मुलुंडच्या आमच्या संभाजी उद्यानातून मॉìनग वॉक घेण्याचा माझा परिपाठ. सकाळची वेळ अतिशय सुंदर. डॉक्टर, उद्योजक, वकील, आमदार, नगरसेवक.. सर्व आपापली कार्यालयीन जोखडे उतरवून फक्त ‘मुलुंडकर’ होऊन एकत्र जमतात. झपझप पावले टाकत व्यायाम करतात. मोकळ्या, स्वच्छ हवेचा लाभ घेतात. कट्टे ज्येष्ठ नागरिकांनी फुललेले असतात. जिमखान्याच्या नेट्समध्ये क्रिकेटचा शास्त्रशुद्ध सराव चाललेला असतो आणि मोकळ्या मदानात असंख्य संघ एकमेकांना सांभाळून घेत क्रिकेटचा आनंद लुटत असतात. एखाद्याने मारलेला शॉट चालण्याच्या माíगकेत आला की, बॉल.. बॉल.. बॉल असा ओरडा सुरू होतो. आणि मग चालण्याचा व्यायाम घेणारे पासष्ठीचे परब, चिटणीस, देशपांडे किंवा अय्यरही चटकन बॉल उचलतात, आपल्या तारुण्याला स्मरून बॉल ग्राउण्डमध्ये थ्रो करतात आणि खेळ पुढे चालू होतो. या नेहमीच्या दृश्याच्या पाश्र्वभूमीवर परवा जे पाहिले त्याने मी बेचन झालो. असाच एका संघाचा डाव रंगत आलेला. विशी-बाविशीतले कॉलेज तरुण.. फििल्डग लागलेली.. आणि थर्ड मॅनला बाऊंड्री लाइनजवळ उभ्या असलेल्या तरुणाच्या तोंडात चक्क सिगारेट..  सकाळी सात वाजता मोकळ्या हवेत खेळतानाही त्याच्या तोंडातून धुराची वलये.. व्यायाम आणि व्यसनाची ही एकात्मता मला अस्वस्थ करून गेली. कदाचित तेवढय़ाचसाठी त्याने थर्ड मॅन पोझिशन निवडली असावी. कारण स्लीप किंवा फॉरवर्ड शॉट लेगला उभे राहून ते त्याला जमले नसते. मला पूर्वी वाचलेल्या एका संस्कृत सुभाषिताची आठवण झाली.
‘‘प्रहारस्तोपि मार्जार तमाखुम् नव मुन्चति, बहुधा बोधिस्तोपि मूर्ख: तमाखुम् नव मुन्चति’’
काठीचा बडगा पाठीवर पडल्यावरही ज्याप्रमाणे मांजर तोंडातील उंदीर सोडत नाही, त्याचप्रमाणे अनेकदा उपदेश करूनही मूर्ख तंबाखूचे सेवन सोडत नाही. सिगारेटच्या धुरातून श्वसनात आणि शरीरात जाणारे निकोटीन आणि इतर कर्करोगजन्य घटक २८ टक्क्यांहून अधिक फुप्फुस आणि श्वसनसंस्थेच्या कर्करोगाला निमंत्रण देतात.  हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आणि शरीरातील अन्य रक्तवाहिन्यांचे आजार होतात ते वेगळेच! आणि ब्राँकायटीस, फुप्फुसांवर काळे डाग पडणे या सर्व भयानक परिणामांना सामोरे जावे लागते, तेही शाश्वत सत्य आहे.  बारीक अक्षरात लिहिलेले पाकिटावरचे वैधानिक इशारे धूर हवेत विरावा तितक्या सहजतेने विसरले जातात. आणि ‘कुछ नहीं होता’ ची बेदरकार, बेपर्वाई वाढते.
मदानात क्रिकेट खेळताना झुरके घेणाऱ्याच्या मानसिकतेचा मी विचार करू लागलो. आपण दोन अगदी परस्परविरोधी गोष्टी करत आहोत, हे त्याला समजत नसावे?  व्यायामाच्या ठिकाणी हवेत धूर सोडून आपण इतरांनाही प्रदूषणाची नको असलेली भेट देत आहोत, याचे सामाजिक भानही हरपलेले.  एकच प्याला इतकाच एकच झुरकाही भयानक ठरावा. सवय आणि व्यसन यांच्या सीमारेषा धुसर व्हाव्यात. चुटक्याने चटका द्यावा आणि सारासार विचार धूम्रवलयांसारखा अदृश्य व्हावा, यापरिते मोठे दु:ख कोणते?
आज वैद्यकीय विश्वात निकोटीनचे दुष्परिणाम दूर करणाऱ्या औषधांवर संशोधन सुरू आहे. फुप्फुसाच्या अंतर्भागात औषध नेमके पोचविणारे नॅनो कण ही उगवतीची दिशा आहे. निकोटीनचा तिटकारा वाटावा आणि पर्यायाने सवय सुटावी यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्या, डिनिकोटीनाईज्ड सिगारेट आणि इतर मार्गही उपलब्ध आहेत. पण औषध केवळ निर्माण करून प्रश्न सुटत नाहीत तर त्याची योजना आणि स्वीकार करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते. सत्तरच्या दशकातले िहदी चित्रपट पाहा. खलनायक, नायक सगळ्यांच्या तोंडी सदानकदा धुरांडी. ती जणू मर्दानगीचे द्योतक! तसेच काही त्या तरुणाला वाटत नसेल ना! मर्दानगी संयमात असते, स्वैराचारात नाही.  पौरुष इतरांचा हळुवारपणे विचार करण्यात असते, बेपर्वा वागण्यात नाही. बेदरकारी शेवटी आत्मघाताच्या दरीकडेच घेऊन जाते.
    ‘‘देवा तुझे किती सुंदर आकाश,
     सुंदर प्रकाश सूर्य देतो.’’
ही बालपणाची कविता आठवा आणि देवाजीने दिलेल्या या सुंदर प्रकाश आणि निर्मळ हवेचा विध्वंस करण्याचा करंटेपणा आपण दाखवू नये आणि इतरांनाही आवर घालावा, मग भले त्यासाठी वाद घालावा लागला तरी बेहत्तर.
.. मुलुंडच्या मदानावरचे दृश्य माझ्या मनातून जात नव्हते.  इंदोरहून एक सर्जरीची परिषद आटोपून परत येत होतो. विमानात मनात नक्की केले की, उद्या मदानात चालताना जर तो युवक परत फििल्डग करताना सिगारेट ओढताना दिसला तर त्याला हटकायचे. विमान मुंबईला येऊन थांबले. माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशाची विलक्षण लगबग सुरू झाली. हातातील बॅग उचलून तो त्वरेने माíगकेतून बाहेर पडू पाहात होता. जवळ जवळ धावतच तो टर्मिनल दोनच्या आगमन कक्षात शिरला. मला वाटले, घरी जायची गडबड असेल.. पण हा हन्त.. धावतच तो इमारतीत डाव्या बाजूला वळला, नव्याने बांधलेल्या काचेच्या तावदानातल्या ‘स्मोकिंग झोन’ मध्ये शिरला आणि त्याने त्याचा इतके तास आवरून ठेवलेला झुरका घेतला. जणू त्याला प्राणवायू मिळत होता. उद्विग्न मनाने मी गाडीत बसलो. ड्रायव्हरने ९१.१ एफएम सुरू केले आणि शब्द आले..
‘‘बीडी जलाइले जिगरसे पिया..
जिगरमा बडी आग है।’’