25 November 2020

News Flash

.मग जगायचं कधी?

‘तु म्हाला एक सॉलिड आयडिया देते सर. रोज तुम्ही एका विषयावर मुलाखत द्या. संगीताची वेगवेगळी अंगं, कविता, वाद्यं, परंपरा..

| August 8, 2015 01:01 am

‘तु म्हाला एक सॉलिड आयडिया देते सर. रोज तुम्ही एका विषयावर मुलाखत द्या. संगीताची वेगवेगळी अंगं, कविता, वाद्यं, परंपरा.. रोज एक. शिवाय आपण एका साइटवर तुमची गाणी टाकली आहेत.. तिथल्या रसिकांशी तुमचा संवाद दर तीन दिवसांनी. लहान मुलांच्या वेगवेगळ्या ग्रुप्सना गाणी शिकवायला आठवडय़ातून दोन वेळा. काही रेडिओ स्टेशन्स- आणि शिवाय ब्लॉग लिहा. सतत संपर्कात राहा. आजच्या जनरेशनला संवाद ठेवायला लागतो..’ मी डोळे विस्फारून सगळं ऐकत होतो. कलाकारांची प्रसिद्धी करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या त्या उत्साही तरुणीला मी शांतपणे विचारलं, ‘पण मग मी गाणं, वाचणं हे कधी करू?’ तिनं माझ्याकडे- ‘हं. म्हणूनच हे मराठी कलाकार मागे राहतात!’ असं बघितलं आणि म्हणाली, ‘एकदा ब्रँड तयार केलाय तुम्ही; आता तुम्ही तो छान मार्केट करायला हवा!!’ ‘अगं, मी काय टूथपेस्ट, वेफर्स, डास मारण्याचं यंत्र आहे का? मी मनापासून ठरवून संगीतातच आयुष्य रमवायचं असं ठरवलं ते मला गायला आवडतं, नवनवीन प्रयोग करायला आवडतात म्हणून ना? महिन्यातले वीस दिवस जर मी दुकानात उभं राहिलो तर गाणं कधी करू? शेतकऱ्यांनी शेतात चांगला वेळ घालवला तरच धान्य येणार ना?’ ‘हा अगदीच येडा आहे!’ असे भाव तिच्या डोळ्यात दिसत असतानाही ती म्हणाली, ‘पण नुसतंच पिकवून चालत नाही, विकायलाही लागतं सर.’ अगदी अचूक होतं तिचं. पण ज्यानं त्यानं त्याला नेमून दिलेलं काम नीट करावं असं वाटतं हो मला. म्हणजे गाणाऱ्यांनी गायला हवं. वादकांनी वाजवायला हवं. कारण त्यांचं ते प्रेम असतं. तबला वाजवताना तबलजी जसा दिसतो, तसा कध्धी कध्धीच दिसू शकत नाही. पण अलीकडे कलाकारांच्या तोंडून सतत ‘एका मीटिंगला जायचंय, नंतर एक चर्चा आहे, आणि मग मुलाखत झाली, एक आल्बमचं लाँच आहे- त्यासाठी काय कपडे घालावे याची ट्रायल आहे..’ असंच ऐकायला मिळतं. याला जबाबदार कोण? रसिक, कलाकार की मधले कोणी? ठाऊक नाही. पण ज्या ओढीनं आणि ज्या गोडीनं आपण सुरुवातीला आपल्या कामात रमतो, ते नंतर हरवून जातं का? गाण्याचा आनंद कमी वाटतो, आणि परिणामांचा जास्त वाटतो का? आणि सतत माझा सूर जगभर पोहोचावा म्हणून धडपड करायची, तर मग गायचं कधी? आणि खरं तर याच चालीवर विचार केला तर- जगायचं कधी?
कितीतरी अभ्यासू वक्ते चटपटीत व्याख्यान हवं म्हणून त्यांना जे इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक माहितीये ते सांगतच नाहीत. आणि अनेकदा तर अत्यंत चतुर आणि वाक्चातुर्य लाभलेले निवेदक त्यांच्याकडून हवी तीच उत्तरं वदवून घेतात. म्हणजे या माणसाला जे काही बोलायचंय, ते राहूनच जातं. मुलाखतकाराला लोकांनी काय ऐकावं असं वाटतं, तेच लोकांपर्यंत जातं. म्हणजे ज्यांच्याकडे जे खरं साहित्य आहे, त्यांनी तेच मांडायला हवं. लोकांनाही खरं तर तेच आवडेल. पण ही भेट पुष्कळदा राहूनच जाते. मग या प्रगल्भ आणि सखोल ज्ञान असलेल्या लोकांनी त्यांचं मन मोकळं करायचं कधी?
एखाद्या उत्तम फटकेबाजी करू शकणाऱ्या फलंदाजाला जसं सतत दबावाखाली फलंदाजी करून विसरायलाच होतं- की आपल्याला चेंडू टोलवायला आवडतो म्हणून आपण शाळेत असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. पण ते राहूनच जातं. आणि संघातलं स्थान, स्पॉन्सर्स आणि पुढचं प्लॅनिंग यांत तो गुणी क्रिकेटर त्याचा खरा खेळ खेळणार कधी? पैसा मिळतो, नाव मिळतं. पण स्वाभाविकतेचा आनंदही हवा ना? मग त्याने खरं खरं खेळायचं कधी? अगदी गल्ली क्रिकेटसारखं!!
अभिनेत्यांना सतत दडपण- की आज आपण लोकप्रिय आहोत तसे उद्या राहू की नाही? पैसा आज आहे तसा उद्या असेल का? मग या असुरक्षिततेपायी जे मिळेल ते काम.. दिवसातून वीस तास काम. शिवाय दहीहंडी, गणपती उत्सव, न्यू इयर पार्टी.. खरंच, इतक्या पैशांची गरज असते का जगण्यासाठी? कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये उत्तम अभिनय केलेला दिवस जास्त सुखाचा, की सतत वणवण करत डोळ्यांखालचा काळिमा झाकायला गॉगल लावून मुलाखत देण्याचा दिवस सुखाचा? मित्रांशी तासन् तास अभिनय, स्वप्नं, तत्त्वं यावर केलेली चर्चा, आई-वडिलांना या क्षेत्रात येताना झालेल्या वादाच्या वेळी पोटतिडकीनं ‘अभिनयाचं वेड आहे मला!’ हे सांगणं.. ते वेड..? राहूनच जातं!
गायक, अभिनेते, खेळाडूच नाही, तर प्रत्येक माणसाचंच अर्ध अधिक आयुष्य हे सिद्ध करण्यात निघून जातं. सतत धडपड- स्वत:ला सिद्ध करायची. मुळात ‘मी चांगला आहे’ हे जगाला पटवून देण्यात जन्म जातो आपला. मी मनमिळावू आहे, कणखर आहे, मित्र जोडणारा आहे, मोठय़ांचा आदर करतो, देशाचा, धर्माचा, जातीचा, पोटजातीचा, पोट-पोटजातीचा मला जाज्ज्वल्य अभिमान आहे आणि तरीही मी मानवतावादी व सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. मला फारसा राग येत नाही, हे सिद्ध करण्याची किती धडपड चालू असते सगळ्यांचीच. मग खरं कधी व्यक्त होणार? एखाद्याला मनापासून कंटाळा आला तर ते व्यक्त करतानासुद्धा दहा वेळा विचार करावा लागतो. राग व्यक्त करणं हे तर माथेफिरूचं लक्षणच समजलं जातं. अशावेळी ही माणसं त्यांच्या डोळ्यांना.. स्वत:चे डोळे आरशात दिसतात ते डोळे, ती खरी नजर घेऊन जगणार कसे?
वेगवेगळ्या भूमिका जगताना आपण नेमके कोण आहोत? कोण होतो? आपण खरं कसे बोलतो? आपली आवड काय आहे? हे विसरतोच आपण. ज्याच्या आवडीसारखी आपली आवड आहे असं म्हणत राहिलं तर आपण एका ताकदवान कंपूमध्ये समाविष्ट होऊ, या सुरक्षित भावनेतून आपली चवसुद्धा बदलतो आपण. मुळात आपण ‘ताकद’ आणि ‘समाधान’ यांत नेमकी ‘ताकद’च निवडतो. का? सगळीकडे आपल्याला बोलावणं आलं म्हणजे आपण लोकप्रिय का? दुसऱ्यांच्या भाषणात आपला उल्लेख होणं म्हणजे लोकप्रियता का?
देवळात देवासमोर हात जोडले की किती लोकांना एका वाक्यात ‘देवा, मला ‘अमूक’ दे, ‘तमूक’पासून दूर ठेव’ असं नेमकं म्हणता येतं? मुळात स्वत:ला ‘जगवत’ ठेवण्यासाठी आपण इतकं काही करतो, की एखाद्या रेसच्या घोडय़ाला खुराक देण्यातच सगळा पैसा संपावा आणि रेसला न्यायचं राहूनच जावं, तसंच काहीसं होतं. त्यामुळे वयाच्या अठराव्या-विसाव्या वर्षी समोर दिसलेलं आयुष्य आणि आपण जगतो ते आयुष्य- वेगवेगळीच असतात.
‘मला एखादी विशिष्ट गोष्ट, व्यक्ती, पुस्तक, पदार्थ, चित्रपट, देश, खेळ आवडतो’ यात त्या गोष्टींविषयी पुढे खोलात जाऊन चर्चा करण्यापेक्षा आपली शक्ती- मला ‘हे’ आवडतं, ते कसं योग्य आहे, हे इतरांना पटवून देण्यामध्येच संपते.
आदर देण्यापेक्षा वाकून नमस्कार करण्यात आपण जास्त शक्ती घालवतो. प्रेम करण्यापेक्षा ते भेटवस्तूच्या, पत्राच्या, कवितेच्या स्वरूपात व्यक्त करण्यात जास्त मन रमवतो आपण.
चांगली सुभाषितं, म्हणी, विनोद, कविता जमवता जमवता आपल्यालाही एकेकाळी काहीतरी चांगलं सुचत होतं, हे पूर्णपणे विसरून जातो आपण! सुचण्यापेक्षाही साठवण्यालाच आपण यश म्हणतो का?
प्रवासाची मजा घेण्यापेक्षा तिथे किती पटकन् पोचलो, आणि इतरांपेक्षा किती सोयीस्कर- ही आपली आनंदाची व्याख्या होऊन बसलीय का?
आपण.. आपलं मन.. स्वप्नं.. आतला हुंकार.. एक स्वाभाविक मनस्वी जगणं.. एवढीच असते अपेक्षा आपल्यातल्या खऱ्या ‘माणसाची’!
पण आपण त्याला इतकं सजवतो, मिरवतो, नाचवतो, यशस्वी करतो, गटात अडकवतो, की मला भीती वाटते की त्या लहान मुलासारख्या असणाऱ्या निखळ ‘आपण’ने मनापासून हसायचं, रडायचं कधी? आणि स्वत:ला उत्तमपणे जिवंत ठेवता ठेवता या सगळ्यात मग मनापासून जगायचं कधी?
सलील कुलकर्णी – saleel_kulkarni@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2015 1:01 am

Web Title: story of this life
टॅग Life
Next Stories
1 निमित्त : फाशी
2 कर्मयोगी
3 उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
Just Now!
X