सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास..

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
lok sabha election 2024, nanded, constituency, vanchit bahujan aghadi, congress, bjp
नांदेडमध्ये वंचितच्या उमेदवाराचा यंदा कोणाला फटका ?

सदू धांदरफळेचा नमस्कार.

आज माणसाने किती प्रगती केलीय. देशोदेशीच्या अंतराळ संशोधन संस्था मंगळावर मानवरहित यान पाठवतात, चंद्रावर तर माणूस जाऊन येतोय, लोक अंतराळात सहलीला जायच्या गोष्टी करू लागलेत, पृथ्वीच्या कक्षेबाहेरून ही मंडळी ट्वीट करून आपल्याला तिथली बित्तंबातमी देतात आणि आम्ही मात्र बेडरूममध्ये किंवा लिफ्टमध्ये मोबाइलला रेंज येत नाही म्हणून कुरकुर करत असतो. तुला सांगतो दादू, कुरकुर करायला आपल्याला निमित्तच हवं असतं. गर्मी असो, पाऊस असो, वारा असो, कडाक्याची थंडी असो की नावडत्या पक्षाचं सरकार असो; आपल्याला अजिबात सहन होत नाही. आपण लगेच त्याबद्दल कुरकुर करू लागतो. जगातल्या कुठल्याच जागेवरील वातावरणाबद्दल तिथला माणूस समाधानी असेल असे मला वाटत नाही. मी म्हणतो, बाकी सगळे पशुपक्षी, प्राणी, मासे, कीटक हे कसे तिथल्या वातावरणाला लगेच अ‍ॅडजस्ट होतात? माणूसच का होत नाही? मला तर अशी शंका आहे की, मनुष्य हा प्राणी या पृथ्वी ग्रहावरील नसावाच. हा कटकट करणारा प्राणी आपल्या ग्रहावर नसावा म्हणून मनुष्याला नक्कीच कुणीतरी गुपचूप बाहेरून आणून पृथ्वीवर सोडलंय. मनुष्य मूळ कुठल्या ग्रहावरून आलाय त्याचा शोध घ्यायला एखादी मोहीम आखायला इस्रोला सांगायला हवे.

अरे दादू, २००९ सालच्या चांद्रयान-१ च्या यशानंतर अलीकडेच चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-२ ही आपल्या देशाची अंतराळ विज्ञानातील मोठीच झेप आहे. विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यामुळे या मोहिमेला काहीसं गालबोट लागलं असलं तरी इतकं साध्य करू शकणाऱ्या जगातील मोजक्या देशांपैकी आपण एक आहोत, या विचाराने आपणही आपली छाती छपन्न इंचाच्या आसपास फुगवायला हरकत नाही. जवळजवळ चार टन इतकं वजन घेऊन जाणारं आणि चंद्राच्या सर्व भागांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट असलेलं पहिलं यान आपल्या भारताचं असावं याचा तुझ्या-माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला अभिमान वाटणं साहजिकच आहे. अभिनंदन दादू.. तुझंही, माझंही, सर्व भारतीयांचं आणि विशेष म्हणजे ज्यांनी आपल्याला हा अभिमानाचा दिवस दाखविला त्या इस्रोचंही मनापासून अभिनंदन!

वैज्ञानिक, शास्त्रज्ञ अशा लोकांचं मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे समजा, आपल्या छताला कुठेतरी लीकेज असेल, पावसाळ्यात त्यातून पाणी झिरपत असेल, घरात ओल येते म्हणून बायको आपलं डोकं खात असेल तर आपण शक्यतो काही ना काही सबबी काढून घरात झिरपणाऱ्या पाण्याचा स्रोत शोधण्याचा कंटाळा करतो. अशा परिस्थितीत वैज्ञानिकांना चंद्रावरील आणि मंगळावरील पाणी शोधण्याचा उत्साह कुठून येत असेल? इथे आपल्याला आपल्याच घरात ठेवलेले पायमोजे वेळेवर सापडत नाहीत; आणि हे शास्त्रज्ञ लोक नवनवीन ग्रह-तारे शोधायला कुठून ऊर्जा आणत असतील? आमच्या शेजारचा बापू तर म्हणतो, ‘ठीकाय.. त्यांना ग्रह-तारे शोधायचे असतील तर शोधू दे; पण इतक्या दूरवरचे ग्रह-तारे शोधल्याने आपल्याला काही फायदा होणार आहे का? तर नाही! उलट, यांच्या शोधांमुळे आमच्या पोरांचा सायन्सचा अभ्यास जड होणार आहे!’

परवा टीव्हीवर चांद्रयान-२ मधून विक्रम लँडरचं चंद्रावर होणारं लँडिंग पाहत होतो, तर टीव्हीवर त्या लँडरचा जाण्याचा रस्ता (trajactory) आणि त्यावरून हळूहळू पुढे सरकणारा एक लाल ठिपका दिसत होता. मला कमाल अशी वाटते की, हे शास्त्रज्ञ लोक इथे पृथ्वीवर बसून चंद्रापर्यंतचा आणि मंगळापर्यंतचा रस्ता ठरवतात आणि मला साधं चर्चगेटहून मंत्रालयात जायचं असलं तरी प्रत्येक वळणावरील पानवाल्याला पत्ता विचारावा लागतो. अरे, ज्या मत्रिणींच्या घरी गुपचूप चार-चार वेळा जाऊन आलोय तिथलेही रस्ते माझ्या लक्षात राहत नाहीत. (आणि गेल्याबरोबर माझा मोबाइल मात्र त्यांच्या वायफायशी लगेच कनेक्ट होतो!) खरं म्हणजे मला आणि माझ्यासारख्या हुकमाच्या बेपत्त्यांना पोलिओ डोसबरोबरच एखादं जीपीएसचं इंजेक्शन द्यायला हवं. चंद्रावर गेलेलं आपलं यान पहिला महिनाभर नुसते वेगवेगळ्या अँगलमधून पृथ्वीचेच फोटो पाठवत होतं. ते पाहून आमच्या ऑफिसमधला गजा बोलला, ‘‘चंद्राचा अभ्यास करायला गेलेला उपग्रह पृथ्वीचे का फोटो काढतोय? हा वेळेचा आणि पशाचा अपव्यय नाही का?’’ मी त्याला म्हटलं, ‘‘तुम्ही लोक पैसे देऊन बुर्ज खलिफा, आयफेल टॉवर अशा उंच ठिकाणी जाता आणि वर चढल्यावर तिथे आणखी दुर्बणिीसाठी दिऱ्हॅम किंवा युरो मोजून खाली काय आहे ते पाहता की नाही?’’ गजा निरुत्तर झाला! वाचाच गेली त्याची.

त्याचं काय आहे दादू, हल्ली कुणी काही अडचणीचा प्रश्न विचारला की त्याला उत्तर न देता उलट प्रश्न विचारायचा अशी नवीन सिस्टम मी आजूबाजूला पाहून पाहून शिकलोय. प्रत्येक प्रश्नामागे चाळीस पैसे कमाई होते ती वेगळीच! अरे दादू, आकाशातल्या आणि जन्मकुंडलीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह सर्वश्रेष्ठ असतो असं मानणारा मी एक सामान्य विवेकी माणूस आहे. मंगळ किंवा कुंडलीतले राहू-केतूसारखे आभासी ग्रह माझ्या आयुष्याची दिशा ठरवतात असे समजण्याइतका मी भाबडा नाहीये आणि लोकांच्या सगळ्याच श्रद्धा वैज्ञानिक पुराव्याद्वारे खोडून काढू शकेन इतका माझा विज्ञानाचा अभ्यासही नाही. शाळेत आमचे विज्ञानाचे अल्मेडा सर म्हणायचे की, ‘‘माणसाने विज्ञाननिष्ठ झालं पाहिजे. प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. ज्याला प्रश्न पडत नाहीत तो विवेकी होऊ शकत नाही, शास्त्रज्ञ होऊ शकत नाही.’’ सातवीत असताना सरांच्या या विचारांनी भारावून जाऊन मी सरांना विचारले, ‘‘प्रकाशाचा वेग आपल्याला माहीत आहे, पण अंधाराचा वेग किती असेल?’’ तेव्हा सरांनी माझ्या कानाखाली काढलेल्या आवाजाचा वेग आणि माझ्या डोळ्यापुढे अंधारी येण्यासाठी लागलेला वेळ याचं गणित मला अजून सुटलेलं नाहीये.

आज चंद्रावरील खड्डय़ांविषयी अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही माहिती असताना आपल्या प्रियतमेला चंद्राची उपमा देणाऱ्या धाडसी प्रियकरांचा मला हेवा वाटतो आणि भाबडय़ा कवीलोकांची कींव येते. चंद्राखालोखाल खड्डे फक्त आमच्या गावात, शहरात आहेत असं प्रत्येकालाच वाटतं. अरे, हल्लीच कुणा अवलियाचा अंतराळवीरासारखा पोशाख करून चंद्रावर चालल्याच्या आविर्भावात रस्त्यावरील खड्डय़ांतून चालतानाचा एक व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपला निषेध प्रशासनापर्यंत पोहोचवायचा त्या माणसाचा हा मार्ग मला आवडला. महापालिकेमध्ये सेटिंग असलेला, आमच्या विभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे वर्षांला दोन वेळा कंत्राट मिळवणारा एक कंत्राटदार माझ्या ओळखीचा आहे. त्याला मी विचारले की, दुरूस्त करूनही मुंबईच्या रस्त्यावर खड्डे का पडतात? तो म्हणाला, ‘‘सदूभाऊ, गणितातल्या शून्याची आणि खड्डय़ाची संकल्पना सेम आहे. कुठल्याही संख्येस शून्याने गुणले तर गुणाकार शून्यच येतो, तसेच कोणत्याही खड्डय़ाचा रस्ता बनवला तरी तेथे खड्डाच पडतो.’’

भारताने अवकाश विज्ञानात घेतलेल्या रॉकेटभरारीबद्दल देशभरात उत्साहाचं वातावरण असताना, इस्रो या आपल्या अवकाश विज्ञान संस्थेचा जगभरात गौरव होत असताना विरोधी सूर लावणारेही आहेतच. त्यांच्या मते, ‘तापमानवाढीमुळे भूगर्भातील पाण्याचे साठे आटत आहेत. मराठवाडा, पूर्व महाराष्ट्र, चेन्नईसारखी शहरे पाणीटंचाईने त्रासलेली आहेत. अशा वेळी चांद्रयान-२ प्रकल्पात ९७८ कोटी रुपये घालवणाऱ्या आपल्या देशाची अवस्था ऋण काढून सण साजरे करणाऱ्या माणसासारखी आहे. इथला पाणीप्रश्न न सोडवता चंद्रावरच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेचा अभ्यास करणे हा क्रूर विनोद आहे. खेडय़ापाडय़ांत पाण्यासाठी हंडे घेऊन मलोन् मल वणवण फिरणाऱ्या बायांना यावर काय वाटेल, हे सोडून तुम्ही चांद्रयान प्रकल्पात बाया आघाडीवर आहेत याचं कौतुक कसलं करता? तुमचा ऊर राष्ट्राभिमानाने भरून येतो कशासाठी? तर अवकाश मोहिमेत अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यापाठोपाठ आपला चौथा क्रमांक लागतो म्हणून! पण हे म्हणत असताना जगातले १८० पेक्षा अधिक देश असल्या मोहिमेच्या फंदात पडलेले नाहीत हे आपण नजरेआड करतो आहोत. २०१८ च्या मानवी विकास निर्देशांकात पहिल्या दहा क्रमांकांत आलेल्या एकाही देशाने असल्या मोहिमेत भाग घेतलेला नाही आणि ते दहाही देश संपन्न अवस्थेत आहेत. मग चंद्रावरील पाण्याच्या शोधाचा खटाटोप नेमका कशासाठी आहे?’

दादू, पृथ्वीवरील लोकांना मूलभूत सुविधा आणि हक्क मिळायलाच हवेत, या विचाराशी पूर्णपणे सहमत असूनही मी असे म्हणेन की, संपूर्ण जगातील एकूण एक माणसाच्या सर्व मूलभूत गरजा जोवर पूर्ण होत नाहीत तोवर वैज्ञानिक प्रगतीला हात घालू नये, हा विचार नाही तर ठार अविचार आहे. हा विचार ग्राह्य़ मानला असता तर मनुष्यदेखील इतर जंगली प्राण्यांसारखा अजूनही भूक, निद्रा, मथुन या गरजांभोवतीच घुटमळत राहिला असता. असो. निराशावादी लोकांच्या नादी लागण्यात हशील नाही.

पत्र संपवता संपवता इतकंच म्हणेन.. सव्वाशे कोटींहून अधिक भारतीयांच्या आशा-अपेक्षांचा वेताळ पाठीवर घेऊन इस्रोचा हा विक्रमादित्य चांद्रयान, मिशन मंगळ या आपल्या मार्गाने दमदार पावले टाकीत पुढे निघालाय. या मार्गात यश आलं तरी ‘या खटाटोपाची काही गरज होती का?’ असे प्रश्न विचारणाऱ्यांची या देशात कमी नाही. आणि अपयश आलं तर जीवनातून उठवील अशा नराश्याचा वेताळ तर चोवीस तास मानगुटीवर बसलेलाच आहे. अशा पावलोपावली परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत काम करून देशाची मान उंच करण्यासाठी आपली मान मोडून झटणाऱ्या सर्व विक्रमादित्य शास्त्रज्ञांना कडक सॅल्यूट!

तुझा मंगलमय मित्र

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com