News Flash

एका दुर्लक्षित नायकाचे चरित्र

शत्रूने केलेली स्तुती इतिहासात अनेकदा महत्त्वाची मानली गेली आहे.

|| डॉ. गणेश राऊत

‘दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती अंताजी माणकेश्वर गंधे’ हा चरित्रग्रंथ कौस्तुभ कस्तुरे यांनी सिद्ध केला आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत निर्माण झालेली ऐतिहासिक जागृती, ऐतिहासिक विषयावरील चित्रपटांचे प्रमाण, ऐतिहासिक-पौराणिक विषयांवरील मालिका, ऐतिहासिक घटनांवर आधारित संशोधनपर वा ललित पुस्तके यांनी ‘इतिहास’ विषयातील मरगळ दूर केली आहे. त्यामुळे आजवर फारसे हाताळले न गेलेले विषय पुढे येत आहेत. त्याचेच एक चांगले उदाहरण म्हणजे ‘अंताजी माणकेश्वर गंधे यांचे चरित्र’!

‘पानिपतचा रणसंग्राम’ म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. अब्दालीसारख्या परकीय आक्रमकाला तोंड देण्यासाठी संपूर्ण भारतातून आघाडीवर गेलेली एकमेव सत्ता म्हणजे मराठे. या युद्धात मराठ्यांचे मोठेपण दिसून येते. हा रणसंग्राम ज्यांच्या जिवावर खेळला जाणार होता, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे चरित्रनायक गंधे.

शत्रूने केलेली स्तुती इतिहासात अनेकदा महत्त्वाची मानली गेली आहे. त्या व्यक्तीचे मोठेपण समजण्यासाठी शत्रूने केलेली स्तुती प्रमाण मानली जाते. १७६१ च्या पानिपतच्या रणांगणावरील मराठ्यांचा शत्रू अब्दाली म्हणतो, ‘हिंदुस्थानात आल्यावर मोठमोठे राजपूत, राजेरजवाडे वगैरे कोणीही तलवार उचलली (अब्दालीविरोधात) नाही आणि हा अंताजीच का माझ्या मागे लागला आहे?’ यावर अधिक भाष्य करण्याची गरज आहे का?

रियासतकार सरदेसाई यांनी मागील शतकात अंताजी माणकेश्वर गंधे यांचे चरित्र लिहिले जाण्याची गरज प्रतिपादन केली होती. ती इच्छा या शतकात पूर्ण झाली. लेखकाने अंताजींबद्दलचे एक चांगले निरीक्षण नोंदवले आहे आणि ते महत्त्वाचे आहे. अंताजींनी आपल्या गावात आणि कुटुंबामध्ये सतीबंदी केली होती. अंताजींना दिल्लीच्या अहमदशाह बादशहाने दिलेले अस्सल फर्मान या चरित्रग्रंथात दिले आहे. त्यांना आणि त्यांच्या वारसांना ‘राजा’ हा किताब वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरून त्यांचे बादशहाच्या दरबारातील मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून काय स्थान होते, हे लक्षात येऊ शकते. परिशिष्टात अहमदनामा, मुद्रा आणि मोर्तब, कामरगाव वाडा व छायाचित्रे, जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई यांची मते या सगळ्यांचा समावेश आहे. यानिमित्ताने मराठेशाहीतील अनेक सरदारांची चरित्रे लिहिली गेल्यास त्यातून अनेक गोष्टी प्रकाशात येतील. उत्तम दर्जाची संदर्भ साधने वापरून सिद्ध केलेला हा चरित्रग्रंथ इतिहासप्रेमींनी आवर्जून वाचायला हवा. एका अलक्षित विषयाला न्याय दिल्याबद्दल लेखक आणि प्रकाशकांचे अभिनंदन.

‘दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती अंताजी माणकेश्वर गंधे’ – कौस्तुभ कस्तुरे, अनुबंध प्रकाशन,

पृष्ठे : १६०, किंमत : २२५ रुपये  ६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 12:01 am

Web Title: the character of a neglected hero akp 94
Next Stories
1 वाचू आनंदे… घडू या स्वानंदे…
2 रफ स्केचेस : देऊळ
3 चवीचवीने… : धावीर बाबा की जय!
Just Now!
X