रिपोर्टरबाला : आता इथं सभेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याचं दिसतंय. संपूर्ण राज्यातून लोक इथं आलेत. मदान टोटल भरलेलं आहे! (स्टुडिओतल्या अँकरला उद्देशून) हर्षदा, ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. इथं काही लोक बसलेले आहेत. काही उभे आहेत! मी माझ्या कॅमेरामनला रिक्वेस्ट करीन की त्याने कॅमेरा तिकडं पॅन करावा. तिकडं मदानात आपल्याला काही स्टॉल्स दिसत आहेत. तिथं मोठा क्राऊड आहे. त्यावरून स्पष्ट होतंय की, हल्ली लोकांमधील वाचनाचं वेड वाढलेलं आहे. आता माझ्यासोबत एक मनसनिक आहेत. आपण त्यांनाच विचारू या. मला सांगा, हल्ली लोकांमध्ये वाचनाचं वेड वाढलेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मनसनिक : हा. आता आपुनच परवा बाबासाहेबांची शेलारिखड घेत्ली नाय का.. सवलतीत!
रिपोर्टरबाला : (स्टुडिओतल्या अँकरला उद्देशून) हर्षदा, ही ब्रेकिंग न्यूज आहे. आपण आताच कॅमेऱ्यासमोर ऐकलं, की मनसनिकांना आता िखडीतून जायला सवलत देण्यात आलेली आहे.. ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे.. मला सांगा, कोणत्या एक्स्प्रेस-वेवरती आहे ही शेलारिखड?  
मनसनिक : वो, तसं नाय वो! आपुन काय बोल्तो, का राजसायेबांमुळंच पोरं वाचायला लागली ना शाखे-शाखेवर?  
रिपोर्टरबाला : एक मिनिट! मनसनिकांना तसा आदेश देण्यात आला आहे का? (स्टुडिओतल्या अँकरला उद्देशून) हर्षदा, ही ब्रेकिंग न्यूज आहे..
मनसनिक : तसं नाय वो! त्याचं काय आहे, राजसायेब दर सभेत काय ना काय वाचून दाखवतात का नाय? मागं एकदा काय नव्हतं, तर राशनकार्डावरची नावं वाचून दाखिवली होती.. शेवटी कितीपन नाय बोल्लं, तरी पोरान्ला वान नाय पन गुन लागनारच का नाय?
रिपोर्टरबाला : म्हणूनच तिकडं स्टॉलवर पुस्तकं विकत घेण्यासाठी गर्दी उसळली आहे का? तिकडं ब्लू िपट्रपण भेटते का?
मनसनिक : कोन्त्या स्टॉलवर? त्या? अहो, तो काय बुकस्टॉल नाय!
रिपोर्टरबाला : मग? वडापावचा आहे का? हर्षदा, ही ब्रेकिंग न्यूज आहे.. येथे सभेला गर्दी जमावी म्हणून वडापावची व्यवस्था करण्यात आली आहे.. मी माझ्या कॅमेरामनला सांगेन, की त्याने त्या स्टॉलचा क्लोज शॉट दाखवावा. ओ माय गॉड! ओ माय गॉड! तो वडापावचा स्टॉल नाही! हर्षदा, ही..
मनसनिक : ब्रेकिंग न्यूज आहे! तेच तर सांगतोय. तिथं राजनामाचे दगड मिळतात.
रिपोर्टरबाला : आँ? आय डोन्ट अंडरस्टँड!
मनसनिक : तिथं खास पेशल दगडं विकायला ठेवलीत.
रिपोर्टरबाला : ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आम्ही आमच्या च्यानेलवर सर्वात आधी देतोय. या सभेत दगडांची विक्री सुरू आहे. इंडिका, सुमो, बोलेरोमधून लोक दगड नेत आहेत. आपण त्यांनाच विचारू या.. मला सांगा, तुम्ही इथून हे दगड का विकत घेत आहात?
सुमोतील मनसनिक : आम्हाला काय हौस आलीय का गाडीत दगडं भरायची? पण या सरकारनं एकापण हायवेवर दगडांची व्यवस्था केलेली नाय. बीओटीत सगळं कांक्रिटीकरन झालं बघा.
दुसरा मनसनिक : मागच्या टायमाला काय लोच्या झाला! टोल फोडायला गेलो, तं दगडंच नाहीत! डिवायडरची दगडं काडा म्हन्लं तं त्येच्यात दोन तास गेलं च्यामारी फुकट..   
सुमोसनिक : (बूम खेचत) या प्रत्येक दगडावर इथं राजनाम लिहिलेलं आहे.
 रिपोर्टरबाला : मी माझ्या कॅमेरामनला सांगेन, की त्याने या दगडाचा क्लोज शॉट घ्यावा. इथं ‘राज’ असं लिहिलेलं क्लीअर दिसतंय. हर्षदा, ही अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. या दगडांवर राज यांचं नाव िपट्र केलेलं आहे. आपण या स्टॉलमालकालाच विचारू या.. मला सांगा, या दगडांमध्ये असं स्पेशल काय आहे?
स्टॉलमालक : स्पेशल आहे तो!
रिपोर्टरबाला : हं, बोला, बोला.
स्टॉलमालक : (आजूबाजूला पाहत) त्याच्यावर हे राजनाम लिहिलेलं आहे ना, म्हणून तो स्पेशल आहे.
रिपोर्टरबाला : पण राजनाम लिहिल्यामुळे असा काय फरक पडलाय?
स्टॉलमालक : पडलाय तर! आता तो कसापण फेका, खळ्ळ् खटॅक बरोबर होणार!
रिपोर्टरबाला : ते तर काय कोणत्याही दगडाने होतं..
स्टॉलमालक : हा वेगळा आहे! समजा, हा दगड टोलनाक्यावर फेकला, तर त्याने तिथं खळ्ळ् खटॅक होईलच.. पण त्याने खरी तोडफोड दुसरीकडेच होईल!
रिपोर्टरबाला : हर्षदा, ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. येथे एका विशेष प्रकारच्या दगडाची निर्मिती करण्यात आली आहे. टोलनाक्यावर हा दगड फेकला तरी खरी तोडफोड दुसरीकडेच करणारा असा हा दगड आहे. आणि तो तयार करणाऱ्याचं नाव आहे.. (स्टॉलमालकास उद्देशून) हे दगड तुम्ही तयार केलेत?
स्टॉलमालक : हो.
रिपोर्टरबाला : आमच्या लक्षावधी प्रेक्षकांना तुमचं नाव सांगाल?
स्टॉलमालक : हो. पृथ्वी-राज!!