29 September 2020

News Flash

समृद्ध जाणिवांचं संचित

भारत सरकारने फिल्म इन्स्टिटय़ूट काढण्याच्या उद्देशाने या सर्वगुणसंपन्न प्रभातनगरीची निवड केली. १९६० साली  FTII अस्तित्वात आले.

(संग्रहित छायाचित्र)

उमेश विनायक कुलकर्णी

aantarik@yahoo.com

पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवरच्या ‘भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थान’ अशी ठळक पाटी असलेल्या कमानीतून आत गेलं की आपला बाहेरच्या जगाशी संबंध संपतो आणि आपण एका बेटावर प्रवेश करतो. एक आडवी दांडी आपलं स्वागत करते आणि थांबा असा इशारा करते. आपल्याकडच्या गुप्त खिशातून खच्चून भरून आणलेलं dos + donts चे, खऱ्या-खोटय़ाचे, सुष्ट-दुष्टाचे अर्थ-अनर्थाचे, भूत-वर्तमान-भविष्याचे निकष आपल्याला या बेटावर नेता येत नाहीत. कारण हे एक अद्भुत बेट आहे. मग आपण एखाद्या भारतीय घराच्या बाहेर जसे चप्पल काढून आत प्रवेश करतो, तसे हे सगळे पूर्वग्रह आपल्याला शरीरावरून, शरीराआतून तात्पुरते का होईना, पण काढून ठेवायला लागतात. ‘ते ठेवले का?’ असं विचारल्यावर आपण ‘हो’ म्हटलं की ती आडवी दांडी उभी होते आणि आपण या बेटावर प्रवेश करते होतो.

तर हे एक अजब मायावी संस्थान आहे. साठ वर्षांपूर्वी ते सुरू झालं. पण खरं म्हणजे १९३३-३४ च्या आसपास ‘प्रभात’च्या मंडळींनी त्यावेळी गावाबाहेर असलेली ही जागा हेरली, नव्हत्याचं होतं केलं आणि त्याकाळी आशियातील सर्वात मोठा अद्ययावत फिल्म स्टुडिओ इथे उभारला आणि चित्रनिर्मितीला सुरुवात केली.

त्यावेळी त्यांना कुठं माहीत होतं, की भारतीय चित्रपटसृष्टीचा एक नवा अध्याय त्यांच्याकडून सुरू झाला होता. आपण एखादी कृती करतो, त्या कृतीचे दूरगामी, साधकबाधक परिणाम काळाच्या पटावर कुठल्या रंगात, किती खोलवर उमटतील याचं नेमकं भाकीत करण्याचं सामर्थ्य मानवाकडे नाहीच. त्यामुळे कर्मसिद्धांतानुसार, आपण आपलं काम करायचं आणि बाकी सगळं त्या अज्ञात ऊर्जेच्या लहरीवर सोडून द्यायचं. तर त्याप्रमाणे या विचक्षण, धैर्यवान, बुद्धिमान आणि उत्कृष्ट निर्मिती करण्याच्या कल्पनेनं झपाटलेल्या ‘प्रभात’वीरांनी या माळरानाचं एका चित्रनगरीत रूपांतर केलं आणि चित्रपटनिर्मितीच्या वैशिष्टय़पूर्ण कार्यपद्धतीचा समृद्ध पाया रचला.

नवे कॅमेरे, ध्वनिमुद्रणाची यंत्रे, कला विभाग, शिल्प विभाग, छायाचित्रण विभाग, संकलन, प्रिंटिंग, वातानुकूलित रसायनशाळा, नट-नटय़ांसाठीचे कक्ष, व्यायामशाळा, ग्रंथालय, संगीत दिग्दर्शकासाठी, तालमीसाठी स्वतंत्र जागा, संचालक व अधिकाऱ्यांची कार्यालये, प्रिंट झालेले फुटेज पाहण्यासाठी थिएटर, प्राणीसंग्रहालय, बाह्य़ चित्रीकरणासाठी उद्यान, अरण्य, नदीचा घाट यांसारखी स्थळे अशी जय्यत आखणी केली गेली होती. आणि या जगड्व्याळ कारभाराचे काम चोख व्हावे यासाठी तितकीच कडक शिस्त होती.

पुढच्या दोन दशकांत ‘प्रभात’नं ‘धर्मात्मा’, ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘रामशास्त्री’ यांसारख्या अनेक अस्सल कलाकृती या वास्तूत तयार केल्या. व्ही. शांताराम, व्ही. दामले, एस. फत्तेलाल, तुकाराम कुलकर्णी, केशवराव धायबर, विश्राम बेडेकर, शांताराम आठवले, केशवराव भोळे, शाहू मोडक, विष्णुपंत पागनीस, केशवराव दाते, दुर्गा खोटे, शांता हुबळीकर, हंसा वाडकर या आणि अशा अनेक अफाट ताकदीच्या सर्व विभागांतील कलाकार व तंत्रज्ञांनी या वास्तूला सळसळते सोनेरी चैतन्य दिले. तिच्या रंध्रारंध्रांत सिनेमाची ही झिंग रुजत राहिली. आणि पुढे भारत सरकारने फिल्म इन्स्टिटय़ूट काढण्याच्या उद्देशाने या सर्वगुणसंपन्न प्रभातनगरीची निवड केली. १९६० साली  FTII अस्तित्वात आले.

एका अदृश्य साखळीनं आपलं या अद्भुताशी नातं जडेल, हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. मी कधी चित्रपट तयार करेन अशी पुसटशी कल्पनाही माझ्या मनात आली नव्हती. आपण प्रवाहाबरोबर स्वत:ला वाहवत ठेवलं की सांदीकपारीतून वळणं घेत आपण इष्ट जागी पोहोचतो यावर विश्वास ठेवून वाहत होतो, इतकंच.

तर त्याचं असं झालं की.. कॉलेजमध्ये शिकत असतानाच सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करायला लागलो. आणि त्या टीममधली काही मंडळी फिल्म इन्स्टिटय़ूटची असल्यामुळे आपसूकच तिथं जाणं-येणं सुरू झालं. इथं ही लांब केसवाली, दाढीवाली मंडळी मख्ख चेहऱ्यानं इकडून तिकडं फिरतात, ती नक्की कोण आहेत, कुठून आली आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कोरलेल्या या कलाकारपणाच्या बुरख्याआड नक्की कोण श्वास घेतंय याचं गारूड खूप पटकन् तयार झालं. आपण न ऐकलेल्या कितीतरी शब्दांची, नावांची, संज्ञांची कारंजी चहूबाजूंनी थुईथुई नाचताना अनिमिष नेत्रांनी पाहत, ऐकत बसण्याचा तो काळ. तसंही मी कमी बोलतो. आणि त्यावेळी एका साध्या, सदाशिवपेठी, मध्यमवर्गीय, मराठी माध्यमातून आलेल्या मुलाला इंग्रजी बोलण्याचं, एखादा प्रश्न विचारण्याचं धारिष्टय़ तर अजिबातच नव्हतं. पण त्या सगळ्याविषयी एक गूढ आकर्षण मात्र तयार होत राहिलं.

माझा जवळचा मित्र सचिन कुंडलकर फिल्म इन्स्टिटय़ूटची परीक्षा देणार होता. तो म्हणाला, ‘मी एकटय़ानं परीक्षेला जाण्यापेक्षा तूही ये आणि माझ्याबरोबर परीक्षा दे.’ तेव्हा मी ‘हो’ म्हणालो आणि सहज जाता जाता एखाद्या विहिरीत डोकवावं तसं त्याच्याबरोबर परीक्षेला जाऊन आलो. आमची दोघांचीही निवड झाली आणि आम्ही रीतसर या सिनेमाच्या आखाडय़ात प्रवेश घेतला.

पुढच्या चार-पाच वर्षांचा काळ हा माझं पूर्ण आयुष्य उभ्याचं आडवं, तिरपं, तिरपागडं करणारा, भैसटून टाकणारा रंगीत काळ होता. पहिल्या दिवशी आत जाणारा मी आणि ‘गिरणी’ या आम्ही तयार केलेल्या डिप्लोमा फिल्मचं स्क्रीनिंग संपवून हॉस्टेलची ‘डी २६’ ही खोली रिकामी करून बाहेर पडणारा मी- या दोहोंमध्ये एका समुद्राचं अंतर होतं. आत जे मटेरियल गेलं ते बाहेर आलंच नाही. बाहेर जे काही आलं, त्यातलं आत काही गेलंच नव्हतं.

या सगळ्या काळात मी आणि ही वास्तू एकमेकांना हळूहळू ओळखत गेलो. इथली प्रत्येक जागा.. मोकळी, अडगळीची, चौकोनी, वक्राकार, अंधारी, टळटळीत.. ही सतत बदलणारी आणि तरीही तशीच असल्याचं भासवणारी जादूई आहे.

गेल्या गेल्याच डाव्या हाताचं विस्तृत मैदान, उजवीकडे जुन्या कौलारू राणा बंगल्याला वळसा घेऊन येणारं गर्ल्स होस्टेल, ट्रायपॉडपासून प्रत्येक लेन्सची काटेकोर काळजी घेणारं कॅमेरा डिपार्टमेंट, गेल्या शंभर वर्षांतल्या सिनेमाकलेच्या जगभरातल्या झंझावाती वादळानं नि:स्तब्ध, अवाक्, भयभीत, निर्मळ करणारं मेन थिएटर, प्रॉडक्शनची छोटी कार्यालये आणि भव्यदिव्य असा प्रभातकालीन धुळीनं माखलेला स्टुडिओ क्र.१, त्याच्यामागे असलेलं शांत, अबोल, जुना आणि नखरेल नवा असे साऊंड स्टुडिओज्, डावीकडे टुमदार डिरेक्टर बंगला, त्याच्यामागे रशियन मनाची लांब कॉरिडॉरची तीन मजली इमारत- त्यात टेलिव्हिजन स्टुडिओ, रजिस्ट्रार, डीन, शिक्षक यांची कार्यालये आणि तिसऱ्या मजल्यावर सदैव आळसावलेली सिनेपूर्णा लायब्ररी. या इमारतीच्या डावीकडे अलिप्त अ‍ॅक्टिंग स्टुडियो. मुख्य रस्त्यावर मग इकडे उजवीकडे गुळगुळीत फरशीचा धाकटा स्मार्ट स्टु्डिओ क्र. २. म्हणजे गावातल्या घराचा सेट लावायचा. तर स्टुडियो १ मध्ये आणि शहरातल्या घराचा असेल तर स्टुडियो २ मध्ये. त्यात द्विधा नाही. या दोन्ही स्टुडियोच्या मधल्या चिंचोळ्या भागातून पुढे गेल्यावर दिसणारी एडिटिंग डिपार्टमेंटची स्थितप्रज्ञ, संकोची इमारत. एकेक सीन, एकेक फ्रेम थांबत, थांबवत त्यावर चर्चा करत पाहता यावी यासाठीचं क्लासरूम थिएटर- उफळ. आणि त्याला लागून जुन्याजाणत्या वृक्षांचं एक जंगल में मंगल. त्या जंगलातून वाट काढत गेलं की अवतरतो शांताराम पाँड.. तोच- जिथे ‘संत तुकाराम’मधला वैकुंठगमनाचा प्रसंग चित्रित केला गेला. पुढे झाडांच्या फांद्यांनी ज्यावर नक्षीदार कनात आच्छादली आहे, तो पोहोण्याचा छोटेखानी तलाव. त्याच्या कडांच्या भिंतींना वेगवेगळ्या उंचीवर काचांचे चौकोन.. म्हणजे कॅमेरा बाहेर ठेवून पाण्याच्या आतलं चित्रीकरण करता येईल.

डावीकडे रात्री जिवंत होणारं आणि पक्ष्यांच्या आवाजांनी प्रात:काळी निद्राधीन होणारं मुलांचं वसतीगृह. अलीकडे जिथून कुणीही तुम्हाला निघा म्हणणार नाही असं कँटिन. एकेक चहा पीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच शॉट कसा घेता येईल याची हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा करण्याची इथल्या बाकांना असलेली जुनी खोड.

अशा ठोस आणि अनेक गुप्त, लपलेल्या सगळ्या स्थानांना कवेत घेणारं, फारसं अवडंबर न करता आब राखून बुद्धाचे स्मित आकळलेलं सदाबहार आंब्याचं झाड- ज्याला ‘विज्डम ट्री’ या नावानं अख्खं जग ओळखतं. या ‘विज्डम ट्री’खाली बसून तासन् तास, दिवस-रात्र, महिनोन् महिने, वर्षांनुवर्षे रंगलेल्या अनेक पिढय़ांतल्या विविध प्रेमळ, गूढ, नशिल्या, वाह्य़ात, हिंस्र चर्चाचं जर कुणी जसंच्या तसं शब्दांकन केलं असतं तर तो बहुभाषिक ग्रंथ अनाकलनीय असाहित्य म्हणून अभिजात तरी ठरला असता किंवा तुफान विनोदी म्हणून जगातील बेस्टसेलर तरी!

या विज्डम ट्रीखाली इथेच ऋत्विक घटक बसले होते. उत्तररात्रीपर्यंत मणी कौल, कुमार शाहनी आदी मंडळींसमोर त्यांनी प्रतिमेतील भारतीयत्वाची चिकित्सा केली होती. काही वर्षांनी मणी कौल त्यांच्या अवकाश-काळ तत्त्वाविषयीचा दृष्टिकोन रजत कपूर, अनुप सिंग यांच्यापुढे मांडत होते. आणि काही दशकांनी अनुप सिंग इथेच बसून हे मिझ ऑ सेन म्हणजे नक्की काय असतं, यासारख्या आमच्या प्रश्नांचं आदरातिथ्य करत होते.

अशा एकच नव्हे, तर सिनेमा समजून घेण्याच्या विविध मार्गाचं, पद्धतींचं, विचारधारांचं बहुपेडी, बहुस्तरीय वीण असलेलं वस्त्र इथे आपोआप विणलं जातं.

आता बाहेर पडून दीड दशकापेक्षा अधिक काळ गेल्यानंतर त्याकडे दुरून पाहताना हे जाणवतं, की सिनेमा शिकायला इथं आलेल्या प्रत्येकाला या वस्त्रातील धाग्यानं जोडलं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल, तर इथलं विचार करण्याचं स्वातंत्र्य. तुमचा विचार, तुमची कल्पना इथं नि:संकोच मांडता येते.. मग ती कितीही पांचट, विक्षिप्त, आततायी, गंभीर असो, एखादा भन्नाट शॉट घेण्याची असो, एखादी तिरपागडी रचना करण्याची असो किंवा दृश्य आणि ध्वनी यांची भलत्याच पद्धतीची मांडणी करण्याची असो.

नुसतं यावरच हे थांबत नाही, तर तुमच्या मनातील कल्पना इथे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहता येते, अस्तित्वात आणता येते. मग भले त्याची प्रशंसा होवो अथवा त्यावर टीका होवो. इथे मला कुणीही कधीही अमुक एखादी गोष्ट चूक आहे, असं सांगितलं नाही. इथल्या सगळ्या शिक्षकांना- ज्यातले बहुतेक इथेच शिकलेले होते- त्यांना हे माहीत होतं की, सिनेमा ही शिकवून  येणारी गोष्ट नाही. पण जर कलात्मक जाणिवांनी भारलेलं मुक्त वातावरण असेल आणि चुका करून पाहण्याची मोकळीक असेल तर सिनेमा शिकता येऊ शकतो.

कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉर एका भीतीला जन्म देतं. आणि भीतीयुक्त कलाकृती सत्यशोधनाच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नाही. याची जाण या वास्तूला आणि स्टुडिओ क्रमांक १ च्या मागे रात्री-अपरात्री डोळे ताणून पहारा देणाऱ्या घुबडाला आहे.

इथं मेन थिएटरमध्ये जगभरातले महत्त्वाचे सिनेमे आम्ही पाहिले. ज्यावेळी आजच्यासारखं पाहिजे तो सिनेमा एका बटनाच्या हुकुमाचा ताबेदार नव्हता, त्यावेळी कुठून कुठून महत्प्रयासानं मिळवलेल्या हजारो फिल्म्सच्या प्रिंट्स आम्हा विद्यार्थ्यांसाठी इथं तैनात होत्या. आता जयकर बंगल्याच्या आवारात दिमाखात उभ्या असलेल्या नॅशनल फिल्म अर्काईव्हची सुरुवात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्येच झाली.

कुरुसावा, केस्लोवस्की, तारकोव्स्की, ब्रेसॉं, सत्यजीत रे, मृणाल सेन, याच वास्तूत तरुण वयात सहकारी म्हणून ज्यांनी उमेदवारी केली ते गुरुदत्त, अरविंदन्, ओझू, फासबिंदर, क्युब्रिक, ओशिमा, किअरोस्तामी, झाबो अशा अनेक मास्टर फिल्म मेकर्सच्या फिल्म्स आम्हाला रोज संध्याकाळी दाखवल्या जात. एकच फिल्म पहिल्या वर्षी पाहताना जे वाटे त्याच्या कितीतरी वेगळा अनुभव तीच फिल्म दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पाहताना येत असे. प्रत्येक फिल्म झाल्यानंतर रात्री- बेरात्रीपर्यंत त्यावर बोलभांड चर्चा झडत. या सगळ्यांतून सिनेमामध्ये काय मांडलंय आणि ते कसं मांडलंय या दोन्ही गोष्टींचं महत्त्व आम्हाला जाणवायला लागलं. दिग्दर्शकाची शैली म्हणजे नेमकी काय भानगड आहे, ती कशी शोधायची, याच्या वाटा आम्ही धुंडाळू लागलो. सिनेमा ही दृकश्राव्य भाषा कशी आहे या संभ्रमविलासाची ती एक लागण होती. आपल्याला कलाकृतीतून नक्की काय आणि का मांडायचंय, आपला कलात्मक शोध कुठल्या जातकुळीचा आहे हे प्रश्न पडू लागले.

इथं भारतातल्या सर्व स्तरांतून, सर्व ठिकाणांहून आलेली मंडळी होती. त्यांचं अनुभवविश्व, जगण्याच्या, वागण्या-बोलण्याच्या पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी निरनिराळ्या होत्या. त्यांची राजकीय, सामाजिक, साहित्य, कला, संस्कृतीविषयीची धारणा भिन्न होती. त्यामुळे या सगळ्यांबरोबरच हे शिक्षणदिव्य व्यामिश्र आणि एकंदर जगण्याची समजूत बहुआयामी होण्यात झालं.

सिनेमा ही समूहकला आहे. त्यामुळे हे जग फक्त विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं नव्हतं, तर कार्पेंटरी विभागातील कामगार, पेंटर्स, लाइटिंग डिपार्टमेंट, फिल्म लॅबमधली मंडळी, कॉस्च्युम, कॅमेरा डिपार्टमेंट या सर्व विभागांतल्या मंडळींचा सक्रीय हातभार आमच्या या सिनेमा समजून घेण्याच्या प्रवासात होता. इन्स्टिटय़ूटमधला प्रत्येक घटक पुण्यातील ज्या विविध घरे-वाडे-इमारतींमध्ये आम्ही चित्रीकरण करत होतो ती पुणेकर मंडळी, आमची जवळची मित्रमंडळी हे सर्वजण आमचा प्रत्येक एक्सरसाईज परिपूर्ण होण्यासाठी आत्मीयतेने झटत होते. या सगळ्यांच्या विनाकिंतु अथक आधाराच्या बळावर ही सिनेमाची झिंग आम्ही निभावू शकलो.

विद्यार्थ्यांच्या इथे तयार होणाऱ्या कितीतरी फिल्म्सना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या फेस्टिव्हल्समध्ये दाखवण्यात आलं. त्यांची प्रशंसा झाली. त्यांना बक्षिसं मिळाली. यातील काही फेस्टिव्हल्समध्ये जाण्याची जेव्हा मला संधी मिळाली आणि जगभराच्या फिल्मस् पाहता आल्या तेव्हा या वास्तूची एकमेवाद्वितीयता ध्यानात आली.

जगातल्या फार मोठय़ा फिल्म स्कूलमध्ये या पद्धतीचा पाठिंबा विद्यार्थ्यांना लाभत होता. आपल्याोळकक  ची वर्णनं अनेक देशांतल्या विद्यार्थ्यांना आणि फिल्म मेकर्सना तोंडात बोटं घालायला भाग पाडत होती. आणि त्यामुळेच पुण्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात इतरत्र गेल्यावर ‘फिल्म इन्स्टिटय़ूट म्हणजे विद्यार्थ्यांचे खूप संप होतात तीच संस्था ना?’ अशी ओळख ऐकावी लागायची, लागते तेव्हा तोंडात बोटं घालण्याची पाळी माझी असते. ही आपल्या देशातील खूप महत्त्वाची संस्था आहे. आणि ती आपल्या महाराष्ट्रात, पुण्यात आहे. इतकंच नव्हे, तर आत्ताच्या हिंदी आणि प्रादेशिक, कलात्मक आणि तथाकथित व्यावसायिक फिल्म जगतातील आघाडीचे महत्त्वाचे कॅमेरामन, दिग्दर्शक, आर्ट डिरेक्टर, अभिनेते, अभिनेत्री, साऊंड रेकॉर्डिस्ट, एडिटर्स, मिक्सिंग इंजिनीअर्स या संस्थेने घडवले आहेत, हे कशा शब्दांत सांगायचं, हेच समजेनासं होतं.

अर्थात माणसासारखीच कुठलीच संस्था परिपूर्ण नसते. तिच्यात अनेक चढउतार, साचून राहिलेल्या, दरुगधी येणाऱ्या, अडेलतट्टू, विरोधाभासी, कमकुवत गोष्टी असतील.. असणारच. पण निव्वळ त्याचेच दाखले देऊन तिला जोखण्याचा खुळेपणा कुठलाही विवेकी माणूस करणार नाही.. करू नये.

माझ्यासारख्या साध्या, मराठी घरातून आलेल्या, दूरदूपर्यंत सिनेमाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या मुलाला ज्या संस्थेनं घडवलं, तिला या साठाव्या वर्षीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

माझे सर्वात ज्येष्ठ मित्र उस्ताद सईदुद्दिन डागर म्हणत की, मी विसाव्या वर्षी गाणं शिकायला सुरुवात केली. चाळीसाव्या वर्षी मी पहिल्यांदा लोकांसमोर गायलो. आणि साठाव्या वर्षी मला कळायला लागलंय, की गाणं म्हणजे नक्की काय आहे. त्यामुळे आता ही संस्था कळत्या वयाची झाली आहे. तिला दीर्घायुष्य लाभो. तिची साठी बुद्धी नाठी न होवो व तिच्यातील सत्त्व टिकून राहो, हीच सदिच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 4:24 am

Web Title: umesh vinayak kulkarni ftii filmmaking experience abn 97
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : चष्मा
2 विश्वाचे अंगण : ठाव अंतरीचा..
3 अनुवादात घोळ
Just Now!
X