News Flash

सांगतो ऐका : स्टालिनची शापित कन्या

स्वेतलाना अलिलुयेवा (१९२६-२०११) हे जोसेफ स्टालिनचं (१८७८ - १९५३) सर्वात धाकटं अपत्य आणि एकुलती एक मुलगी होती.

स्वेतलाना अलिलुयेवा

मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

स्वेतलाना अलिलुयेवा (१९२६-२०११) हे जोसेफ स्टालिनचं (१८७८ – १९५३) सर्वात धाकटं अपत्य आणि एकुलती एक मुलगी होती. जगाच्या इतिहासात भयंकर नरसंहार घडवणाऱ्या दोन राक्षसांपैकी स्टालिन एक आणि दुसरा अ‍ॅडॉल्फ हिटलर. या दोघांपैकी जास्त भयंकर कोण होता, हे टॉस करूनच ठरवावं लागेल. स्टालिन हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय अशा वाचकांसाठीदेखील हा लेख रोचक ठरेल.

बायबलमध्ये अशा प्रकारचं एक वचन आहे की, ‘वडिलांच्या पापांकरिता त्यांच्या मुलांना बळी देता कामा नये.’ पण या वचनात जी एक चांगली भावना व्यक्त केली गेली आहे ती स्टालिनच्या या शापित कन्येच्या बाबतीत फारशी योग्य वाटत नाही. अर्थात तिला प्रत्यक्षात कोणी फाशी दिली नाही की ठार मारलं नाही. Stalin- her father- although can not be accused of filicide, but yes, he did destroyher early life and thus caused her slow death.

आघात करणारे अनेक प्रसंग स्वेतलानाच्या सुरुवातीच्या आयुष्यात आले असले तरी पुढील दोन प्रसंगांमुळे आपले वडील पशुवत आहेत अशी तिची खात्री पटली. ती सहा वर्षांची असताना तिच्या आईचं निधन झालं. ते अ‍ॅपेंडिसायटिसच्या आजारामुळे झालं असं तिला सांगण्यात आलं होतं. पण पुढे तिला जे सत्य कळलं ते असं, की तिच्या वडिलांचं क्रूर वागणं अस झाल्यामुळे तिच्या आईने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली होती. आणि दुसरी घटना : स्वेतलाना १६ वर्षांची असताना ३८ र्वष वयाच्या अ‍ॅलेक्सी काप्लर नावाच्या एका ज्यू पत्रकार आणि सिने-दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली. काप्लरमुळेच तिला हेमिंग्वे आणि वॉल्ट डिस्ने या दोन महान अमेरिकन कलाकारांच्या त्या काळी रशियात प्रतिबंधित कलाकृतींची ओळख झाली होती. पण स्टालिनला हे प्रेमप्रकरण मुळीच मान्य नव्हतं. त्याने काप्लरला अटक केली आणि गुलाग येथील लेबर कॅम्पमध्ये त्याची रवानगी केली. (स्वेतलानाच्या दु:खी आयुष्याच्या अखेपर्यंत हे तिचं पहिलं खरं प्रेम राहिलं.) स्वेतलानाने ‘ळ६ील्ल३८ छी३३ी१२ ३ ंो१्रील्ल’ि या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात आपल्या रशियातील जीवनाच्या आठवणी लिहिल्या आहेत. हे पुस्तक तुफान खपलं. त्यात तिने लिहिलंय.. ‘‘स्टालिनचे जवळचे नातेवाईक असणं हे त्याची प्रजा असण्याइतकंच भयंकर होतं.’’

स्टालिन हा काही आदर्श पती किंवा पिता कधीच नव्हता. पण स्वेतलानादेखील काही रशियन सावित्री किंवा श्यामची आई वगैरे नव्हती. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल चार लग्नं तिने केली होती आणि चारही सपशेल अयशस्वी ठरली होती. तिचे तिच्या मुलांबरोबरचे संबंधदेखील नेहमीच अतिशय तणावपूर्ण होते आणि त्यास ती स्वत:च जबाबदार होती. योसिफ हा २१ वर्षांचा मुलगा आणि येकोतेरिना ही १६ वर्षांची मुलगी यांना मॉस्कोलाच सोडून ती अमेरिकेत राजाश्रय घेऊन गेली होती. ओल्गा या अमेरिकन नवऱ्यापासून झालेल्या मुलीबरोबरदेखील तिचं कधीच पटलं नाही. आधुनिक मानसशास्त्रात ‘Nature versus nurture’ असा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्ताच्या संदर्भातच बोलायचं झालं तर स्वेतलानाचं अतिशय सदोष व्यक्तिमत्त्व घडण्यात निसर्गाचा (म्हणजे तिच्या वडिलांचा) आणि ती ज्या वातावरणात वाढली त्याचा वाटा किती, याचा शोध घ्यायला मानसशास्त्रज्ञांची एक टीमच लागेल. हा विषय बराच वादग्रस्त असल्याने तूर्तास तो आपण बाजूला ठेवू या.

स्वेतलाना पहिल्यांदा सोव्हिएत रशियाबाहेर पडून १९६७ साली जेव्हा भारतात आली ती कहाणी फारच रोचक आहे. ऑक्टोबर १९६३ मध्ये टॉन्सिलचं ऑपरेशन झाल्यानंतर ती मॉस्कोमधील एका हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेत होती. आणि आता या कहाणीत मनमोहन देसाईंच्या एखाद्या चित्रपटासारखा एक भन्नाट ट्विस्ट.. त्याचवेळी त्या हॉस्पिटलमध्ये नाकाच्या पडद्याचं ऑपरेशन झाल्यानंतर कुंवर ब्रजेश सिंग नावाचा एक भारतीय कम्युनिस्ट तरुणदेखील विश्रांती घेत होता. त्या दोघांची भेट झाली. हॉस्पिटलच्या वाचनालयातून स्वेतलानाने रवींद्रनाथ टागोरांचं एक पुस्तक वाचलं होतं, त्याबद्दल दोघं चर्चा करू लागले. भेटी वाढत गेल्या आणि दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. ब्रजेश अतिशय मृदू आणि शांत स्वभावाचा तरुण होता. स्वेतलानालाही आपल्याला दुसरं खरं प्रेम मिळाल्यासारखं वाटत होतं. ब्रजेशला जेव्हा तिनं सांगितलं, की ती स्टालिनची मुलगी आहे, तेव्हा त्याच्या तोंडून फक्त ‘ओ!’ असा उद्गार निघाला. हा विषय त्या दोघांमध्ये पुन्हा कधी आला नाही. ब्रजेश भारतात परतण्यापूर्वी काळ्या समुद्राच्या किनारी असलेल्या सोची या गावातील एका सुंदर रिसॉर्टमध्ये दोघांनी एक महिना एकत्र घालवला.

ब्रजेश भारतातून परत आल्यानंतर दोघांनी सोव्हिएत सरकारकडे लग्न करण्यासाठी अर्ज केला. त्या दोघांना ‘अ‍ॅलेक्सी कोसिजिन यांना भेटा’ असं सांगण्यात आलं. ते त्यावेळी सोव्हिएत रशियाचे पंतप्रधान होते. ते म्हणाले, ‘हे लग्न अनैतिक असून त्याला स्टेट परवानगी देऊ शकत नाही.’ ‘हिंदू लोक आपल्या स्त्रियांना वाईट वागणूक देतात..’ अशा काहीशा अर्थाचंदेखील ते बोलले. (हे खरं असेल किंवा नसेलही; पण एक गोष्ट नक्की.. कॉम्रेड कोसिजिनचा एकेकाळचा बॉस स्टालिन हा एक स्त्रीद्वेष्टा होता.)

श्वसनाचं दुखणं बळावून शेवटी ब्रजेश याचा १९६६ साली मृत्यू झाला आणि व्होल्गा व गंगेचं मीलन अधुरंच राहिलं. ब्रजेशच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी भारतात नेल्या पाहिजेत यावर स्वेतलाना ठाम होती. आणि आश्चर्य म्हणजे तिला सोव्हिएत सरकारकडून तशी परवानगीदेखील मिळाली. त्याप्रमाणे अस्थिकलश घेऊन ती भारतात आली. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यतील कालाकंकर या छोटय़ा गावातील ब्रजेशच्या राजपूत जमीनदार कुटुंबीयांना ती भेटली. भारतात तिला मोकळ्या आकाशात विहरणाऱ्या एखाद्या आनंदी पक्ष्याप्रमाणे मुक्त वाटलं. ती खूप सुखावली. पण..

स्वेतलानाला अमेरिकेत राजाश्रय मिळवून देण्याच्या कामी जॉर्ज केनन यांची खूप मदत झाली. ते बरीच र्वष मॉस्कोमध्ये अमेरिकेचे राजदूत होते. स्वेतलानाला पूर्णपणे परक्या देशात स्थायिक व्हायला त्यांनी खूप मदत केली. (प्रिन्स्टन विद्यापीठात ‘आधुनिक राजकीय इतिहासा’ची व्याख्याती म्हणून तिला नोकरीही देऊ केली होती. पण त्यास स्वेतलानाने नकार दिला.) चार दशकांपेक्षा जास्त काळ तिने अमेरिकेत व्यतीत केला. तिच्या आयुष्याचा हा काळ दुर्दैवाने खाचखळग्यांनी भरलेला होता.

मात्र, स्वेतलानाचं अमेरिकेतील आगमन खूपच प्रकाशझोतात झालं. तिच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला (जी न्यूयॉर्कच्या प्लाझा हॉटेलमध्ये झाली.) चारएकशे पत्रकार उपस्थित होते. लवकरच तिने ‘Twenty Letters to a friend’ (१९६८) आणि ‘only one year’ (१९६९) ही दोन बेस्ट सेलर पुस्तके लिहिली आणि ती खूप श्रीमंत झाली. पण जितका झटपट पैसा तिने मिळवला, त्यापेक्षा जास्त वेगाने तो उडवलाही. शीतयुद्ध संपलं त्या सुमारास लोक  तिला विसरले होते. आणि १९९० नंतर तर ती जवळजवळ विजनवासातच गेली. ती एका चॅरिटी हॉस्पिटलमध्ये राहू लागली आणि सोशल सिक्युरिटी कायद्यांतर्गत अमेरिकन सरकार तिला दरमहा जो ‘पे चेक’ देत असे त्यावर ती गुजराण करत होती. चाळीस वर्षे अमेरिकेत राहूनदेखील तिला हा देश आपलं घर आहे असं कधीच वाटलं नाही.

मरणाच्या कल्पनेने पछाडलेल्या स्वेतलानाने जून २०११ मध्ये आपल्या एका मित्राला लिहिलं होतं- ‘‘मला हृदयविकाराचा झटका येऊन पटकन् मृत्यू यावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते, म्हणजे फार काळ मी खितपत पडणार नाही. पण मी पापी आहे. त्यामुळे देव माझी प्रार्थना का बरं ऐकेल?’’

त्याच वर्षी २२ नोव्हेंबरला वयाच्या ८५ व्या वर्षी स्वेतलानाचं देहावसान झालं. ‘नोव्हेंबर महिना माझ्यासाठी नेहमीच सगळ्यात वाईट असतो. मी ८५ व्या वर्षी मरणार आहे,’ असं ती मित्रांना नेहमी सांगत असे. त्यामुळे This was a most poignant case of a self-fulfilling prophecy.

जाता जाता तीन विचार.. (१) १९६७ मध्ये दिल्लीतल्या अमेरिकन दूतावासात स्वेतलानाने जेव्हा राजाश्रय घेतला तेव्हा एम. सी. छागला हे देशाचे परराष्ट्र मंत्री होते आणि टी. एन. कौल हे परराष्ट्र सचिव. आता जरा कल्पना करा : एका सकाळी जरा जास्तच भारावलेल्या अवस्थेत कौलसाहेब छागलासाहेबांच्या साऊथ ब्लॉकमधल्या ऑफिसात येतात आणि जणू काही आपल्या कारकीर्दीतली सर्वात सनसनाटी घटना सांगतोय अशा आविर्भावात मंत्रिमहोदयांना अत्यंत नाटय़पूर्ण आवाजात विचारतात, ‘‘सर, वुड यू बिलीव्ह दॅट.. स्वेतलानाला भारतात आश्रय हवा आहे?’’ छागलासाहेब त्यांना अत्यंत थंडपणे विचारतात, ‘‘कोण आहे हा किंवा ही स्वेतलाना?’’ (कौल हे सोव्हिएत रशियात भारताचे राजदूत होते तेव्हा त्यांनी स्वेतलानाच्या आठवणींच्या एका पुस्तकाची संहिता गुप्तपणे रशियातून भारतात आणली होती. आणि ती जेव्हा दिल्लीला आली, तेव्हा तिला ती परत केली होती. काही वर्षांत हे पुस्तक अमेरिकेत प्रकाशित झालं आणि बेस्ट सेलर म्हणून गाजलं.) (२) आपल्या राक्षसी पित्याची स्वेतलानाला एवढी लाज वाटे, की १९५३ साली त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिने आपलं ‘स्टालिन’ हे आडनाव बदलून ‘अलिलुयेवा’ असं केलं होतं. आणि इथे आपल्या भारतात डी. एम. के.चे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आपल्या मुलाचं नाव ‘स्टालिन’ ठेवलं होतं ( या बेबी तामिलियन स्टालिनचा जन्म १ मार्च १९५३ चा. आणि असली स्टालिनचा मृत्यू त्याच्यानंतर चार दिवसांनी- म्हणजे ५ मार्चला झाला.) स्वेतलानाची कृती आपण समजून घेऊ शकतो; परंतु करुणानिधींचं हे भन्नाट कृत्य आकलनापलीकडचं आहे. या आपल्या देशी स्टालिनने १९८९ साली जेव्हा रशियाला भेट दिली, तेव्हा त्याला भेटलेल्या रशियन लोकांना त्याचं नाव ऐकून त्याची भीतीच वाटली असेल. काही जणांची तर मतीच गुंग झाली असेल. (३) माझा हा लेख जेव्हा मी माझा मित्र सोपान याला दाखवला तेव्हा तो म्हणाला, ‘‘मित्रा, माफ कर, पण तुला अनेक लग्नं केलेल्या व्यक्तींचं एक फिक्सेशन आहे असं मला वाटायला लागलंय. आधी तुझा तो आई तेंडुलकर आणि आता ही स्वेतलाना मॅडम.’’ मी म्हणालो, ‘‘सॉरी सोपान, पण मला वाटतं, इथे तू अस्तित्वात नसलेला पॅटर्न शोधतोय. मी वाचकांची करमणूक करणारा एक साधा माणूस आहे; नीतिमत्तेचे पाठ देणारा उपदेशक नाही. मला जी माणसं वा विषय भावतात त्यांच्याबद्दल मी लिहितो.’’ यावर मात्र सोपानने मला निरुत्तर करत म्हटलं, ‘‘मी केवळ माझ्या सदरलेखक मित्राचा साऊंडिंग बोर्ड आहे हे न कळण्याइतका मी खुळा नाही.’’ मी यावर काहीच बोललो नाही. कारण सोपान माझ्यासाठी याहून खूप आहे. आणि हे आम्हा दोघांनाही चांगलं माहितीये

शब्दांकन : आनंद थत्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 1:05 am

Web Title: svetlana alliluyeva daughter of joseph stalin sangto aika dd70
Next Stories
1 या मातीतील सूर : ज्ञानयोगी भास्करजी
2 घेणाऱ्याने घेता घेता श्रमिकांचे देणे द्यावे!
3 एका साथीचा जन्म
Just Now!
X