04 December 2020

News Flash

इतिहासाचे चष्मे : प्रामाण्याचे समाजशास्त्र

इतिहास काळापासून उपखंडात भाषिक स्तरापासून ते आहार, आचारविषयक सवयींपर्यंत प्रमाणीकरणाचा आग्रह सातत्याने होत असल्याचं  दिसून येतं.

वेदमंत्रांचा उच्चार त्यांच्या शास्त्रविहित रीतीनेच व्हायला हवा यावर परंपरेचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

इतिहास काळापासून उपखंडात भाषिक स्तरापासून ते आहार, आचारविषयक सवयींपर्यंत प्रमाणीकरणाचा आग्रह सातत्याने होत असल्याचं  दिसून येतं. व्याकरण ही ज्ञानशाखा भारतीय भाषा-व्यवहारात विकसित झाली, त्याची प्रक्रिया ही या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेशी हातात हात गुंफूनच आकाराला आली. प्रमाणीकरण म्हणजे  समाजातील विशिष्ट व्यवहारपद्धतीला विशिष्ट साच्यात बसवण्याची प्रक्रिया. या सामाजिक तत्त्वाचा विचार करताना अर्थातच काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. यापैकी काही बाबींचा विचार आपण इथे करणार आहोत. प्रमाणीकरण ही प्रक्रिया अस्थिर, प्राथमिक गरजा न भागलेल्या समाजात सुरू होऊ शकत नाही, हे अगदी साधं वास्तव थोडा विचार करू शकणाऱ्या माणसाला सहज लक्षात येईल. याचाच अर्थ असा की, विशिष्ट आर्थिक किंवा उत्पादनाचा विशिष्ट स्तर गाठून स्थिरावू लागलेल्या मानवी समूहांमध्ये सांस्कृतिक संरचनांचे उन्नयन होण्याची सार्वत्रिक रीत दिसून येते. या क्रियेमध्ये विशिष्ट भूभागात किंवा समाजाच्या वर्तुळात आघाडीवर असलेल्या, ज्ञानव्यवहार, धर्मव्यवहार, राजव्यवहार किंवा आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार बाळगणाऱ्या वर्गाने ठरवलेले नियम किंवा आचारांची रीत अधिकाधिक साचेबद्ध होत जाणे म्हणजे प्रमाणीकरण अशी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल. मात्र अशा ढोबळ व्याख्या नेहमीच ढोबळ राहतात. प्रमाणीकरण या प्रक्रियेचे राजकारण असते, तसेच ढोबळीकरणाच्या प्रक्रियेचे दुसरे समांतर राजकारण एकाच वेळी आकाराला येत असते. आज अधिकाधिक विकेंद्रित होत चाललेल्या इतिहास, समाजशास्त्रविषयक संकल्पना एकाच विशिष्ट चौकटीत बघणे हीदेखील या गुंतागुंतीच्या क्रियेतील एक महत्त्वाची उपज मानायला हवी. प्रमाणीकरण आणि ढोबळीकरणाच्या या दोन्ही प्रवाहांची होणारी सरमिसळ लक्षात घेताना या प्रक्रियांमधून समाज एकाच साच्यात बसतो की वेगवेगळ्या आकाराच्या, मापांच्या परस्परपूरक साच्यांना एकत्रित करून त्यातून काही वेगळे राजकारण आकाराला येते असा विचार करणे आज म्हणूनच औचित्याचे झाले आहे.

‘मन्त्रो हीन: स्वरतो वर्णतो वा, मिथ्याप्रयुक्तो न तमर्थमाह।

स वाग्वज्रो यजमानं हिनस्ति, यथेन्द्रशत्रु: स्वरतोऽपराधात्॥’

भावार्थ : ‘स्वर किंवा वर्ण यांच्या अशुद्ध, चुकीच्या रीतीने केलेला उच्चार मंत्रातून योग्य अर्थ अभिव्यक्त होत नाही. उलट, ज्याप्रमाणे प्राचीन काळी ‘इंद्रशत्रू’ या शब्दाचा उच्चार चुकीचा झाल्याने उच्चारणकर्त्यांचा नाश झाला, अगदी त्याचप्रमाणे तो उच्चार शब्दरूप वज्र होऊन उच्चारणकर्त्यांचाच घात करतो.’

वेदमंत्रांचा उच्चार त्यांच्या शास्त्रविहित रीतीनेच व्हायला हवा यावर परंपरेचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे. पाणिनी या संस्कृत भाषेच्या सर्वश्रेष्ठ व्याकरणकार आचार्याच्या नावावर असलेल्या ‘पाणिनीय शिक्षा’ या उच्चारण-शास्त्राच्या (स्र्ँल्ली३्रू२) अतिशय महत्त्वाच्या ग्रंथातील हा श्लोक. प्राचीन काळी त्वष्टा नामक प्रजापतीने इंद्राला मारणारा मुलगा जन्मावा या हेतूने यज्ञ केला. या यज्ञात आहुती देताना ‘इंद्रशत्रुर्वर्धस्व’ अशी कामना मंत्रातून व्यक्त करताना या शब्दाचा उच्चार चुकीचा झाला. वैदिक स्वरपद्धतीनुसार विशिष्ट स्वराचा उच्चार आघात देत केल्यास व्याकरणदृष्टय़ा समासरचना बदलते. या नियमानुसार ‘इन्द्रशत्रू’ शब्द चुकीच्या रीतीने उच्चारला गेल्याने तत्पुरुष समासानुसार इंद्राचा शत्रू म्हणजे ‘इंद्राला  मारणारा मुलगा जन्माला यावा’ अशा अर्थाऐवजी बहुव्रीही समासानुसार ‘इंद्र ज्याला मारेल असा मुलगा’ अशा अर्थीचे उच्चारण यज्ञ करणाऱ्याकडून झाले व त्याचा परिणाम म्हणून जन्माला आलेल्या मुलाला इंद्राने मारून टाकले आणि मंत्रोच्चारण व्यर्थ ठरले. व्याकरणशास्त्राचे महत्त्व आणि औचित्य मांडताना पतंजलीसारख्या महान साक्षेपी भाष्यकाराने वेगवेगळी प्रयोजने सांगून व्याकरण आणि त्यातील नियमबद्धता (म्हणजेच प्रमाणीकरण) कशी गरजेची आहे हे वेगवेगळ्या रीतींनी पटवून द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो. यामध्ये वेदांच्या आहे तशा स्वरूपात संरक्षणापासून ते लौकिक व्यवहारात यश मिळावं इथपर्यंत वेगवेगळ्या उद्देशांना अनेकविध आख्याने, पुराणकथा यांचा आधार देऊन पतंजली यांनी ‘महाभाष्य’ या ‘पाणिनीय व्याकरणा’वरील भाष्यात प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेचे एक मॉडेलच उभे केले आहे. केवळ पतंजली नाही, तर जवळपास सर्वच धर्म, तत्त्वज्ञान प्रवाहांतील विचारांनी त्या, त्या संबंधित मांडणीला एक विशिष्ट चौकट देत त्यांना साचेबद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. या साचेबद्धतेचा आग्रह कोणकोणत्या धारणांतून येत असावा याचा अगदी बेसिक विचार केला तरी काही गोष्टी जाणवतील. एक म्हणजे संबंधित धर्म/ तत्त्वज्ञान/ ज्ञानशाखेच्या संरचनेत परकीय विचारांचा प्रभाव न पडता ती संबंधित चौकट शुद्ध किंवा मूळ आहे त्या रूपात टिकून राहावी किंवा हस्तांतरित व्हावी, ही धारणा यामागे स्पष्ट रीतीने  दिसून येते. मानवी समूहांच्या बाबतीत जाती, वर्ण यांच्या शुद्धतेच्या अनुषंगाने असलेली कर्मठता आणि हट्ट याविषयी आपण आधीच्या लेखांत सविस्तर चर्चा केलेली आहेच. या साऱ्या चौकटी आणि त्यांच्या प्रमाणीकरणाच्या आग्रहाला आधुनिक काळात नवे आयाम मिळालेले आता दिसून येऊ लागले आहेत. मायकेल सिल्व्हरस्टाईन या शिकागो विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी भाषेच्या  संदर्भात विचार  करताना याला ‘कल्चर ऑफ मोनोग्लॉट स्टँडर्डायजेशन’ अशी संज्ञा दिली आहे. या अशा रीतींचा संबंध सिल्व्हरस्टाईन यांनी एक देश, एक भाषा आणि एकसाची समाजरचना  यांविषयीच्या आग्रही धारणांचा आग्रह करणाऱ्या व्यवस्थांशी लावला आहे. अमेरिकेसारख्या बहुवांशिक देशाच्या संदर्भात हा विचार मांडला गेला असला तरीही भारतासारख्या विविध जैववंश, भाषावंश किंवा आचाररीतींनी युक्त असलेल्या देशातील बहुपेडी वास्तवांच्या बाबतीतही हा विचार करणे अतिशय सयुक्तिक ठरते. अनिबाल क्वीजानो या पेरुवियन अभ्यासकाने ‘कॉलोनियलिटी ऑफ लँग्वेजेस’ या अंगाने यासंदर्भात केलेला विचार केवळ वासाहतिक रूढ संदर्भातच नाही, तर वसाहतपूर्व जगातील वेगवेगळ्या समूहांच्या इतिहासाचा विचार करतानादेखील औचित्याचा ठरतो. वसाहतवाद म्हणजे मध्ययुगीन काळातील युरोपीय समूहांनी आशिया, आफ्रिका आणि  दक्षिण अमेरिकेतील भूभागांत स्थापन केलेल्या वसाहती आणि राजकीय वर्चस्व या अंगाने नेहमी अभ्यासला जातो. वसाहतींना आणि त्यांच्या राजकीय इतिहासाला असलेले विशिष्ट अधिष्ठान आणि त्यांचे ऐतिहासिक अस्तित्व अभ्यासाच्या दृष्टीने स्वतंत्र क्षेत्र असले तरी त्यांनी अमलात आणलेल्या प्रमाणीकरणाला बळ देणाऱ्या रीती वसाहतपूर्व जगातील समूहांत आधीही अमलात आणल्या गेल्याचे हजारो संदर्भ सर्वच मानवी समूहांच्या इतिहासात दिसून येईल.

अगदी मराठीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास प्रमाण समजल्या जाणाऱ्या भाषाविश्वाची घडण पुण्यातील ज्ञानव्यवहार करणाऱ्या २० व्या शतकातील ब्राह्मण वर्गाच्या प्रभावातून झाल्याचे मानले जाते आणि त्या दाव्यात पुष्कळ तथ्यदेखील आहे. या तथाकथित प्रमाण मराठी भाषाव्यूहातील काही धारणांचा आपण विचार करू. ‘पानी’ आणि ‘पाणी’ या शब्दांच्या उच्चारणावरून अभिजन वर्गात भाषाशुद्धता, उच्चभ्रू नियमनिष्ठा आणि हेटाळणी असा त्रिकोण नेहमीच दिसून येतो. यातील ‘पानी’ हा शब्द अब्राह्मणी, ग्रामीण किंवा अशुद्ध व्यवहारातील आणि ‘पाणी’ हा शब्द ब्राह्मणी, नागरी, शुद्ध असल्याचे नेहमी सांगितले जाते. ब्राह्मणी भाषाविश्व हे संस्कृतनिष्ठ भाषाव्यवहाराचा अभिमान बाळगणारे असल्याने तिथे ‘ण’ या उच्चारणाला विशिष्ट अस्मितादर्शक भावनेची जोड असते. मात्र, संस्कृत भाषेनुसार ‘पानीयं’ अर्थात ‘पिण्यास योग्य असे द्रव्य’ असा शब्द पाण्यासाठी वापरला जातो, तर पाली या प्राचीन बौद्धधर्मीय भाषेत या द्रव्यासाठी ‘पाणी’ हा शब्द वापरला जातो. ब्राह्मणी आणि बौद्धधर्मीय समाजांतील परस्परांसंदर्भाविषयीच्या ऐतिहासिक आणि वर्तमान धारणा बघता आधुनिक शुद्धाशुद्धतेच्या भाषिक धारणा कृत्रिम आहेत हे सरळ दिसून येतं. ऋग्वेदातील आणि अभिजात संस्कृतातील अनेक भाषाशास्त्रीय रूपे आणि आजच्या ग्रामीण, नागरी मराठीतील रूपांची रीत अशाच विसंगतींना अजूनही टिकवून असल्याचं दिसून येतं.

भाषेच्या बाबतीत हे जसे दिसून येते तसेच ग्रंथरचना किंवा विशिष्ट तत्त्वज्ञान शाखांच्या संहितांच्या रचनेच्या बाबतीतही हे दिसून येते. वेदांच्या संहितांची निर्मिती असो, बौद्धवचनांच्या संहिता किंवा त्रिपीटकाच्या रचनेचा इतिहास असो, किंवा जैन, बौद्ध किंवा इस्लाम, ख्रिस्ती धर्माच्या ग्रंथांच्या शुद्ध आवृत्ती बनवण्याच्या चळवळी असोत; एखादे तत्त्वज्ञान विशिष्ट ग्रंथ किंवा श्रौत, मौखिक अंगाने साचेबद्ध संहितीकृत होते तेव्हा त्या धर्म, तत्त्वज्ञान, विचारप्रणालीचे प्रमाणीकरण किंवा प्रमाणीकरणाची क्रिया सुरू होत असते किंवा ती पूर्णत्वाला जात असते. ऋषी, प्रेषित किंवा अवतारी व्यक्तींच्या किंवा ईश्वरी अधिकार असलेल्या राजांच्या अस्तित्वाला आणि त्यांनी मांडलेल्या किंवा रूढ केलेल्या साहित्य किंवा व्यवस्थेला ईश्वरी प्रमाण देऊन हे अधिकार सिद्ध होतात. या अधिकारांना किंवा प्रामाण्यपर धारणांना हाताशी धरतच त्यातून त्याविषयीच्या काटेकोरपणाचा किंवा शुद्धता जपण्याचा आग्रह निर्माण होत नवी कर्मकांडे जन्माला येतात. आणि संबंधित व्यवस्थांच्या भागधारक वर्गाला अनुकूल, सत्तास्थान मिळेल अशी समाजरचना आकाराला येते. राजेशाही, ब्राह्मणी व्यवस्था, पॅपसी किंवा इस्लामी मौलवी किंवा शुद्धीकरणाचा मूलतत्त्ववादी आग्रह धरणाऱ्या व्यवस्थांचा उदय याच प्रक्रियेतून होत असतो.

प्रमाणीकरणाचा आग्रह हा नेहमीच समूहांच्या राजकारणाला आणि भारतीय संदर्भात जातिव्यवस्था किंवा वर्गव्यवस्थेला आधुनिक संदर्भातही पोषक ठरत आला असल्याची तक्रार किंवा मांडणी नेहमीच केली जाते. शैक्षणिक साहित्य, शासकीय व्यवस्थांतील कामकाजासाठी वापरली जाणारी भाषा किंवा माध्यमांमध्ये रूढ असलेली भाषा या निमित्तांनी ही प्रमाणभाषा ब्राह्मणेतर किंवा नागरेतर समूहांमध्ये रूढ होते. अनेकदा सांस्कृतिक वर्चस्व किंवा सांस्कृतिक वसाहतवादाच्या अंगाने या प्रमाणीकरणाच्या बागुलबुवावर भाष्य केले जाते. यातून वर उद्धृत केलेल्या सिल्व्हरस्टाईन यांनी मांडलेल्या सरसकट एकसाची समाज बनवण्याच्या प्रक्रियेला बळ मिळत असल्याचेही दिसून येते.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 1:18 am

Web Title: social science of standardization itihasache chashme dd70
Next Stories
1 सांगतो ऐका : थोर कवी, तत्त्वज्ञ अन् सनातनी इस्लामी
2 अफसाना लिख रही हूँ.. : ‘ओ पंछी प्यारे..’
3 दखल : पारधी समाजातील स्त्रीचं भीषण वास्तव
Just Now!
X