिटं झाली की सूचना मिळे; तीन मिनिटं झाल्यावर ते निघून जात. पण अभ्यासाचं बोलणं असलं, काही नव्या प्रबंधाची चर्चा असली की तासन् तास त्यांचं बोलणं चालू राही. आपल्या संकल्पित पुस्तकाचं हस्तलिखित एखाद्या होतकरू अभ्यासकाच्या हवाली ते उदारपणे करत असत. त्यांच्या शिष्यांना, होतकरू अभ्यासकांना या उदार वृत्तीचा अनेकदा लाभ होई.

जदुनाथांच्या घरचं ग्रंथालय मोठं होतं. स्वत:चा ग्रंथसंग्रह हे कंजूष माणसाच्या डबोल्याप्रमाणे जपत. खुद्द सरदेसाईंनाही त्यांनी आपल्या पुस्तकांना हात न लावण्याची तंबी दिली होती. हे दोघेही एकमेकांचे मित्र असले तरी एकमेकांच्या स्वभावातल्या खोडय़ांचे तडाखे परस्परांना बसत असत.

चिंतनशील स्वभाव, एखाद्या वादग्रस्त मुद्दय़ाची सर्वागीण परीक्षा करण्याची त्यांची अभ्यासपद्धत, युरोप-अमेरिकेच्या इतिहासातील साम्यस्थळे सांगण्याचे वैशिष्टय़ अशा अनेक गोष्टींमधून जदुनाथांचा इतिहासाचा निदिध्यास कसा होता हे समजून घेता येतं. स्वातंत्र्यानंतर इंग्रजीतून मुघल व मराठा कालखंडाविषयी जे इतिहासलेखन होऊ लागलं त्यावर मार्क्‍सवाद व राष्ट्रवादाचा मोठा प्रभाव पडला. अलिगढ विद्यापीठातल्या इतिहासकारांनी मुस्लीम राजवटींचा निराळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केल्यामुळे जदुनाथांनी ज्या पद्धतीने इतिहासलेखन केलं ते विस्मृतीत गेलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:07 am

Web Title: sir jadunath sarkar historian dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : व्यंगचित्रकलेचं मर्म, कर्म आणि धर्म
2 इतिहासाचे चष्मे : चष्म्याच्या काचा स्वच्छ असाव्या!
3 सांगतो ऐका : कभी अलविदा ना कहना!
Just Now!
X